Sunday, November 29, 2020

शब्दफुलांचा माग....

फुलाच्या ओटीत
गंधाचा अत्तरथेंब साचे
आभाळ दाटते इकडे
तिकडे मोर मनात नाचे

मी वेचत जातो हलकेच
ओठावर थबकते गाणे
तळव्यावर उमटती जर्द
मेहंदीची हिरवी पाने

देवकुळी चांदण्याला
आभास होतो प्रकाशी
तुझ्या रूपाचे चांदणे
ये बहरून अवकाशी 

शब्दखुडीची वेळ 
फुलांचा करते धावा
राधेच्या अंतरआत्म्याला
भारून देतो पावा

कंदिलाच्या काचकाळजावर
हे कुणाचे काळे डाग?
वातीने का धरावा
जळत्या समईचा राग?

खडकाच्या पाझराला
फुटते मुक ओल
रातीस कळते राती
तुझ्या काजळाचे मोल

तुझ्या सावलीच्या हातावर
ही कसली गोंदणनक्षी?
डोळ्यात तुझ्या उतरती
सांजदाटले पक्षी

बोटांच्या पेरांना तुझ्या
स्पर्शाची भाषा फुटते
बहरती रातराणी
दचकून राती उठते

पावलांना अलगद उचल
कवितेला येईल जाग
तु काढत येशील अलवार मग
माझ्या शब्दफुलांचा माग

भारून जाईल तुझ्या
समग्र अस्तित्वाची रेषा
उमटेल तुझ्या ओठी मग
माझ्या कवितेची खोलभाषा.....
(प्रताप)
"रचनापर्व"
29/11/2020
prataprachana.blogspot.com

Saturday, November 28, 2020

राधेचा आर्जवी प्रहर.....

मनास हितगुज करती
तुझ्या आठवांचे भावभोळे
वाहत्या नदी काठावर
मी सोडून आलो डोळे 

चिंब वाटेने वाहे नदी
डोळ्यात किनारा दाटे
अर्पण केल्या फुलांचे
मी चुंबून घेतो काटे

प्रार्थनेतील आळवणी
का नभी निनादत फिरते?
रात दाटल्या कोनाड्यात
समई उगाच झुरते

अपु-या पुनवेचा चांद
नभात खुलून हसतो
चांदण्याच्या झुडुपात
पदर कुणाचा फसतो

चंद्र कशाला झाकु?
तळव्यात त्याची कांती
क्रमाने जळती दिप
वातीस बिलगते शांती

रात दाटून येता पेटती 
'शकुनफुलांचे दिवे'
तुझ्या कुशीत उधळती
सोनकांती चांदणथवे

पदराला येवो तुझ्या
माझ्या आठवणीचा गंध
पेटून याव्यात दिशा
वात होता अलगद मंद

तुझ्या घराच्या खिडकीला
फुटावे आठवणीचे गाणे
वा-याच्या आभासात मोहरावी
रातराणीची पाने

मोहरल्या रातराणीला 
गंधाची पडावी भुल
तुझ्या मनाच्या कळीचे
मी राखे ओंजळीत फुल...

तुझ्या बहराला लगडावेत
माझ्या मोसमांचे बहर
मी उचलून घ्यावा कुशीला
तुझ्या राधेचा आर्जवी प्रहर.....
(प्रताप)
"रचनापर्व"
28/11/2020
prataprachana.blogspot.com 
(शकुनफुलांचे दिवे- आदरणीय ग्रेस सरांची अमिट कल्पना...साभार# संदर्भ #सांध्यपर्वातील वैष्णवी)

Tuesday, November 24, 2020

आठवणीचे तळे..

समर्पणाची दृष्टांतकथा
आदिम पिढ्यातुन वाहे
मृगजळाच्या छायेतुन
नजर कुणाची पाहे?

सांजधुलीची वलये
किरणाची लगबग वाढे
सांजेला दे संधिप्रकाश
दिर्घ आलिंगन गाढे

पानांना गहिवर दाटे
फुल सजून जाते
यशोधरेची छाया अनवाणी 
अंगणी रूजून जाते

बेटांना सागराने
अपार वेढून घ्यावे
लाटांचे सांडबहर शुभ्र
ओंजळीत झाडून घ्यावे

औदुंबर उन्हात निजतो
बिजास हृदय फुटते
पाखरांच्या पंखाची
आस झेपावी फिटते

हंस लाघवी फिरतो
शोधीत मोती चारा
तथागताच्या मुद्रेचा
मंद वाहतो वारा

मी बकुळफुलांची समई
स्पर्शाने पेटवून देतो
विरहाच्या अंधाराचे
पंख मिटवून घेतो

तृष्णचातक उभा
उधाणल्या सागरा काठी
अस्पर्शी लाटांचे शुष्क
तुषार बिलगती ओठी

ही तुष्णा की तृप्ती?
सांजेस ना कळे
भरून वाहे रानी
आठवणीचे तळे...
(प्रताप)
"रचनापर्व"
23/11/2020
prataprachana.blogspot.com

Sunday, November 22, 2020

दिवोत्सवास ग्वाही.......

पुर्वसंचिताचे हाकारे
नभाचे संध्यादान
सुर्यास ये अलवार
दाटत्या रातीचे भान

सांज मागे संधिप्रकाशास
प्रकाशाचा जोगवा
पेटत्या पणतीआड दडे
अंधार बुजरा नागवा

ही कसली हैराणी
कशाला अलिंगन आंधळे?
श्वासांच्या बावर स्पर्शी
दुःख हो अनामिक पांगळे

झेलून घेत्या हाकेला
पाखरपंखी ओझे
मनात कसली लगबग
धुन कसली वाजे?

मौनातुन अंधार झरतो
शब्दाला पाझर फुटतो
कवितेचा काफिला नित्य
भरल्या सांजेस निघण्या उठतो

शब्दांची झडती घेत
मन भिरभिर चाले रानी
मातीत उगवून हिरवी
येतात टप्पोर गाणी

धुक्याला उमजते
थंडीची चाहुल ओवी
मनाचा कळस
पायरीकडे धावी

सांज वाहून जाताना
प्रकाश सांडून जाते
पेटल्या दिव्याच्या उजेडी
रातीस भांडून जाते

सावलीच्या आडून
तु अंधार का लपवला?
उतर तो चांदणखडा
ज्याने काळीज परिघ दिपवला

दिव्याचा सोस
तसा खास मला नाही
तुझ्या दिवोत्सवास दिलीय
माझ्या वातीची ग्वाही...
(प्रताप)
"रचनापर्व"
22/11/2020
prataprachana.blogspot.com




राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...