Wednesday, January 10, 2024

इंद्रधनु तमात सजतो



रात भेगाळते अशी
जसे टिचकते काकण
जरी झाकले डोळ्यावरती
पापण्यांचे झाकण

निरांजनाच्या वळचणीला
अंधार मूठभर सांडे
अर्धउजेडी गात्रात माझ्या
स्वप्नांचे रंगीत तांडे

बकूळ झरतो दारी
निद्रिस्त होता केवडा
मी गंधभारला होतो
निशीगंधाच्या एवढा

अंगाई का सुचते?
मोरणीच्या मना
मी भूईवर रेखत असता
मोरपिसारी खुणा 

का कसे मला
घनघोर अंधार सोसवे?
जळल्या वातीतून झरती
काजळरंगी आसवे

ओल मनाला फुटते
कैफ हळुवार निजतो
दिवा अलगद विझूनी
इंद्रधनु तमात सजतो...

                          ("やraτa ₱)                           
www.prataprachana.blogspot.com
१० .१.२०२४



 








  

No comments:

Post a Comment

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...