Tuesday, December 15, 2020

झुळुकीच्या स्पर्शाला...

नसताना तु शिलगे
मनात एक पणती
कशी करावी सांडल्या
प्रकाशकणाची गिणती?

अनोळखी अंधाराला
पाचोळ्याचा भार
नदीच्या अंतःकरणातुन
वाहे सलग सांजरी धार

काळ वश होत नाही
फुटे अंधाराला विलाप
त्वचेच्या रंध्राआड
तुझ्या आभासाचा मिलाफ

रस्ताभर फुलांचा बाजार
वेलीचे काळीज तुटते
निजेला झपाटे जागेपण
रातीस पहाट फुटते

आठवणीच्या हनूवटीवर
कल्पनेचा असर
उघड्या टक्क डोळ्यात
तुच तु धुसर

नक्षत्र उगवतीच्या घटकेला
द्यावी कसली आण?
सागर पडे शांत
ये माळरानास उधाण

तुझ्या आसक्तीचा प्रहर
दिव्याला हवा ओवाळे
मी तुडवत निघतो दिगंती
निसरड्या स्वप्नाचे शेवाळे

तु असताना चांद
जागचा हलत नाही
झुळुकीच्या स्पर्शाला
प्राजक्त भुलत नाही

तु आत दाटला आवेग
तु अपूर्ण राहीले काव्य
कृष्णाच्या बासरीला
पैंजण कुणाचे श्राव्य?

तु तिथे असता रिक्त
मला साद द्यावी
सादेस तुझ्या अनवाणी
माझ्या कवितेने दाद द्यावी....
(प्रताप)
"रचनापर्व"
15/12/2020
prataprachana.blogspot.com














No comments:

Post a Comment

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...