Saturday, January 20, 2024

भूपाळी


ही वेळ अशी का रिती?
चांद नभात ढळतो
हरणांचा रथ कुठे हा
अज्ञात दिशेला वळतो

राजकन्या कुठली वेडी
शोधण्या कुणाला निघते?
वैभव चांदण्याचे 
निळे निळे ती बघते

ती का अनाहूत थबके?
कोण जिव्हारी लागे?
ती अखंड अवकाश शोधे
स्थिर ध्रुवा मागे

मी ही अढळ उधळतो
प्रतिक्षा खुल्या आभाळी
अन् श्वास उमटवून देतो
तिच्या आभास भाळी

ती हळूहळू धुसरते
कोण दिशेला जाते?
हरणांच्या पदध्वनिची
आर्त भूपाळी होते...


                           ("やraτa ₱)                           
www.prataprachana.blogspot.com
  २० .१.२०२४
 







Thursday, January 18, 2024

अक्षरे



वाजती का अंतरी
आठवांचे चौघडे?
खोल उसासे दडपून 
इथे काळजाला तडे

वणवण फिरती येथे
भूगर्भातील झरे
उगवून पृष्ठी येती
कवितेतली अक्षरे

घे ओटीस ही फुले
नकोस खचवू माती
झाक पदराखाली
हे व्याकुळ शब्दमोती

का कुशीला उगवे?
तुझ्या आसेचे चांदणे
कायेवर सजून येते
अस्पर्शी हिरवे गोंदणे...


                          ("やraτa ₱)                           
www.prataprachana.blogspot.com
 १८ .१.२०२४
 
   


 



 

Friday, January 12, 2024

नामी दवा



दुःख अनाम अगतीक
त्याचा ना गवगवा
कोण फकीर कोठून
देईल नामी दवा?

सुजाण वेदना उभी
असते दारापाशी
तरीही हाक उमलते
होवून माहेरवाशी

अस्तविहीन चांदणे
देतसे मनाला धिर
कवने गात फिरतो
एक अवलिया पिर 

नित्य घडीस हवा
कावर बावर होते
शब्दांचे संयत हृदय
वेदनेचे माहेर होते

दुर गावची सजनी
शब्द माहेरी रमते
मंद उसासे तिचे
एकाकीपण गमते....


                          ("やraτa ₱)                           
www.prataprachana.blogspot.com
१३ .१.२०२४



















रेशमी उखाणे


देठ नको ना तोडू!
संपतील उगवत्या वेदना
दिठीस बिलगुन घे तू
झाडाच्या संवेदना!

झड भले ही येवो
तु राखून ठेव चैत्र 
मी निभवून नेईन एकला
शिशिर झडीचे मैत्र

चल उगवून येवू दोघे
दगडाची भेग सांधू
अंधार वेलीवरती 
चांदण्याचे फूल बांधू

येवू दे स्फटिक गंध
रात उजेडा नेऊ
मी रम्य पहाटवेळी
तुझी भूपाळी होऊ?

साजि-या तुझ्या वाणीने
तु गाऊन घे ना गाणे
मी लिहून घेईन ईकडे
रेशमी तुझे उखाणे...... 

                          ("やraτa ₱)                           
www.prataprachana.blogspot.com
१२ .१.२०२४





Thursday, January 11, 2024

राई राई


थिजते रान उभ्याने
होई हाकेचा गुंता
सांज किरमिजी उभी
नसे तमाची चिंता

त्या पैंजणध्वनी वरती 
सजते सांजफुलाचे गाणे
आकाशाच्या कुशीत 
चांदण्याचे जोंधळ दाणे

नक्षत्र आशेचे उगवे
त्याला संकेताचा पान्हा 
शुभ्र झोळीआड मीरेच्या 
हसतो शामल कान्हा

मी ओंजळ धरुन चाले
शिवतो तिला वारा
दान कान्हा देतो
ओंजळीत तुटला तारा....

रास अशी तुटक्यांची
घर भरले बाई!
रात नभात भिनते
मंद राई राई

                             ("やraτa ₱)                           
www.prataprachana.blogspot.com   
 ११ .१.२०२४









 




Wednesday, January 10, 2024

इंद्रधनु तमात सजतो



रात भेगाळते अशी
जसे टिचकते काकण
जरी झाकले डोळ्यावरती
पापण्यांचे झाकण

निरांजनाच्या वळचणीला
अंधार मूठभर सांडे
अर्धउजेडी गात्रात माझ्या
स्वप्नांचे रंगीत तांडे

बकूळ झरतो दारी
निद्रिस्त होता केवडा
मी गंधभारला होतो
निशीगंधाच्या एवढा

अंगाई का सुचते?
मोरणीच्या मना
मी भूईवर रेखत असता
मोरपिसारी खुणा 

का कसे मला
घनघोर अंधार सोसवे?
जळल्या वातीतून झरती
काजळरंगी आसवे

ओल मनाला फुटते
कैफ हळुवार निजतो
दिवा अलगद विझूनी
इंद्रधनु तमात सजतो...

                          ("やraτa ₱)                           
www.prataprachana.blogspot.com
१० .१.२०२४



 








  

Tuesday, January 9, 2024

स्तब्ध पाश



हे संमोहन टिपेला
जिव एकला झुरे 
गर्ततळाच्या हाका जणू
बुडल्या द्वारकेची घरे

पृष्ठी वर्तुळ वाटा
त्यांचा काठावरती नाश
अनंत सागरा भोवती
किना-यांचे स्तब्ध पाश...

                           ("やraτa ₱)                           
www.prataprachana.blogspot.com   ९.१.२०२४






सुगंधी शेला


येशील कधी का असे
जणू राम मिथीला आला
ज्या भावघडी जानकीचा
शेला सुगंधी झाला

नयनात तिच्या का हसते
रघूकुळाचे पाणी
रामाचे हृदय होई
प्रितीची अत्तरदाणी


विभक्त ठरे ना काही
एकात्म सारे वाटे
फुलती प्रित फुले
शमती वनवासाचे काटे
                          ("やraτa ₱)                           
www.prataprachana.blogspot.com
   ७.१.२०२४


Monday, January 1, 2024

पद्मताटवा



सिध्दार्थ दाटला येथे
कलिंग झरते आहे
महावस्त्र सम्राटाचे
मुक विरते आहे

उध्वस्त समशेरीला 
आकांत असा हा फुटला
दंभ दाटला स्तंभ !
आकांत भारे तुटला

आक्रोशाला आली
संवेद हाकेची वाणी
रक्तमातीवर झाकतो
चिवर पद्मपाणी

हिंसा निमाली येथे
बुध्द भेटण्या आला
महावीर नश्वर इथला
शिलालेखी अक्षर झाला.....! 

हर युध्दभुमीस इथल्या
बुध्द स्फूरून यावा
शांतीच्या पद्मताटव्याने 
'दंभ' हरून जावा! 


                          ("やraτa ₱)                           
www.prataprachana.blogspot.com
 २.१.२०२४















राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...