Thursday, November 8, 2018

स्पर्धा परीक्षेची बखर: 'मी' ते अधिकारी ...एक आठवणींचे मोरपीस भाग 13 :बिन पावसाचा भरकटणारा ढग !!

स्पर्धा परीक्षेची बखर: 'मी' ते अधिकारी ...एक आठवणींचे मोरपीस

भाग 13 :बिन पावसाचा भरकटणारा ढग !!



          आपण ध्येय ठरवतो, एकांताच्या अनंत पोकळीत व परिस्थितीच्या रेट्यात ते प्राप्त झाल्याचे स्वप्नही पाहतो, आणी मनोराज्य करून काही क्षणच ते स्वप्न जगतो, आणी नंतर विसरून जातो. परिस्थिती शरण होवून चालत राहतो, एवढ्या अल्प काळासाठी त्यांना जवळ करून जर आपल्याच स्व्प्नांना आपण पोरके केले तर ते जगतील कसे? त्यांना जोजवावे लागते, त्याचे लालनपोषण करावे लागते, त्यांना अस्तित्वात आणण्यासाठी त्यांचे पालकत्व घ्यावे लागते. संकटाच्या काळात त्यांना पाठीशी घेवून झुंज द्यावी लागते, करावे लागते युध्द पराभव अंताचे . भळभळणा-या जखमांना येथे स्वतःच दुरूस्त करून घ्यावे लागते, अन्यथा अपयशाच्या अरण्यात अश्वत्थाम्यासम अनाथ रुदन नशिबी येते. त्रास होतो स्वप्न अस्तित्वात येताना पण त्यांच्या पुर्तिचा आनंद शब्दात मांडता येत नाही.ती अनुभूतीच एवढी श्रेष्ठ आहे की सगळे दुःख, वेदना,यातना यांची क्षणात फुले होतात.पण ती फुले येण्यासाठी काटे जोजवावे लागतात अगोदर....

माझे बि ए तृतीय वर्ष सुरू झाले. मी काॅलेजला जाऊ लागलो. पण आता काॅलेज मधे मन लागेल असे काही ऊरले नव्हते. एकतर ते खुप दुर होते...आणी ते जास्तच दुर वाटेल अशा घटनांनी मला वेढले होते. पण तेथे उपस्थिती अनिवार्य असल्याने नाईलाजाने जावे लागत होते. सकाळी लवकर काॅलेज असल्याने काहीच न खातापिता काॅलेजला जाणे नित्याचे झाले. धावत पळत येवून, मोठ्या भावाने केलेला किंवा केला नसेल तर तो मिळून करून कसेबसे खाऊन धावत पळत अरूण भैय्याच्या रूमवर जात होतो. त्यांचा चाललेला अभ्यास पाहून मला ऊगीचच फुरफुरल्या सारखं व्हायचे. पण माझी लिंबूटिंबू सारखी अवस्था होती. माझी धावपळ पाहून माझा वर्गमित्र सचिन आडाणे(राष्ट्रीय ख्यातीचा बास्केटबॉल खेळाडू, सध्याच्या क्रिडा शिक्षक) याने त्याची जुनी एक सायकल वापरायला दिली. ती मी काही दिवस वापरली. थोडी वेळेची बचत होत होती. दिवस झपाट्याने चालले होते. तांदळे सर , अरूण पोतदार व प्रविण शेळके तेथे खुप अभ्यास करायचे. पण अत्यंत गांभीर्याने तो करताना तांदळेसर दिसायचे. ते गेलेल्या पुर्वीच्या अॅटेम्प्ट बद्दल फार कळवळून सांगायचे त्यांची तळमळ जास्त बेचैन करायची, वाटायचे किती अपार दुःख होते निकाल गेल्यावर..!! स्पर्धा परीक्षेचे तिन टप्पे, तुम्ही कुठल्याही टप्प्यावर नापास झाले की, पुन्हा पहिल्या पासून सुरूवात..सापशिडीचा खेळ नुसता..संपेल आत्ता हा टप्पा म्हणून थोडेही गाफील राहिले की अपयशाचा साप तोंड वासून ऊभाच असतो म्हणजे तुम्ही नव्याण्णव वरून थेट एकवर...!! त्या सर्व सिनियर मुळे "सदैव सज्जता" हे स्पर्धा परीक्षेचे ब्रीद मनात ठसले. अरूण पोतदार यांच्यामुळे संदर्भ साहित्याची माहिती मिळू लागली. पण हवे ते गांभीर्य अजून यायचे होते मला...

          आता हळूहळू गावाचा विसर पडत होता. तिकडे येणे जाणे ही कमी झाले होते. आईवडिल एकीकडे आम्ही एकीकडे असे झाले होते. त्यांची काय अवस्था होत असेल हा विचार येवून व आपण आज पर्यंत काहीच का नाही केले यावरून नुसता त्रागा व्हायचा, स्वतःलाच रागे भरून घ्यायचो, पण माझ्यातील मीच मला नाईलाजाने समजवायचो...डिग्री तर पुर्ण होऊ दे.... कारण स्वप्न माझे होते..त्याच्या वेदना मला सहन करायच्याच होत्या...हे असे ओझे होते की त्याचा भार मी माझ्या शिवाय कोणालाच देवू शकत नव्हतो. लहान भाऊही आता, त्याच काॅलेज मधे शिकत होता. वादविवाद स्पर्धेत महाराष्ट्रात महाविद्यालयाचे नाव वाढवत होता. त्याचा अभिमान वाटायचा, कारण दहावी पर्यंत तो बाजुच्या गावात शिकला होता. चालत जात असल्याने, त्याला एक जुनी सायकल घरच्यांनी घेतली होती, त्या वेळी इतर मुलभुत बाबीही मिळायची मारामार...आम्ही सारेच या शिक्षणामुळे खुप काही भोगत होतो.... गेल्या वर्षी काॅलेज मधे आम्हाला नविन दोन सर शिकवायला आले होते. दोघेही प्रचंड हुशार !! दहिफळे सर राज्यशास्त्र,तर बैनाडे सर लोकप्रशासन शिकवायचे.यांच्यापैकी बैनाडे सर औरंगाबाद वरून आले होते.त्यांना MPSC चे बैकग्राउंड होते. वर्गात ते MPSC चा संदर्भ देवून शिकवायचे, त्यामुळे MPSC ची धुगधुगी माझ्या मनात सतत मेंटेन होत होती. पण आता वर्गात ती दिसणार नाही असाच मी वागत होतो. पण चुकून एकदा माझ्या तोंडून ऊत्तर देताना जास्तीची माहिती निघालीच!! सरांनी तात्काळ मला क्राॅस केले, "बाकी जास्तीचे काही सांगु नको , मला माहित आहे" म्हटले...वर्गात खसखस पिकली. मी खाली मान घालून बसलो. अपमान जिव्हारी लागला. बैनाडे सरांनाही ते ठळकपणे जाणवले...त्यांना वाईट वाटले. त्यांनी ते ज्या हाॅस्टेलवर राहत होते तेथे भेटायला सांगितले, मी गेलो..सरांना भेटलो..अत्यंत अनौपचारिक पध्दतीने त्यांनी माझा उत्साह वाढवला..स्पर्धा परिक्षा हे करिअर हातातुन सुटत जाताना त्या कॅन्डिडेटला काय वाटते याचा प्रत्यय तेथे आला...त्यावरून क्षणीक परिस्थिती सुधारण्यासाठी आपण दिर्घ दुःखी व्हायचे नाही असे मी ठरवले....मी एमपीएससी करण्यासाठी अजुन दृढ होत चाललो होतो...

                परिक्षा जवळ येत चालली होती. अभ्यास टिपेला पोहचला होता. सगळे सिनियर जिव तोडून अभ्यास करत होते. मला अभ्यासाचे गांभीर्य कळू लागले. परिक्षेचा दिवस उगवला.मी थर्ड इअर पुर्ण नसतानाही अनुभव म्हणून फाॅर्म भरला होता. प्रत्येकजण आपापल्या सेंटर वर गेले. तांबे सरांच्या क्लासवरील सिनीयर्स पण तेथे भेटले. सर्वजण गंभीर होते. सेंटर वर ज्यांना MPSC चा गंधही नव्हता ते जास्त काॅन्फिडन्स मधे दिसत होते.तर जे सिरीयस कॅन्डिडेट होते ते गंभीर!! वर्गात गेलो. पेपर पाहीला. त्यातील बहुतांश प्रश्न ओळखीचे वाटत होते. पण भरपूर प्रश्न असेही होते जे अभ्यासातील उणीव दाखवून देत होते. पेपर सोडवला. धावत पळत अरूण भैय्याच्या रूम वर आलो. आल्यावर पाहिले, सिनीयर्स उत्तरे शोधत होते.(तो काळच असा होता, त्यावेळी ना वेबसाईट, ना मोबाईल, ना यु ट्यूब, ना व्हाट्सअॅप,ना टेलिग्राम चॅनेल. जाहिरात पेपर मधे यायची, हाताने फार्म भरून पोस्टात टाकायचा, पोस्टाने हाॅलटिकीट येणार, पुर्वपरीक्षेचा निकाल कलेक्टर ऑफिसला फॅक्स रूपात यायचा. त्यामुळे आन्सर की पण स्वतःच शोधावी लागायची. जेवढे सापडले उत्तरे तेवढाच पेपर तपासून व्हायचा. मग न सापडलेल्या उत्तरासाठी आगामी "स्पर्धा परीक्षा " या मासिकाच्या अंकाची वाट पहायची नाहीतर पुणे, औरंगाबाद येथील क्लास किंवा कृषी विद्यापिठातील आन्सर की मिळवण्याची धडपड करायची. ती मिळाली की आन्सर की नुसार बरोबर आलेल्या उत्तरांची संख्या कमी जास्त व्हायची.निकाल लागेपर्यंत जिव टांगणीला रहायचा. तो कधी लागेल हे पण माहिती नसायचं) त्यावेळी 200 मार्क्स चा एकच पेपर राज्यसेवा पुर्व परिक्षेसाठी असायचा, व 170 च्या मागे पुढे कटऑफ असायचा. सगळ्याची उत्तरे तपासून झाली. सगळ्यात कमी माझे बिट होते. 132 फक्त!! मला निकाल नाही येणार या बद्दल वाईट वाटत होते.(तसा येऊन तरी मी थोडाच मुख्य परिक्षा देवू शकत होतो) पण माझ्या अभ्यासाची पातळी उंचावली आहे याचे आत्मभान मला त्यामुळे आले, मला अजून किती अभ्यास करायचा आहे याचा अंदाज आला.आणी आपण या परीक्षेला सामोरे जाऊ शकतो हे समजले.. लातूर मधे साधारणतः मुख्य परिक्षे साठी कुठलीच मुले थांबत नसत, ते सरळ पुणे किंवा औरंगाबादला जायचे . तांदळेसर व मी वगळता प्रत्येकाला लातूर सोडायला संधी होती. मी अधून मधून तांबे सरांच्या क्लास कडे पण जाऊन येत होतो. तेथे काय सुरू आहे हे ही पाहत होतो.सगळेजण अभ्यासासाठी परेशान असायचे....कोंडी मात्र फुटत नव्हती.जणू काळाचा गुंता झाला होता.पुर्वपरिक्षे नंतर अरूण भैय्या लातूर मधे थांबले नाहीत...तांदळेसर राहिले फक्त...सुगीचे दिवस सरल्यास पाखरांचे थवे निघून जातात आणी रानात एखादे बाभळीचे झाड एकटेच ऊभे रहावे अशी अवस्था झाली होती...माझी...

               रूमवर थांबत होतो. तेथे प्रदिप इके (सध्या महाराष्ट्र अकॅडमी चा संचालक, पुण्यातील सध्याचा नामांकित एमपीएससी मार्गदर्शक )हा रहायला आला. तो ही एकदम खेड्यातून आलेला होता. त्याच्या मागोमाग लहू भोसले व त्याचा चुलत भाऊ भुजंग भोसले हे ही रहायला आले. हे ज्युनिअर मुले पण स्वप्नाचं गाठोडं घेवून शहराकडे अपेक्षेने निघणा-या रांगेतील सहप्रवाशी...आम्ही सगळे एकमेकांशी जुळवून रहायचो..गावाकडील खबरबात कधीतरी मिळायची..सणासुदीला कोणाकडून तरी डबा यायचा..आलेच कधी घरून कोणी तर घरचं जेवण...कधिकधी हे सोबती त्यांच्या गावाकडे जावून यायचे..मी मात्र तेथेच पाण्याने वेढलेल्या बेटा सारखा..अनंत प्रवाह झेलत...!! आई बिचारी गावाकडे कुढायची..वडील झगडत रहायचे..आम्ही सगळेच परिस्थितीशी दोन हात करत होतो जेथे आहोत तेथे राहून! मी तिकडे अभ्यासासाठी मरमर फिरायचो.. तर गावात इकडे काही अर्धवट रावांनी पोरं बिघडले आहेत बि ए साठी कधी रूम करावी लागते का? मुलं आईबापाला मूर्खात काढत आहेत अशी बदनामी (की किर्ती) चालवली....वडील कधि बोलायचे नाहीत पण येवून अंदाज घ्यायचे आमचा....आणी चार सुज्ञपणाच्या गोष्टी सांगून अभ्यास करत रहा म्हणून आम्हाला सांगायचे... सहा सहा महिन्याचे रूमचे भाडे थकल्याने जिव मेटाकुटीस यायचा.

             परिक्षा झाली होती, गांभीर्याने अभ्यास करणारा ग्रुप जागेवर नव्हता. मी काॅलेजला जात होतो. पण मन सदैव बेचैन असायचे. काही नविन मित्र झाले. त्यापैकी एक म्हणजे दिपक बाभळसुरे. त्याचे इंटरनेट कॅफे काॅलेजच्या रोडवर होते व घर माझ्या रूम च्या रस्त्यावर. त्याची गजा मुळे ओळख झाली. मग ऊगीचच मी कॅफेवर जाऊन बसू लागलो. तो ही येता जाता रूमसमोर येवून आवाज द्यायचा. मी जात रहायचो.. रिती अवस्था नुसती..

          बि ए तृतीय वर्षाची परिक्षा जवळ आली..पुन्हा गजा रूमवर यायला सुरूवात झाली. मग तेच..नोट्स, झेराॅक्स, परिक्षा...इत्यादी.. मी अभ्यास करून परिक्षा दिली..आणी दुस-याच दिवसा पासून एमपीएससीच्या अभ्यासासाठी तगमग सुरू झाली...तांबे सरांनी आता व्यावसायिक स्तरावर क्लास सुरू केले होते...पण मी तेथे जाऊन काय करणार होतो...मी रूम च्या आसपास राहू लागलो..तिकडे तांबे सरांच्या क्लास मधे धनवंतकुमार माळी सर (पुर्विचे शिक्षक, अत्यंत जिद्दी स्पर्धक , दररोज नोकरी करून औसा या तालूक्याच्या ठिकाणी येवून मग नंतर क्लासला येणारे, तरीही क्लास मधे सर्वाधिक मार्क घेणारे, माझ्या अगोदर राज्यसेवेची परिक्षा दिलेले , पण माझ्या नंतरच्या अॅटेम्प्टला प्रथम नायब तहसीलदार व नंतर महाराष्ट्रात एमपीएससी च्या यादीत अव्वल क्रमांकाने पास होऊन उपमुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर निवड होऊन अभ्यास सातत्याने कसा करावा याचे व नोकरी करत करत अभ्यास कसा करावा याचे रोलमाॅडेल ठरलेले) ,लहान असुनही सचोटीने अभ्यास करून नंतर सिलेक्शनच्या यादीत आलेला अतुल कुलकर्णी ( एक उत्कृष्ट कवी, चांगला स्पर्धक व व्यक्ती, सध्या  कक्ष अधिकारी - मंत्रालय) यांची नावे समजली..इतर मुले ही अभ्यास करत होती. त्यात प्रकर्षाने माहिती झालेले नाव म्हणजे प्रकाश कुलकर्णी सर ( अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून आलेले, उत्कृष्ट गायक असणारे, अत्यंत सज्जन व्यक्ती ,माझे काॅलेजचे सिनियर , युपिएससी मधे धडपडणारे,नंतरच्या राज्यसेवेच्या अॅटेम्प्टला ऊपजिल्हाधिकारी संवर्गात सहज निवड होऊ शकेल इतपत उत्कृष्ट मार्क येवूनही निव्वळ त्या वर्षिच्या जाहिरातीत केवळ 78 एवढ्याच पोस्ट असल्याने त्या ऊपलब्ध पोस्ट पैकी उपअधिक्षक भुमि अभिलेख झालेले, मात्र नंतरच्या काळात सहा. आयुक्त (विक्रिकर) म्हणून निवड झालेले, एक अनुकरणीय व्यक्तीमत्व) यांची नावे कळायला सुरूवात झाली. ते चांगली तयारी करतात हे कानावर येवू लागले.लातूर मधे हळुहळु MPSC बाबत प्रयत्न सुरू झाले होते. माझी बि ए तृतीय वर्षाची परिक्षा संपल्याने मी रिकामा झालो होतो, लातूर मधेच थांबलो होतो.आणी जाण्यासारखं कोणतं ठिकाण तरी होतं मला? काही मुलंमुली आवश्यकते प्रमाणे पुण्याला क्रॅश कोर्स साठी जायचे. आणी परत येवून अभ्यास करायचे. पण माझ्या आर्थिक मर्यादा असल्याने मी कुठेच जाऊ शकत नव्हतो. माझी अवस्था चिखलात रूतलेल्या बैलगाडीसारखी झाली होती...जायचं आहे..धडपड ही सुरू आहे..पण जो जो निघावे.. तो तो रूतत जावे जास्त खोल अशी....

             त्या उन्हाळ्याच्या सुट्टीत मी काय केले....???? जसा बिन पावसाचा ढग भर दुपारी आकाशात भरकटत असतो तसा भरकटत राहिलो...नाही म्हणायला तांदळेसरांना माझ्या परिस्थितीचा थोडा अंदाज आला होता. पण ते दररोज आपल्या नोकरीला जायचे..अरूण भैय्याही गेले निघून, तांबे सरांचे क्लास ही तेथुन निघुन गेले, ज्या काॅलेज मधे गेली पाच वर्ष शिकलो, आयुष्य घडवणा-या विविध घटना जगलो, ते काॅलेजही संपले...आता तिथेही बदल... रित्या क्षणांची दिर्घ मालिका..वेढलेल्या गर्दितही तळमळणारे एकाकीपण ......दिशाहीन प्रवास..जायची तळमळ खुप पण काहिच जुळून न येणारे...अवकाळी पाऊस तरी अचानक येतो, धांदल ऊडवतो पण तो येवून गेला की सुखद वाटते....तसं काही अवचित घडावं असं ही काही नाही..निरंतर तेच ते सुर्य उगवणे...मावळणे..रात्र होणे आणी उजाडणे.... मी मात्र आस घेवून त्या नवसुर्याची ..निःशब्द चालत होतो दिशाहीन कधी पावलांना टाकत तर कधी पावलांनी पुढे ओढल्याने...या सुट्ट्यात मी आत्मचिंतन केले, अनंत विचार केले...मनोराज्य केले..स्वप्न पाहीली, ते वास्तवात येत नाहीत म्हणून..त्यांना शिव्याही घातल्या..मुका मुका आकांत नुसता...काय करू काय नको नुसती तगमग नियती माझी सत्वपरीक्षा घेत होती जणू...आणी मी त्याच त्या अवस्थेला कंटाळलो असल्याने बदल माझी वाट पाहत दबा धरून बसला होता..तो योग्य वेळी माझ्यावर झडप घालणार होता ..आणी फरफटत नेणार होता मला....त्या क्षणा पर्यंत..ज्या क्षणाला मी टाचा रोवून थांबणार होतो, आणी बदलाला अंगावर झेलून त्यालाच भिडून, त्या बदलालाच बदलण्यासाठी निकराची झुंज देणार होतो...आणी त्यालाच फरफटत नेणार होतो स्वप्नपुर्तिच्या टप्प्यावर..युध्दाचे ढग जमु लागले होते... आणी येणारे दररोजचे सुर्य उजाडण्या अगोदरच शंखनाद करणार होते....आणी मीही लढायच्या आणी भिडायच्या टप्प्याकडे नकळत निघालो होतो....(क्रमशः)
(प्रताप)

Saturday, November 3, 2018

स्पर्धा परीक्षेची बखर: 'मी' ते अधिकारी ...एक आठवणींचे मोरपीस भाग 12 : दगडपण गळून पडताना.... !

स्पर्धा परीक्षेची बखर: 'मी' ते अधिकारी ...एक आठवणींचे मोरपीस

भाग 12 : दगडपण गळून पडताना.... !!


           शाहू काॅलेजच्या क्लासेसला आम्ही सगळे जण बसत होतो. अनेक मुलंमुली नव्याने येत होते. काही काॅलेज बाहेरच्या मुलांना पण प्रवेश दिला गेला ...तेथे अत्यंत स्टायलीश पध्दतीने येणारे दोघे म्हणजे राजा आणी संदिप!! ( हे नंतरच्या काळात आयुष्य भराचे मित्र झाले, राजेंद्र ढाकणे(शालेय पोषण आहार अधिक्षक) ऊर्फ राजा...वयाने मोठा असुनही आम्हा सगळ्या लहानांना भावंडाप्रमाणे वागवणारा अत्यंत मॅच्युअर व धाडसी असणारा पण तसा न दिसणारा!!, महाराष्ट्रातील नामांकित बुध्दीमापण चाचणी शिकवणारा, ट्रेकिंगवेडा, आणी सगळ्यात अगोदर संदिपचा जिगरी दोस्त व त्यानंतर सगळ्याचा दोस्त असणारा मित्रवेडा मित्र!! .....आणी दुसरा माझ्यासाठी एकदम खास!! एकदमच जिगरी म्हणजे संदिप जाधव ! ऊर्फ ...त्याला मर्यादाच नाही...!! सध्याचा (असिस्टंट डेस्क ऑफिसर) पण त्या काळातील माझा सच्चा साथी..दिलदार मित्र आणी माझ्या पडत्या काळात मला सर्वस्तरीय व यथाशक्ती मदत करणारा, सणासुदीला मी सण सोडून उपाशी बसलो आहे हे माहित असल्याने घरून गुपचुप डबा आणनारा व तो खास कारणाने आणला आहे हे कळू न देण्याचा अयशस्वी प्रयत्न करणारा, दुःखाच्या प्रसंगी हक्काने बोलवणारा आणी दुस-याच्या दुःखात न सांगता येऊन आधार देणारा, यामाह वेडा, रायडर, अत्यंत मॅच्युअर व धाडसी दिसणारा पण मुळात तसा नसणारा!!! , स्पर्धापरिक्षा क्षेत्रात खुप काही पाहिलेला.. आणी आजही जसा होता तसाच संपर्कात असणारा अत्यंत हळवा, संवेदनशील असा मोठा भाऊच जणू !!) ते दोघंही अनुभवी स्पर्धक होते. ते आल्याने अजुन स्पर्धेत चुरस यायला लागली, मी मात्र खिंड लढवत होतो...न घाबरता भिडत होतो..थोडं दुर्लक्ष झाले की फटके बसायचे अक्कल ठिकाणावर यायची..अभ्यासाची रंगत वाढली होती..अवघड अवघड विषय डोकं जड करत असायचे...तरीही प्रयत्न करत असायचो...निसर्गरम्य ठिकाणी जायची ओढ असावी, फुरसतही असावी , मुबलक पैसा असावा..आपण निघावं..आवडती गाडी असावी..भरधाव वेगानं आपण निघावं...आणी अचानक रस्त्यात ट्रॅफिक जाम लागावा..तस्सच झालं. काॅलेजच्या वार्षिक परिक्षा जवळ आल्याने काॅलेजचे क्लास बंद झाले..शेवटी कितीही झालं तरी हा क्लास म्हणजे काॅलेजसाठी एक उपक्रमच होता..! जो काही चार पाच महिन्याचा काळ मला शिकायला भेटले ते अनमोल होते पण अपूर्णता जाणवत होती. जिव था-यावर नव्हता. ऐकून होतो परभणीला कृषिविद्यापिठात खुप मुलं तयारी करतात पण तेथे मी जाऊ शकत नव्हतो. औरंगाबादला क्लास चालतात हे ही माहित होतं पण क्लासची फिस मी भरूच शकत नव्हतो. तशी ऐपतच नव्हती (आयुष्यात मी पहिल्यांदाच औरंगाबाद पाहिले तेही मुळात राज्यसेवा मुख्यपरिक्षा द्यायला गेल्यावर!!) कालय तस्समैय नमः!!!!माझी वेळ आलीच नव्हती, ती आणावीच लागेल हे मात्र मला जाणवत होते..मांडलेला सारा डाव तुटत जाणे हे स्पर्धा परीक्षेचे वैशिष्ट्य आहे. आणी जिद्दीने पुनः वारंवार ऊभे राहणे हे सच्च्या स्पर्धकाचे लक्षण..!!

                जगद्गुरु तुकोबा म्हणतात "आलिया भोगासी असावे सादर" मी गुमान काॅलेजचा अभ्यास सुरू केला.डिग्री असल्याशिवाय आपल्याला परिक्षा देता येणार नाही हे स्वतःला बजावून मी वाचत होतो. रात्री बसायचो, नोट्स काढायचो, दुस-या दिवशी त्या नोट्सच्या अनेक झेराॅक्स निघायच्या! रात्री अभ्यास करण्यासाठी गज्या यायचा, सोबत बसायचा,इकडच्या तिकडच्या गप्पा व्हायच्या,   मोठा भाऊ अर्थात भैय्या ही क्लासमेट असल्याने तोही सोबत अभ्यास करायचा. भविष्यात काय करायचे चर्चा व्हायची..माझ्या मनातील जखमेची खपली निघायची,मी मुकामुका होवून कुढत कुढत अभ्यास करायचो, मी आत्ममग्न होऊन माझी जखम भळभळताना अनुभवायचो, उदास उदास वाटत रहायचं. आपण कधी MPSC करू शकू का? कसं होणार आपलं? पुस्तके नाहीत, पैसे नाहीत, मार्गदर्शन नाही, लातूर सारख्या ठिकाणी दहा पंधराजण कसेबसे एकत्र येवून तुटपुंजा प्रयत्न करत होते तर तो ही तडीस जात नाही....अनंत प्रश्न घेरत असायचे...वडील यायचे, काहीतरी खायला आणायचे..गावाकडले हाल सांगायचे, प्रयत्न करत रहा म्हणायचे..खिशात एक रुपया नसायचा..कुठे जायचेच असेल तर चालत फिरावं लागायचं...कोणी मित्र आलाच तर त्याच्या गाडीवर जायचो...शेवटी डिग्री शिवाय पर्याय नाही..पाहू अगोदर ती तरी करून घेवू हा विचार करून मी अभ्यास करत रहायचो. काॅलेजच्या लाएब्रेरी मधून क्रमिक पुस्तके घ्यायचे कुठल्या मित्राने गाईड आणले तर ते मागुन वापरायचं असं करत करत मी परिक्षा दिली. सुट्ट्या लागल्या, पण गावाकडे जाता येत नव्हतं, कारण गेलो तर मिळालेली रूम जाइल ही भिती ! आणी सुट्टयात लातुरात रहायचे तर कसे टिकायचे? काय करायचे? रूमचे भाडे कसे द्यायचे ही त्याहूनही जास्त भिती!! इकडे आड तिकडे विहीर!!!सुट्टयात MPSC चा अभ्यास करायचा तर माझ्याकडे फक्त दोनच पुस्तके , एक म्हणजे मागील प्रश्नपत्रिकेचा संच आणी दुसरं के'सागर चं सामान्य अध्ययन ,आणी तुटपुंज्या काही विषयाच्या नोट्स. ना काॅलेज,ना क्लास, ना गावाकडे,ना मित्राच्या घरी , जायचे तर कोठे आणी कसे? का? दर सुट्ट्यात काम करून शिकायचं नशिबी..वाटायचं या सुट्ट्यात कुठंतरी काम करावं..पण काही सुचत नव्हतं...सगळा अंधार....ठार अंधार......पण मनात होती आशा प्रकाशाची...वाटायचं येईल कधीतरी तो कवडसा...आपण फक्त टिकून रहायचं...तग धरायची...उगवेल कधी दिवस आपलाही..जातील हेही दिवस!बाजुच्या रूम मधे कैलास, त्याचा लहान भाऊ जयराम रहायला आले होते, खेड्यातून आलेले मुलं होते ओळखी झाल्या, तेही तगत होते. आम्ही ऊगीचच भरकटलेल्या पतंगाप्रमाणे काही बाही बोलत असायचो. दिवस काढत होतो पण मन MPSC च्या आभाळात गिरक्या घेत असायचं.......

      एके दिवशी मित्राने सांगितले नांदेड नाक्यावर(माझ्या रूम पासून आठ किलोमीटर अंदाजे) एक मुलगा राहतो तो दरवर्षी पुर्वपरिक्षा पास होतो, वाटले चला त्याला भेटून मार्गदर्शन घेऊ, त्याला विचारू, आणी मग मी सकाळी चालत निघालो, जाताना हातात अभ्यासाचे मुद्दे काढलेली छोटी डायरी होती..पाठ करत करत तेथे पोहचलो. त्याच्या घरी जाऊन विचारले. तो बाहेर आला त्याने मला बाहेरूनच चौकशी केली.आणी मग मी बि.ए. सेकंड ईअरची परिक्षा दिली आहे हे माहित झाल्याने त्याने मला डिग्री झाल्यावर भेटायला सांगितले. मी त्यांना विनंती केली की मी थोडासा अभ्यास करू शकेन जर त्यांनी मला काही मार्गदर्शन केले तर, त्यावर त्यांनी मला म्हटले," मित्रा तिन वर्ष मी MPSC मधे घासतो आहे, खुप अभ्यास करावा लागतो, तुला एका दिवसात काय सांगु?" मी निराश होऊन त्याचे आभार मानून निघालो. पुन्हा त्याला काय वाटले माहित नाही मला परत बोलाऊन त्यांनी मला एक फोन नंबर लिहून दिला.आणी सांगितले "हा नंबर ठेव, डिग्री झाल्यावर फोन कर, तो पर्यंत माझे सिलेक्शन झाले असेल, माझी पोस्टिंग कुठे झाली ते तुला कळेल, तु मला तेथे येवून भेट ,मी तुला सांगेन मग सगळं!" मी होय म्हटले. मी परत निघालो. त्या मित्राची चुक नव्हती, मी परिक्षे बद्दल किती गंभीर आहे हे कदाचित त्यांच्या पर्यंत पोहचले नव्हते. ऊन तापले होते. मी ही खुप तापलो होतो. माझ्या मनात नाना विचार येत होते. सरतेशेवटी माझ्या मनात विचार आला हे हात आता मदती साठी असे कधी पसरायचे नाहीत स्वतःच ईतके मजबूत व्हायचे की आपण दुस-याला मदत करायची.( माझे सिलेक्शन झाल्यावर तोच मित्र- एक ग्रुप लातूर मधे आख्खा सिलेक्ट झाला आहे हे समजल्याने भेटायला आला त्याचा शेवटचा अॅटेम्प्ट तरी त्याला जाऊ द्यायचा नव्हता म्हणून तो आला होता, तेथे मला पाहून त्याला आश्चर्य वाटले, मी त्याला दादा तुम्हीही होऊ शकता ,माझ्या सा-या नोट्स घेवून जा! असे म्हणून पुर्ण बंच झेराॅक्स करून दिला, मी त्यांना कुठलीच अट टाकली नाही, ते म्हणाले "मी तुला त्यावेळीच सिरीयस घेतले असते तर माझेही सिलेक्शन झाले असते,मी म्हणालो मग आता घ्या!व्हाल तुम्ही!! त्यांनी खुप वेळा आभार मानून माझी माफी मागितली, मी त्यांना आपल्या पेक्षा मी खुप लहान आहे कृपया माफी मागु नका, मी दुस-या नोट्स मिळाल्यास नक्कीच पाठवतो म्हणून मी त्यांना रवाना केले, दुर्दैवाने पुढे त्यांचे MPSC त सिलेक्शन झाले नाही ते आज प्रगतिशील शेती करतात,आणी अधुन मधुन स्वतः होवून मला फोन!!!)


     जसे पाणी आपला मार्ग शोधतेच, तसे स्वप्न ही आपला मार्ग शोधत असते. गरज असते ती त्यावर विश्वास ठेवण्याची आणी त्याला घट्ट पकडून स्वतः सोबत चालत ठेवण्याची, दृढ इच्छाशक्ती असेल व स्वप्नपूर्तीचा ध्यास असेल तर नियती काही मददगार स्वतः पेरते आयुष्यात! आश्चर्य वाटेल इतपत काही असंबंध व्यक्ती संपर्कात येवून आपल्या स्व्प्नांना आधार देतात.आणी पथदर्शी ठरतात.आणी प्रत्येक ध्येय्यवेड्या व्यक्तीचा हा अतिविशिष्ठ अनुभव असतोच.उन्हाळ्याच्या सुट्ट्या एकदम भकास पध्दतीने चालत होत्या, वैताग येत चालला होता, मी अभ्यास करण्याचा प्रयत्न करत होतो. एकदा असाच एमपीएससीचे पुस्तक हातात घेऊन मी गल्लीतुन चालत जात होतो.अचानक बाजुच्या इमारतीच्या वरच्या मजल्यावरून मला आवाज देणारा एक मुलगा दिसला.मी थांबलो..तो खाली उतरला. त्याने मला विचारले, तु MPSC चा अभ्यास करतोस का?, मी तुझ्या हातात पुस्तक बघितले म्हणून विचारले अशी पुस्ती त्याने जोडली. मी नुकताच सिनीयरला विचारायला जायच्या अनूभूतीने निराश होतो. मी त्यांना सांगितले "प्रयत्न करत आहे." त्यावर त्यांनी मला या अगोदर पुर्वपरिक्षा दिली का? कुठली तयारी करतो वगैरे सखोल चौकशी केली. मला तांबे सर मुळे किमान माहिती होतीच. मी त्यांना मला जे जे माहिती होते, व मी किती अभ्यास केला हे सगळं सांगितले. त्यावर त्यांनी स्वतःची ओळख करून दिली. मी अरूण पोतदार,(अत्यंत पॅशनअसणारा, कोमल मनाचा हा व्यक्ती, सगळ्यात असूनही आपले अस्तित्व जतन करणारा व MPSC या शब्दा खातर कोणावरही विश्वास ठेवून त्याला मदत करण्यास तत्पर असणारा हा व्यक्ती) राज्यसेवा पुर्वपरिक्षा या अगोदर पास झालो होतो. पण मुख्य परीक्षेची तयारी न झाल्याने मी ती दिली नाही.आता 2001 ची पुर्व परीक्षेची तयारी करण्यासाठी आलो आहे. तु माझ्या सोबत अभ्यासाला बसशील का? मला एकदम धक्का बसला. खुप आनंद ही झाला.मी त्यांना सांगितले की, मी इथेच बाजुला राहतो. मी बसत जाईन तुमच्या सोबत. पण माझ्याकडे जास्त पुस्तके नाहीत. त्यावर ते म्हणाले माझ्याकडे पुस्तके आहेत. तु माझ्या रूमवरच बसत जा. मला विश्वास बसत नव्हता की मी जिथे राहतो तेथेच आसपास एवढा सिरीयस आणी अनुभवी व्यक्ती भेटेल. म्हणून मला पुन्हा सांगावेसे वाटते. आपले स्वप्न जिवंत असेल तर नियती मदत करतेच!!.( पुढे अरूण पोतदार STI झाले आणी आता ते असिस्टंट कमिशनर व्हॅट म्हणून कार्यरत आहेत. त्याच अॅटेम्प्टला त्यांची छोटी बहीण रोहिणी ही PSI झाली आता ती API पदी कार्यरत आहे..आणी त्याच वर्षीच्या राज्यसेवेतुन माझेही सिलेक्शन आहे..पण तो अॅटेम्प्ट 2001 चा नव्हता!!!! अजून खुप खस्ता खाणे बाकी होते..आयुष्य शिकायला मिळायचे होते. नविन धक्के बसायचे होते!!)
माझ्या Mpsc च्या यशाचे अत्यंत महत्वाचे कारक म्हणजे अरूण भैय्या!! ज्यांनी विस्कटलेला आमचा ग्रुप एकत्रीत करून ही यशोगाथा लिहिण्याची संधी मला मिळवून दिली.

          मी अरूणभैय्याच्या रूमवर अभ्यासाला बसू लागलो. इतके दिवस माझा अभ्यास इतरांच्या साथीने सुरू होता.त्याला एक कोष होता. पण येथे तो कोष विरून गेला. जिव टांगणीला लागावा ईतके खुजेपण अभ्यासात जाणवू लागले. मी ते कमी व्हावे या साठी जिव तोडून अभ्यास करत होतो. तेथे त्यांचे अत्यंत अनूभवी व सिनियर असणारे मित्र प्रविण शेळके अभ्यासाला यायला लागले. राज्यसेवेची मुलाखत दिलेला हा माणूस (दुर्दैवाने त्यांचे सिलेक्शन नंतर झाले नाही) ते अभ्यास, चर्चा करत आणी मी विचारच करत रहायचो की हे दोघं जे बोलत आहेत त्याचे तर बेसिक नाॅलेज पण आपल्याला अजून आले नाही. त्यांनी माझी दखल घेण्याइतपत ना माझा अभ्यास होता ना माझे वय! त्यांच्या लेखी मी एक काॅलेजचा विद्यार्थी होतो. आणी हे खरे ही होते. त्यांनी त्या टप्प्यावर मला तेथे बसायला संधी दिली हिच मोठी गोष्ट होती. ते दोघं 2001 च्या पुर्व परिक्षे बद्दल गंभीर होवून अभ्यास करायचे. माझ्या अनुभवाची रुंदी वाढत होती..मी सारे काही टिपून घेत होतो..मला खुप दूरचा पल्ला गाठायचा होता. मी एक एक टप्पा पार करायचे ठरवले...हा पाया भरणीचा टप्पा होता.

           रूमवर जे ऊपलब्ध सामान असायचे त्यातुन आम्ही जमेल तसा स्वयंपाक करायचो, कधी तो व्हायचा, कधी तो व्हायचा नाही. तरीही दिवस ढकलत रहायचो. मोठा भाऊ चित्रकलेच्या छंदाने लातुरातल्या वेगवेगळ्या ठिकाणी जायचा,मी अभ्यासाला जायचो. अभ्यास करत होतो.खुप प्रयत्न करून चर्चेची तरी पातळी गाठावी हा उद्देश होता.परीक्षेला सामोरे जाताना अभ्यास कसा करायचा याचे धडे मिळत होते.पण अजुन एक कठोर समीक्षक, ज्येष्ठ बंधुसम असणारे, खंदे स्पर्धक, व जवळपास संपुष्टात आलेली व मृतप्राय झालेली संधी अक्षरशः जिवंत करून तिचे सोने करणारे, आम्हा सगळ्यांनाच ज्येष्ठ असणारे, अनुभवी असणारे, ज्यांनी ऑलरेडी राज्यसेवेच्या मुलाखती देऊनही पराभवाचे विष पचवून लातुरला लॅब टेक्निशीयन पदावर नोकरी निमित्त आलेले सौदागर तांदळे सर (सध्या नायब तहसीलदार)यांचा नाट्यमय प्रवेश होणे बाकी होते( आमच्या ग्रुप मध्ये सर्वाधिक अॅटेम्प्ट देवूनही न थकता, न हारता,MPSC ने वारंवार पीछेहाट करूनही सरते शेवटी MPSC ला आपली जिगर दाखवून तिलाच धोबीपछाड देवून शब्दशः यश खेचून घेणारे हे सर! मला ज्यांनी अभ्यास कसा खुन्नस आणी जिगरने करायला पाहिजे हे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष शिकवले, आजही आम्ही आमच्या पदांची कुठलीही वरिष्ठता कनिष्ठता न ठेवता त्यांना सरच म्हणतो. अत्यंत मायाळू पण त्याहूनही जास्त कडवा स्पर्धक असणारा हा व्यक्ती यांनी मला जे सहकार्य केले ते कदाचित एखादा भाऊच करू शकला असता. माझ्या संघर्षाला यांनी टोकदार केले, यांच्या संघर्षाची कहाणी खुप उद्बोधक आहे.)

        अरूणभैय्या जेथे राहत होते. ती बिल्डींग मोठी होती,तेथे विद्यार्थी भाड्याने राहत होते. तेथे रूम पाहण्यासाठी तांदळे सर आले. ते मुळचे बिड जिल्हयातील पण लातुरच्या पुरणमल लाहोटी तंत्रनिकेतन शासकीय महाविद्यालय येथे पोस्टिंग मिळाल्याने ते रूम शोधत नेमके तेथेच आले आणी नेमके त्यांनी अरूण पोतदार यांच्या रूम बाहेरील चिकटवलेला " कृपया गोंधळ करू नये, येथे MPSC चा अभ्यास करणारी मुले राहतात" या आशयाचा कागद त्यांनी पाहिला.मग काय!! दारावर एक जेंटल नाॅक , रितसर प्रवेश, एकमेकांचा अंदाज घेणे, पहिलवान कुस्ती अगोदर एकमेकाला कसे जोखतात तसेच मला वाटत होते, ते दोघे बोलताना. त्यांचे बोलून झाले.सर म्हणाले मला अपेक्षाच नव्हती, लातुरात MPSC करणारे कोणी भेटेल!! आणी सरतेशेवटी तो एक प्रश्न, माझ्याकडे पाहून, " हा बारावीचा मुलगा येथे काय करत आहे?" माझी त्यांनी त्यावेळी घेतलेली ही दखल!! आणी माझे सिलेक्शन झाल्यानंतर त्या अॅटेम्पटला ते नसतानाही त्यांनी मला दिलेली दाद व आजही अत्यंत अभिमानाने त्यांचे माझ्या बद्दल बोलणे... सगळंच स्वप्नवत व आयुष्य नितीतत्वाने जगायला शिकवणारे....!! सरांनी त्या सायंकाळी आपले सामान बाजुच्या रूम मधे टाकले..आठवले तर हे योगायोग स्वप्न वाटतात निव्वळ! "स्वप्न आपला मार्ग शोधतेच शोधते!!"
सर रहायला आले मग काय अभ्यासाची रणधुमाळीच!!! पण मी मैदानात नसतानाही स्वतःचा कस वाढवत होतो.चर्चेत प्रश्नाचा भडिमार झेलत  होतो, पराभूत होवून पुन्हा पुन्हा भडिमाराला सामोरे जात होतो...टाकाचे घाव बसायला सुरूवात झाली होती.. माझे दगडपण गळून पडायला सुरूवात झाली होती......(क्रमशः )
(प्रताप )

Sunday, October 28, 2018

स्पर्धा परीक्षेची बखर: 'मी' ते अधिकारी ...एक आठवणींचे मोरपीस भाग 11 : स्पर्धेची झुंज.......!!!

स्पर्धा परीक्षेची बखर: 'मी' ते अधिकारी ...एक आठवणींचे मोरपीस

भाग 11 : स्पर्धेची झुंज.......!!!


        बिए प्रथम वर्ष... परिक्षा झाली. सुट्ट्या लागल्या. या सुट्ट्यात मी पुर्वपिठीके प्रमाणे पुन्हा कामाला गेलो. बाॅयलर, स्टिम, प्रेशर....माळरान, पाऊलवाट...निःशब्द संवाद, मुक्या आवाजात स्वतःशी बोलणे...मनाची घालमेल...लातुरची ओढ...काॅलेजची आठवण...सुट्टी आली की ती अभ्यासाचा असलेला माझा पुर्ण सेट अप बदलवून टाकायची आणी जीवनाच्या सेट अप मधे मला बंदिस्त करण्याचा प्रयत्न करायची ...मी तगत रहायचो कारण मला माहिती असायचं हे असं काम करणं फक्त सुट्ट्या पुरतं आहे. नंतर आपला अभ्यास करायला मिळणारच आहे. पण " काळाच्या कळा सोसल्याशिवाय यश जन्माला येत नाही, आणी त्या सोसाव्याच लागतात!!!" मी सोसत होतो गुमान!

          सुट्ट्यात लिहीत होतो काहीबाही...घरच्यांना तो पर्यंत समजत होते की मी MPSC ने पछाडलो आहे. आणी ही बाधा चांगलीच होती..पण तुटपुंज्या साधनांनी साध्य प्राप्त करण्याचे आव्हान मला जास्त मागे रेटत होते.कशाबशा सुट्ट्या संपल्या...काॅलेज सुरू झालं...मी अत्यंत उत्सुकता व उत्साह घेवून महाविद्यालयात आलो..अलिकडे मार्क्स चांगले पडायचे त्यामुळे निकालाचे टेन्शन नव्हते..मी अभ्यासाला सुरूवात केली..काॅलेजची अभ्यासिका..क्लास पूर्ववत सुरू झाले..मी पुन्हा माझ्या रूटीन मधे आलो..पण रूटीन सोडुन करण्यासाठी जो मनसुबा मी आखला होता तो अजुन काही दृष्टीक्षेपात येत नव्हता. मी वेगाने चालण्याचा प्रयत्न करत होतो..पण किती,कोठे, कसा ...सगळा अंधारच....पण अंधार येतोच मुळी प्रकाशमान करण्यासाठी!!!!


         एके दिवशी मी अभ्यासिकेत बसलो होतो,आणी खुप गंभीर होऊन वाचत होतो..त्यावेळी एक अत्यंत ऊंच(मनाने तर त्याहून ही ऊंच) असणारा सिनियर मुलगा हळुच जवळ आला व त्याने विचारले"MPSC चा अभ्यास करत आहेस का?" मी प्रथमच MPSC चे थेट नाव घेवून कोणीतरी विचारत आहे म्हणून थोडा सजग झालो, आणी मी जबाबदार आवाजात त्याला सांगितले "हो भैय्या!!" कारण मला त्याचे नाव माहित होते.......... मुकरम काझी!! ( जो नंतर खरंच माझ्या आयुष्याला ख-या वळणावर घेऊन येणारा पहिला दिशादर्शक व्यक्ती ठरला जर मुकरम भैय्या नसते तर मी MPSCच्या अंधारात किती दिवस चाचपडत असतो माहित नव्हते, काही लोक स्वतः सारखेच इतरांचेही आयुष्य मौल्यवान असते याचे भान बाळगून असतात ते भान असणारा हा व्यक्ती, सदैव मित्रांच्या भल्यासाठी अहोरात्र तत्पर असणारा हा व्यक्ती आजही मित्रासाठी झिजत असतो..MPSC मधे असताना तिने कधी यांना यशाचे दान दिले नाही पण इमानदारीने MPSC चाअभ्यास करणा-या व त्यासाठी धडपडणा-या लातूर मधिल मुलांचा हा दिग्दर्शक व्यक्ती..पुस्तकाच्या दुकानावर गेले असताना तिथे आपल्या मुलास फक्त 1500 रूपयांची पुस्तके घे म्हणुन सांगणा-या त्या मुलाचे वडील , पण जास्त पुस्तके घ्यायची आहेत याची तळमळ असणारा तो मुलगा या दोघांची घालमेल पाहून त्यांची कुठलीही पुर्व ओळख नसताना निव्वळ माणुसकीसाठी स्वतः मदत करून, नंतर त्या मुलाला स्वतः सोबत ठेऊन त्याचे सहकार खात्यात सिलेक्शन होईपर्यंत त्याला मदत करणारा एक दिलदार व ऊमदा व्यक्ती , म्हणजे हा माणुस....हेच नाही तर त्यांच्या आख्ख्या घराला शिक्षणाचे वेड असणारे हे कुटुंब, मुकरम भैय्या व त्यांच्या भाऊ व एक बहिण यांच्या मिळालेल्या सर्व डिग्री यांची बेरीजच माणसाला थकवून टाकेल...सुदैवाने तिघेही भावंडे आज शासकीय सेवेत आपल्या कामाचा ठसा उमटवत आहेत. मुकरम भैय्या स्वतः पोलीस खात्यात वायरलेस विभाग, लहान भाऊ लातूर पोलीस मधिल एक झंझावात तर त्यांची लहान बहिण, दिदी या वर्षी आपली पहिली नोकरी करत असतानाच सहाय्यक कामगार आयुक्त म्हणून निवडली गेली आहे. अत्यंत प्रगतीशील विचार असणारे हे कुटुंब, व आपल्या मुलांना असा विचार देणारे त्यांचे अत्यंत ऊमदे वडील , आदरणीय चाचा!! मला अत्यंत प्रेमाने वागवणारे, पोलीस खात्यात अत्यंत ईमानदारीने काम करून नावारुपाला आलेले, आणी मला भेटल्यास अत्यंत मित्रत्वाने भेटून चहा पित पित MPSC बद्दल व मुकरम भैय्याच्या अभ्यासाबद्दल चर्चा करणारे आणी उत्साह वाढवणारे व्यक्ती! दुर्दैवाने चाचा यांचे अकाली व अपघाती निधन झाले. ते तिघा मुलांचे सिलेक्शन पाहू शकले नाहीत, पण या तिघांना जी सामाजिक समज त्यांनी दिली त्यायोगेच हे तिघेही घडले. चाचा गेले आणी मुकरम भैय्याने आख्खे कुटुंब योग्य मार्गावर नेले. अत्यंत जबाबदार व संवेदनशील मनाचा हा व्यक्ती ज्यांच्या ज्यांच्या सोबत जुडला त्या त्या व्यक्तीला त्यांनी मदतच केली आहे...एवढे सारे मुकरम भैय्या बद्दल लिहिणे या साठी की ज्या व्यक्तीने माझी अभ्यासिकेत वर्षभर धडपड पाहिली व माझ्यावर लक्ष ठेवले, माझा लेखाजोखा ठेवला आणी योग्यवेळी मला मदतीचा हात दिला तो पहिला व्यक्ती हाच!! माझा जिवलग मित्र आणी माझ्या कुटुंबा साठी एक सन्माननीय सदस्य!! "शुक्रिया भैय्या ! कुछ लोग फ़रिश्ते होते है। आप वही हो।") मी MPSC चा अभ्यास करतो हे ऐकुन त्यांनी म्हटले, "असा एकट्याने कसा अभ्यास होईल?? तुला खरंच अभ्यास कसा असतो आणी तो कसा करतात बघायचा आहे का??" मी एकदम स्तब्ध झालो! आणी नकळत तोंडून शब्द निघाले"प्लिज!"यावर एक आश्वासक स्मितहास्य करून, मुकरम भय्याने सांगितले , तु टेन्शन मत ले भाई! हम जाएंगे शाम मे, तुझे अच्छे और सीरियस कॅन्डिडेटसे मिलाता हूँ । तु सीरियस पढता है इसलिए मैने बताया ।" मी लगेच होकार भरला. आणी सायंकाळ व्हायची वाट पाहत बसलो. मी खुप अस्वस्थ झालो होतो. मला सायंकाळ कधी होते याची प्रतिक्षा होती. मला मुकरम भैय्याने 5.00 वाजता नंदी स्टाॅपला यायला सांगितले होते. काॅलेज ते नंदी स्टाॅप हे अंतर साधारणतः 3.5 कि.मी. होते. मी साडेतीन वाजताच काॅलेजवरून निघालो, कारण चालत जायला मला वेळ लागला असता....अॅटोने पोहोचण्याची व्यवस्था होउ शकेल एवढे पैसे होते पण तेथे गेल्यास सहज चहा पाजण्याची वेळ आली तर काय? या टेन्शनमध्ये मी चालत निघालो. जाता जाता मी अनेक विचार करत होतो..काय असेल तेथे? कुठली मुले असतील? आपण तेथे अॅडजेस्ट होऊ शकु का? मुकरम तसा चांगला माणुस आहे...तेथे ग्रुप मेंबर व्हायच्या काय अटी असतील???? वगैरे..


           मी साडेचार पर्यंत तेथे पोहोचलो. मुकरम भैय्या पाच वाजता हजर झाले. त्यांनी मला त्यांच्या गाडीवरती बसवून घेतले आणि आम्ही निघालो..तो एरीया माझ्या ओळखीचा होता. कारण आठवीला असताना मी याच रस्त्यावरून शाळेत जात होतो. आम्ही एका बिल्डींग जवळ पोहचलो. मला जातानाच त्यांनी समजवून सांगितले होते की, घरमालकाला तेथे गोंधळ चालत नाही तु काही न बोलता गुपचूप माझ्या सोबत चलशील. मी सांगीतल्या प्रमाणे केले. मी गुपचुप वरच्या मजल्यावर त्यांच्या सोबत पोहचलो.तेथे गेल्यावर दिसले की, खाली सतरंजी टाकली आहे. समोर भिंतीवर एक फळा टांगलेला होता. काही खडुचे तुकडे व्यवस्थित ठेवले होते. पोहचल्यावर मी पाहीले, मुकरम भैय्याने पण खडुचे स्वतः जवळील तुकडे काढून तेथे ठेवले. आणी सांगितले मला की, "काॅलेज मे क्लास मे बहोत टुकडे गिरे रहते है। वही ऊठाके लाया हूं, उससे आराम से अपने तिन चार दिन के क्लास की राइटिंग अॅडजेस्ट हो जाती है। " यावरून मला तात्काळ अंदाज आला की येथे असेच आपल्या सारखे गरीब पण होतकरू मुलं अभ्यास करतात. ज्यांना जाणीव आहे. साडेपाच वाजता मला तेथले स्वरूप समजले की, तांबे सर ज्यांना तेथील सगळे मुलं भैय्या म्हणतात त्यांनी हा ग्रुप तयार केला आहे. व येथील सर्व मुले एकत्र पैसे जमा करून त्यातुन खर्च भागवत अभ्यास करतात व तांबे सर तेथे शिकवतात. सहा वाजेपर्यंत हळूहळू मुलं जमायला सुरूवात झाली. सागर पुदाले, नितीन सिरसाट, अशोक गिराम, चंद्रशेखर ऊत्के, सोमनाथ रेड्डी ( नंतरAPO ),संजय (नंतर STI) , उज्ज्वला मॅडम (नंतर PSI),सचिन काळे, अश्विनी मॅडम हे सर्व सिनियर तेथे जमा झाले. आणी तांबे सर यांनी प्रवेश करून ओळख करून घेतली. आणी पहिल्याच लेक्चर मधे समजले, मी आजपर्यंत अभ्यास केला होता पण MPSC चा अभ्यास त्यात फार कमी होता. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने व सिरीयस लेक्चर झाले. डोळे उघडले. MPSC, काय असते, कशी परिक्षा असते, अभ्यासक्रम काय असतो, कसा अभ्यास करावा लागतो,संदर्भ साहित्य काय असते या बद्दल अचुक माहिती मिळाली. मी एकदम स्तब्ध होतो. मुकरम भैय्याने ओळखले, आणी म्हटले, मैने बोला था ना तुझे।मी होकार भरला आणी न विचारता, न सांगता मी त्या ग्रुप चा सदस्य झालो. मी दररोज तेथे जाऊ लागलो.आवश्यक ती फिस मी घरी बोलून व इकडुन तिकडुन जमा केली, तांबेसर एकदम सुंदर शिकवायचे, वर्गात असतानाच शिकवलेले लक्षात राहील अशी त्यांची पध्दत. मुलं अनौपचारिक पण अत्यंत व्यावसायिक पध्दतीने तयारी करत. टेस्ट, ग्रुप डिस्कशन , सिलॅबस, स्वंयमुल्यमापन या बाबी समजत चालल्या होत्या. दिवसेंदिवस काॅलेजच्या क्लास मधून मुलं कमी होवून इकडे जमु लागली..त्या पैकी अनिरुद्ध कुलकर्णी , प्रदीप राऊत ( सहकारी बॅकेत सध्या रुजू)हेही तिकडे जाॅइन झाले. ग्रुप मधिल काही इतर जण पण शिकवायचे.

         मी सकाळी काॅलेज, नंतर लाएब्रेरी आणी रात्री क्लास करून मग गावी जात होतो. आता रस्ता सापडला होता पण धावण्यासाठी आवश्यक वेळ मिळत नव्हता. गावी गेले की ती रूम, तो बल्ब आणी मनात प्रकाशाची व्यापकता...क्लास मधे टेस्ट व्हायच्या एकाचढ एक मुलं अभ्यास करायचे. अधून मधून माझाही नंबर यायला लागला.कधी तो गेला की जिद्द वाटायची की आपण असं मागे पडायला नाही पाहिजे , मग त्वेषाने अभ्यास सुरू व्हायचा आणी त्याचा फायदा पुढल्या परिक्षेत व्हायचा. या वरून एक जाणिव झाली की जिद्दीने, त्वेषाने अभ्यास केलातर आपण स्पर्धेत राहू शकतो, टिकू शकतो...तेथे जमलेले सगळे गंभीर होते. त्यामुळे अभ्यासाशिवाय इतर कुठला विषयच असायचा नाही.


                      मला हळुहळु जाणीव होत होती की, गावाकडून येण्याजाण्यात खुप वेळ जात आहे. आपण क्लासच्या आजुबाजुला जर राहू शकलो तर आपण जास्त अभ्यास करू शकतो. आपल्याला जास्त वेळ मिळेल. इतर मुलं आपल्या पेक्षा जास्त वेळ बसतात त्यामुळे ते वेगाने पुढे निघून जात आहेत. या बाबत इतर सहकारी मित्रांनी पण दुजोरा दिला. मन घट्ट करून या बाबत घरी बोललो. पण घरी एक अडचण होती. एकदमच तीनचार हजार रूपये कसेही करून जुळवता येतील पण दर महिन्याला नियमीतपणे भाडं कसं देणार? खेड्यात दर महिन्याला पैसे येतीलच याची काही हमी नसते. मग मेस चा खर्च तो कसा देणार? मग काॅलेजला रोज कसं जाणार? अडचणीने मला घेरायला सुरूवात केली होती पण मला आता ही संधी सोडायची नव्हती.मी खुप वैतागलो होतो. काही सुचत नव्हते. शेवटी मेसची चिंता नको,आम्ही हाताने जेवण बनवू, दररोज काॅलेजला चालत जाउ, लातुरात राहिलो तर बसच्या पासचे पैसे वाचतील, मी व मोठा भाऊ राहतो असे ठरले, हा तोडगा आम्हा सर्वांसाठी सुसह्य होता.वडिलांनी क्लास पाहीला होता, तेथील मुले पाहिली होती. त्यांना मी तिथं शिकावं ही इच्छा होती. ती कशी तरी जुळवून आणायचा आमचा सगळ्यांचाच प्रयत्न होता. जुळवाजुळव सुरू झाली. दिवस सरत होते. एके दिवशी मला खुप गंभीर झालेले पाहून वडीलांनी विचारले, मी त्यांना अगदी कळवळून बोललो, लातूर मधे राहिलो तर फायदा होईल. बोलता बोलता डोळ्यात पाणी आले. वडीलांना एकदम जाणीव झाली की मी किती गंभीर आहे. त्यांनी पुर्व तयारी नसताना माझी अवस्था पाहून मला सांगितले, "ठिक आहे ऊद्या रूम शोधू" हातात काहीच नसताना स्वप्न पाहणारा मी आणी ती कदापिही परवडत नसताना त्याच्या साठी स्वतःस वेठीस धरणारे माझे आईवडील...जर त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला नसता आणी जर मला व माझ्या स्व्प्नांना किंमत दिली नसती तर ....तर कदाचित ही कथा लिहायला मला संधी मिळाली नसती...परिस्थितीच्या क्रूर पंजाखाली माझी कथा अशीच अस्तंगत झाली असती. मी माझे स्वप्न हे फक्त माझे नव्हते, ते आम्हा सगळ्यांचा जिवनध्यास बनला होता, आईवडिल, दोन्ही भाऊ यांनी जर माझ्यावर व माझ्या स्वप्नांवर विश्वास ठेवला नसता आणी माझ्या सोबतीला राहीले नसते तर मीही इतराप्रमाणे परिस्थितीच्या वेलीवरील एक न उमललेले फुल ठरलो असतो....माझ्या स्वप्नांच्या दिव्यास त्यांनी वादळात तेवत ठेवले आपली ओंजळ करून आणी त्याचे चटके त्यांच्या हाताला बसले...कितीदा ते हात माझ्यासाठी इतरांकडे विनवणीचा व्यवहार करत होते..आज आठवले तरी जिव कासावीस होतो.....

        दुस-या दिवशी मी आणी माझे वडील...ते पुढे मी मागे..(..हाॅस्टेलची आठवण...फक्त त्यांच्या खांद्यावर लोखंडी पेटी नव्हती आणी माझ्या हातात पिशवी.. ) आम्ही रूम शोधायला सुरूवात केली. आजही तो क्षण आठवतो..ज्या भागात मातीच्या खोल्या आहेत तिकडून आमची सुरूवात झाली..झोपडपट्टीचा तो भाग..मी पाहतो आहे , वडील ही पाहत आहेत सरतेशेवटी तेच म्हणाले ईकडे नको , कारण इथे तुला रात्री यायला जायला अडचण होईल. मी तर अशा मानसिकतेत होतो की कसेही होवो , कसलीही असो एक खोली मिळावी बस्स!! सरतेशेवटी एक दहा बाय दहाची खोली (इतर कोणीच घेत नसल्यामुळे) आम्हाला मिळाली. घरमालक आज्जी चांगली व ग्रामीण भागातील असल्याने तेथे राहणे निश्चित झाले. आम्ही सामान घेवून रूमवर आलो. रोज सकाळी आम्ही लवकर ऊठून काॅलेजला चालत जायचो. ते संपले की आल्यावर दोन्ही वेळचा एकदमच स्वयंपाक.. मग मी क्लास कडे जाऊन अभ्यास करायचो...रूटीन बसलं होतं...जाण्या येण्याच्या वेळी मी डायरीत काढलेले व पाठांतराचे मुद्दे सोबत घेवून ते पाठ करत करत जात येत होतो. वेळ सत्कारणी लावत होतो. एक बेभान अवस्था आली होती. कोण काय म्हणेल.? काय समजेल? कसलीच तमा नव्हती. ...आता क्लासमधला माझा दर्जा उन्नत होत होता...मी ऊन्नत होत होतो...मला आत्मविश्वास येत चालला होता...

         एकदा अशीच परिक्षा झाली आणी तिच्या अनुषंगाने एक कार्यक्रम क्लासवर ठेवला..त्याला प्राचार्य अनिरुद्ध जाधव सर यांना बोलावले गेले...सरांना MPSC करणारी मुले आहेत हे कळल्याने त्यांनी कुठलाही राजशिष्टाचार न बाळगता येतो म्हणून सांगीतले. सर वेळेवर आले. त्यांनी आमचा गुणगौरव केला..आणी तुम्ही माझ्याच काॅलेजचे विद्यार्थी आहात, आपल्या काॅलेजच्या क्लास मधे काय कमतरता आहे म्हणून विचारणा केली. आम्ही चिडीचूप झालो काय बोलावे सुचत नव्हते. आम्ही धर्मसंकटात सापडलो होतो. पण सरांनी आश्वासक सुरात सांगितले की, इकडल्या चांगल्या बाबी आपण आपल्या काॅलेज मधे करू, तुम्ही जेथे चांगलं मार्गदर्शन मिळेल तेथे जाणे योग्यच आहे. हे ऐकल्यावर मग आम्ही सरांना दोन्ही बाजुची तुलना करून सांगितली. सर जरी गुणवत्तेचे पारखी असले तरीही ते खातरजमा करणारच ! हाच त्यांचा गुण "लातूर पॅटर्न " महाराष्ट्राला देवून गेला. सरांनी सांगितले की या क्लासची मुले आणी काॅलेजच्या क्लासची मुले यांचे एक डिस्कशन ठेऊ आणी मग निर्णय घेवू... झाले म्हणजे युध्दच!!!!

क्लासतर्फे मी, सागर, मुकरम भैय्या आणी नितीन, सचिन जाणार ठरले...भुगोल चर्चेचा विषय ठरला. मी खुप जिव तोडून अभ्यास केला. आम्ही सगळेच तयारी करत होतो. शेवटी आम्ही काॅलेजच्या क्लासला गेलो. तेथील आख्खा क्लास विरूद्ध आम्ही. प्रश्नाना तोंड फुटले. अटितटीने प्रश्न विचारले जाऊ लागले. मी लहान असल्याने मला जास्त संधी मिळाली. विचारलेल्या सा-याच प्रश्नाची उत्तरे आम्ही देत असल्याने काॅलेजच्या मुलामुलींना आश्चर्य वाटू लागले. रोजचेच मित्र पण झुंजच लागली, आम्ही अत्यंत योग्यरित्या ऊत्तरे दिल्याने शिक्कामोर्तब झाले की, काॅलेजमधील क्लास मधे सुधारणा अपेक्षीत आहे आणी ते करण्यासाठी तांबे सर!!!!! म्हणजे आता आमचे क्लास काॅलेजवर होणार!!! पुन्हा उलट , मग मी रूम कशाला केली?? पण आम्ही ठरवले की आता काही बदल नको, फक्त अभ्यास करायचा..

                       तांबेसरच क्लासला शिकवायला काॅलेजवर येत असल्याने आता सगळेच उन्नत होत होते, माझे आर्थिक नुकसान झाले असले तरी एक प्रचंड मोठा फायदा झाला होता आता तेथे विविध विभागातून सिरीयस कॅन्डिडेट त्या क्लासला येत होते..शर्यतीचा पट विस्तारला होता..आणी स्पर्धेसाठी मला स्फुरण चढत होते....मी पटावर उतरलो होतो....आता झुंज सुरू झाली होती......(क्रमशः)
प्रताप

Wednesday, October 17, 2018

स्पर्धा परीक्षेची बखर: 'मी' ते अधिकारी ...एक आठवणींचे मोरपीस भाग 10 : स्वप्ननाची पाऊलवाट रेखताना.....!!!

स्पर्धा परीक्षेची बखर: 'मी' ते अधिकारी ...एक आठवणींचे मोरपीस

भाग 10 : स्वप्ननाची पाऊलवाट रेखताना.....!!!


       बारावीच्या नंतर बि.ए. ची सुरूवात झाली. राज्यशास्त्र , लोकप्रशासन व इंग्रजी साहित्य हे विषय मी घेतले. वर्ष सुरू झाले. आणी मी नुकताच डि एड न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे मला MPSC साठी प्रयत्न करणे गरजेचे होते. मला माझा निर्णय चुकु द्यायचा नव्हता. मला माझं आयुष्य गुलाबासारखं फुलवता येईल की नाही माहित नव्हतं पण भर वैशाख वणव्यात फुलणा-या गुलमोहरा सारखा मी नक्कीच त्याला जुळवणार होतो. मी शिकायला सुरूवात केली....आणी मी दुसरे करू तरी काय शकत होतो!

      जुने मित्र निघून गेले, नविन मित्र मिळाले. वर्ष सुरू झालं तसा अभ्यास ही सुरू झाला. घेतलेले विषय सखोल शिकवले जात असत.पण हवे ते सापडत नव्हते. जिव कासावीस होत रहायचा. MPSC चा अभ्यास करायचा होता. काय करायचे सुचत नव्हते. सकाळी गावावरून निघायचे, काॅलेजला यायचे, शिकवलेले समजुन घ्यायचे. 2.00 वा. काॅलेज सुटायचे. पण बारावीची सवय होती. आणी गावात लवकर जाऊन करण्यासाठी काही नव्हते. ना गावात कुठली सुविधा ना वातावरण. सगळ्या खेड्यासारखे हे ही एक गाव, जिथे शेती, मजुरी किंवा रिकामटेकडेपणा या शिवाय चौथा पर्याय नव्हता. आणी ओढीने घराकडे जायला ना शेती होती ना धंदा. सोबत करता येईल असे मित्र ही गावात नव्हते. तसेच काॅलेज सुटल्यानंतर टाईमपास करत फिरायला खिशात पैसा तरी हवा , पण तो ही नसल्याने एकमेव चांगला आणी सुसह्यय पर्याय होता तो म्हणजे काॅलेजची लाएब्रेरी...आणी मी तिथे बसायला सुरूवात केली. मी तिथे बसत होतो आणि झपाटून वाचत होतो. पण त्याला ना दशा होती ना दिशा....पण । प्रयत्नांती परमेश्वर । म्हणतात...
         मी काही तरी वाचतो, जास्त वेळ बसतो हे सिनीयर्सच्या दोन मुलांनी पाहिले. व ते माझ्या आसपास बसु लागले. एक होते प्रकाश मस्के व दुसरे होते तोडकर. तेही असेच तगमगणारे व झगडणारे होते. त्यांनी मला काय करतोस म्हणून विचारले? मी त्यांना खुप अदबीने सांगितले की मी एमपीएससीची तयारी करण्यासाठी वाचत आहे. त्यावर त्यांनी मला सांगितले की, आम्हाला पण काहीतरी चांगले करून दाखवायचे आहे. आपण मिळून अभ्यास करू. मला खुप आनंद झाला कारण मला एमपीएससीच्या नावाने चिडवणारे खुपजण होते पण कोणी तरी त्याला गांभीर्याने घेतले होते. मस्के हे बाभळगाव चे रहिवासी, दररोज ते माझ्यासारखेच अपडाऊन करणारे. तर तोडकर हे लातुरमधेच रहायचे. आम्ही तिघांनीही खुप भाराऊन आणी गांभीर्याने ठरवून टाकले की खुप अभ्यास करायचा.पण हे असे होते की, आम्ही गावाला जायचे पक्कं केलं पण कोणत्या आणी कसे? हे मात्र माहिती नव्हतं...पण प्रत्यक्षात कृतीला सुरूवात झाली होती...मला खुप हुरूप आला होता..कसा आणी किती अभ्यास करावा याचेच पिसे मला लागले होते. आम्ही विस्कळीत का होईना पण खुपच अभ्यास करत होतो. मस्के आणी मी खेड्यातले असल्याने एकमेकांशी ट्युनिंगने राहत होतो. ते ही दुपारचा डबा आणायचे. मग मी ही डबा न्यायचो. आम्ही काॅलेज सुटल्यानंतर जो आणी जसा असेल तो डबा खायचो. आणी अभ्यास करायचो. काही दिवसांनी काॅलेजच्या नविन इमारतीचे काम सुरू झाले. आणी लायब्ररीच्या गर्दीत वाढ झाल्याने आम्ही तिघांनी ठरवले की वेगळ्या ठिकाणी अभ्यास करू. आणी आजही डोळ्यांसमोर ते दिवस येतात...आठवले तरी पोटात कालवा कालव होते..आम्ही शांत वेळ मिळेल म्हणून त्या बांधकामाचं काम सुरू असलेल्या इमारतीत कोणाला कळणार नाही अशा पध्दतीने अभ्यासाला बसू लागलो...जणू काही आम्ही आयुष्याचं बांधकाम काढलं होतं....

            मी एकाचवेळी अनेक भूमिकेत होतो. रेग्युलर काॅलेज मधे रेग्युलर विद्यार्थी, भरपूर मित्र मैत्रिणी. आणी ते सगळे घरी गेले की एमपीएससीचा अभ्यास करणारा विद्यार्थी, मित्रासाठी भांडणारा मुलगा, एनएसएस मधे सक्रिय सहभाग,आणी स्नेहसंमेलनात विविध सांस्कृतिक कार्यक्रमात लक्षणीय व बक्षिस मिळेपर्यंत सहभाग.पण हे सगळं चाललं होतं एका "आएडेंटिटी क्रायसीस" साठी ! मला माझी ओळख निर्माण करायची होती. सर्व सिमा तोडायच्या होत्या. लांघायची होती ही आयुष्यातील अंतरे! मी जवळपास सगळंच करत होतो. पण पुर्णत्वाचा साधा आभासही होत नव्हता. फक्त एक होतं मात्र! मी इतरा सारखा नाही हे मला कळायला सुरूवात झाली होती. माझे हे दोन्ही सिनीयर्स आणी मी अभ्यासा सोबतच अत्यंत भावनिकतेने भविष्या बद्दल बोलायचो. त्यामुळे झगडण्याची जिद्द वाढली. आणी स्वप्न पेरून जर त्यांची नीट मशागत केली तर ते मुळ धरतातच !!!! याचा आलेला पहिला प्रत्यय म्हणजे शाहू काॅलेज जे महाराष्ट्रालाच नाही तर पुर्ण देशाला ज्याने मेरिट, मेडिकल व इंजिनियरींग साठीचा "शाहू पॅटर्न " , "लातूर पॅटर्न " दिला त्या महाविद्यालयास नावारुपाला आणणारे आदरणीय प्राचार्य अनिरुद्ध जाधव सर यांची नेहमीच एक खंत असायची की, आपण महाराष्ट्राला दर वर्षी शेकड्याने मेरिटचे विद्यार्थी देतो. पण आपण आज पावेतो स्पर्धा परीक्षा क्षेत्रात काहीच करू शकत नाही, या साठी त्यांनी काॅलेज मधे नव्याने रूजू झालेल्या प्राध्यापकांना घेवून महाविद्यालयातच " स्पर्धा परीक्षा" विषयक वर्ग प्रथमच सुरू केले!!! त्यांचा हेतू अत्यंत प्रामाणिक होता...मी एमपीएससी करायला सुरूवात (पण तशी ती फक्त भावनिकच होती हे नंतर कळले) केली आणी त्याचवेळी व वर्षी काॅलेजने हे क्लास सुरू केले....शुभशकूनच होता हा!!!!!

             मी माझ्या सिनियर सह त्या वर्गास बसू लागलो. तेथे इच्छुक विद्यार्थी एकत्र आल्याने अजून हिंमत आली. अनिरुद्ध, मकरंद, निर्भय जाधव, प्रदिप राऊत , मनिषा (asst. Comm. Vat),असे काही सिरीयस वर्गमित्र तेथे भेटले. ते ही क्लासला यायचे. आम्ही सगळे काॅलेजचेच असल्याने आम्हाला सकाळी शिकवणारे प्राध्यापकवृंदच सायंकाळी शिकवायचे. पण महाविद्यालयीन विषय आणी एमपीएससीचे विषय यात साम्य असले तरी अॅप्रोच भिन्न असतो. महाविद्यालयात इतिहास शिकणे आणि एमपीएससी साठी इतिहास तयार करणे यात मोठा फरक असतो. हे समजत नव्हते. सगळेच अनअनुभवी पण हेतु मात्र खुप उदात्त!! आम्ही शिकत होतो. पण अपुर्णत्वाची रूखरूख येथे होतीच.पण एकट्याने दिशाहीन अभ्यास करण्यापेक्षा सामूहिक काहीतरी भरीव करण्याचा हा प्रयत्न ही आश्वासक होता...कमीत कमी या प्रयत्नांमुळे इच्छुक विद्यार्थ्यांचा संपर्क झाला. भलेही तो काॅलेजचा एक आदर्शवत उपक्रम होता. पण सर्वोत्तमचा ध्यास असणा-या जाधव सरांना आणी आम्हा विद्यार्थ्यांना अपुर्णत्वच जाणवत होते. आमच्या पैकी खुप जण काहीतरी नविन आहे म्हणून आले होते. आम्ही शिकत होतो....त्या बॅच मधिल अनेकजणांनी महाविद्यालयाची परिक्षा येण्या अगोदरच क्लास बंद केला आणि वार्षिक परिक्षा आल्याने      काॅलेजने पण.....त्यातील अनेकजण आज विविध क्षेत्रात नावारुपाला आले आहेत अनिरुद्ध कुलकर्णी हा संपादन, लेखन, अनुवाद व सामाजिक संघटन यात एक अग्रणी नाव बनत आहे. तर निर्भय जाधव हा स्पर्धा परीक्षा क्षेत्रात पुण्यात एक नावाजलेले नाव आहे. ज्याच्या मार्गदर्शनातून अनेक अधिकारी घडत आहेत.फक्त चटका लावणारी एकच गोष्ट...माझ्या दोन्ही सिनीयर्स पैकी प्रकाश मस्के यांनी एमपीएससी सोडली ते गावी असतात तर तोडकर यांचा संपर्क झाला नाही. एकदा सुट्टीला गेल्यावर अचानक मस्के लातूर मधे गांधी चौकात भेटले. प्रथम मी तहसीलदार असल्याने जपून पण नंतर , (मी आजही त्याच आदराने त्यांना पाहतो याची जाणीव झाल्याने ) डोळ्यात पाणी आणून त्यांनी माझं कौतुक केलं, पाठ थोपटली. आणी भावड्या तु तरी करून दाखवलंस !अभिमान वाटतो! म्हणून भरभरून बोलले. माझ्या आयुष्याला हातभार लावणारे त्यांचे हात....जर प्रशासनात असते तर.......काही स्वप्न ऊगवतात पण मुळ धरत नाहीत.. त्याला अनंत कारणे असतात पण ..असो त्यांचा आदर कायम आहे माझ्या मनात...कारण माझ्या प्रयत्नांना त्यांनी पहिल्या टप्प्यातच खुप भावनिक आधार दिला .. आणी आज माझ्या यशाचं निर्मळ मनाने कौतुक करून त्यांनी त्यांच्या विशाल ह्रदयाचा परिचय ही दिला...

              याच वर्षात महाविद्यालयीन आयुष्य भरभरून जगता आले. एनएसएसचा कॅम्प तर अविस्मरणीयच! भुकंपग्रस्तांसाठी चलबुर्गा गावात गेलेला हा कॅम्प, तेथे भुकंपग्रस्तांसाठी घराच्या बांधकामासाठी पाया खोदण्याचे केलेले काम, केलेले सांस्कृतिक कार्यक्रम, उनाडपणा आणी तरीही उत्कृष्ट पथक म्हणून गौरव यातुन आपोआपच नेतृत्वगुण विकसीत होत गेला, कष्टाची सवय दृढ झाली आणी जिवाभावाचे मित्र भेटले शेळके(पिंट्या), लखादिवे,संतोष..असे खुपजण..ज्यांनी आयुष्यातील उणीवा मैत्रीने भरून टाकल्या. असेच उणीवा भरून काढणारे व सतत संपर्कात राहून प्रेरणा देणारे मित्र म्हणजे जयपाल , युसूफ, ईस्माइल, विनोद,डाॅ.संघरत्न सोनवणे( खो खो चा नामांकीत खेळाडू ते पुणे विद्यापिठाचा एक स्काॅलर विद्यार्थी व महाराष्ट्रातील वर्तमान बुध्दिवादी आगामी विचारवंत) संतोष तंत्रे (मला गाणे शिकवणारा, स्नेहसंमेलनाच्या साठी तयारी करून घेणारा संगीताचा तत्कालीन विद्यार्थी व आता संगीत महाविद्यालयाचा संचालक आणी संगीत विद्यापिठाचा सदस्य)आलोक चिंचोलकर(कोणाचेही भांडण असो आलोकने सांगितले की ते मिटणारच असा दरारा असणारा पण जेंव्हाही भेटला तेंव्हा- होतोस रे तु! अभ्यास कर म्हणून सतत आत्मविश्वास वाढवणारा महसूल खात्यातील माझा सहकारी), संजय गायकवाड (रेल्वे सेवा), महेश सुडे, प्रा. युवराज वाघमारे, सचिन आडाणे( राष्ट्रीय ख्यातीचा बास्केटबॉल खेळाडू व क्रिडा शिक्षक) असे अनंत मित्र ज्यांनी आयुष्य शिकवले व भरीव केले...तसेच मैत्रिणी ज्यांनी सामाजिक सभ्यतेचे भान ठेवत सातत्याने केलेले कौतुक...या सर्वांनी आयुष्यात अर्थ निर्माण केला. मी महाविद्यालयात एमपीएससी शिकत होतो पण वार्षिक परिक्षा आल्याने ते क्लास बंद झाले. मी काॅलेजचा अभ्यास सुरू केला.

         काॅलेजचा अभ्यास सुरू केला की, आठवणारा एकमेव मित्र म्हणजे गज्या!! (गजानन सुरवसे) त्या काळातील काॅलेजचा फॅशन आयकाॅन, अत्यंत सुबक दिसणारा, हुशार पण वर्षभर स्वतःच्या धुंदित सुखी असणारा, खेळाडू (बास्केटबॉल, व्हाॅलीबाॅल) व आत्ताचा LIC -D.O., युपिएससी होता होता वाचलेला (त्यामुळे तो आजही शिव्या खातो सर्वांच्या)माझा नववी पासुनचा बालमित्र (ज्याने सदैव साथ दिली) तो अभ्यासाला यायचा. मी काढलेल्या नोट्स भांडून हक्काने वापरायचा आणी बरोब्बर स्वतःचे डोकं लावून परिक्षेत लिहायचा आणी इतरांच्या बरोबरीने मार्क्स घ्यायचा, सगळ्यांना धक्का!! वर्षभर वर्गात नियमीत नसणारा पण तरीही भरपुर मार्कस घेणारा तो अजुन भाव खाऊन जायचा. त्यातल्या त्यात मुलीमधे जास्त गाॅसिपींग असायची ती पुन्हा वाढत राहील अशी तरतुद होउन जायची. हा तो मित्र ज्याने MPSC स्वतः केली नाही . पण माझ्या MPSC च्या तयारीच्या काळात क्वालिटी इनपुट दिले व मदत केली (त्याचा संदर्भ येईलच पुढे).

         या सर्व मित्रांत व विविध उपक्रमात मी राहूनही मला सतत एमपीएससीची हुरहुर असायची. मी स्वतःला खुप
ताणत होतो. कुठलीही जागा नैराशासाठी शिल्लक राहणार नाही या साठी स्वतःला गुंतवून ठेवत होतो. काही सिनियर मंडळी येता जाता मला खोचकपणे काय MPSC! काय चालले आहे म्हणून विचारायचे. मी त्यांना हसून उत्तर द्यायचो पण मनात चर्रर्र व्हायचे आणी खुणगाठ अजुन तिव्र व्हायची की, अशी टिका , खोचक शेरे आयुष्य भर नको असतील तर अभ्यास करावा लागेल. मला हरवलेले पान व्हायचे नव्हते. मला माझी गडद रेषा ओढायची होती. मला डंका पेटवायचा होता!!!!

           बि ए प्रथम वर्ष हे MPSC करण्याच्या साठी कृतीशील वर्ष ठरले. या वर्षी नविन सहकारी भेटले, काॅलेज मधे क्लास होऊन तिन चार महिने नविन काही शिकायला मिळाले. मी वर्गात शिकवल्या जाणा-या अभ्यासातही MPSC चा कंटेंट पाहत असे त्यामुळे कधिकधी प्राध्यापक मंडळी अंदाज घ्यायचे. विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मी इतरही संदर्भ देवून ऊत्तर देत असल्याने मला गांभीर्याने घेतले जावू लागले. वर्गातल्या काही मुलामुलींना थोडे आश्चर्य वाटायचे, ते कौतुकाने पहायचे, कधिकधी सर ही कौतुक करायचे. पण मला कधी शेफारल्या सारखं झालं नाही.किंवा मी कधि स्वतःला विशेष समजत नव्हतो, अधुन मधुन सर लोक कंट्रोल ठेऊन असायचे. एकदा मी व संतोष काॅलेज सुटल्यानंतर एका रिकाम्या वर्गात बसलो होतो. आमची चर्चा सुरू होती. चर्चेचा विषय होता गॅट करार. आम्ही बोलत होतो. फार काही क्वालिटी डिस्कशन नव्हते ते पण गोंधळ मात्र क्वालिटीचा होता! आम्ही त्वेषाने बोलत असतानाच महाविद्यालयाचे प्राचार्य अनिरुद्ध जाधव सर राऊंडवर असल्याने ते त्या वर्गासमोर आले हे आमच्या लक्षात आले नाही. महाविद्यालयाचा नियम होता की काॅलेज संपले अथवा लेक्चर ऑफ असेल तर एकतर काॅलेज बाहेर किंवा सरळ लाएब्रेरीत बसायचे. आम्ही तर दोन्ही नियम तोडले होते. रितसर चौकशी झाली. ओळखपत्र जप्त झाले आणी खुप बोलण्याची हौस आहे तर सायंकाळी 5.00 वा. वादविवाद स्पर्धा होत असलेल्या वर्गात भेटायला बोलावले आणी ओळखपत्र घेवून जायला सांगितले. पर्याय नव्हता, सायंकाळी 4.45 वा. घाबरत घाबरत हजर राहिलो. वर्गात बसलो. फोरम फाॅर फ्री एंटरप्रायझेस तर्फे तेथे "कामात नितीमूल्यांची आवश्यकता " या विषयावर वक्तृत्व स्पर्धा आयोजित होती.मला वाटले ऐकायला लावतील आणी नंतर समज देवून परत पाठवतील.त्या हिशोबाने मी वर्गात बसलो होतो.सर आले, स्पर्धा सुरू झाली, स्पर्धक बोलत होते, अचानक माझ्या नावाचा पुकारा झाला. मी एकदम हबकून गेलो. मी नको ही म्हणायच्या स्थितीत नव्हतो. काही ओळखीचे स्पर्धक तेथे होते. सर पण बसलेच होते. नकार देणे म्हणजे शालजोडीतील शब्दानी सत्कार झाला असता. विचार केला बोलणी खाण्यापेक्षा बोललेलेच बरे! आणी ओळखपत्र ही परत घ्यायचे होते !! मी मनाचा हिय्या करून उठलो. मी अगोदरच ऊठायला आवश्यकतेपेक्षा जास्त वेळ घेतला होता. मी उठलो, डायसवर गेलो, क्षणभर दिर्घ श्वास घेतला, आणी मी बोलायला सुरूवात केली. मी बोलत होतो सात मिनिटांचा वेळ होता मी अकरा मिनीटे बोललो. गुपचुप खाली येऊन बसलो, स्पर्धा पुर्ण होईपर्यंत बसण्या शिवाय पर्याय नव्हता. मी बसलो, माझ्यानंतर तिघेजण अजून बोलले. स्पर्धा सुरू असताना माझे सगळे लक्ष ओळखपत्रावर होते. आगाऊपणा केला असता तर सरळ घरी पत्र गेले असते. मग पालकां समोर हजेरी झाली असती. स्पर्धा संपली, निकाल जाहीर करण्याची वेळ आली. मी तो झाल्या बरोबर माझे ओळखपत्र घेवून व बोलणी खाऊन जाण्याची मानसिक तयारी करून बसलो होतो. निकाल जाहीर करायला सुरूवात झाली, अगोदर उत्तेजनार्थ बक्षिसे जाहिर झाली, तृतीय बक्षिस आणी त्यानंतर द्वितीय पारितोषिक जाहीर झाले आणी ते मिळाल्या बाबत माझे नाव!!!! मला सर्वात अगोदर माझे ओळखपत्र मिळाले, त्या सोबत प्रमाणपत्र व बक्षिसाची रक्कम व सोबत पाठीवर थाप, एक स्मितहास्य व सोबत पुन्हा वर्गात बसून गोंधळ करायचा नाही ही समज !!!! मला त्या दिवशी खुप आश्चर्याचे धक्के बसले, व एक जाणिव झाली , आपण एवढेही वाईट बोलत नाही दिलेल्या विषयावर !!!

                मोठा भाऊ राहूल आता क्लासमेट होता. त्याला चित्रकलेने झपाटले होते. तो विविध प्रयोग करून त्याचे कौशल्य वाढवत होता. तर लहान भाऊ निशांत शाळेत असतानाच वादविवाद - वक्तृत्व करायला त्याने सुरूवात केली होती. गावातले काही लोक कुजबुजत रहायचे. आम्ही मात्र आमचे वेड घेवून निघालो होतो. आईवडिल आमच्यावर नितांत विश्वास ठेवून होते. तरीही अधुन मधुन ते सातत्याने जाणीव करून द्यायचे. वडिलांनी एक गोष्ट सांगितली होती ती चिरस्मरणात आहे "घडी(क्षण) गेली की पिढी बिघडते" ," तुमचे शिक्षण हिच आमची कमाई आहे" या सगळ्या गोष्टी मी लक्षात ठेऊन होतो. आणी माझी वर्षभराची ही चाललेली धडपड एकजण अत्यंत अलिप्त होवून पाहत होता. मी काय वाचतो, किती गंभीर आहे वगैरे माझ्या प्रत्येक हालचालींचा लेखाजोखा एक व्यक्ती ठेवत होता. फक्त त्याची खात्री पटली की मग तो पुढे येवून मला मदत करणार होता...आपण आपल्या धुंदीत चालत राहतो. पण काही लोक आपला मार्ग सुरळीत होण्यासाठी नकळत कारण बनतात. ते मार्ग सुकर करतात. मी स्वप्न पेरले होते,त्यांने मुळपण धरले होते. पण त्याची वाढ होण्यासाठी आवश्यक ती पार्श्वभूमी तयार होत होती. माझ्या निष्ठेपोटी अथवा कोणाच्या तरी चांगुलपणा व तळमळीपोटी मी MPSC च्या जवळ जाणार होतो

       ...नियती पट आखते..काही चांगले लोकही पेरून टाकते आयुष्यात...फक्त आपण आपले सत्व टिकवायला हवे. आपली आपल्या स्वप्नांवर निष्ठा हवी...पाऊलो कोएलो च्या "द अल्केमिस्ट" यातुन मिळणारा संदेश "ध्येयवेडेपणा घेवून जर आपण निष्ठेने स्वप्नपूर्ती कडे वाटचाल करत राहिलो तर सारं जग तुमच्या मदतीला धावून येते, फक्त नियती वेळोवेळी आपल्याला संकेत देत असते व आपल्याशी स्वप्नाची भाषा बोलत असते ती आपण ओळखायला हवी व चालत रहायला हवे सतत" हा एकदम खरा आहे.याची शब्दशः प्रचिती मला आहे. फक्त स्वप्न खरी असतात, अडचणी खोट्या..अडचणीमुळे उलट आपण मजबूत व दृढ व्हायला हवे. मुलं मुली जेंव्हा सांगतात की सर माझी परिस्थिती खराब आहे, घरी अडचणी आहेत तेंव्हा खरं तर ते अडचणीला शरण जात असतात हे जाणवते , खरं तर अशा अडचणी मुळेच तर आपली स्टोरी बनत असते. त्या नसतील तर आपली स्टोरी कशी बनेल. उलट अडचणी असल्यास आपण नियतीचे आभार मानले पाहिजेत कारण तिने आपल्याला लढण्याचे कारण दिले. पाय रोवून आपण थांबायला हवे आणी भिडायला हवे प्रतिकुलते सोबत.."कौन कहता है आसमां में छेद नहीं होता । जरा तबियत से पत्थर तो उछालो यारो।" मी स्वप्न पथावरील पहिला मैलाचा दगड गाडला होता...मी पाऊलवाट रेखाटायला सुरूवात केली होती..(क्रमशः)


(प्रताप )

Sunday, October 14, 2018

स्पर्धा परीक्षेची बखर: 'मी' ते अधिकारी ...एक आठवणींचे मोरपीस भाग 9: मला स्वप्नाने झपाटले...

स्पर्धा परीक्षेची बखर: 'मी' ते अधिकारी ...एक आठवणींचे मोरपीस

भाग 9: मला स्वप्नाने झपाटले...


             बारावीचं व्हेकेशन सुरू झालं. अशावेळी काॅलेज मधे फक्त 12 वी चेच विद्यार्थी येत जात असत.त्यामुळे एक शांतता असायची..विद्यार्थी कमी असल्याने व इतर धावपळ नसल्याने प्राध्यापकवृंद जास्त वेळ द्यायचे.. सरांच्या ओळखी दृढ व्हायच्या सरांना विद्यार्थ्यांची परिस्थिती कळून यायची. ते मग अशा विद्यार्थ्यांना जरा जास्तच आस्थेने शिकवायचे. व सतत परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असते या बाबत भान ठेवायला अभिप्रेरीत करायचे. कारण आम्हाला शिकवणारे जवळपास सर्वच प्राध्यापक स्वतःच अत्यंत बिकट परिस्थितीतुन आलेले होते.त्यांना परिस्थितीची जाण होती आणी त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीत कसे टिकून रहायचे हे सतत ते प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या ते सांगत रहायचे. काही सर तर स्टाफरूम मधे बोलवून अडचणी विचारायचे. मी धडपड
करणा-यापैकी आहे हे त्यांना माहीत असल्याने त्यांना आस्था असायची. त्यामुळे हुरूप यायचा , वाटायचं सर एवढे समजवून सांगतात तर आपण मेहनत घेतली पाहिजे...काही असेच चांगले मित्र मैत्रिणी धडपडताना पाहिले की लढण्याची जिद्द वाढायची. बहुतांश मित्र मैत्रिणीना बारावीत खुप अभ्यास करून डि एड ला जायचे होते. मी मात्र एकटाच असा होतो की मला डि एड करायचे नव्हते.पण अभ्यास करायचा होता. मी तो करताना ठरवले होते की फक्त काॅलेजच्या विषयाचा नाही तर सामान्य ज्ञानाचाही अभ्यास करायचा. थोडेफार मार्क्स कमी पडले तरी चालतील (अर्थात हा दृष्टीकोन मी घरी कळू दिला नाही, कारण माझ्या नात्यातील व गावातील खुप जणांनी वडिलांना सल्ला दिला होता की 'जर लवकर डि एड झाले तर घरची अडचण दुर होईल. मग पुढे शिकून तो काही का करेना !' आणी वडील पण दोन तिन वेळा सहज हा विषय बोलून गेले होते) पण मी ठरवले होते की मी डि एड वगैरे करणार नाही. कारण मला माहित होतं. "गड सर करायचा असेल तर सगळे दोर कापावे लागतात!" मी खरंच खुप धुमसत होतो...मला आता परिस्थिती म्हणून नाही तर " स्वंयसिध्दीच्या गरजे पोटी " MPSC करायची होती .पण जरी ठरलं असलं तरी परिस्थिती अत्यंत बिकट बनली होती. कारण अकरावीच्या नंतर सुट्ट्या नसल्याने मला कोठे कामासाठी जाता आले नाही..अख्खं वर्ष वंचनेचे चटके बसणार होते...नुसती परिक्षाच नव्हती तर सत्वपरीक्षा वाट पाहत होती. आणी मी ही आता सज्ज झालो होतो...

         बारावी सुरू झाली , फार वेगाने अभ्यासक्रम शिकवला जात होता. ऊर्वरित वेळेत विविध परिक्षा घेवून मुल्यमापन केले जात होते. जेथे उणीवा होत्या ते पुन्हा शिकवले जात होते. सकाळी सहा वाजता गावाकडून निघून मी रात्री नऊ , साडे नऊ ला घरी जात होतो. दिवसभर काॅलेजच्या अभ्यासिकेत बसून वाचन चालायचे. इतर काही करण्यासारखे नव्हते. अभ्यासिकेत इतर पुस्तकाचे वाचन सुरू रहायचे. मित्रासोबत चर्चा व्हायच्या. पण या मुळे मी पुस्तकी किडा होणार नाही याचीही काळजी घेत होतो. घरी ऊशीरा गेल्यावर घरचे विचारायचे ऊशीर का झाला? मी उत्तर द्यायचो की अभ्यास करत बसलो होतो. गुपचूप असेल ते जेवायचे आणी मग दुस-या दिवशी पुन्हा तेच...
गरीबीची लाज वाटण्या इतपतही उसंत मी ठेवली नाही स्वतःला...पण खुप तीव्रतेने जाणवायचे, आणी आजही आठवते, पुर्ण वर्षभर माझ्याकडे काॅलेजचा युनिफॉर्म सोडला तर फक्त एक जास्तीचे शर्ट होते !!!. युनिफॉर्मला सुट्टी असलेल्या दिवशी मी तो शर्ट वापरायचो...वर्षाच्या शेवटी शेवटी तो खुप विरळ झाला होता. भिती वाटायची की तो फाटला तर काय??? पण सुदैवाने त्याने वर्षभर साथ दिली. त्या शर्टाची आजही आठवण येत राहते....

            काॅलेज मधे तसा मी ब-यापैकी सर्वांना माहित होतो. सिनीयर्स ही नावानिशी ओळखायचे. प्राध्यापक, शिपाई मंडळी यांच्यात ही माझी चांगली ओळख होती. आणी भरपूर मित्र परिवार होता. मला सातत्याने या सर्वांकडून प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पाठबळ मिळायचे. मीही माझ्या सारख्या फाटक्या परिस्थितीच्या मित्रांना धिराचं बोलायचो. शिकत होतो , टिकत होतो. गरीबी आता उणीव वाटत नव्हती, आता ती हवी होती कारण मला तिलाच भिडायचे होते. तीच माझी संपत्ती बनत चालली होती. या महाविद्यालयांने मला सगळ्यात जास्त काय शिकवले ? तर स्वाभिमान व आत्मभान!!आणी गरीबी मुळे लज्जित न होता तीला संपवण्यासाठी प्रयत्नवादी रहायचे...सोबतच्या मित्रांनीही कधी कोणालाच ती जाणवेल असे वर्तन केले नाही. ते आमच्या पिढीचं अनमोल शहाणपण होतं. म्हणून त्या काळातील सर्व मित्र मैत्रिणी या आयुष्यभराचे साथी झाले आहेत. आजही आम्ही संपर्कात आहोत.

      अधुन मधुन वडील अचानक काॅलेज मधे यायचे , आणी मी काय करतो आहे ते पहायचे. पण मी कधीच काही वावगं करत नसल्याने ते समाधानाने परत जायचे. हे बारावीचे वर्ष एवढे अनमोल आहे आयुष्यात की काॅलेज ची आठवण आली की हेच वर्ष डोळ्यांसमोर येतं. सर्व मुले भारावलेले.. एकमेकांशी अतूट भावनेने वागणारे.. एकमेकाला आधार देत आयुष्याचा प्रत्येक भाव तन्मयतेने जगणारे असे सगळे...आजही आम्ही बहुतांश जण परस्परांच्या संपर्कात आहोत..पण काहीजणांचा संपर्क झाला नाही. आयुष्याचे ही हरवलेली पाने भेटत नसल्याने हुरहुर दाटून येते...


        हे बारावीचे वर्ष मला खुप काही शिकवत होते. अभ्यास, आयुष्य, मैत्री, गुरुजनांचा आदर, सामाजिक दृष्टिकोन, कौटुंबिक समस्या, आर्थिक मर्यादा व त्यावर मात करण्यासाठी प्रयत्न. आता मला परिस्थिती भितीदायक न वाटता आव्हानात्मक वाटायला लागली. ती जेवढा दबाव टाकायची तेवढी जास्त उसळी आत मधून यायला लागली. मी मन लावून अभ्यास करत होतो. दहावी सारखं हे वर्ष मला गमवायचं नव्हते. मी जास्तीत जास्त वेळ अभ्यासिकेत घालवत होतो. पण सगळा वेळ निव्वळ 12 वी ला न देता मी MPSC ची उपलब्ध पुस्तके पण वाचत होतो. ते वाचताना मला काय सिलॅबस असतो, काय विचारले जाते, अभ्यास कसा करायचा असतो, परिक्षा कशी असते या बद्दल काहीही माहित नव्हते. पण मी अभ्यास करत होतो. कोणाला विचारावे असे कोणी नव्हतेही आसपास...आणी त्या वेळी मी MPSC बद्दल कोणाला विचारणे म्हणजे स्वतःचे हसू करून घेण्यासारखे होते .वर्ष झपाट्याने सरत होते.


              वर्गात भरपूर मुले होती जे लातुरच्या आसपासच्या खेड्यातून रोज यायचे. चर्चा व्हायच्या. सिनीयर्स किंवा वर्गातील मुले विविध चळवळी, आंदोलने यावर बोलायचे. आणी त्यात सक्रिय होण्याचा प्रयत्न करायचे. मी मात्र राजकीय दृष्ट्या कसलीही सक्रियता ठेवली नव्हती. विद्यार्थ्याच्या उद्बोधनासाठी काॅलेज विविध कार्यक्रम आयोजित करायचे. अशा कार्यक्रमांना हजर रहावे लागायचे. अशा उपस्थितीमुळे खुप काही शिकायला मिळायचे.

        बारावीची परिक्षा जवळ आली. मी ब-यापैकी अभ्यास केला होता. त्या सोबतच मी इतर ही सामान्य ज्ञानाचा अभ्यास केला होता. माझ्या वर्गमित्रांनीही खुप अभ्यास केला होता. आम्ही सगळ्यांनी परिक्षा दिली. मीही खुप चांगल्या पद्धतीने पेपर लिहीले. ते लिहिताना सामान्य ज्ञानाचा जो काही विस्कळीत अभ्यास केला होता त्याचाही वापर केला. मार्क्स किती पडतात या पेक्षा विश्लेषणात्मक लिहले आहे याचे जास्त समाधान होते. परिक्षा झाली. मोठा भाऊ ही सुट्टीला आला. आता तो परत जाणार नव्हता.कारण त्याचे नवोदयचे शिक्षण पुर्ण झाले होते. आणी लहान भाऊ दहावीला जाणार होता. आगामी वर्षात खर्च वाढणार होता. याची जाणीव आम्हा सर्वांना होती. अकरावीच्या सुट्ट्यात काम न केल्याने ही अडचणी वाढल्या होत्या. त्यामुळे सुट्ट्या लागल्या बरोबर आम्ही तिघे भाऊ कंपनीत कामाला निघालो.फरक एवढाच होता की लहान भाऊ ऑफसेट मधे तर मी व मोठा भाऊ नव्याने स्थापित बायोफर्टिलायझरच्या कंपनीत कामाला जात होतो. मला या कंपनीत बाॅयलर चालवावा लागला. हे अत्यंत धोकादायक काम होतं. पण पर्याय नव्हता. मी ते शिकून घेतलं. माझ्या सोबत मोठा भाऊ पण ते काम करायचा पण नंतर त्याला तेथुन दुस-या युनिट मधे काम करावं लागलं. मला हे बाॅयलर चालवताना खुप वाईट वाटायचं पण मी करू तरी काय शकत होतो? अजून माझा दिवस उगवायचा होता....

         सर्व सुट्ट्याभर आमचा एकच दिनक्रम..सकाळी 6ला उठायचे आणी 7वाजता कंपनीत..रात्री 7वा. सुट्टी झाली की घरी...बस्स! आयुष्य एवढे अनुभव देत होतं की, कधी सुट्ट्यात मौज करण्याचा पुसट विचारही मनात येत नव्हता.. आम्ही सकाळी सोबत घेऊन गेलेला डबा दुपारी खायचो. तो कधी कधी खराब झालेला असायचा.पण पर्याय नव्हता. पुर्ण सुट्ट्या आम्ही गुमान काम केले. ना कुठल्या कार्यक्रमाला, ना लग्नाला, ना इतर ठिकाणी जायला भेटायचे . पण त्याचे वाईट वाटण्याचे काही कारण नव्हते...गावातल्याही कुठल्या कार्यक्रमात आमचा सहभाग अथवा उपस्थिती रहायची नाही. कधितरी मित्र गावाकडे भेटायला यायचे..सगळं पहायचे..माझ्याकडे लपवण्या सारखंही काही नसल्याने मीही आहे तसा त्यांना भेटायचो. ते आधाराचं बोलायचे. आणी परत निघायचे.मन पुन्हा भरून यायचं..वाटायचं काय हे दिवस आहेत? कधी बदलेल हे सगळं? पण काळ आपल्याच गतीनं चालत असतो. त्याला लवकर संपवता येत नाही की लांबवता येत नाही..त्याचे भोग भोगायचेच असतात. ही सुट्टीही अशीच कामात गेली..

        कंपनीतून चालत परत येताना आम्ही नि:शब्द असायचो. ते 3 कि.मी. चे अंतर फक्त आत्मसंवाद चालायचा. फक्त एक बाब होती ज्या माळरानावर मी स्वप्नबिज पेरले होते ते रस्ताभर सोबत करायचं आणी मुक्याने ओरडून ओरडून सांगायचं...विसरू नकोस तुझ्या स्वप्नांनी अजून ऊगवायला सुरूवात केली नाही. आणी मग आत्मसंवाद जास्त बोलका व्हायचा. अशा प्रत्येक संध्याकाळी मी स्वप्नांना अंगाखांद्यावर घेवून प्रवास करायचो. संध्याकाळ भारलेली असायची. जिवात कोलाहल असायचा. आत्मउन्नतीचा ध्यास हीच खरी संपत्ती आहे. हे मनावर ठसायचे. मी रंगीत संध्याकाळ सांजावताना पाहत असायचो...आणी गावच्या माळरानावरून दिसणा-या लातुरच्या दिव्याच्या ठिपक्यात मला माझे स्वप्न प्रकाशमान होताना दिसायचे...

       बारावीचा निकाल लागला. चांगले मार्क मिळाले. आणी ठरलेल्या पध्दतीने घरी सल्ले द्यायला अनेक हितचिंतक येवून गेले. बहुतांश लोकांनी डि एड करण्याचा सल्ला दिला. पण माझ्या मनात एमपीएससी करण्याचा मनसुबा दृढ झाला होता. मी मला कुठेच गुंतवणार नव्हतो. सर्वांनी परिस्थितीचा विचार करून डिएड चा सल्ला दिला होता. पण मला परिस्थितीला शरण जायचे नव्हते. मला तिच्यावर मात करण्यासाठी झगडायचे होते. मला आता मीही थांबवणार नव्हतो...सरते शेवटी मी डिएड न करण्याचा निर्णय घेतला, वर्गातल्या सर्व हुशार मुलांनी चांगले मार्क्स घेतले व ते डिएडला गेले. मी मात्र कुठल्या उत्साहाने पुढील तिन वर्ष काढणार होतो काय माहीत? एक अनिश्चिततेची पोकळी होती. मी चालायला सुरूवात केली होती. सर्व हुशार मित्र डिएडला गेल्याने थोडीशी पोकळी वाटत होती...पण ती पोकळी मी स्वप्नानी भरून टाकली होती. एक अवघड दिशेने मी पाऊल टाकले होते. ज्या निर्धाराने मी घरच्या लोकांना डिएड करणार नाही म्हणून सांगीतले होते तो निर्धार मी कोठून आणला होता मलाच आज आश्चर्य वाटते. कशाच्या भरवशावर मी हा डाव मांडला होता माहित नव्हते. कसा, कधी मी एमपीएससी पास होणार होतो याची सुतराम कल्पना नव्हती पण एक मात्र नक्की माहित होते ... मी एमपीएससी पास होणारच होतो....!!!!! मला स्वप्नांनी अक्षरशः झपाटले होते.....!!!!!!! (क्रमशः)

-प्रताप -

Friday, September 28, 2018

स्पर्धा परीक्षेची बखर: 'मी' ते अधिकारी ...एक आठवणींचे मोरपीस भाग 8: दगडावरील पहिला थर निघताना.....

स्पर्धा परीक्षेची बखर: 'मी' ते अधिकारी ...एक आठवणींचे मोरपीस

भाग 8: दगडावरील पहिला थर निघताना.....

     शाहू काॅलेज...स्वप्न पहायला शिकवणारं काॅलेज....इथे स्वप्नाची बाग होती..पण फुलपाखरांचे पंख घेवून येथे आलोच नव्हतो मुळात...एक गरूडपंखी खदखद मनात होती...काॅलेजचा पहिला दिवस..आणि सोबत कोण तर..माझे वडील..!!! काॅलेजला आलो..लातूर व राज्यातून सर्व थरांचे व स्तराचे, श्रीमंत, गरीब, ग्रामीण, शहरी,नाना परीचे विद्यार्थी. आयुष्य समृद्ध करणारे व अनुभवाची शिदोरी देणारे हे काॅलेज..अत्यंत कडक शिस्त..युनिफॉर्म असेल तरच आत प्रवेश..लेक्चर ऑफ असेल तर सरळ लाएब्रेरी किंवा इमारती बाहेर...कोणासही तुलना करायला संधी मिळू नये या साठी गणवेशाचा आग्रह.....वैचारिक खुलेपणा बाबतीत आग्रही पण स्वैराचारास प्रतिबंध करणारे काॅलेज..दरमहा पाल्यांच्या महाविद्यालयात उपस्थितीचा रिपोर्ट थेट पालकांना पाठवणारे काॅलेज..!!! इथे शिकायला मिळणे हे ही भाग्यच!

     काॅलेज सुरू झाले.. वेगवेगळ्या विषयांवर शिकायला मिळत होतं. वर्गात एकाचढ एक हुशार मुलं, मुली..सगळे जण शिकायचे..वर्गात उत्तरे देण्याचा प्रयत्न करायचे. ग्रामीण भागातील मुलं ही हळुहळु धिटाइने पुढे यायला लागले..मलाही धडपड कराविशी वाटायची..प्रामाणिक प्रयत्न करायचो..सुदैवाने लातूर बसस्थानका पासुन काॅलेज अगदी दोन मिनीटावर होते. त्यामुळे इतर त्रास नव्हता..काॅलेज ते घर..घर ते काॅलेज एवढाच दिनक्रम..हळूहळू काॅलेज मधे रूळू लागलो..प्राध्यापकांची ओळख व्हायला लागली..वर्गात चांगले मित्र मैत्रिणी झाल्या,बहुतांश सगळेच अभ्यास करणारे, सचोटीने राहणारे..

      वेळ मिळेल तसा लाएब्रेरीतुन पुस्तके घेणे सुरू झाले..गावातल्या साने गुरूजी वाचनालयाच्या चकराही वाढल्या, अभ्यास, वाचन, मित्र यात दिवस संपून जायचा....काही प्राध्यापक खुप जिव तोडून शिकवायचे..काही जणांच्या शिकवण्याच्या त-हा वेगळ्याच...पण सारे गुणवत्तेसाठी आग्रही..वर्गातले मुलं मुली वेगवेगळ्या उपक्रमात भाग घेवू लागले..जसे गावात सरतेशेवटी काही झोपड्या असतात तशाच शहराच्या शेवटी काही वस्त्या असतात..तिथले मुलं मित्र झाले..ते "कमवा शिका" योजनेत काॅलेज सुटल्यावर काॅलेज मधेच काम करायचे..त्यातीलच काही जण खुप चांगले अर्थात राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू होते..काही जण एन सी सी मधे होते, मी मात्र "राष्ट्रीय सेवा योजना " मधे सहभागी झालो..त्याचे वेगवेगळे उपक्रम चालायचे..कोणी वादविवाद, वक्तृत्व स्पर्धेत सहभागी व्हायचे तर कोणी नुसतेच वादात पण इथेही..काॅलेजच्या बाहेर...

         मी काॅलेज मधे रममाण झालो होतो..आम्हाला " सी "डिव्हीजनला राज्यशास्त्र शिकवायला एक सर आले..नविन..ते खुप विश्लेषणात्मक शिकवायचे..काही मुलं मागे बसून शेरेबाजी करायचे..पण त्यांचा संयम ढळायचा नाही..एके दिवशी लेक्चर संपल्यास मी त्यांना काही अडचणी विचारण्यासाठी बाहेर भेटलो तेंव्हा त्यांनी त्या सोडवल्या , माहिती दिली व सरते शेवटी ते म्हणाले की असा विश्लेषणात्मक अभ्यास केल्यास त्याचा MPSC ला खुप फायदा होतो.....आणी दगडा वरील पहिला थर निघाल्याचा मला भास झाला !! मी नंतर वर्गात बसून फक्त इंटरव्हल व्हायची वाट पहात होतो..तो झाला आणी मी तडक लाएब्रेरी गाठली..आणी " स्पर्धा परीक्षा " हे त्या काळातील एकमेव मासीक घेतले...त्यातले काहीच समजत नसताना मी ते जिज्ञासेने पाहिले..काहीच समजत नव्हते सगळे एकदम अवघड वाटले..पण त्यातील यशस्वी विद्यार्थ्याची मुलाखत वाचल्यास एक हुरहुर मनात भरून आली...पण लातुरला त्या काळात MPSC बाबत कुठलीही सोय नव्हती..मला खुप प्रश्न निर्माण झाले..मी एकट्यानेच ते पुस्तक पाहीले व वाचून अलगद ठेवून दिले..... विचार येत होता ही सिलेक्शन झालेली मुले कसे पास होत असतील...काय करत असतील...?? मनात सतत विचार घोळत असायचे..काॅलेज मधिल आयुष्य तर समरसून जगत होतो पण एक हुरहुर मनास लागलेली असायची..घरी यायचो..आई चुलीवर स्वयंपाक करत असायची..चुलीसमोर बसून मी घरच्याशी बोलायचो.. वडील सातत्याने अभ्यास करायला पाहिजे, काहीतरी करून दाखवायला पाहिजे, शिक्षणाशिवाय पर्याय नाही असे विषय बोलत असायचे..लहान भाऊ निशांत त्यावेळी गावातल्या जिल्हा परिषद शाळेतून सातवी पास होवून आठवी साठी गावानजिकच्या सेलू गावातील गणेश हायस्कूल ला जात होता..आम्ही ऐकायचो..भूकंपा मुळे पक्की घरे बांधण्यासाठी शासना कडून गावात लोकांना अनुदान मिळाले होते..आमचे घर पण विटाचे झाले होते पण त्याला वरती जुने पत्रे..जवळपास अपूर्ण अवस्थेत असलेले व त्याला प्लास्टर नसलेले ते एक सांगाडा सदृश्य घर होते .. ते एका बाजुने जवळपास भिंत नसणारे होते..मागे एक आडवी खोली जिला एक तात्पुरता दरवाजा, जास्त पाऊस आला की पुन्हा चिखल..समोर पत्र्याचे छप्पर...तिथे एक आडोसा केला होता..तेथे आई स्वयंपाक करायची..या घराचा एक फायदा होता सगळी जागा ओली होत नव्हती.. माझे सिलेक्शन होइ पर्यंत त्यात कुठलीच भर आम्ही घालू शकलो नाही .. फक्त एक लोखंडाची एकमेव फोल्डींग चेअर तेथे वाढली...उलट नंतर ते घर जास्तच जीर्ण होत गेले... सिलेक्शनच्या दिवशी चिखल भेटवण्यासाठी...!!!

            बाजुलाच मोठ्या व छोट्या मामाची घरे होती..मोठे मामा पुण्याला राहत असल्याने त्यांनी या भुकंप अनुदानातुन एक खोली काढली होती..तिथे सिंगल फेजवर चालणारा एकुलता एक बल्ब ..त्याचा मंद उजेड..त्या खोलीत मी, लहान भाऊ, छोट्या मामाचा मुलगा आणी आज्जी असे सगळे झोपायचो...त्या खोलीत एक भिंत होती भिंतिंच्या पलिकडे मी ...तेथे माझे स्वप्नरंजन, मनसुब्याचे बोलणे, लिहिणे, वाचन, अभ्यास हे सगळे चालायचे..मी तेथे जाऊन वडील बोललेल्या विषयावर विचार करायचो, डोळ्यांसमोर सतत परिस्थिती दिसायची , वाटायचं कसं होईल आपलं...? खुप काही ठरवायचो.. भिती वाटायची..पण ती काहीतरी करून दाखवायची सल मात्र सतत मनात असायची.....असं एक स्वप्न वंचनेत धुसर होईल का, मन आक्रंदायचं...सतत जिव झटपटत रहायचा...


            दिवाळीच्या सुट्ट्या लागायच्या अगोदर काॅलेजचं राष्ट्रीय सेवा योजनेचं निवासी शिबीर नेमकं माझ्याच गावात लागलं...मला ते सात दिवस एकच प्रश्न सतावत होता...कोणी चल तुझ्या घरी म्हटलं तर काय करायचं? त्यासाठी मी फार जपूनच शिबिरात राहिलो सुदैवाने तसे कोणी म्हटले नाही..पण गरीबीची जाणीव जास्तच होवू लागली..काॅलेज मधे माझ्या सारख्या फाटक्या परिस्थिती असणा-या मुलांची संख्या कमी नव्हती पण मला का कोण जाणे ती जरा जास्तच जाणवायची..शिबीर संपलं...मग आता काय? घरी बसायची चैन करता येत नव्हती..आणी दहावीच्या फिसची आठवण तिव्र होतीच आणी ताजीही.. घरी काही तरी मदत होईल म्हणून मी शेतात ज्वारी कापायच्या मजुरीच्या कामाला गेलो..दोन दिवस काम केले आणी तिस-या दिवशी आजारी पडलो..थेट शासकीय रूग्णालयात अॅडमीट..मग लक्षात आले आपण असे काम करू शकत नाही..पण अत्यंत कमी काळासाठी कंपनीत ही कामाला जाणे योग्य नव्हते..शांत राहीलो..काॅलेज सुरू झालं...

          आयुष्य शिकायला मिळणा-या घटना घडण्याचा हा काळ..वर्ग सुरू झाले.. भुगोलाचा तास...अचानक सर शिकवता शिकवता सुट्ट्या कशा गेल्या? काय केलं? या विषयावर आले आणी विचारता विचारता पुढे आयुष्यात काय करणार? या विषया कडे ते वळले..सगळे मुलं मुली ऊठून उत्तर देवू लागले..कोणास शिक्षक व्हायचं होतं..कोणाला प्राध्यापक..कोणाला प्रगतीशील शेती करायची होती..कोणा कोणाला अजून माहितंच नव्हतं काय करायचं ते..अशा माहिती नसणा-या विद्यार्थ्यावर मग साग्रसंगीत टिप्पणी व्हायला लागली..सर एकदम मुड मधे येवून पोरांना झापत होते..दबक्या आवाजात हसण्याचे आवाज येत होते..माझा नंबर आला!!! सरांनी मान तिरकी करून विचारलं"बोला साहेब! आपल्याला काय व्हायचं आहे?(कारण माझ्या अगोदरच्या तिन मुलांना उत्तर देता आले नव्हते..त्या मुळे सरांचा मुड टिकून होता त्या मुळे त्यांचा टोन" काय हे आजकालचे पोरं..!!".असा होता) मी उभा झालो..आणी सांगीतले "सर मला MPSC करायची आहे!" आणी एकदम सरांच्या तोंडून निघून गेले" काय!!!! MPSC ?आणि तु???!!! अरे आम्ही नाही झालो MPSC, तु कसा होणार???" वर्गात एकदम हास्याचा स्फोट झाला..मुलींच्या बाजुने पहिल्यांदाच दबका आवाज जाऊन हसण्याचा मोठा आवाज आला..मला एकदम अपमानीत झालं..मान खाली झुकली..मुलं मुली हसत होती...आयुष्यात पहिल्यांदा जाहिररित्या MPSC बद्दल बोलण्याचं धाडंस केलं आणि हसू झालं...खुप वाईट वाटलं..बोलण्या सारखं काही नव्हतं...मी एका गर्तेत कोसळणा-या दगडा सारखा जड होऊन खाली बसलो..सर सहज बोलून गेले...त्यांचा काही वाईट हेतू नव्हता पण ...या वाक्याने पुढील पाच वर्षे मला सतत टोचणी दिली..सतत मला जाणीव करून दिली की मला खुप दूरचा पल्ला गाठायचा आहे ..या घटनेने माझ्या मनावर एक डागणी दिली...मला माझा आरसा दाखवून दिला...सरांना ही गोष्ट खुप रूटीन वाटली..वर्गातल्या मुलामुलींना पण लक्षात राहील अशी ही घटना नव्हती पण माझ्या मनपटलावर या घटनेचा ओरखडा ऊमटला होता....क्लास सुटल्यावर मित्र परस्परांशी टाळ्या देवून हसत होते सर एकेकाला कसे बोलले त्याची नक्कल करत होते..पण अक्कल ठिकाणावर आणणारी ही घटना मला वास्तवाची जाणीव देवून गेली......आता 'काळे' ढग जमायला सुरूवात झाली होती आणी मी सुसाट वा-यात वास्तवाच्या खुल्या माळरानावर घरासाठी उडणारा पाचोळा जणू जमा करत होतो.....मी स्वप्नाचं छप्पर शाकारायला घेतलं होतं....


          पण सहज साध्य होईल ते स्वप्न कसलं...'भाव डागाळणा-या' घटना पिच्छा सोडत नव्हत्या..मी ढासळणा-या बुरूजाला पाठ लाऊन ऊभे राहण्याचा प्रयत्न करत होतो...एकवेळ अशी आली की वाटलं काॅलेज बदलून टाकावं की काय....पण पर्याय नव्हता आणि घरी सांगायला तोंड ही!!! मी गारपीट झेलणा-या झाडा सारखा ऊभा होतो गुमान... आणि सगळ्याच स्तरातून परिस्थिती लचके तोडत होती...नियतीने वार करायला सुरूवात केली होती...मी पाय रोवण्याचा प्रयत्न करत होतो..थकायला व्हायचं खुपदा... वाटायचं आपण मृगजळी स्वप्न पाहतोय...आपले खायचे वांदे, आणी आपण काय विचार करतो आहोत? ज्या लातूर मधे MPSC चा M म्हणन्याची सोय नाही, तेथे आपला कसा निभाव लागणार ??? ऊगी शांत रहावं , शिक्षण पुर्ण करावं..मग पाहू काय होते ते....पण दुसरं मन स्वस्थ बसू देत नव्हतं..इतरांचे आयुष्य खेळ समजणा-या काही टाकाऊ आणी बेगडी आयुष्य जगणा-या लोकांच्या प्रवेशाने मानसिक व भावनिक त्रास वाढला....मी विस्कटलो होतो....MPSC करण्यासाठी मराठवाड्यातील दोनच ठिकाणं होती परभणीचं कृषी विद्यापीठ आणी औरंगाबाद..पण दोन्ही ठिकाणी मी जाऊ शकत नव्हतो.

           वडिलांना त्याच काळात श्वासाचा त्रास वाढला ते रात्र रात्र जागून काढत...पण या हिवाळ्यात त्यांना खुपच जास्त त्रास सुरू झाला होता..दरवेळी शासकीय रूग्णालयात जाऊन उपचार घेणारे ते..पण या वेळी त्यांना कसलाच आराम न पडल्याने ते एका खाजगी दवाखान्यात जाऊन अॅडमीट झाले..सोबत कोणीच नाही..खिशात पैसे नाहीत...मी सरकारी दवाखान्यात जाऊन पाहिले ते तेथे नव्हते...शोधाशोध करत फिरलो..पत्ता नाही..खुप परेशान होवून, शोधून शोधून शेवटी मी टाऊन हाॅलच्या मैदानावर हताश होवून बसलो होतो..काय करावं काहीच सुचत नव्हतं...वेड लागायची स्थिती आली होती.....कोणी नाही...शेवटी उठलो ऊद्या पुन्हा शोधायचं ठरवून गावाकडे आलो...घरी आई उसने आणलेले पैसे घेवून वाट पाहत बसली होती ..मी गेल्या बरोबर तीने सांगितले की गावाकडून रोज लातुरला जाणा-या एका व्यक्ती जवळ ते ज्या दवाखान्यात अॅडमीट होते त्याचा वडिलांनी निरोप व पत्ता पाठवला होता ..सकाळी लवकर ऊठून ते पैसे घेवून मी दवाखान्यात गेलो...वडील नुकतेच सावरले होते..मी काहीच बोलू शकत नव्हतो..वडिलांनी डाॅक्टरला लवकर सोडता येईल का? म्हणून विचारले..( अर्थातच वाढीव उपचाराचे बिल देवू शकत नाही हे माहित असल्याने) डाॅक्टरनी जायला हरकत नाही म्हटल्यास बिल देताना जाणवले ते देण्यासाठी हवे तेवढे पैसेही नाहीत..पण ऐनवेळी लहान मामा आल्याने अडचण सुटली..मी आता खुप वैतागलो होतो..आणी मी पक्कं ठरवलं..."आता एक तर डोकं फुटेल नाही तर दगड...आता डोकं तर आपटायचंच" सगळे जाचणारे,टोचणारे क्षण एकदमच दिसू लागले...मी रणशिंग फुंकले...मी आता थांबायचे नाही असे ठरवले....काहीही होवो आपण MPSC करायचीच...नशिब आडवे आले तरी त्याला अंगावर घ्यायचे...पण नुसता निर्धार करून स्थिती एका दिवसात बदलणार नव्हती त्या साठी काही काळ नक्की जावा लागणार होता..आणी तो काळ कितीही कठीण असला तरी तो भोगावा लागणारच होता..

         जिवन घडवणे म्हणजे सोप्पी गोष्ट असत नाही..खुप सोसावं लागतं..वंचनेची साथ असेल तर वेदना नक्षीदार होते..पण या वेदनेला घेवून जगताना खुप मनस्ताप होतो आज त्या आयुष्यातील घटनांची आठवण जरी आली तरी एक रिक्त अवस्था येते ते हुरहुरीचे पर्व मनात वादळ बनून घोंघावत राहते..

           गावात शिकणारी मुलं आणी न शिकणारी मुलं यांच्यात एक दरी असते..त्यातील न शिकणारी मुलं जर चांगल्या घरची असतील तर मग त्या भेदाची भावना अजुन जास्तच टोकदार होते. गावात विविध जाती धर्माच्या मुलांशी माझी मैत्री होती..काॅलेजला जाणारे..शाळा सोडून दिलेले जुने सहकारी..अधुन मधुन त्यांची भेट व्हायची पण गाव म्हणजे स्वतःची व आपल्या बापजाद्याची मालमत्ता समजणा-या अर्धवट शिकलेल्या अर्धवटरावची संख्या गावात असतेच.आणी अशा चौथी नापास सधन कुटुंबातील लोकांना खुप जातीभिमान आणि असूया असते. अशाच एका अर्धवटरावने विनाकारण माझ्याशी भांडण केले मला आजपर्यंत समजले नाही त्याचे कारण काय होते. त्या भांडणामुळे मला खुप चिड आली. मी व माझे कुटुंबीय कोणाच्याही भानगडीत पडत नसतानाही हे प्रकरण उद्भवले मी ज्या भागात राहत होतो त्या भागातील मित्र खुप चिडले..आणी त्याला धडा शिकवण्यासाठी निघाले..पण माझ्या वडीलांना ही बाब समजल्याने त्यांनी तात्काळ सर्वांना थांबवून दिले व स्वतः जावून विनाकारण भांडण करणा-या अर्धवटरावच्या वडिलाला योग्य भाषेत समज दिली..त्याच्या वडिलाने त्याला खुप झापले, शिव्या घातल्या. आणी सर्वांशी चांगले वागणारे त्या मुलाचे वडील त्यांच्या अर्धवटराव मुलाच्या मनात एवढी तिव्र जातभावना कोठून आली त्या बद्दल परेशान झाले..माझ्या वडीलांनी त्यांना आदरपुर्वक सांगितले 'दादा हे पुन्हा घडणार नाही याची काळजी घ्या' हा विषय तेथेच संपला पण ओरखडा ओढणारी ही घटना मला खुप दिवस त्रास देत राहीली..तो मुलगा आता कधी गावात भेटला तर आदराने 'साहेब नमस्कार !' म्हणतो आणी मी त्याला तेवढ्याच चांगुलपणाने प्रतिसाद देतो . कारण असूया किंवा किल्मिष मनात ठेवणे मला व्यक्तीमत्वाचा दोष वाटतो.

    अशा विविध घटना घडत, पाहता पाहता अकरावीचे वर्ष संपत आले.. मी खुप अभ्यास करून अकरावीची परिक्षा दिली ..त्यात समाधानकारक मार्क मिळाले आणी लगेच बारावीचे व्हेकेशन सुरू होणार होते...(क्रमशः)

Sunday, September 2, 2018

स्पर्धा परीक्षेची बखर: 'मी' ते अधिकारी ...एक आठवणींचे मोरपीस भाग 7: .....10 वी ..."फ".... लाजिरवाणी पण आयुष्य घडवणारी टक्केवारी...!!!

स्पर्धा परीक्षेची बखर: 'मी' ते अधिकारी ...एक आठवणींचे मोरपीस

भाग 7: .....10 वी ..."फ".... लाजिरवाणी पण आयुष्य घडवणारी टक्केवारी...!!!



          नववी ची परिक्षा झाली...पेपर चांगले गेले..निकाल लागला...दहावीत गेलो...पाहता पाहता दहावी... !!! शालेय जीवनाचा संरक्षक कोश असण्याचं अंतिम वर्ष... या नंतर..नव्हे या वर्षीपासुनच सगळे आयुष्याच्या वास्तविकतेची तयारी करतात...पण काहीजणांना जास्त खडतरता वाट्याला येते.......मी त्या पैकी एक....

       शाळा सुरू झाली ..माझ्या शाळेत ऊन्हाळ्याचे व्हेकेशन क्लास नावाचा प्रकार नव्हता..पण सकाळची नियमीत शाळा संपल्यावर सायंकाळी एक्सट्रा क्लास चालायचे...शाळा भरण्या अगोदर सोबतची मुलं ट्युशन करून यायची..मला ती सोय नव्हती....सकाळची शाळा संपल्यास, सर्व मित्र आपापल्या घरी जायचे..आणि सायंकाळी मग क्लासला यायचे..मी मात्र शाळेच्या आसपास फिरत रहायचो...कधी कधी शाळेजवळ एखाद्या मित्राच्या घरी थांबायचो.. पण दररोज एखाद्याच्या घरी जाणे योग्य वाटत नसे.. सायंकाळी क्लास करायचा..गडबडीने चालत शिवाजी चौक गाठायचा..एसटी वेळेवर भेटली तर लगेच गावाकडे जायचे..नाहीतर शेवटची पावणे दहाची बस पकडून जायचे...ऊशीर व्हायचा...गावात रात्री लवकरच सामसुम होवून जायची...जास्त ऊशिर झाला तर वडील रोडवर बस थांबते तेथे येऊन वाट बघत थांबायचे...मग मी उतरलो की ..वडील एवढा ऊशीर का झाला हे विचारायचे..मी कारण सांगायचो..आम्ही मग रोडवरून घराकडे जायचो...जे असेल ते थोडेफार खायचो..दिवस शाळा व क्लास सोडला तर पुर्ण वाया गेलेला असायचा...दमून झोप लागायची..पहाटे आई किंवा वडील हाक मारून ऊठवायचे.. मग दुस-या दिवशी पुन्हा धावपळ...शाळा...क्लास ...त्या दरम्यान इकडे तिकडे टाइम पास..गणितच जमत नव्हतं दिवस कसा मॅनेज करायचा...

       माझ्या या दिनक्रमामुळे घरी तर टेन्शन होतेच... पण इतरांना पण टेन्शन येत होते..."एवढा वेळ कुठे शाळा असते का? एवढी जिवापेक्षा जास्त शाळा शिकून थोडंच कोणी कामदार (नौकरदार) होतं , उगी जमते तेवढी शाळा शिकायला पाहिजे....वगैरे" अशी विविध बोलणी घरच्यांना ऐकावी लागायची.... लोकांचं चुकत नव्हतं...गावात त्यांचं जेवढं विश्व होतं त्या वरून ते मत व्यक्त करत होते... ..सगळ्या गावासारखं हे ही एक गाव...सगळे सण उत्सव यथाशक्ती खर्च करून विविध प्रथा परंपरेने साजरे करायचे...तोकड्या साधनावर समाधानानं जगायचं..सुगी चांगली झाली तरी बचत करत करत काटकसरीनं जगायचं..पोरांना टाकायचं म्हणून शाळेत टाकायचं... शाळा जमली त्याला तरी पुढे आर्थिक कुवत असेल तिथपर्यंतच शिकवायच...पोराचा एखादा विषय चुकुन राहिला किंवा तो नापास झाला तर मग कसलाही पुनर्विचार न करता रोजगाराच्या मागे लावायचं...कितीही वंचना असली तरीही समाधानाने जगायचं....सुखी समृध्द आयुष्य टिव्ही तच पाहून ते वेगळंच काहीतरी असतं आपला काही संबंध नाही ही ठाम समजूत करून घ्यायची.......गाव म्हणजे... सगळं काही एकमेकाच्या आधाराने...किंवा वेळ प्रसंगी एकमेकावर कुरघोडी करत आयुष्य कंठत रहायचं...गावात जयंती, सप्ता , भजन , पोथी वाचन हे कुठलीही चिकीत्सा न करता साजरी करायची...काही वाईट झालंच तर प्रारब्ध समजून मुकाट दिवस काढायचं...एखादा कोणी अर्धवट शिकलेला गावात पुढारीपण करतो त्याला निष्ठा वाहायची... हिच त्यांची जगायची रित....त्यामुळे गावातले , गल्लीतले लोक माझ्या शाळेत जाण्या-येण्यावरून सल्ले द्यायचे... मात्र व्हायचे उलंट..माझ्या घरचे आणि मी अजून जास्त जिद्दीने शिक्षणाची ओढ करायचो....तसेही आम्हाला कर्ज काढून शिक्षण देण्याने घर बदनामच होते.....

      माझ्या अशा होणा-या धावपळीमुळे शेवटी मला लातूर मधे ठेवण्याचे ठरले..भिडस्त स्वभावाच्या माझ्या वडीलांनी नाही नाही करत माझ्या चुलत बहिणीच्या घरी मला दहावीचे वर्ष होईस्तोवर राहण्याची व्यवस्था केली..मी तिथे रहायला जाताना मला घरून जे जे देता येईल ते ते देवून वडील मला तेथे सोडुन गेले..सकाळी शाळा भरण्या अगोदर मुलं ट्युशन करतात म्हणून मला ऊसने अर्थात कर्जाने पैसे घेऊन गणिताची ट्युशनही लावून दिली. माझ्याकडे सायकल नसल्याने शाळेसमोरच असणारे ट्युशन लावले गेले..मी स्थिरावल्या सारखे झाल्याने रोज शाळेत जात होतो..येत होतो आणि ट्युशन करत होतो...पहिली घटक चाचणी आली ..पहिल्यांदाच मुलामुलींची मिळून घटक चाचणी झाली..आणी शाळेच्या या नविन प्रथेमुळे ...घटक चाचणीत मुलामुलींच्या जुजबी ओळखी झाल्या...घटक चाचणी नंतरही त्या " जुजबी "ओळखी सुरू राहिल्याने शाळेने अजून जास्त कडक शिस्त लागू केली..त्यावेळी काळ ही असा होता की,मुलं आणी मुली एकमेकाला बोलूच शकत नव्हते. चुकून बोलंतच असतील तर एखाद्या कामाशिवाय नाही आणी ते दोघं बोलंत असतील तर एवढ्या अंतरावरून बोलत की ते बोलताना त्या दोघांच्या मधून वर्गातल्या मुलांचा आख्खा लोंढा आरामात निघून जाईल ..आणी तो हमखास जायचाच!!!!! घटक चाचणीत चांगले मार्क मिळाले...

          दोन तिन महिने निघून गेले..आणी जाणवायला लागलं की माझ्या तिथे राहण्यामुळे बहिण आणि तिच्या नव-यात बेबनाव होत आहे..अगोदरच त्यांच्यात पुर्वी पासुनच भांडण व्हायचे, बहिण एकदम नव-याला घाबरणारी.. त्यात माझ्या राहण्याने भांडणात वाढ झाली असे मला जाणवायला लागले...माझी खुपच अडचण होत होती....आणी त्या बहिणीची पण...ती मला काही सांगू पण शकत नव्हती...अगोदर पासुन भावजीचा स्वभाव म्हणजे सगळया घरावर हुकुमत ठेवण्याचा..घरातले सगळेच त्यांना प्रचंड घाबरत असत...ते दिवस दिवस भर ऑफीस बुडवून, कधी अर्ध्या वेळेतुनच परत येवून तर कधी कधी महिन् महिने ऑफीसला न जाता घरी कोणाशी न बोलता कागद घेवून आकडे जुळवत बसलेले असायचे..ते घरी असले की कोणाचाही आवाज नसायचा..मी त्यांना अगोदरच काही बोलत नव्हतो, त्यात त्यांच्या अशा प्रतिक्रियेमुळे मी जेवढा वेळ घरा बाहेर थांबता येईल तेवढा थांबायचो.. आणी मी खुप वेळ घराबाहेर राहतो म्हणुन त्यांना माझ्या बहिणीकडे तक्रार करायला वाव भेटायचा..मला कोणाला काहीच बोलता येत नव्हतं..याची परिणीती म्हणजे मी थोडा दबून वागायला लागलो..आत्मविश्वास हरवला...आणी डोकं काम करेनासं झालं...भावजीवर काय वैयक्तिक टेन्शन होते ते त्यांनाच माहित..त्यांच्या टेन्शन मधे सगळं घर मात्र चिडीचूप रहायचं....एक दिवशी मी असाच ऊशीरा घरी पोहचलो.. अचानक बहिण व तिची मुलं रडताना दिसल्याने मी तिला रोजच्या सारखाच काही प्रकार असेल म्हणुन काय झाले म्हणून विचारले.. त्यावर तीने सांगितले की मी तिथे राहणे योग्य राहणार नाही..मी एकही शब्द न बोलता माझे कपडे व पुस्तके एका पिशवीत भरले आणी भाऊजींनी तिच्या माध्यमातून मला निरोप दिला आहे हे ओळखून रात्री गावाकडे जाण्यासाठीची शेवटची बस पकडण्यासाठी मी निघालो..नाईलाजाने बहिण म्हणाली उद्या सकाळी जा..कदाचित दारूच्या नशेत हे बोलले असतील ...पण माझ्या आत्मसन्मानाला खोलवर इजा झाली होती..मी अंतरी दुखावलो होतो...मी तिला वाईट वाटणार नाही अशा पध्दतीने अत्यंत संयमी पणाने सांगितले की टेन्शन घेऊ नको..मी घरी पोहोचेन...मी घरातुन रात्री नऊ वाजता बाहेर पडलो...बाहेर पडताना बहिण रडत होती..भाच्चा पण रडत होता तो पाचवीला असल्याने व अधुन मधुन मी त्याला अभ्यासाचे सांगत असल्याने त्याला ही माझी सवय झाली होती....मी दारा बाहेर पाउल टाकताना पाहीले ..भाऊजी दारूच्या नशेत झोपलेले होते......चार गल्ली पलिकडे गिरीश नावाचा माझा मित्र राहत होता मी त्याच्या कडे गेलो..त्याचे वडील रात्री ऑटो चालवायचे आणी दिवसा त्याची आई आणि वडील मेस चालवायचे...तो माझा क्लासमेट असल्याने मी त्याच्या कडे गेलो...तो मेस मधल्या मुलांना जेवण वाढत होता..मी अचानक गेल्याने..तो बाहेर आला...मी त्याला काहीच बोललो नसतानाही त्याने ओळखले काहीतरी बिघडले आहे..त्यांने विचारले..मी त्याला इतर काहीच न बोलता गावाकडे जात आहे म्हणून सांगितले..त्याने आग्रह केला आता जाऊ नको ..पण मी त्याला सांगितले की जावे लागेल...तिकीटासाठी पैसे घेतले..त्यांने जेवणासाठी विचारल्यास मात्र खुप दाटून आले..पण मी जेवण झाले आहे म्हणून सांगीतले आणी निघालो...

         रस्त्याने मी त्या अंधारातून चालताना स्वतःला प्रश्न विचारत होतो की माझी अशी कोणती चुक झाली म्हणून मी येथे रहायला आलो होतो? आणि मी असे काय वाईट केलं होतं म्हणून माझ्यावर अशी अपमानास्पद वेळ आली? उद्या सकाळी ट्युशन , शाळा कशी करणार??? ज्या अंधारातून मी चालत निघालो होतो त्या पेक्षा जास्त अंधार आत दाटून आला होता.....भावजीच्या अशा वागणुकीचा मला किंवा माझ्या घरच्यांना बिल्कुल अंदाज व पूर्वकल्पना नसल्याने अशी गल्लत झाली होती..मी तिरमिरीत आणी विचारात चालत शिवाजी चौकात पोहचलो...बस ची वाट पाहीली...मन था-यावर नव्हते..असंख्य समस्या एका दिवसात समोर आल्या होत्या...बसलेली घडी विस्कटली होती..खचाखच भरलेली बस आली..कसाबसा गाडीत शिरलो...गाडी निघाल्यास मात्र एकदम काळजात धस्स झालं ..'आता घरी काय सांगायचं?'....

      गावात गाडी पोहचली..अत्यंत दबावाखाली असल्याने धड रस्ता ही सुचत नव्हता...घरी गेल्यावर रामायणंच झालं...आईवडिलांना धक्का बसला...वडील म्हणाले तु काहीतरी चुक केली असेल...खुप रागवले..ओरडले माझ्यावर.. अगोदरच मी खुप दिवसा पासून दबावात होतो आता एकदम रसातळाला गेलो....लोक काय म्हणतील, पाहुणे काय म्हणतील...त्यांना पडलेले प्रश्न वेगळेच होते..आणी मला मात्र शाळा दिसत होती...पुन्हा पहिल्या पासून सुरूवात करावी लागणार होती....आणी सगळं विखुरलं होतं...दोन दिवस सारं स्थिरावायला लागले...आईची मध्यस्थी झाली..मी पुन्हा शाळेत जायला लागलो पण कसेतरी करून लावलेली ट्युशन मात्र करू शकत नव्हतो...मुलं खुप अभ्यास करायची ...मी मात्र या नैराश्यामुळे आक्रमक होवु लागलो होतो...आणी आपोआप माझी संगत शाळेतल्या टुकार मुलां सोबत जुळून गेली...मग मी शाळा ही बुडवली ...खुप भांडण, मारामारी करू लागलो...त्या भांडणा-या मुलांना माझ्या हुशारीचं कौतुक वाटायचं..आणी मला त्यांची बेडर जीवनशैली माझ्या अवस्थेवर उतारा वाटायची...बेभान होण्याची अवस्था आली...टुकार पध्दतीने जगणं हे ही जगणंच असतं असं वाटायला लागलं...घटक चाचणी वेळीच्या जुजबी ओळखी...दिर्घ ओळखीत रुपांतरीत झाल्या...मला परिणामांची भिती वाटेनासी झाली.....मी अक्षरशः वाया चाललो होतो....

                 मात्र हा बदल माझे क्लास टिचर यांच्या लक्षात आला...त्यांनी एके दिवशी शाळा सुटल्यावर मी, संदिप आणी मयुर या तिघांना शिपाया करवी निरोप देऊन शाळेच्या गच्चीवर बोलावले...(कितीही टुकारपणा केला तरी गुरुजनांचा आणी सामाजिक सभ्यचाराचा अवमान व्हावा असे कदापिही वर्तन मी केलेले नव्हते) आम्ही तिघेही गेलो...वर आप्पाराव सर व होनराव सर दोघेच होते...त्यांनी आम्हाला बसवलं आणि अत्यंत गांभीर्याने आमच्या चुका सांगून त्या करू नका, लहानपणी केलेल्या चुका आयुष्य बिघडवतात हे अत्यंत संयमाने व मित्रत्वाने समजवून सांगीतले....दोन्ही सर जवळपास दिड तास बोलंत होते....आणी दर सेकंदाला माझी टुकारपणाची नशा ऊतरत चालली होती....माझ्या व्यक्तीमत्वावर चढलेली पुटं गळुन पडली आणी मलूल झालेला निश्चय प्रज्जवलीत व्हायला लागला.. दरम्यानच्या काळात घेतलेले निर्णय आयुष्यभरासाठी सोबत घेऊन चालण्यासाठी ठाम निश्चय झाला.चुक समजली... पण ती दुरूस्त करण्यासाठी वेळ असायला हवी....!! अंतिम बोर्ड परीक्षेला फक्त दोन महिने राहिले होते..मी घरी पोहचल्यावर वडिलांशी आईशी बोललो..फक्त दोन महिने लातूरला रहायचे आहे म्हणून विनवणी केली..पण ती प्रत्यक्षात येण्यासाठी विस दिवस गेले...जेमतेम काही दिवस शिल्लक राहिले होते...आता परिक्षेचं दडपण जाणवायला लागलं होतं...सरते शेवटी घरच्यांनी किमान अभ्यास तरी होईल म्हणून व मी खुपच विनंती केल्याने मला लातूर मधे ठेवण्याचा निर्णय घेतला...विक्रम नगर मधे खुप मित्र झालेले असल्याने व ते ही बहुतांशी दहावी "फ" मधिल विद्यार्थी असल्याने व वैयक्तिक कारणाने ....मी एक परवडणारी मातीचे घर असणारी रूम तेथे भाड्याने घेतली, घरच्यांनी जेवण बनवायला माझ्या आज्जीला माझ्या सोबत ठेवले...(या वर्षातल्या सगळ्या कारणाने एकतर घरचा खर्च मी खुप वाढवून टाकला होता त्यात मी पुन्हा वाढ केली) पण मी आता इमानदारीने अभ्यासाला सुरूवात केली...विनोद नावाचा मित्र सोबत अभ्यास करायचा...पण आता बराच उशीर झाला होता.....आता तो अभ्यास न राहता...स्वतःला नापास होण्यापासून वाचवणे या थराला पोहचला होता...!!!

    आता खरी घाबरगुंडी सुटली होती...कमी वेळात, तो ही नविन सिलॅबस कोणाच्याही मार्गदर्शनाशिवाय पुर्ण करणे म्हणजे दिव्यच!!! पण करत होतो...पश्चताप जाणवत होता...गाईड अथवा ' 21 अपेक्षित ' हे ही नव्हते..निव्वळ क्रमिक पुस्तकाधारे अभ्यास सुरू होता....

      परिक्षा फी भरण्याची वेळ संपत आली होती...वडिल गावाकडून अजून पैसे घेऊन आले नव्हते..ते म्हणाले होते..सध्या आहे त्या पुस्तकातुन अभ्यास कर..आपण लवकरच फी भरू आणी गाईड घेऊ..पण मी रोज वाट पहायचो.. शेवटी परिक्षा फी भरण्याची वेळ निघून गेली..लेट फी ची वेळ सुरू झाली..मला खुप तणाव यायला लागला...मी दररोज शाळेत जावून त्यांची वाट पहायचो.. मला समजत असायचं ते तिकडे फी च्या पैशाची जुळवाजुळव करत असतील ..पण मग राग ही यायचा...सरते शेवटी लेट फी भरायला दोन दिवस राहिले...मी शाळेत जाऊन थांबायचो त्यांची वाट पहायचो..... लेट फी भरण्याचा शेवटचा दिवस...सायंकाळ 4:30 वाजले..मी वडील ज्या रस्त्याने येवू शकतात त्या रस्त्यावर जाऊन थांबलो..जिवाची नुसती घालमेल सुरू होती...कोणाला सांगायला जावं किंवा कोणाकडून उसने पैसे घ्यायला जावं आणी नेमके वडिल येवून गेले तर...या भितीपोटी मला तेथुन जाता ही येत नव्हतं..अत्यंत अवघड परिस्थिती निर्माण झाली होती..जर फी भरली नाही गेली तर अख्खं वर्ष वाया जाण्याची भिती निर्माण झाली होती..एक एक रूपयांची किंमत काय असते हे तेथेच समजले...मनात भिती दाटून येत होती की अशा फी न भरू न शकल्याच्या कारणाने जर वर्ष वाया गेले तर मी काय करेन वर्ष भर??? की मला पण गावातल्या मुलासारखे शाळा सोडावी लागेल? सगळे मुलं काॅलेजला जातील ...मी काय करेन??? आपणच काहीतरी करून पैसे शिल्लक ठेवायला पाहिजे होते वगैरे विचार डोक्यात येत होते...मला काहीच सुचत नव्हते...पण नियती थांबू देत नाही...डोळे पाण्याने भरून येत होते...मी अत्यंत असहाय्य होवून या परिस्थितीला अद्दल घडवायचीच हा निर्धार करत होतो..पण या निर्धारासाठी मला वर्ष वाया जाण्याची घोर किंमत देणे परवडणार नव्हते...वेळ जात होती..आणी मी अक्षरशः उद्ध्वस्त झालेल्या मानसिकतेत आलो होतो...आणी त्याच वेळी.....अचानक खांद्यावर हात पडला आणी" काय झालं...? " हा प्रश्न कानावर पडला...मी एकदम रडवेला झालो होतो....कसा कोण जाणे तो योगायोगाचा क्षण माझ्या आयुष्यात आला...मनात तळमळ असेल तर नियती निराश करत नाही याचा प्रत्यय येण्याचा तो क्षण..... माझ्या पुण्याला राहणा-या मोठ्या मामाचा मुलगा पुण्यावरून गावाकडे जाण्यासाठी लातूर हून जात होता. त्याला माझी शाळा माहित असल्याने तो शाळेकडे मला घ्यायला आला होता..त्याला वाटले की माझी शाळा सुटली असेल तर तो मला सोबत घेऊन गावाकडे जाईल...या योगायोगाचा धक्का मला आजपर्यंत जाणवतो...!!!! त्याला माझी स्थिती पाहून खुप वाईट वाटले... त्यांच्याशी माझी लहान पणा पासूनच मैत्री असल्याने व लहानपणी त्यांनेच पोहायला शिकवले असल्याने ...आमच्यात मित्रत्वाचे संबंध होते.. मला त्याने धिर दिला आणी सांगितलं की " एवढे टेन्शन कशाला घेतो? चल आपण फी भरू...मामा ( माझे वडील) कदाचित गाडी न मिळाल्यामुळे किंवा ईतर कारणाने ऊशीरा आले तर ऑफिस बंद होवून जाईल!!" त्याने मला त्याही परिस्थितीत माझी किंवा माझ्या कुटुंबाची मर्यादा जाणवू दिली नाही..व एकदाही मी त्याला फी भर न म्हणता किंबहुना मी तसे म्हणणारही नाही हे ओळखून स्वतःच फी भरण्याची तत्परता दाखवून माझा नियती वरचा विश्वास त्याने दृढ केला..त्या मदतीच्या हाताची किंमत आणी जाणीव आज ही अमुल्य आहे...अशा अनाहूत पुढे आलेल्या मदतीच्या हातांनीच माझ्या आयुष्याला आकार व आधार दिला आहे...

    फी भरली, शाळा सिलॅबस संपल्यामुळे बंद होती...आता फक्त एकच ...अभ्यास...इकडून तिकडून मदत घेत..अभ्यास करताना मात्र खुप अडचणी येत होत्या..वाटायचं तिकडे वसतिगृहात राहिलो असतो तर बरं झालं असतं..पण एकदा चुकायला सुरूवात झाली की चुकतंच जाते...परिक्षा आली...दडपणात परिक्षा दिली...गणित भुमीतीचा पेपर अवघड गेला होता..पुन्हा सगळं सामान बांधून गावाकडे निघालो...जे काही बरे वाईट अनुभव या वर्षाने दिले होते..ते संचित सोबत होतं..आयुष्याची शिदोरी अशीच बनत जाते..मला आत्मचिंतन करण्याची गरज होती...पण आता आत्मचिंतन करून भागणार नव्हतं...कृती हवी होती..पण मी ठरवलं होतं...आता शिक्षणासाठी कमी पडायचं नाही...नापास होणार नाही आपण पण टक्केवारी घसरणार होती..ऐन मोक्याच्या वेळी समस्या आल्या होत्या...आता रडायचं नाही लढायचं ठरवलं होतं...परिस्थितीला शरण जायचं नाही तर तिच्यावर मात करण्यासाठी प्रयत्न करायचा हा निर्धार केला होता...त्यासाठी ज्या दिवशी गावात पोहचलो त्याच्या दुस-या दिवशी जिल्हा परिषद शाळेतील काही मित्र गावापासून 3 किलोमिटर अंतरावर असणा-या ज्या प्रिंटीगप्रेस आणी ऑफसेट कंपनीत कामाला जात होते तेथे जायचे ठरवले. सुट्ट्या असे पर्यंत काम करायचे आणी मग शिक्षण घ्यायचे असे ठरवल्याने मोठा भाऊ पण सुट्ट्या असल्याने कामास तयार झाला. घरी परिस्थिती बिकट असल्याने पण फक्त सुट्ट्यातच काम करायचे असल्याने व काम पुस्तकांचे असल्याने घरच्यांनी जायला परवानगी दिली...

       मी आणी माझा मोठा भाऊ कंपनीत गेलो..कंपनी मालकांना भेटलो..परिस्थितीची जाण असलेला हा भला माणूस..पण त्यांना रेग्युलर काम करणारे मुलं पाहिजे होते..त्यांना आम्ही कामाबद्दल बोललो..त्यांनी दरमहा सहाशे रूपये मिळतील म्हणून सांगीतले. आठ तासा पेक्षा जास्त काम केल्यास दिडपट ओव्हरटाईम बद्दल ही सांगीतले. आम्ही काम मिळाले म्हणूनच उपकृत झालो होतो कारण त्या वयात करण्या सारखे तेवढेच एक काम गावालगत उपलब्ध होते...दररोज सकाळी आम्ही दोघे भाऊ 6:30 वाजता निघायचो आणी 7.00 वाजता कंपनीत पोहचून कामाला लागायचो, पुस्तकाच्या फाॅर्मची जुळवाजुळव करणे, मशिनला ते पुरवणे, तयार झालेल्या पुस्तकाचे गठ्ठे बांधणे, बालभारतीच्या गोदामात पुस्तके पोहचवण्यासाठी गाडी भरणे..गाडीतुन पुस्तके काढून थप्पी लावणे, वेगवेगळ्या कंपनीच्या प्रॉडक्ट साठी लागणारे कव्हर तेथे बनत असत,त्यासाठी मशिनला लागणारा माल पुरवणे अशी कामे करायचो... काम एवढे अचूक व गतीने करायला लागलो की..कंपनी मालकांनी न सांगता न मागता परस्पर पगार वाढवला, सकाळी 7.00 ते रात्री 9.00 वाजेपर्यंत आम्ही काम करायचो...काम करताना डोक्यात विचार असायचा की इमानदारीने काम केले तर कंपनी मालक सुट्ट्या संपल्यास अडवणुक करणार नाहीत...कामात एवढी गती आली की, सकाळी 7.00 ते 9.00 या वेळेत केलेल्या कामावर तिन शिफ्ट मशीन चालायची...कशाचा राग त्या कामावर निघत होता माहीत नव्हतं...डोक्यात सतत विचार असायचा की हे काम आपल्याला फक्त सुट्ट्यात करायचे आहे..तेथे अगोदर पासून काम करणारे मित्र मात्र तिथे स्थिरावले होते. युनिट फार मोठं होतं साधारणतः 300 लोक काम करायचे . सगळे जण कामाचे कौतुक करायचे. आणी लहानपणा पासून ओळखणारे गावचे इतर सहकारी कामगार शिक्षण सोडू नका म्हणायचे... काम करताना डोक्यात सतत शाळा असायची....

       निकाल जवळ आला..धाकधूक वाढली ...काय होते माहिती नव्हतं..तो लागला...पास झालो..फक्त 52% मिळाले होते पण या 52% ने दुनिया दाखवली होती..रसातळाला न जाता तरंगायची धमक दिली होती, साधनांची कमतरता लांघायचा कानमंत्र दिला होता..आणी भावी आयुष्यातील प्रवासाची जाणीवगर्भ सुरूवात करून दिली होती...घरी 52% वरून चांगलीच खरडपट्टी मिळाली..गावात काही लोकांना कुत्सिक हसण्यासाठी विषय मिळाला...आणी मला प्रज्जवलीत होण्यासाठी ठिणगी...अंतरीचा दिवा पेटला होता तो वादळात तेवण्यासाठी सज्ज होत होता..

         52% वर कोठे अॅडमिशन मिळेल माहित नव्हते. कला    शाखेशिवाय पर्याय नव्हता. प्रवेशासाठी फार्म भरले होते. पास झालो ही भावना उमेद निर्माण करून गेली..आता चुकायचे नाही हे भान आले...आता धावण्यासाठी तयार होतो पण रस्ता मिळत नव्हता....लहानपणी मोठ्या भावाचा झालेला सत्कार आठवत रहायचा...तेंव्हा पासुनच वाटायचं आपण काहीतरी मोठ्ठं झालं पाहिजे.. आता ठरवत होतो...जेंव्हा जेंव्हा बस स्टॅंड वर जायचो तेंव्हा तेंव्हा "स्पर्धा परीक्षा" मासीक पहायला मिळायचं... त्यावर मुला मुलीचे फोटो दिसायचे व त्या खाली अधिकारी पदाचा ऊल्लेख असायचा...त्या पुस्तकाच्या आत काय असतं ते माहिती नव्हतं...चुलत काका असेच संघर्षातुन शासकीय नोकरीत लागुन तहसीलदार म्हणून काम करत होते..त्यांची मुलं अर्थात मिलींद भाऊ (PSI) व सुनिल भाऊ (STI) परभणी कृषी विद्यापीठात शिकून सिलेक्शन झाल्याचे माहित होतं. एकदम लहान असताना मिलींद भाऊ कधी तरी घरी आल्याचं व त्यांच्या लग्नाला बिदरला गेल्याचं आठवत रहायचं...काका कधितरी घरी यायचे त्यांनी आणलेला बिस्किटचा पुडा आठवायचा पण..नंतर कधी नियमीत संपर्क राहिला नव्हता...पण वडील अधून मधून त्यांच्या बद्दल खुप अभिमानाने बोलायचे..आई पण कौतुक करायची..पण सोबतच "असे काहीतरी करायला पाहिजे " असे नक्की म्हणायची..ती सहज बोलून जायची..पण अंतःकरणात पक्षांचा अख्खा थवा चिवचिवायला लागायचा आणि मी नकळत उड्डाणाच्या आवेशात यायचो...वडील कौतुकाने पुतण्या बद्दल बोलताना त्यांच्या डोळ्यांतील चमक मनात ठिणगी निर्माण करायची पण पडलेले 52% वास्तवाची जाणीव करून देत असत मी रिअॅक्ट होवूच शकत नव्हतो...

       निकाल लागल्यावर कंपनी मालकांना भेटलो ...त्यांना खरे काय ते सांगितले..कायम काम करू शकत नाही शिक्षण आहे जावे लागेल..त्यांनी थोडेसे पाहिले आणि सांगितले ठिक आहे..पगार घेऊन जा...आम्ही त्यांचे आभार मानले..पगाराच्या पाकिटात जास्तीचे पैसे आहेत म्हणून सुपरवायझर ला सांगीतले तर त्यांनी सांगितले की, तुम्हा दोघांना पगार वाढवून मिळाला आहे..( तो पगार प्रत्येक सुट्टयात वाढतच राहीला आणी इतरांनी काम सोडून गेल्यास जर पुन्हा ते परत आले तर त्यांना पहिल्या पगार दरा पासून काम करावे लागायचे...तो नियम आम्हाला कधीच लागु झाला नाही.... पेठे साहेब त्यांचे नाव , काॅलेजला असताना त्यांची पुतणी वर्गात होती, तिला माहित होते आम्ही तिच्या काकाच्या कंपनीत सुट्ट्यात काम करतो पण तिने ते कधी जाणवू दिले नाही आणी त्यामुळे माझी मान ही कधि झुकली नाही...)

        अॅडमिशन साठी प्रयत्न चालले होते..अनपेक्षित पणे महाराष्ट्रातील नामांकित काॅलेज, राजर्षी शाहू महाविद्यालय लातूर येथे प्रवेश मिळाला . मी स्वतःला भाग्यवान समजत होतो...आता मागे हटायचे नव्हते..ही पाच वर्षे आयुष्य घडवणार होती..शाळेतले काही मित्र, घटक चाचणीत जुजबी ओळखी झालेल्या विशेष विद्यार्थीसह ब-याच जणांचे प्रवेश झाले होते...आयुष्य घडवणा-या या महाविद्यालयाने जे दिले ते क्वचितच मिळत असेल इतरत्र....मिळालेल्या पगारातून काॅलेजचा युनिफॉर्म, इतर शैक्षणिक साहित्य घेतलं, शैक्षणिक विद्यार्थ्यासाठी असणारा एसटीचा पास काढला....काॅलेज सुरू व्हायला अवकाश होता...सुट्टयात माळरानावर एकट्याने जायला क्वचित भेटले होते कामामुळे....मी आठवणीने त्याला काॅलेज सुरू होण्या अगोदर भेटायला गेलो... आणी तेथे जाऊन त्याला सांगीतले..माझे मनोरथ...!! पेरून टाकली माझी स्वप्न त्याच्या खडकाळ जमिनीवर आणी त्या स्वप्नांच्या बिया वाहणा-या वा-यावर स्वार होवून माझ्या अंतःकरणात रूजण्यासाठी परत आल्या ...मी बिया रूजवून घराकडे परत येत होतो...गाव शांत होत होतं आणी माझ्या आत खळबळ माजली होती... गावच्या मंदिरात वाजणारा अभंग वा-या सोबत वाहत कानावर पोहचत होता आणी मी नेमका शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला निरखून पाहून पुढे येवून बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर ऊभा होतो........ संघर्षाची ज्वाला आता वणवा होवू पाहत होती....(क्रमशः)

(प्रताप)

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...