मनास हितगुज करती
तुझ्या आठवांचे भावभोळे
वाहत्या नदी काठावर
मी सोडून आलो डोळे
चिंब वाटेने वाहे नदी
डोळ्यात किनारा दाटे
अर्पण केल्या फुलांचे
मी चुंबून घेतो काटे
प्रार्थनेतील आळवणी
का नभी निनादत फिरते?
रात दाटल्या कोनाड्यात
समई उगाच झुरते
अपु-या पुनवेचा चांद
नभात खुलून हसतो
चांदण्याच्या झुडुपात
पदर कुणाचा फसतो
चंद्र कशाला झाकु?
तळव्यात त्याची कांती
क्रमाने जळती दिप
वातीस बिलगते शांती
रात दाटून येता पेटती
'शकुनफुलांचे दिवे'
तुझ्या कुशीत उधळती
सोनकांती चांदणथवे
पदराला येवो तुझ्या
माझ्या आठवणीचा गंध
पेटून याव्यात दिशा
वात होता अलगद मंद
तुझ्या घराच्या खिडकीला
फुटावे आठवणीचे गाणे
वा-याच्या आभासात मोहरावी
रातराणीची पाने
मोहरल्या रातराणीला
गंधाची पडावी भुल
तुझ्या मनाच्या कळीचे
मी राखे ओंजळीत फुल...
तुझ्या बहराला लगडावेत
माझ्या मोसमांचे बहर
मी उचलून घ्यावा कुशीला
तुझ्या राधेचा आर्जवी प्रहर.....
(प्रताप)
"रचनापर्व"
28/11/2020
prataprachana.blogspot.com
(शकुनफुलांचे दिवे- आदरणीय ग्रेस सरांची अमिट कल्पना...साभार# संदर्भ #सांध्यपर्वातील वैष्णवी)
No comments:
Post a Comment