दुर धुक्याचे रस्ते आणी
सांजेचे हळुच येणे
रात धुक्यावर पसरत जाई
चांद दवाचे गाणे
धुक्यात बुडल्या आठवलेणी
कसला आभास पसरे?
शांत धुक्यावर उमटून येते
मन कुणाचे हसरे?
उडून गेले पाखरथवे
मागे शिल्लक रस्ते
डोंगरमाथी गडदराती
पुनव चकाकी दिसते
किती लिहावे आठवगाणे
धुक्यात शब्द विरती
शब्द गिताचे सांज धुसर
अर्थासाठी झुरती
दुर डोंगरी साजन वेळ
वाट कुणाची पाही?
वारा असला भलत्यावेळी
गंध कुणाचा वाही?
धुक्यात बुडल्या फांदिला
ही कसली बहर फुले?
उडून जात्या पाखराला
आकाश असते खुले
वाट निघाली अस्ताला
चंद्रउगवत्या वेळी
कोण मुसाफिर पसरून धरे
चांदण्याची अंधूक झोळी?
दुर दिशेला एक खिडकी
हवेस खुली भेटते
त्या खिडकीला चांद उगवेल
असे उगा का वाटते?
धुके मुक्याने झरून जाई
रात बहरत जाते
खिडकीच्या अंतरंगी मग
सांजदिव्याची गीते
(Pr@t@p)
"रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com
23/5/2021