कल्पनेला स्पर्श फुटावा
विचारांना गंध
मनात दरवळत राही
तुझा आभासी सुगंध
कंठ मनाला फुटावा
नजरेला यावी भाषा
मी होवून जावे तुझ्या
तळहाताची ठळक रेषा
दाटल्या हंबरवेळी
आस दाटून यावी
पावलांनी माझ्या तुझ्या
पावलांची गती गाठून घ्यावी
दिर्घ नि:श्वासांना तुझ्या
माझ्या उसाशांची आण
का थरारे फांदिवर एकले
कंच हिरवे हिरवे पान?
अंधाराला उजेडाचे
लागावे काळीज पिसे
दुर अवकाशी अंधूक
कोणती चांदणी हसे?
चांद उगवी उशीरा
समईची वात विझे
कोणाच्या कुशित मिटल्या
कोणाचे स्वप्न निजे?
नितळ स्वच्छ कांती
अंधार झाकत नाही
लुटुन जाई काफिला
तुझी नजर राखत नाही
मनाला मनाचा
अपूर्व ध्यास बिलगे
वा-याची अनवाणी झुळुक
देह फुलांचा विलगे
रातीला कसले अजाण
पडते गुढ कोडे लाघवी
नजर कुणाची ओली
नजरेस कुणाच्या जागवी?
प्राजक्ताचे बहर क्षण
स्वतःस जाती विसरून
कोणाच्या प्रतिक्षेचा सडा
असतो फुलात पसरून?
(प्रताप)
"रचनापर्व"
08/12/2020
prataprachana.blogspot.com
No comments:
Post a Comment