फुलाच्या ओटीत
गंधाचा अत्तरथेंब साचे
आभाळ दाटते इकडे
तिकडे मोर मनात नाचे
मी वेचत जातो हलकेच
ओठावर थबकते गाणे
तळव्यावर उमटती जर्द
मेहंदीची हिरवी पाने
देवकुळी चांदण्याला
आभास होतो प्रकाशी
तुझ्या रूपाचे चांदणे
ये बहरून अवकाशी
शब्दखुडीची वेळ
फुलांचा करते धावा
राधेच्या अंतरआत्म्याला
भारून देतो पावा
कंदिलाच्या काचकाळजावर
हे कुणाचे काळे डाग?
वातीने का धरावा
जळत्या समईचा राग?
खडकाच्या पाझराला
फुटते मुक ओल
रातीस कळते राती
तुझ्या काजळाचे मोल
तुझ्या सावलीच्या हातावर
ही कसली गोंदणनक्षी?
डोळ्यात तुझ्या उतरती
सांजदाटले पक्षी
बोटांच्या पेरांना तुझ्या
स्पर्शाची भाषा फुटते
बहरती रातराणी
दचकून राती उठते
पावलांना अलगद उचल
कवितेला येईल जाग
तु काढत येशील अलवार मग
माझ्या शब्दफुलांचा माग
भारून जाईल तुझ्या
समग्र अस्तित्वाची रेषा
उमटेल तुझ्या ओठी मग
माझ्या कवितेची खोलभाषा.....
(प्रताप)
"रचनापर्व"
29/11/2020
prataprachana.blogspot.com
No comments:
Post a Comment