ओथंबलेले उधाण
सागर अपार खिन्न
चंद्राच्या काळजावर
भरतीचे ओले चिन्ह
गवतात विखुरलेले
हे हलके दव मुके
कोणाची साद अन् स्पंदन
कुणाच्या काळजाचे चुके
ही रातसांज केसाची
चेह-यावर हो आभास
कोणाचीच ना चाहूल
तरी बावर बावर श्वास
तु आल्याचा हृदयप्रहर
अजूनही त्यांचे ठसे
रात उगवे मावळत्या प्रहरी
हे रातीचे असे...!
तुझ्या गंधाचा दरवळ
प्राजक्त फुलण्या विसरे
नजरेच्या समीप माझ्या
तुझे नयन आभासी हसरे
दगडाला फुटते काया
तुझ्या नजरेचा टाक
चंद्र दिला मी ओंजळी
तु रातीस अलबत राख
हृदयाची समिधा वाहून
हा यज्ञ करावा साकार
मी अंधाराला कितीदा
देतो तुझा आकार
मी यावे मनात उमलून
सोडत अलवार गाठी
मी उचलून घ्यावा नि:श्वास
तुझ्या सुस्का-या पाठी
वहिवाट मिलनाची
प्राचिन हा ठेवा
बेधुंद आळवी धुन
वृंदावनात पावा
तळहाताच्या तळ्यात
मी धारण करावे फुल
चेह-याला तुझ्या पडावी
माझ्या तळहाताची भुल.....
(प्रताप)
"रचनापर्व"
13/12/2020
prataprachana.blogspot.com

No comments:
Post a Comment