Sunday, October 28, 2018

स्पर्धा परीक्षेची बखर: 'मी' ते अधिकारी ...एक आठवणींचे मोरपीस भाग 11 : स्पर्धेची झुंज.......!!!

स्पर्धा परीक्षेची बखर: 'मी' ते अधिकारी ...एक आठवणींचे मोरपीस

भाग 11 : स्पर्धेची झुंज.......!!!


        बिए प्रथम वर्ष... परिक्षा झाली. सुट्ट्या लागल्या. या सुट्ट्यात मी पुर्वपिठीके प्रमाणे पुन्हा कामाला गेलो. बाॅयलर, स्टिम, प्रेशर....माळरान, पाऊलवाट...निःशब्द संवाद, मुक्या आवाजात स्वतःशी बोलणे...मनाची घालमेल...लातुरची ओढ...काॅलेजची आठवण...सुट्टी आली की ती अभ्यासाचा असलेला माझा पुर्ण सेट अप बदलवून टाकायची आणी जीवनाच्या सेट अप मधे मला बंदिस्त करण्याचा प्रयत्न करायची ...मी तगत रहायचो कारण मला माहिती असायचं हे असं काम करणं फक्त सुट्ट्या पुरतं आहे. नंतर आपला अभ्यास करायला मिळणारच आहे. पण " काळाच्या कळा सोसल्याशिवाय यश जन्माला येत नाही, आणी त्या सोसाव्याच लागतात!!!" मी सोसत होतो गुमान!

          सुट्ट्यात लिहीत होतो काहीबाही...घरच्यांना तो पर्यंत समजत होते की मी MPSC ने पछाडलो आहे. आणी ही बाधा चांगलीच होती..पण तुटपुंज्या साधनांनी साध्य प्राप्त करण्याचे आव्हान मला जास्त मागे रेटत होते.कशाबशा सुट्ट्या संपल्या...काॅलेज सुरू झालं...मी अत्यंत उत्सुकता व उत्साह घेवून महाविद्यालयात आलो..अलिकडे मार्क्स चांगले पडायचे त्यामुळे निकालाचे टेन्शन नव्हते..मी अभ्यासाला सुरूवात केली..काॅलेजची अभ्यासिका..क्लास पूर्ववत सुरू झाले..मी पुन्हा माझ्या रूटीन मधे आलो..पण रूटीन सोडुन करण्यासाठी जो मनसुबा मी आखला होता तो अजुन काही दृष्टीक्षेपात येत नव्हता. मी वेगाने चालण्याचा प्रयत्न करत होतो..पण किती,कोठे, कसा ...सगळा अंधारच....पण अंधार येतोच मुळी प्रकाशमान करण्यासाठी!!!!


         एके दिवशी मी अभ्यासिकेत बसलो होतो,आणी खुप गंभीर होऊन वाचत होतो..त्यावेळी एक अत्यंत ऊंच(मनाने तर त्याहून ही ऊंच) असणारा सिनियर मुलगा हळुच जवळ आला व त्याने विचारले"MPSC चा अभ्यास करत आहेस का?" मी प्रथमच MPSC चे थेट नाव घेवून कोणीतरी विचारत आहे म्हणून थोडा सजग झालो, आणी मी जबाबदार आवाजात त्याला सांगितले "हो भैय्या!!" कारण मला त्याचे नाव माहित होते.......... मुकरम काझी!! ( जो नंतर खरंच माझ्या आयुष्याला ख-या वळणावर घेऊन येणारा पहिला दिशादर्शक व्यक्ती ठरला जर मुकरम भैय्या नसते तर मी MPSCच्या अंधारात किती दिवस चाचपडत असतो माहित नव्हते, काही लोक स्वतः सारखेच इतरांचेही आयुष्य मौल्यवान असते याचे भान बाळगून असतात ते भान असणारा हा व्यक्ती, सदैव मित्रांच्या भल्यासाठी अहोरात्र तत्पर असणारा हा व्यक्ती आजही मित्रासाठी झिजत असतो..MPSC मधे असताना तिने कधी यांना यशाचे दान दिले नाही पण इमानदारीने MPSC चाअभ्यास करणा-या व त्यासाठी धडपडणा-या लातूर मधिल मुलांचा हा दिग्दर्शक व्यक्ती..पुस्तकाच्या दुकानावर गेले असताना तिथे आपल्या मुलास फक्त 1500 रूपयांची पुस्तके घे म्हणुन सांगणा-या त्या मुलाचे वडील , पण जास्त पुस्तके घ्यायची आहेत याची तळमळ असणारा तो मुलगा या दोघांची घालमेल पाहून त्यांची कुठलीही पुर्व ओळख नसताना निव्वळ माणुसकीसाठी स्वतः मदत करून, नंतर त्या मुलाला स्वतः सोबत ठेऊन त्याचे सहकार खात्यात सिलेक्शन होईपर्यंत त्याला मदत करणारा एक दिलदार व ऊमदा व्यक्ती , म्हणजे हा माणुस....हेच नाही तर त्यांच्या आख्ख्या घराला शिक्षणाचे वेड असणारे हे कुटुंब, मुकरम भैय्या व त्यांच्या भाऊ व एक बहिण यांच्या मिळालेल्या सर्व डिग्री यांची बेरीजच माणसाला थकवून टाकेल...सुदैवाने तिघेही भावंडे आज शासकीय सेवेत आपल्या कामाचा ठसा उमटवत आहेत. मुकरम भैय्या स्वतः पोलीस खात्यात वायरलेस विभाग, लहान भाऊ लातूर पोलीस मधिल एक झंझावात तर त्यांची लहान बहिण, दिदी या वर्षी आपली पहिली नोकरी करत असतानाच सहाय्यक कामगार आयुक्त म्हणून निवडली गेली आहे. अत्यंत प्रगतीशील विचार असणारे हे कुटुंब, व आपल्या मुलांना असा विचार देणारे त्यांचे अत्यंत ऊमदे वडील , आदरणीय चाचा!! मला अत्यंत प्रेमाने वागवणारे, पोलीस खात्यात अत्यंत ईमानदारीने काम करून नावारुपाला आलेले, आणी मला भेटल्यास अत्यंत मित्रत्वाने भेटून चहा पित पित MPSC बद्दल व मुकरम भैय्याच्या अभ्यासाबद्दल चर्चा करणारे आणी उत्साह वाढवणारे व्यक्ती! दुर्दैवाने चाचा यांचे अकाली व अपघाती निधन झाले. ते तिघा मुलांचे सिलेक्शन पाहू शकले नाहीत, पण या तिघांना जी सामाजिक समज त्यांनी दिली त्यायोगेच हे तिघेही घडले. चाचा गेले आणी मुकरम भैय्याने आख्खे कुटुंब योग्य मार्गावर नेले. अत्यंत जबाबदार व संवेदनशील मनाचा हा व्यक्ती ज्यांच्या ज्यांच्या सोबत जुडला त्या त्या व्यक्तीला त्यांनी मदतच केली आहे...एवढे सारे मुकरम भैय्या बद्दल लिहिणे या साठी की ज्या व्यक्तीने माझी अभ्यासिकेत वर्षभर धडपड पाहिली व माझ्यावर लक्ष ठेवले, माझा लेखाजोखा ठेवला आणी योग्यवेळी मला मदतीचा हात दिला तो पहिला व्यक्ती हाच!! माझा जिवलग मित्र आणी माझ्या कुटुंबा साठी एक सन्माननीय सदस्य!! "शुक्रिया भैय्या ! कुछ लोग फ़रिश्ते होते है। आप वही हो।") मी MPSC चा अभ्यास करतो हे ऐकुन त्यांनी म्हटले, "असा एकट्याने कसा अभ्यास होईल?? तुला खरंच अभ्यास कसा असतो आणी तो कसा करतात बघायचा आहे का??" मी एकदम स्तब्ध झालो! आणी नकळत तोंडून शब्द निघाले"प्लिज!"यावर एक आश्वासक स्मितहास्य करून, मुकरम भय्याने सांगितले , तु टेन्शन मत ले भाई! हम जाएंगे शाम मे, तुझे अच्छे और सीरियस कॅन्डिडेटसे मिलाता हूँ । तु सीरियस पढता है इसलिए मैने बताया ।" मी लगेच होकार भरला. आणी सायंकाळ व्हायची वाट पाहत बसलो. मी खुप अस्वस्थ झालो होतो. मला सायंकाळ कधी होते याची प्रतिक्षा होती. मला मुकरम भैय्याने 5.00 वाजता नंदी स्टाॅपला यायला सांगितले होते. काॅलेज ते नंदी स्टाॅप हे अंतर साधारणतः 3.5 कि.मी. होते. मी साडेतीन वाजताच काॅलेजवरून निघालो, कारण चालत जायला मला वेळ लागला असता....अॅटोने पोहोचण्याची व्यवस्था होउ शकेल एवढे पैसे होते पण तेथे गेल्यास सहज चहा पाजण्याची वेळ आली तर काय? या टेन्शनमध्ये मी चालत निघालो. जाता जाता मी अनेक विचार करत होतो..काय असेल तेथे? कुठली मुले असतील? आपण तेथे अॅडजेस्ट होऊ शकु का? मुकरम तसा चांगला माणुस आहे...तेथे ग्रुप मेंबर व्हायच्या काय अटी असतील???? वगैरे..


           मी साडेचार पर्यंत तेथे पोहोचलो. मुकरम भैय्या पाच वाजता हजर झाले. त्यांनी मला त्यांच्या गाडीवरती बसवून घेतले आणि आम्ही निघालो..तो एरीया माझ्या ओळखीचा होता. कारण आठवीला असताना मी याच रस्त्यावरून शाळेत जात होतो. आम्ही एका बिल्डींग जवळ पोहचलो. मला जातानाच त्यांनी समजवून सांगितले होते की, घरमालकाला तेथे गोंधळ चालत नाही तु काही न बोलता गुपचूप माझ्या सोबत चलशील. मी सांगीतल्या प्रमाणे केले. मी गुपचुप वरच्या मजल्यावर त्यांच्या सोबत पोहचलो.तेथे गेल्यावर दिसले की, खाली सतरंजी टाकली आहे. समोर भिंतीवर एक फळा टांगलेला होता. काही खडुचे तुकडे व्यवस्थित ठेवले होते. पोहचल्यावर मी पाहीले, मुकरम भैय्याने पण खडुचे स्वतः जवळील तुकडे काढून तेथे ठेवले. आणी सांगितले मला की, "काॅलेज मे क्लास मे बहोत टुकडे गिरे रहते है। वही ऊठाके लाया हूं, उससे आराम से अपने तिन चार दिन के क्लास की राइटिंग अॅडजेस्ट हो जाती है। " यावरून मला तात्काळ अंदाज आला की येथे असेच आपल्या सारखे गरीब पण होतकरू मुलं अभ्यास करतात. ज्यांना जाणीव आहे. साडेपाच वाजता मला तेथले स्वरूप समजले की, तांबे सर ज्यांना तेथील सगळे मुलं भैय्या म्हणतात त्यांनी हा ग्रुप तयार केला आहे. व येथील सर्व मुले एकत्र पैसे जमा करून त्यातुन खर्च भागवत अभ्यास करतात व तांबे सर तेथे शिकवतात. सहा वाजेपर्यंत हळूहळू मुलं जमायला सुरूवात झाली. सागर पुदाले, नितीन सिरसाट, अशोक गिराम, चंद्रशेखर ऊत्के, सोमनाथ रेड्डी ( नंतरAPO ),संजय (नंतर STI) , उज्ज्वला मॅडम (नंतर PSI),सचिन काळे, अश्विनी मॅडम हे सर्व सिनियर तेथे जमा झाले. आणी तांबे सर यांनी प्रवेश करून ओळख करून घेतली. आणी पहिल्याच लेक्चर मधे समजले, मी आजपर्यंत अभ्यास केला होता पण MPSC चा अभ्यास त्यात फार कमी होता. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने व सिरीयस लेक्चर झाले. डोळे उघडले. MPSC, काय असते, कशी परिक्षा असते, अभ्यासक्रम काय असतो, कसा अभ्यास करावा लागतो,संदर्भ साहित्य काय असते या बद्दल अचुक माहिती मिळाली. मी एकदम स्तब्ध होतो. मुकरम भैय्याने ओळखले, आणी म्हटले, मैने बोला था ना तुझे।मी होकार भरला आणी न विचारता, न सांगता मी त्या ग्रुप चा सदस्य झालो. मी दररोज तेथे जाऊ लागलो.आवश्यक ती फिस मी घरी बोलून व इकडुन तिकडुन जमा केली, तांबेसर एकदम सुंदर शिकवायचे, वर्गात असतानाच शिकवलेले लक्षात राहील अशी त्यांची पध्दत. मुलं अनौपचारिक पण अत्यंत व्यावसायिक पध्दतीने तयारी करत. टेस्ट, ग्रुप डिस्कशन , सिलॅबस, स्वंयमुल्यमापन या बाबी समजत चालल्या होत्या. दिवसेंदिवस काॅलेजच्या क्लास मधून मुलं कमी होवून इकडे जमु लागली..त्या पैकी अनिरुद्ध कुलकर्णी , प्रदीप राऊत ( सहकारी बॅकेत सध्या रुजू)हेही तिकडे जाॅइन झाले. ग्रुप मधिल काही इतर जण पण शिकवायचे.

         मी सकाळी काॅलेज, नंतर लाएब्रेरी आणी रात्री क्लास करून मग गावी जात होतो. आता रस्ता सापडला होता पण धावण्यासाठी आवश्यक वेळ मिळत नव्हता. गावी गेले की ती रूम, तो बल्ब आणी मनात प्रकाशाची व्यापकता...क्लास मधे टेस्ट व्हायच्या एकाचढ एक मुलं अभ्यास करायचे. अधून मधून माझाही नंबर यायला लागला.कधी तो गेला की जिद्द वाटायची की आपण असं मागे पडायला नाही पाहिजे , मग त्वेषाने अभ्यास सुरू व्हायचा आणी त्याचा फायदा पुढल्या परिक्षेत व्हायचा. या वरून एक जाणिव झाली की जिद्दीने, त्वेषाने अभ्यास केलातर आपण स्पर्धेत राहू शकतो, टिकू शकतो...तेथे जमलेले सगळे गंभीर होते. त्यामुळे अभ्यासाशिवाय इतर कुठला विषयच असायचा नाही.


                      मला हळुहळु जाणीव होत होती की, गावाकडून येण्याजाण्यात खुप वेळ जात आहे. आपण क्लासच्या आजुबाजुला जर राहू शकलो तर आपण जास्त अभ्यास करू शकतो. आपल्याला जास्त वेळ मिळेल. इतर मुलं आपल्या पेक्षा जास्त वेळ बसतात त्यामुळे ते वेगाने पुढे निघून जात आहेत. या बाबत इतर सहकारी मित्रांनी पण दुजोरा दिला. मन घट्ट करून या बाबत घरी बोललो. पण घरी एक अडचण होती. एकदमच तीनचार हजार रूपये कसेही करून जुळवता येतील पण दर महिन्याला नियमीतपणे भाडं कसं देणार? खेड्यात दर महिन्याला पैसे येतीलच याची काही हमी नसते. मग मेस चा खर्च तो कसा देणार? मग काॅलेजला रोज कसं जाणार? अडचणीने मला घेरायला सुरूवात केली होती पण मला आता ही संधी सोडायची नव्हती.मी खुप वैतागलो होतो. काही सुचत नव्हते. शेवटी मेसची चिंता नको,आम्ही हाताने जेवण बनवू, दररोज काॅलेजला चालत जाउ, लातुरात राहिलो तर बसच्या पासचे पैसे वाचतील, मी व मोठा भाऊ राहतो असे ठरले, हा तोडगा आम्हा सर्वांसाठी सुसह्य होता.वडिलांनी क्लास पाहीला होता, तेथील मुले पाहिली होती. त्यांना मी तिथं शिकावं ही इच्छा होती. ती कशी तरी जुळवून आणायचा आमचा सगळ्यांचाच प्रयत्न होता. जुळवाजुळव सुरू झाली. दिवस सरत होते. एके दिवशी मला खुप गंभीर झालेले पाहून वडीलांनी विचारले, मी त्यांना अगदी कळवळून बोललो, लातूर मधे राहिलो तर फायदा होईल. बोलता बोलता डोळ्यात पाणी आले. वडीलांना एकदम जाणीव झाली की मी किती गंभीर आहे. त्यांनी पुर्व तयारी नसताना माझी अवस्था पाहून मला सांगितले, "ठिक आहे ऊद्या रूम शोधू" हातात काहीच नसताना स्वप्न पाहणारा मी आणी ती कदापिही परवडत नसताना त्याच्या साठी स्वतःस वेठीस धरणारे माझे आईवडील...जर त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला नसता आणी जर मला व माझ्या स्व्प्नांना किंमत दिली नसती तर ....तर कदाचित ही कथा लिहायला मला संधी मिळाली नसती...परिस्थितीच्या क्रूर पंजाखाली माझी कथा अशीच अस्तंगत झाली असती. मी माझे स्वप्न हे फक्त माझे नव्हते, ते आम्हा सगळ्यांचा जिवनध्यास बनला होता, आईवडिल, दोन्ही भाऊ यांनी जर माझ्यावर व माझ्या स्वप्नांवर विश्वास ठेवला नसता आणी माझ्या सोबतीला राहीले नसते तर मीही इतराप्रमाणे परिस्थितीच्या वेलीवरील एक न उमललेले फुल ठरलो असतो....माझ्या स्वप्नांच्या दिव्यास त्यांनी वादळात तेवत ठेवले आपली ओंजळ करून आणी त्याचे चटके त्यांच्या हाताला बसले...कितीदा ते हात माझ्यासाठी इतरांकडे विनवणीचा व्यवहार करत होते..आज आठवले तरी जिव कासावीस होतो.....

        दुस-या दिवशी मी आणी माझे वडील...ते पुढे मी मागे..(..हाॅस्टेलची आठवण...फक्त त्यांच्या खांद्यावर लोखंडी पेटी नव्हती आणी माझ्या हातात पिशवी.. ) आम्ही रूम शोधायला सुरूवात केली. आजही तो क्षण आठवतो..ज्या भागात मातीच्या खोल्या आहेत तिकडून आमची सुरूवात झाली..झोपडपट्टीचा तो भाग..मी पाहतो आहे , वडील ही पाहत आहेत सरतेशेवटी तेच म्हणाले ईकडे नको , कारण इथे तुला रात्री यायला जायला अडचण होईल. मी तर अशा मानसिकतेत होतो की कसेही होवो , कसलीही असो एक खोली मिळावी बस्स!! सरतेशेवटी एक दहा बाय दहाची खोली (इतर कोणीच घेत नसल्यामुळे) आम्हाला मिळाली. घरमालक आज्जी चांगली व ग्रामीण भागातील असल्याने तेथे राहणे निश्चित झाले. आम्ही सामान घेवून रूमवर आलो. रोज सकाळी आम्ही लवकर ऊठून काॅलेजला चालत जायचो. ते संपले की आल्यावर दोन्ही वेळचा एकदमच स्वयंपाक.. मग मी क्लास कडे जाऊन अभ्यास करायचो...रूटीन बसलं होतं...जाण्या येण्याच्या वेळी मी डायरीत काढलेले व पाठांतराचे मुद्दे सोबत घेवून ते पाठ करत करत जात येत होतो. वेळ सत्कारणी लावत होतो. एक बेभान अवस्था आली होती. कोण काय म्हणेल.? काय समजेल? कसलीच तमा नव्हती. ...आता क्लासमधला माझा दर्जा उन्नत होत होता...मी ऊन्नत होत होतो...मला आत्मविश्वास येत चालला होता...

         एकदा अशीच परिक्षा झाली आणी तिच्या अनुषंगाने एक कार्यक्रम क्लासवर ठेवला..त्याला प्राचार्य अनिरुद्ध जाधव सर यांना बोलावले गेले...सरांना MPSC करणारी मुले आहेत हे कळल्याने त्यांनी कुठलाही राजशिष्टाचार न बाळगता येतो म्हणून सांगीतले. सर वेळेवर आले. त्यांनी आमचा गुणगौरव केला..आणी तुम्ही माझ्याच काॅलेजचे विद्यार्थी आहात, आपल्या काॅलेजच्या क्लास मधे काय कमतरता आहे म्हणून विचारणा केली. आम्ही चिडीचूप झालो काय बोलावे सुचत नव्हते. आम्ही धर्मसंकटात सापडलो होतो. पण सरांनी आश्वासक सुरात सांगितले की, इकडल्या चांगल्या बाबी आपण आपल्या काॅलेज मधे करू, तुम्ही जेथे चांगलं मार्गदर्शन मिळेल तेथे जाणे योग्यच आहे. हे ऐकल्यावर मग आम्ही सरांना दोन्ही बाजुची तुलना करून सांगितली. सर जरी गुणवत्तेचे पारखी असले तरीही ते खातरजमा करणारच ! हाच त्यांचा गुण "लातूर पॅटर्न " महाराष्ट्राला देवून गेला. सरांनी सांगितले की या क्लासची मुले आणी काॅलेजच्या क्लासची मुले यांचे एक डिस्कशन ठेऊ आणी मग निर्णय घेवू... झाले म्हणजे युध्दच!!!!

क्लासतर्फे मी, सागर, मुकरम भैय्या आणी नितीन, सचिन जाणार ठरले...भुगोल चर्चेचा विषय ठरला. मी खुप जिव तोडून अभ्यास केला. आम्ही सगळेच तयारी करत होतो. शेवटी आम्ही काॅलेजच्या क्लासला गेलो. तेथील आख्खा क्लास विरूद्ध आम्ही. प्रश्नाना तोंड फुटले. अटितटीने प्रश्न विचारले जाऊ लागले. मी लहान असल्याने मला जास्त संधी मिळाली. विचारलेल्या सा-याच प्रश्नाची उत्तरे आम्ही देत असल्याने काॅलेजच्या मुलामुलींना आश्चर्य वाटू लागले. रोजचेच मित्र पण झुंजच लागली, आम्ही अत्यंत योग्यरित्या ऊत्तरे दिल्याने शिक्कामोर्तब झाले की, काॅलेजमधील क्लास मधे सुधारणा अपेक्षीत आहे आणी ते करण्यासाठी तांबे सर!!!!! म्हणजे आता आमचे क्लास काॅलेजवर होणार!!! पुन्हा उलट , मग मी रूम कशाला केली?? पण आम्ही ठरवले की आता काही बदल नको, फक्त अभ्यास करायचा..

                       तांबेसरच क्लासला शिकवायला काॅलेजवर येत असल्याने आता सगळेच उन्नत होत होते, माझे आर्थिक नुकसान झाले असले तरी एक प्रचंड मोठा फायदा झाला होता आता तेथे विविध विभागातून सिरीयस कॅन्डिडेट त्या क्लासला येत होते..शर्यतीचा पट विस्तारला होता..आणी स्पर्धेसाठी मला स्फुरण चढत होते....मी पटावर उतरलो होतो....आता झुंज सुरू झाली होती......(क्रमशः)
प्रताप

No comments:

Post a Comment

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...