Friday, May 29, 2020

कवितेच्या राखेआड......


ही झुळुकीची ओंजळ
उफान थव्याला आले
सांजसावळ्या घटीकेचे
मन गुलाबी झाले

ही वैशाखी रिक्तता
सांज भरून येते
सांजसयीचा पदर
रात धरून येते

ओकाबोका डोंगर
अंधार धुक्यात बुडतो
झडल्या पंखाचा आत्मा
मुक मनात रडतो

चोचीत साठले दाणे
खोप्यात निपचीप निजती
डोळ्याच्या पापणीआड
स्वप्न चंदेरी सजती

झाड स्तब्ध होते
स्पर्शित नाही वारा
सुकल्या माळावर झिरपती
आठवणीच्या धारा

पैंजणांचा नाद उतरतो
माती मोहरून हसते
वैशाखाच्या चांदणबनात
सावली चमकत असते

वैशाख वणव्याने पेटे
मनी शब्दांची मशाल
कवितेच्या राखेआड निजती
आर्त भाव खुशाल......
♡Pr@t@p♡
29/5/20
"रचनापर्व"
prataprachana.blogspot.com 

No comments:

Post a Comment

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...