Saturday, July 31, 2021

चांद घडीचा शकून...

शब्दांच्या अंतःकरणी 
ध्यान कुणाचे लागे
जोडण्या तुला मी...
हात कुणाचे मागे?

माग कुणाचा काढत
मन निघे अनवाणी 
फुलकळ्याच्या खोल 
आतवर सुगंध ओल्या धुनी

हाक दाटले डोळे
आणिक कटाक्षाची दिक्षा
तुझ्या क्षणांना अनंत ...
द्यावी प्रतिक्षेची भिक्षा

चांदघडीचा शकून साजे
हवेस हुरहुर वाटे
रात एकल्या एकटवेळी
सय कुणाची दाटे?

रात झडीचे थेंब घेउनी
पाऊस असा का पडे?
मातीच्या काळजावर
हलक्या थेंबाचे ओरखडे

बहर असा हा उठवत जाई
मृत फुलांच्या राशी
गंध कुणाचा भटकत राही
माझ्या एकांताच्या पाशी?

थेंब जणू की अत्तर अत्तर 
सागर हो सुगंधी...
दे हाकारा!....स्वतःवरली
उठवून दे तु बंदी!

सांजप्रहरी सागर गाई
पावसाची गीते
घेवून नदीच्या अंतरातील
पात्र...भरले...रिते...!
(Pr@t@p)
"रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com 
31/7/2021

Sunday, July 25, 2021

नदीचे प्रारब्ध.....

भरून ओथंब येत्या 
घन सावळ्या मेघा
भरून घे ओंजळीत 
पडलेल्या तृष्ण भेगा

देवून जा सरीची
चिंब ओली धुन
फांदीवर चंद्र गोंदुनी
दे त्याला हिरवी खुण

वाहत्या नदीस भेटे
मातीचे ओघळ गाणे
भिजपावसी तृष्ण
झाडाची हिरवी पाने

झर सरीचा पाऊस 
मनास ओल फुटते
काळीज नदीचे अवखळ 
हर वळणावर तुटते

दाटून येता ढग
हवेस कसली व्यथा?
तो घेवून पुन्हा झडतो 
वाहून गेली कथा

मातीला कसला गंध
सर कोणती झरते?
वाहून सारे पाणी
ढगात व्यथा उरते

कंप दाटली फांदी
थेंबाचे घेईल उखाणे
ओघळेल मातीत तो
मग समर्पणी सुखाने

तो वाहील तो पाहील
तो न बोलेल शब्द
शोधेल सागराच्या अंतरी 
तो नदीचे प्रारब्ध....
(Pr@t@p)
"रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com 
25/6/2021

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...