स्पर्धा परीक्षेची बखर: 'मी' ते अधिकारी ...एक आठवणींचे मोरपीस
भाग 13 :बिन पावसाचा भरकटणारा ढग !!
आपण ध्येय ठरवतो, एकांताच्या अनंत पोकळीत व परिस्थितीच्या रेट्यात ते प्राप्त झाल्याचे स्वप्नही पाहतो, आणी मनोराज्य करून काही क्षणच ते स्वप्न जगतो, आणी नंतर विसरून जातो. परिस्थिती शरण होवून चालत राहतो, एवढ्या अल्प काळासाठी त्यांना जवळ करून जर आपल्याच स्व्प्नांना आपण पोरके केले तर ते जगतील कसे? त्यांना जोजवावे लागते, त्याचे लालनपोषण करावे लागते, त्यांना अस्तित्वात आणण्यासाठी त्यांचे पालकत्व घ्यावे लागते. संकटाच्या काळात त्यांना पाठीशी घेवून झुंज द्यावी लागते, करावे लागते युध्द पराभव अंताचे . भळभळणा-या जखमांना येथे स्वतःच दुरूस्त करून घ्यावे लागते, अन्यथा अपयशाच्या अरण्यात अश्वत्थाम्यासम अनाथ रुदन नशिबी येते. त्रास होतो स्वप्न अस्तित्वात येताना पण त्यांच्या पुर्तिचा आनंद शब्दात मांडता येत नाही.ती अनुभूतीच एवढी श्रेष्ठ आहे की सगळे दुःख, वेदना,यातना यांची क्षणात फुले होतात.पण ती फुले येण्यासाठी काटे जोजवावे लागतात अगोदर....
माझे बि ए तृतीय वर्ष सुरू झाले. मी काॅलेजला जाऊ लागलो. पण आता काॅलेज मधे मन लागेल असे काही ऊरले नव्हते. एकतर ते खुप दुर होते...आणी ते जास्तच दुर वाटेल अशा घटनांनी मला वेढले होते. पण तेथे उपस्थिती अनिवार्य असल्याने नाईलाजाने जावे लागत होते. सकाळी लवकर काॅलेज असल्याने काहीच न खातापिता काॅलेजला जाणे नित्याचे झाले. धावत पळत येवून, मोठ्या भावाने केलेला किंवा केला नसेल तर तो मिळून करून कसेबसे खाऊन धावत पळत अरूण भैय्याच्या रूमवर जात होतो. त्यांचा चाललेला अभ्यास पाहून मला ऊगीचच फुरफुरल्या सारखं व्हायचे. पण माझी लिंबूटिंबू सारखी अवस्था होती. माझी धावपळ पाहून माझा वर्गमित्र सचिन आडाणे(राष्ट्रीय ख्यातीचा बास्केटबॉल खेळाडू, सध्याच्या क्रिडा शिक्षक) याने त्याची जुनी एक सायकल वापरायला दिली. ती मी काही दिवस वापरली. थोडी वेळेची बचत होत होती. दिवस झपाट्याने चालले होते. तांदळे सर , अरूण पोतदार व प्रविण शेळके तेथे खुप अभ्यास करायचे. पण अत्यंत गांभीर्याने तो करताना तांदळेसर दिसायचे. ते गेलेल्या पुर्वीच्या अॅटेम्प्ट बद्दल फार कळवळून सांगायचे त्यांची तळमळ जास्त बेचैन करायची, वाटायचे किती अपार दुःख होते निकाल गेल्यावर..!! स्पर्धा परीक्षेचे तिन टप्पे, तुम्ही कुठल्याही टप्प्यावर नापास झाले की, पुन्हा पहिल्या पासून सुरूवात..सापशिडीचा खेळ नुसता..संपेल आत्ता हा टप्पा म्हणून थोडेही गाफील राहिले की अपयशाचा साप तोंड वासून ऊभाच असतो म्हणजे तुम्ही नव्याण्णव वरून थेट एकवर...!! त्या सर्व सिनियर मुळे "सदैव सज्जता" हे स्पर्धा परीक्षेचे ब्रीद मनात ठसले. अरूण पोतदार यांच्यामुळे संदर्भ साहित्याची माहिती मिळू लागली. पण हवे ते गांभीर्य अजून यायचे होते मला...
आता हळूहळू गावाचा विसर पडत होता. तिकडे येणे जाणे ही कमी झाले होते. आईवडिल एकीकडे आम्ही एकीकडे असे झाले होते. त्यांची काय अवस्था होत असेल हा विचार येवून व आपण आज पर्यंत काहीच का नाही केले यावरून नुसता त्रागा व्हायचा, स्वतःलाच रागे भरून घ्यायचो, पण माझ्यातील मीच मला नाईलाजाने समजवायचो...डिग्री तर पुर्ण होऊ दे.... कारण स्वप्न माझे होते..त्याच्या वेदना मला सहन करायच्याच होत्या...हे असे ओझे होते की त्याचा भार मी माझ्या शिवाय कोणालाच देवू शकत नव्हतो. लहान भाऊही आता, त्याच काॅलेज मधे शिकत होता. वादविवाद स्पर्धेत महाराष्ट्रात महाविद्यालयाचे नाव वाढवत होता. त्याचा अभिमान वाटायचा, कारण दहावी पर्यंत तो बाजुच्या गावात शिकला होता. चालत जात असल्याने, त्याला एक जुनी सायकल घरच्यांनी घेतली होती, त्या वेळी इतर मुलभुत बाबीही मिळायची मारामार...आम्ही सारेच या शिक्षणामुळे खुप काही भोगत होतो.... गेल्या वर्षी काॅलेज मधे आम्हाला नविन दोन सर शिकवायला आले होते. दोघेही प्रचंड हुशार !! दहिफळे सर राज्यशास्त्र,तर बैनाडे सर लोकप्रशासन शिकवायचे.यांच्यापैकी बैनाडे सर औरंगाबाद वरून आले होते.त्यांना MPSC चे बैकग्राउंड होते. वर्गात ते MPSC चा संदर्भ देवून शिकवायचे, त्यामुळे MPSC ची धुगधुगी माझ्या मनात सतत मेंटेन होत होती. पण आता वर्गात ती दिसणार नाही असाच मी वागत होतो. पण चुकून एकदा माझ्या तोंडून ऊत्तर देताना जास्तीची माहिती निघालीच!! सरांनी तात्काळ मला क्राॅस केले, "बाकी जास्तीचे काही सांगु नको , मला माहित आहे" म्हटले...वर्गात खसखस पिकली. मी खाली मान घालून बसलो. अपमान जिव्हारी लागला. बैनाडे सरांनाही ते ठळकपणे जाणवले...त्यांना वाईट वाटले. त्यांनी ते ज्या हाॅस्टेलवर राहत होते तेथे भेटायला सांगितले, मी गेलो..सरांना भेटलो..अत्यंत अनौपचारिक पध्दतीने त्यांनी माझा उत्साह वाढवला..स्पर्धा परिक्षा हे करिअर हातातुन सुटत जाताना त्या कॅन्डिडेटला काय वाटते याचा प्रत्यय तेथे आला...त्यावरून क्षणीक परिस्थिती सुधारण्यासाठी आपण दिर्घ दुःखी व्हायचे नाही असे मी ठरवले....मी एमपीएससी करण्यासाठी अजुन दृढ होत चाललो होतो...
परिक्षा जवळ येत चालली होती. अभ्यास टिपेला पोहचला होता. सगळे सिनियर जिव तोडून अभ्यास करत होते. मला अभ्यासाचे गांभीर्य कळू लागले. परिक्षेचा दिवस उगवला.मी थर्ड इअर पुर्ण नसतानाही अनुभव म्हणून फाॅर्म भरला होता. प्रत्येकजण आपापल्या सेंटर वर गेले. तांबे सरांच्या क्लासवरील सिनीयर्स पण तेथे भेटले. सर्वजण गंभीर होते. सेंटर वर ज्यांना MPSC चा गंधही नव्हता ते जास्त काॅन्फिडन्स मधे दिसत होते.तर जे सिरीयस कॅन्डिडेट होते ते गंभीर!! वर्गात गेलो. पेपर पाहीला. त्यातील बहुतांश प्रश्न ओळखीचे वाटत होते. पण भरपूर प्रश्न असेही होते जे अभ्यासातील उणीव दाखवून देत होते. पेपर सोडवला. धावत पळत अरूण भैय्याच्या रूम वर आलो. आल्यावर पाहिले, सिनीयर्स उत्तरे शोधत होते.(तो काळच असा होता, त्यावेळी ना वेबसाईट, ना मोबाईल, ना यु ट्यूब, ना व्हाट्सअॅप,ना टेलिग्राम चॅनेल. जाहिरात पेपर मधे यायची, हाताने फार्म भरून पोस्टात टाकायचा, पोस्टाने हाॅलटिकीट येणार, पुर्वपरीक्षेचा निकाल कलेक्टर ऑफिसला फॅक्स रूपात यायचा. त्यामुळे आन्सर की पण स्वतःच शोधावी लागायची. जेवढे सापडले उत्तरे तेवढाच पेपर तपासून व्हायचा. मग न सापडलेल्या उत्तरासाठी आगामी "स्पर्धा परीक्षा " या मासिकाच्या अंकाची वाट पहायची नाहीतर पुणे, औरंगाबाद येथील क्लास किंवा कृषी विद्यापिठातील आन्सर की मिळवण्याची धडपड करायची. ती मिळाली की आन्सर की नुसार बरोबर आलेल्या उत्तरांची संख्या कमी जास्त व्हायची.निकाल लागेपर्यंत जिव टांगणीला रहायचा. तो कधी लागेल हे पण माहिती नसायचं) त्यावेळी 200 मार्क्स चा एकच पेपर राज्यसेवा पुर्व परिक्षेसाठी असायचा, व 170 च्या मागे पुढे कटऑफ असायचा. सगळ्याची उत्तरे तपासून झाली. सगळ्यात कमी माझे बिट होते. 132 फक्त!! मला निकाल नाही येणार या बद्दल वाईट वाटत होते.(तसा येऊन तरी मी थोडाच मुख्य परिक्षा देवू शकत होतो) पण माझ्या अभ्यासाची पातळी उंचावली आहे याचे आत्मभान मला त्यामुळे आले, मला अजून किती अभ्यास करायचा आहे याचा अंदाज आला.आणी आपण या परीक्षेला सामोरे जाऊ शकतो हे समजले.. लातूर मधे साधारणतः मुख्य परिक्षे साठी कुठलीच मुले थांबत नसत, ते सरळ पुणे किंवा औरंगाबादला जायचे . तांदळेसर व मी वगळता प्रत्येकाला लातूर सोडायला संधी होती. मी अधून मधून तांबे सरांच्या क्लास कडे पण जाऊन येत होतो. तेथे काय सुरू आहे हे ही पाहत होतो.सगळेजण अभ्यासासाठी परेशान असायचे....कोंडी मात्र फुटत नव्हती.जणू काळाचा गुंता झाला होता.पुर्वपरिक्षे नंतर अरूण भैय्या लातूर मधे थांबले नाहीत...तांदळेसर राहिले फक्त...सुगीचे दिवस सरल्यास पाखरांचे थवे निघून जातात आणी रानात एखादे बाभळीचे झाड एकटेच ऊभे रहावे अशी अवस्था झाली होती...माझी...
रूमवर थांबत होतो. तेथे प्रदिप इके (सध्या महाराष्ट्र अकॅडमी चा संचालक, पुण्यातील सध्याचा नामांकित एमपीएससी मार्गदर्शक )हा रहायला आला. तो ही एकदम खेड्यातून आलेला होता. त्याच्या मागोमाग लहू भोसले व त्याचा चुलत भाऊ भुजंग भोसले हे ही रहायला आले. हे ज्युनिअर मुले पण स्वप्नाचं गाठोडं घेवून शहराकडे अपेक्षेने निघणा-या रांगेतील सहप्रवाशी...आम्ही सगळे एकमेकांशी जुळवून रहायचो..गावाकडील खबरबात कधीतरी मिळायची..सणासुदीला कोणाकडून तरी डबा यायचा..आलेच कधी घरून कोणी तर घरचं जेवण...कधिकधी हे सोबती त्यांच्या गावाकडे जावून यायचे..मी मात्र तेथेच पाण्याने वेढलेल्या बेटा सारखा..अनंत प्रवाह झेलत...!! आई बिचारी गावाकडे कुढायची..वडील झगडत रहायचे..आम्ही सगळेच परिस्थितीशी दोन हात करत होतो जेथे आहोत तेथे राहून! मी तिकडे अभ्यासासाठी मरमर फिरायचो.. तर गावात इकडे काही अर्धवट रावांनी पोरं बिघडले आहेत बि ए साठी कधी रूम करावी लागते का? मुलं आईबापाला मूर्खात काढत आहेत अशी बदनामी (की किर्ती) चालवली....वडील कधि बोलायचे नाहीत पण येवून अंदाज घ्यायचे आमचा....आणी चार सुज्ञपणाच्या गोष्टी सांगून अभ्यास करत रहा म्हणून आम्हाला सांगायचे... सहा सहा महिन्याचे रूमचे भाडे थकल्याने जिव मेटाकुटीस यायचा.
परिक्षा झाली होती, गांभीर्याने अभ्यास करणारा ग्रुप जागेवर नव्हता. मी काॅलेजला जात होतो. पण मन सदैव बेचैन असायचे. काही नविन मित्र झाले. त्यापैकी एक म्हणजे दिपक बाभळसुरे. त्याचे इंटरनेट कॅफे काॅलेजच्या रोडवर होते व घर माझ्या रूम च्या रस्त्यावर. त्याची गजा मुळे ओळख झाली. मग ऊगीचच मी कॅफेवर जाऊन बसू लागलो. तो ही येता जाता रूमसमोर येवून आवाज द्यायचा. मी जात रहायचो.. रिती अवस्था नुसती..
बि ए तृतीय वर्षाची परिक्षा जवळ आली..पुन्हा गजा रूमवर यायला सुरूवात झाली. मग तेच..नोट्स, झेराॅक्स, परिक्षा...इत्यादी.. मी अभ्यास करून परिक्षा दिली..आणी दुस-याच दिवसा पासून एमपीएससीच्या अभ्यासासाठी तगमग सुरू झाली...तांबे सरांनी आता व्यावसायिक स्तरावर क्लास सुरू केले होते...पण मी तेथे जाऊन काय करणार होतो...मी रूम च्या आसपास राहू लागलो..तिकडे तांबे सरांच्या क्लास मधे धनवंतकुमार माळी सर (पुर्विचे शिक्षक, अत्यंत जिद्दी स्पर्धक , दररोज नोकरी करून औसा या तालूक्याच्या ठिकाणी येवून मग नंतर क्लासला येणारे, तरीही क्लास मधे सर्वाधिक मार्क घेणारे, माझ्या अगोदर राज्यसेवेची परिक्षा दिलेले , पण माझ्या नंतरच्या अॅटेम्प्टला प्रथम नायब तहसीलदार व नंतर महाराष्ट्रात एमपीएससी च्या यादीत अव्वल क्रमांकाने पास होऊन उपमुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर निवड होऊन अभ्यास सातत्याने कसा करावा याचे व नोकरी करत करत अभ्यास कसा करावा याचे रोलमाॅडेल ठरलेले) ,लहान असुनही सचोटीने अभ्यास करून नंतर सिलेक्शनच्या यादीत आलेला अतुल कुलकर्णी ( एक उत्कृष्ट कवी, चांगला स्पर्धक व व्यक्ती, सध्या कक्ष अधिकारी - मंत्रालय) यांची नावे समजली..इतर मुले ही अभ्यास करत होती. त्यात प्रकर्षाने माहिती झालेले नाव म्हणजे प्रकाश कुलकर्णी सर ( अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून आलेले, उत्कृष्ट गायक असणारे, अत्यंत सज्जन व्यक्ती ,माझे काॅलेजचे सिनियर , युपिएससी मधे धडपडणारे,नंतरच्या राज्यसेवेच्या अॅटेम्प्टला ऊपजिल्हाधिकारी संवर्गात सहज निवड होऊ शकेल इतपत उत्कृष्ट मार्क येवूनही निव्वळ त्या वर्षिच्या जाहिरातीत केवळ 78 एवढ्याच पोस्ट असल्याने त्या ऊपलब्ध पोस्ट पैकी उपअधिक्षक भुमि अभिलेख झालेले, मात्र नंतरच्या काळात सहा. आयुक्त (विक्रिकर) म्हणून निवड झालेले, एक अनुकरणीय व्यक्तीमत्व) यांची नावे कळायला सुरूवात झाली. ते चांगली तयारी करतात हे कानावर येवू लागले.लातूर मधे हळुहळु MPSC बाबत प्रयत्न सुरू झाले होते. माझी बि ए तृतीय वर्षाची परिक्षा संपल्याने मी रिकामा झालो होतो, लातूर मधेच थांबलो होतो.आणी जाण्यासारखं कोणतं ठिकाण तरी होतं मला? काही मुलंमुली आवश्यकते प्रमाणे पुण्याला क्रॅश कोर्स साठी जायचे. आणी परत येवून अभ्यास करायचे. पण माझ्या आर्थिक मर्यादा असल्याने मी कुठेच जाऊ शकत नव्हतो. माझी अवस्था चिखलात रूतलेल्या बैलगाडीसारखी झाली होती...जायचं आहे..धडपड ही सुरू आहे..पण जो जो निघावे.. तो तो रूतत जावे जास्त खोल अशी....
त्या उन्हाळ्याच्या सुट्टीत मी काय केले....???? जसा बिन पावसाचा ढग भर दुपारी आकाशात भरकटत असतो तसा भरकटत राहिलो...नाही म्हणायला तांदळेसरांना माझ्या परिस्थितीचा थोडा अंदाज आला होता. पण ते दररोज आपल्या नोकरीला जायचे..अरूण भैय्याही गेले निघून, तांबे सरांचे क्लास ही तेथुन निघुन गेले, ज्या काॅलेज मधे गेली पाच वर्ष शिकलो, आयुष्य घडवणा-या विविध घटना जगलो, ते काॅलेजही संपले...आता तिथेही बदल... रित्या क्षणांची दिर्घ मालिका..वेढलेल्या गर्दितही तळमळणारे एकाकीपण ......दिशाहीन प्रवास..जायची तळमळ खुप पण काहिच जुळून न येणारे...अवकाळी पाऊस तरी अचानक येतो, धांदल ऊडवतो पण तो येवून गेला की सुखद वाटते....तसं काही अवचित घडावं असं ही काही नाही..निरंतर तेच ते सुर्य उगवणे...मावळणे..रात्र होणे आणी उजाडणे.... मी मात्र आस घेवून त्या नवसुर्याची ..निःशब्द चालत होतो दिशाहीन कधी पावलांना टाकत तर कधी पावलांनी पुढे ओढल्याने...या सुट्ट्यात मी आत्मचिंतन केले, अनंत विचार केले...मनोराज्य केले..स्वप्न पाहीली, ते वास्तवात येत नाहीत म्हणून..त्यांना शिव्याही घातल्या..मुका मुका आकांत नुसता...काय करू काय नको नुसती तगमग नियती माझी सत्वपरीक्षा घेत होती जणू...आणी मी त्याच त्या अवस्थेला कंटाळलो असल्याने बदल माझी वाट पाहत दबा धरून बसला होता..तो योग्य वेळी माझ्यावर झडप घालणार होता ..आणी फरफटत नेणार होता मला....त्या क्षणा पर्यंत..ज्या क्षणाला मी टाचा रोवून थांबणार होतो, आणी बदलाला अंगावर झेलून त्यालाच भिडून, त्या बदलालाच बदलण्यासाठी निकराची झुंज देणार होतो...आणी त्यालाच फरफटत नेणार होतो स्वप्नपुर्तिच्या टप्प्यावर..युध्दाचे ढग जमु लागले होते... आणी येणारे दररोजचे सुर्य उजाडण्या अगोदरच शंखनाद करणार होते....आणी मीही लढायच्या आणी भिडायच्या टप्प्याकडे नकळत निघालो होतो....(क्रमशः)
(प्रताप)