तुझ्या शहराला बरकत आहे
तेथे माझ्या मनाचा प्राचिन ठेवा
तिथल्या जळत्या दिव्यांचा
न माझ्या अंधारास हेवा
वेदनेचे वारस शब्द घेवून
मी गझलांचे रस्ते आखतो
शब्दांचे ठसे आभासी
मुसाफिर कोण थकतो?
हे वाटा चुकवणारे वाटाडे
देतात उजाड वस्त्यांचे पत्ते
मी गिरवत जातो तुझ्या
दिर्घ आठवणींचे कित्ते
तुझ्या चेह-यासम दिसता ढग
घराहून माझ्या जातो
हा सांजपारवा धुकेरी
आर्त कसले गीत गातो?
माझ्या पुर्वजांच्या दुव्यांना
मी कवटाळुन उरास चाले
कोणाची चाहूल पूर्वजन्मीची
जखमांचे टाके खोले?
अजब अत्तर आहे तुझे
मनात दाटता दरवळ
आभाळाला जाचत राहते
चंद्रचणीची हिरवळ
देवदुतांच्या हाताचे
कंपन करती बोटे
चालत राहते गझल
काळोखास ठरवत खोटे
तुझ्या शहराला हा कसला
अंधाराचा सोस?
फकिराच्या कटो-यात तो
ओसंडे भरघोस
मी अंधाराच्या धाग्यातुन
प्रकाश विणत राहतो
जिव कुणाचा भिंतीत
कोण चिनत राहतो?
त्या शहराच्या मध्यभागी
तो उभा मनोरा कसला?
सांजपारवा माझा
त्याच्या माथ्यावर बसला...दिसला....
(प्रताप)
"रचनापर्व"
20/12/2020
prataprachana.blogspot.com
No comments:
Post a Comment