एक ढगाचे
दोन तुकडे
मनात त्यांच्या
समान दुखडे
हवा संन्यासी
वैरागमुखी चांदणे
कुणाच्या काळजावर
उमटे कुणाचे गोंदणे
चंद्र नभीचा गातो
चकोरआलापी गाणे
मोग-याच्या वेलीला
आठवणीचे पान्हे
तु दर्ददुव्याची वाणी
कवितेस माझ्या देते
चंद्र पुरवतो तुला
चकोरभयाची गीते
दुरदेशी चांदणउजेड
गाव उसासे भरतो
मोरपिसा-यावर मी
ओंजळ काहूरी धरतो
दिव्याच्या अंतःकरणी
सजतो वातीचा सण
संबंध जाळुन घेणे
साधण्या प्रकाशसाजरा क्षण
या आभासाच्या अस्तरात
कोणाचा शोध चाले?
मुकशब्दाआडून मन
गुज कुणाचे खोले?
उसास्याची विण घट्ट
गंधबहराची आरास
रातीच्या कुशीत चांद
उमलून ये भरास
मंद दिव्याच्या ठायी
हा चेतव जागर चाले
रातसजणीच्या कानी
वारा काय बोले?
सारेच काळीजक्षण
रातराणीच्या ओटी
बहराच्या पहिल्याप्रहरी
दारात फुलांची दाटी...
(प्रताप)
"रचनापर्व"
27/12/2020
prataprachana.blogspot.com

No comments:
Post a Comment