हवेत उडतो सुगंध
बनून सांज धुळ
मी चंद्रकोरीच्या हृदयी
शोधतो तुझे कुळ
हा पसरला माळ
ही तप्त मातीचे असणे
मी वळिवाचे थेंब घ्यावेत
तुझ्या आभासातुन उसने
हा पोपटथवा निघे
कुठल्या दुर देशी
वारा थबके क्षणभर
न ओलांडता गाववेशी
दुर निरंजन लकाके
संध्या समय साजरा
खुण दाटते नयनी
संधेत बुडाल्या नजरा
मी चांदण्याचे लामणदिवे
आभाळास भेट देतो
पारिजाताच्या फांदिवर
मग चंद्र थेट येतो
तुझ्या निरंजनाचे कवडसे
चंद्र सोन्यात सजतो
चांदण्याचा जिव मग
फुल दवात भिजतो
अंधार हळुवार वितळे
चांद ठिबकता मनी
तुझ्या चांदण्याखाली
मी प्रकाशाचा हो धनी
सांज भुरभुर वाहे
चांदण्याचा आभास
चंद्र निरखुन घेतो
मुक्त शितल नभास
कधी चंद्र बनून ये
खिडकीच्या गवाक्षी
रेखु दे तनावर तुझ्या
शितल चांदण नक्षी
मनीचा चंद्रध्यास
आभाळास भिडतो आहे
चंद्रकोरीत निमुळत्या
पुनव चांद घडतो आहे....
(Pr@t@p)
"रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com
15/5/2021

No comments:
Post a Comment