चंद्रचाहूली प्रहर
ते दुर पसरले धुके
घरट्यातल्या उबेतुन
गीत बहरते मुके
ही पैंजणी भैरवी
हा समर्पणी आलाप
जात्या पाउलवाटेचा
तळ्याकाठास हो मिलाफ
पाण्यात उतरते चांदणे
ही सोनेरी आभा
गंगेच्या काठावर हा
कोण भगिरथ उभा?
रानफुलांना गंध
फुलती कळ्यांचे श्वास
डोळ्यांचा माझ्या चाले
तुझ्या डोळ्याकडे प्रवास
खुण कसली प्राचिन
नयनात तुझ्या दाटे?
कुठल्या जन्मीचे झाड
कुठल्या जन्मात फाटे
तळव्यात चांद बंदिस्त
मिटल्या पापण्यांना चांदणे
अंधारात चकाकून उठते
तुझ्या तनावरील गोंदणे
हे भारले पाणी
तळ्यास तहान लागे
चांदण्याच्या उजेडात
हे पक्षी का जागे?
हवेला ही कसली
निरोपाची भाषा फुटते?
तुझे आभासी चांदणे
वाण प्रकाशी लुटते
नभीचा चांद देतो
दिव्याला वातीचा संग
रातीच्या अंधारात उमटतो
इंद्रधनुचा रंग
नकोस बोलू काही
शब्द अधुरे राहू दे
कवितेच्या गवाक्षातुन मला
पुनव तुझी पाहू दे...
(प्रताप)
"रचनापर्व"
01/12/2020
prataprachana.blogspot.com

No comments:
Post a Comment