सांजपर्णी शामल धुक्याला
फुटते सोनल भाषा
विझत्या ढगात रूजता
रेंगाळती प्रकाश रेषा
हळुवार अलगद दुरवर
अंबर विझत कलते
रातीचे चांदण अत्तर
अवकाशी बहरून फुलते
निळ दाटते नभातुन
धरतीवर साज निळा
हवा मुक वाहते
मिलनाच्या मुक कळा
चंद्रोदयाच्या घडीला
पाखरात उठते हूल
बिलगत असता फांदिला
एक सुगंधी भुल
नजर पसरते अगाध
शोधते तुला दुर
सांज ओढून घेते
रातभयाचा नूर
पक्षी बघ निघाला!
घेवून माझे शब्द
तुझ्या नजरदिव्यातुन
जळे कवितेचे प्रारब्ध
मी खरेच आलिप्त असता
पक्षांना मिलनाचे पंख
मी उजवून घेतो बाहू
सजवत मिठीचे डंख
सांजघडीला सजनी
तु पेटवत चांदण दिवे
दुर हाकारत असते
जमल्या प्रतिक्षेचे थवे
ही गडद निळाई नभाची
नित्य खोल साचते
कोण चांदण नजरेने
निळी कविता वाचते?
मी बुडवून सारे शब्द
चालत निघतो दुर
का येतो ऊंच आभाळी
निळ्या चांदण्यांना महापूर.....
(Pr@t@p)
"रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com
(०२ नोव्हेंबर २०२१)