Saturday, May 30, 2020

मुकुटातुन गळले मोरपीस.....


अंधार तळातुन येती
शब्द चांदणअस्तरी
कवितेच्या आत्म्याला ये
सुवास तुझा कस्तुरी

हे गडद अंधारी रस्ते
होई फिक्कट सावली
तुटत्या ता-याच्या गतीने
झुळुक का धावली?

ही कसली आवर्तने
हे कसले सुर?
वैशाखाच्या चांदण्याला
येई शब्दऊधाणी पुर

दिशाहीन भावनांना
निशीगंधी आत्मा मिळे
राधेच्या पावलात साचते
सुगंधी कृष्णनिळे तळे

ही कोरड कसली साचे?
तळे पावलाशी असताना
सुर दाटून येतो कुठला
बासरी नसताना

हे असले कसले संगीत
सारेच भारून जाते!
वावटळीचे साध्वीपण
वा-याला सारून येते

जगरहाटीची पुनव चकाकी
रानोमाळ सांडत असते
माझ्या ओल्या शब्दांशी
कविता भांडत असते

मी शब्द सांधून घेतो
भाव हरवत जातो
मुकुटातुन गळले मोरपीस
आत्म्यावर गिरवत राहतो.....
(♡pr@t@p♡)
30/05/2020
" रचनापर्व"
BLOG# prataprachana.blogspot.com

No comments:

Post a Comment

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...