Monday, May 26, 2025

राधेस बोल लागे....



चंद्रफुलाच्या छायेमधला
एक उसासा घेऊन आलो
चांदचकोरी कथा बिलोरी
हृदयी तुझ्या मी लिहून आलो

किती कवडसे वितळून झाले
तुझ्या हातच्या तळव्यारेघा 
किती विणवतो प्राक्तनाला 
सांधून देण्या व्याकुळ भेगा

ही तिरीप काळीज हसरी
झाडाचे शिवार हलते
एकल चंद्रउजेडी आता
मनात काही सलते

कशास रहावे अबोल
जशी अमेची रात
दे ना पेरून हृदयी
चंद्रचकाकी बात 

कृष्णकुळाच्या हाका दाटता
पाय नसावा मागे
वेणूचा दोष कसला
राधेस .....बोल लागे


("やaraτa ₱)                           
www.prataprachana.blogspot.com



Saturday, May 10, 2025

प्राक्तन गाठी



एक कोरला रस्ता 
चाले सुना सुना 
गाठण्या अंतरीच्या
व्याकुळ ओल खुणा

संगतीस शब्द छाया
झेलते एकट ऊन
हवेत दाटून असते
आठवाची मूक धून

संपत नाही चालणे
हाकांच्या पाठीपाठी
सोडवण्या गहिऱ्या
प्राक्तांनाच्या गाठी



("やaraτa ₱)                           
www.prataprachana.blogspot.com

पान्हा...



भर दुपारी रित्या गावात 
भुकेजली तहानली मुले 
पान्हावल्या उराने दूर
आया वेचती फुले

झाडोऱ्यात घुमती
केकाजले टाहो व्याकुळ
लगबगीने पाय उचलून
गाठून घेते गोकुळ

दुधास उरीच्या होते
अमाप पान्हा घाई
रीती होऊन अख्खी
संपृक्त होते आई !!!

मातृदिन-2025 
("やaraτa ₱)                           
www.prataprachana.blogspot.com

Sunday, May 4, 2025

मरुस्थळातील हात



ओलांडून कितीक जातो 
तो शहरे, कसबे, गाव 
रोखून मनात असतो
वेशी आतली धाव

तुडवत मरुस्थाळांना 
तो गातो हिरवे गाणे
हारीने रचत जातो 
आठवां ची मरुद्याने

पांथस्त कोणी पिईल
ओंजळीने निळे पाणी
ओतणाऱ्या घड्याचे हात
होतील आबादाणी



("やaraτa ₱)                           
www.prataprachana.blogspot.com


चिनाब सागर


फुटका घडा कुणी हा 
हाती देऊन गेले ?
वाहत्या 'चिनाब "धारी 
स्वप्ने वाहून गेले

जाड थराच्या भिंती
सुनी हवेली खिन्न
खळखळ चिनाब पाणी
झाले मूक सुन्न

पाण्यात बुडून गेली
जीव वाहती घागर
महिवाल सोनी  हृदयी 
चिनाब झाली सागर



("やaraτa ₱)                           
www.prataprachana.blogspot.com

स्वप्नवर्दी





लपलेली चंद्र कोर 
झावळीच्या आड 
चांदणरंगी उभा
शांत एकला माड

झूळूकीच्या स्पर्शरेषा
चांदव्याची त्यावर नक्षी
आकाश निळेनिळेसे
भासे किती सुलक्षी

हळुवार घटिकेच्या
पावलांना बिलगे झोप
आठवांच्या सहाणे वरती
आभासी चंदन लेप

अर्धमिटल्या डोळ्यात या
चंद्र कोर दाटे अर्धी
पापण्यांना मोरपीसरी
स्वप्नांची मिळते वर्दी



("やaraτa ₱)                           
www.prataprachana.blogspot.com

उमाळी धिर




मोहमुठीत माझ्या 
आठवाची रेती
लाटा मनातल्या
सागर सांगताती

उधाण मुके मुके
स्थिर निळी चर्या
वरवर उगाच शांतावा
दाखवी खोल दर्या

गलबंताना देतो किनारे
स्वतः तिथेच स्थिर
धावत्या नदीस का इतका
भाव उमाळी धीर?


सीगल भावनेचे
शोधती डोलकाठी
गीत पाचू बेटाचे
शीळ तयांच्या ओठी


("やaraτa ₱)                           
www.prataprachana.blogspot.com

फांदीहाक





झाड धरून अंतरी
पाखरचोची सूर
ढोलीत काहूर दाटके
पक्षी दूर..... दूर

येईल फिरून बहर
आणीक गेली पाखरे
फांदीवर उमलून आली
एक हळवी हाक रे!



("やaraτa ₱)                           
www.prataprachana.blogspot.com

Saturday, May 3, 2025

काटेसावर होऊ!




ये ना करू आपण
आपल्याशी हळवे सुले
सावरीच्या फांदीवरली
जणू पंचकळ्याची फुले

असो अंगभर काटे
गळलेली सारी पाने
तरीही फांदीवर उन्नत
हसते फुल धीराने

तापलेल्या वैशाखाला
रंगीत छटा देऊ
जगण्याच्या धावपळी
चल काटेसावर होऊ!



("やaraτa ₱)                           
www.prataprachana.blogspot.com

वळिव....



गडगडाटी वळिव अनाहुत
विरळ बरसून गेला 
जीव मातीचा तसाच तृष्ण
पाण्या तरसून गेला

किती गर्जना त्याच्या मोठ्या
मातीची हाक विरली
दग्ध विरहाच्या तप्त झळ्यांनी
माती मूक झरली

उगाच कशाला त्याने येऊन
राघू वाटा मोडल्या?
आल्या गेल्या पावलांच्या
नक्षी त्याने खोडल्या

मी देऊ कसले दाखले
कितीदा येऊन गेलो
उमटल्या 'येत्या' खुणा कुठल्या?
निराश पाहून आलो....



("やaraτa ₱)                           
www.prataprachana.blogspot.com


राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...