समर्पणाची दृष्टांतकथा
आदिम पिढ्यातुन वाहे
मृगजळाच्या छायेतुन
नजर कुणाची पाहे?
सांजधुलीची वलये
किरणाची लगबग वाढे
सांजेला दे संधिप्रकाश
दिर्घ आलिंगन गाढे
पानांना गहिवर दाटे
फुल सजून जाते
यशोधरेची छाया अनवाणी
अंगणी रूजून जाते
बेटांना सागराने
अपार वेढून घ्यावे
लाटांचे सांडबहर शुभ्र
ओंजळीत झाडून घ्यावे
औदुंबर उन्हात निजतो
बिजास हृदय फुटते
पाखरांच्या पंखाची
आस झेपावी फिटते
हंस लाघवी फिरतो
शोधीत मोती चारा
तथागताच्या मुद्रेचा
मंद वाहतो वारा
मी बकुळफुलांची समई
स्पर्शाने पेटवून देतो
विरहाच्या अंधाराचे
पंख मिटवून घेतो
तृष्णचातक उभा
उधाणल्या सागरा काठी
अस्पर्शी लाटांचे शुष्क
तुषार बिलगती ओठी
ही तुष्णा की तृप्ती?
सांजेस ना कळे
भरून वाहे रानी
आठवणीचे तळे...
(प्रताप)
"रचनापर्व"
23/11/2020
prataprachana.blogspot.com
No comments:
Post a Comment