Saturday, December 12, 2020

निद्रानाशाचे फुल...


मनास सांजेच्या पडे
धुक्याची अस्पर्शी भुल
मी उचलून घेई अलगद
निद्रानाशाचे फुल

दोन ढगांचा मिलनबिंदू
तेथून हो पाठलाग
दुर अंधारात दिसे
पेटल्या नंदादिपाची आग

तुझ्या उशिला सुचते
सुस्का-याची गझल
मी चालत जाई शब्दबनातुन
मजल....दरमजल

रित्या क्षणांना कवेत
अंधार हळू घेतो
चंद्र ही मग अधिर
चांदणीचा होवून जातो

दुरदेशी टेकडीला
हवेचा ये इशारा
मी पायथडीला आवरे
झुळुकींचा पसारा

ओल्या गवताला येती
फुलांच्या काळीज हाका
रात पेटल्या वेळी 
चंद्र होई शांत ....मुका

हा दुराव्याचा खंजीर
कोणास हे ओरखडे?
पहाडाचे काळीज हळवे
होई थोडे थोडे

रातीच्या गर्भगुहेतुन
कोणाची साद घुमते?
रातराणीची कळी
झुळुकीच्या ठायी रमते

तु बहर कशाला द्यावे
आठवणीचे सारे?
मी मोजून घेतो अगणित 
रातदाटले तारे....

या हवेला तु गंध
मिलनघडीचा द्यावा
वासरकंठी उत्सुक
मुरलीचा रूजतो धावा...
(प्रताप‍‍‍‍)
"रचनापर्व"
12/12/2020
prataprachana.blogspot.com

 

No comments:

Post a Comment

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...