हैराण संध्येवर घाले
रात गडद घाला
भेटीचे गीत चोची
निघते पक्षांची माला
ती रांग नभात उडते
झाड एकले पाहते
परतून आल्या पंखातुन
झाडाची झुळुक वाहते
अंधार व्यापतो अवनी
देवून उजेडाचे भास
मिटल्या पंखाना जाचते
नभी झेपावण्याची आस
सिगल एकला उडतो
अथांग सागरा वरती
लाटांच्या खोल आतुन
सुर ओलसर झरती
झाडात अवलीया येतो
गातो कलाम आर्त
ढोलीत घुमते काळीज
अंधार दाटतो गर्त
फुले बहरून सांडती
बहराची फुलोर गाणी
चंद्र उजाळत असता
तळ्यात स्तब्ध पाणी
मी लहरी वेचून घेई
तळे असता दंग
रातीच्या तनावर उमटे
काजळाचा उजळ रंग
झाड,पक्षी, तळे
त्यांना आस लागे
फुलझडीच्या आवाजाने
तु कशास व्हावे जागे?
रात अशीच अवकाशी
मंद धुंद चढू दे
किना-याच्या ओढीने
सिगल एकला उडू दे!
(Pr@t@p)
"रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com
13/5/2021

No comments:
Post a Comment