हाताशी आभाळ घेवून
चांदणे गुंफावे
सांजेच्या धुकेरी क्षणांना
स्वप्नास जुंपावे
मिटत्या सावलीचे ठसे
अंधार सजवून घेतो
धरतीचा मावळ कोना
सुर्य रूजवून घेतो
हा कसला नित्य उगवणे
आणी मावळतीचा फेरा
मी नित्य पाहतो अवकाशी
एक लुकलुकणारा तारा
ही पुरातन ओढ
ही प्राचीन आस
या कळ्यांना दे!
बहराचा बकुळ भास
या धुक्याच्या अंतःकरणी
माझ्या हाकेच्या नक्षी
मनाच्या मुक सादेला
तुझे मन बावरे साक्षी
नजरेचे स्पर्श
नजरेला होई बाधा
रातीच्या कृष्ण रंगात
चमकून उठते राधा
तु आर्जवी पुजा
मी मनात मांडलेली
उचलून घे स्पर्शफुले
ओटीत सांडलेली
बोटांना सुचली कविता
बटावर ती उमले
तुझ्या तनुच्या भूर्जपत्री
शब्दांचे कोमल इमले
गहिवर तुटवत नाही
रान भरून येते
तु गेल्यापाठी आठवण
लगेच फिरून येते
तु , तुझा आभास
मी रिक्त नाही
तुझी जागती नजर
माझ्या बंद डोळ्यांना ग्वाही!!
(प्रताप)
"रचनापर्व"
09/12/2020
prataprachana.blogspot.com
No comments:
Post a Comment