स्वप्नपडीचा मुहूर्त
वेशीत उभे आभास
लगडून जातो जिव
चांदण्याच्या नभास
कोण कुठला दरवेशी
नजरबंदीचा खेळ
ओळखीच्या खिडकीशी
रेंगाळे सांजवेळ
पापण्यांचा मुहुर्त
नजरेला साधत नाही
दरवेशाची जादू
काजळाने बाधत नाही
हवेला नजीकचे जंगल
कसला सांगावा धाडे?
तटबंदीच्या भिंतीचे
अस्तर भारी जाडे
झुळुकीला दडवत नेती
पारव्याचे पंख
त्वचेच्या रंध्राखाली गोंदले
विंचवाचे डंख
दारास कसले तोरण
हा कसला उत्सव चाले
काढत चालत जावे
काळजात घुसले भाले
हाक कुणाची येते
शहराला काळीज फुटते
दाराच्या अडसराचे
भान अचानक सुटते
खिडकीला येतो बहर
दारास झुळुक भेटे
पारव्यांच्या पंखाचे
नशीब घालते खेटे
चांद बहरून येतो
प्रतिबिंब तुझे सांडे
दुरदेशी निघती चालत
तुझ्या प्रकाशाचे तांडे
गाव अंधारात बुडता
एक खिडकीत दिवा जळतो
शिखरास जोडल्या हाताचा
अर्थ मला मग कळतो....
(प्रताप)
"रचनापर्व"
23/12/2020
prataprachana.blogspot.com
No comments:
Post a Comment