Thursday, December 31, 2020

वसंत भारली माती...

या प्राजक्त फुलांची 
ही कसली गर्दी?
सकाळ देते अलवार
गंधबहराची वर्दी

सांडल्या किरणांचे
भरून येती थवे
उगवत्या सुर्याचे
स्पर्श भासती नवे

काल रातीचे मळभ
आपसुक दुर सरले
दाटून गेल्या धुक्याचे
अस्तर अलबत विरले

दुरच्या गर्द जंगलाला
बहराची सय दाटली
पहाटेच्या काळजाला 
कसली खुण पटली?

दिवे विझुन गेले
आकाशी लामणदिवा
दुर भरारी मारे
स्वप्नदाटला थवा

बोटांच्या पेरांना सुचे
बटांचे गर्द गाणे
शिशीराला भारून देती
मोहरली दोन पाने

वाट उत्सुक वाटे
पावलांना गती सुचे
दुरच्या माळरानी
पक्षाची जोडी नाचे

भिंतींना लागे रंग 
हा कसला उत्सव दाटे?
वेशीस तुझ्या शहराच्या
मन घालते खेटे

रानात फुलांची गर्दी
मातीस भरते येते
शिशीराच्या मध्यावरती
हिरवळीची गीते

येत्या पानगळीची
कशास धरावी भिती?
ओंजळ भरून देईल
वसंत भारली माती...
(प्रताप)
"रचनापर्व"
1/1/2021
prataprachana.blogspot.com

No comments:

Post a Comment

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...