स्पर्धा परीक्षेची बखर: 'मी' ते अधिकारी ...एक आठवणींचे मोरपीस
भाग 24 : उपसंहार - ○अंतिम भाग○
माझं सिलेक्शन झालं...ज्या क्षणाला मला समजलं..मी कांहीतरी झालो आहे..त्या क्षणा अगोदर मी कोणी नव्हतो...तो क्षण आला..(.मी दुनिया चक्क बदलताना पाहिली....) आणी मी खुप काही होतो...आयुष्यात यशस्वी होणं म्हणजे काय? असा क्षण कमावणं..ज्या क्षणाला आपली दुनिया बदलते....तो क्षण आला..जगण्याचे संदर्भ बदलले...ज्या रस्त्यावर माझे आईवडील रोज वावरायचे.. तेथे नमस्कार वाढले....गावगाड्यातल्या वडीलधा-यांच्या पायाला लागण्याचे
भाग्य मिळाले...म्हाता-या कोता-यांनी गोंजारले...आप्तमित्रांनी नवाजले....मनातले वादळ स्थिरावले...वडीलाच्या पायाला भिंगरी आली होती..आजुबाजुच्या खेड्यात चर्चा होती...शाबासकी मिळत होती...दबके स्वप्न खुलले होते...आनंद पसरला होता...मागच्या पिढ्यात कोणीच नव्हते ती सुरूवात करण्याचे भाग्य मला मिळाले होते...माझे स्वप्न आम्ही सारेच मिळुन जगत होतो...त्यामुळे त्याच्या पुर्तिचा आनंद सगळ्यांनाच होता..... मी शांत शांत झालो होतो....जेंव्हा पासून MPSC करायची डोक्यात आले होते त्या क्षणापासून आत आलेली अस्वस्थता मी आतील तगमग व सर्वांच्या सहकार्याने नियंत्रीत पध्दतीने धसास लावली होती...ज्या परिस्थितीत मी शिकणे हेच दिव्य होते तेथे मी अधिकारी होवू शकलो होतो...काय वेगळं केलं होतं मी...? एक स्वप्न पाहण्याचं धाडंस आणि ते वास्तवात येण्यासाठी अखंड व अपार मेहनत.... व कुठल्याही परिस्थितीत त्याच्याशी एकनिष्ठता व सातत्य....आयुष्यात या गोष्टी असतील तर नियती मदतीचे हात आपोआप पाठवते पण ती इमानदारीची ग्राहकता पण स्वतःत असायला हवी.....एका भिंतीवर लिहिलेलं.. व शाळेत जाता येतं वाचलेलं " अत्त दिप भवं" अनुभवायला मिळणे भाग्यच!!!!
नियती किती सुंदर असते...ती सतावते...किंमत कळवते..तुम्हाला संघर्षरत करते...ती सत्व तपासते...आणी तुम्ही तिच्या हर प्रंसंगात तगून राहिलात की ती तुमच्या पदरात दान टाकते...भरून देते ओंजळ...माझा मोठ्या भावाची अवस्था मी पाहत होतो...लहानपणी त्याच्या सत्कारावेळी मलाही त्याच्या सारखाच ड्रेस होता पण त्याच्या सारखे यश मला मिळाले नव्हते...मला तो लपवण्याची इच्छा दाटून आली होती...तशीच त्याची अवस्था..तो ही त्याच्या निकालाची वाट पाहत होता...अस्वस्थ होता...जरी तो मोठा भाऊ असला तरी तो माझा खुप चांगला मित्र होता..मी त्याची मानसिकता जाणत होतो...मी त्याला आधाराचं बोलायचो..अभ्यास कर होईल काही तरी नाहीतर नव्याने अभ्यास करता येईल....पण ज्याचं त्यालाच कळतं!!! सकाळपासून तो खुप अस्वस्थ होता...त्याचा मित्र आला..त्याने त्याला विचारले..10 रूपये आहेत का तुझ्याकडे? त्याने त्याला ते दिले व त्याचा मित्र रूमवरच बसून राहिला हा तडक बाहेर पडला...15 ते 20 मिनिटाने तो परत आला...आणी दारातूनच म्हणाला, "मला वाटलंच होतं! मला एवढं अस्वस्थ वाटतंय म्हणजे काही तरी होणार आहे " मी म्हटलं " काय? " तो म्हणाला " कॅफेवर गेलो होतो..निकाल लागला...मी पास झालो आहे........... प्रचंड खुशी.....प्रचंड उलथापालथ.....पुन्हा डंका!!!!!!!! अपार समाधान...एकाच महिन्यात दोन सिलेक्शन!!! आनंदाला पारावार नाही..!!!
एक काळ होता,अन्नान्न दशा, तुटपुंजी साधनं..(नव्हे वंचनाच), कुठलीही सुविधा नाही, लोक शून्यातून विश्व घडतात...पण काही जणाकडे शुन्य ही नसते...ती अवस्था भोगून..विश्व तर नाही पण सन्मानजन्य पद मिळवू शकलो..आणी वंचनेच्या आमच्या विश्वाला,अस्तित्वाला निश्चित आकार देवू शकलो...धड झोपडंही नसणा-या घरात, जेथे "वाघमारे तुमचे पोरं वाया गेले" इथपासून "अशी पोरं मिळाले भाग्यवान आहात" इथपर्यंत स्थिती आणू शकलो..हेच मोठं कर्तृत्व! आई वडिलांच्या डोळ्यात स्वतःबद्दल अभिमान पाहतो..तिच आयुष्याची सर्वात मोठी कमाई! आणी जी आयुष्य पध्दती त्यांना मिळाली होती तिच्यात बदल होवून त्यांना सामाजिक सन्मान मिळतो हेच त्यांनी घडवले याची उतराई!!!
मी आजही ते दिवस,तो संघर्ष विसरत नाही, किंबहुना तो मला विसरायचही नाही, कारण कोणी आपला खजिना असाच सोडून देईल का? माझ्या आयुष्यातील सर्वात महत्वाची संपत्ती काय? सिलेक्शन??? नाही!!! हे संघर्षाचे दिवस हीच माझी संपत्ती...हे नसते तर मी नसतो....ती वंचनेची परिस्थिती..ती नसती तर मी संघर्ष करायला शिकलो नसतो...ती वाईट परिस्थिती....जी वाईट होती म्हणूनच मी ती बदलू शकलो....ते निंदक ..ते होते म्हणून आत ज्वाला चेतत राहिली...ते मित्र ...ते होते म्हणून आयुष्याचा अर्थ कळाला...ते आईवडील ज्यांनी संस्कार दिले...स्वप्न पाहण्याचे धाडंस दिलं... आणी माझी कथा बनली...आजही माळरान मला खुणावतं...माझ्याशी बोलतं...खोल मनात ते मी जपून ठेवलंय...ते उजाड असतं...म्हणूनच ते मला फुलून येण्यासाठी...सुचवत राहतं...मी हे काहीच विसरत नाही. मित्र विचारतात तुला आजही ते सारं लख्ख आठवतं! आश्चर्य आहे...मित्रांनो जे काळजावर कोरलं आहे ते कसे विसरणार....???
ही कथा मी का लिहावी?(नायब तहसीलदार या पदावर निवडले जाणे म्हणजे फार काही मिळवले का? स्वतःचे महात्म्य मला सांगायचे आहे का?, मला आत्मगौरव,आत्मप्रौढी हवीय का?,मला लोकांनी खुप चांगलं म्हणावं असं काही वाटतं का? मला सहानुभुती पाहीजे का? मला माझ्या परिस्थितीचं भांडवल करायचं आहे का? मला कोणी आदर्श समजावं असं वाटतं का? याचं उत्तर आहे 'नाही') मला ही सांगावी वाटली कारण यातुन एखाद्याचं दबक्या भावनेनं पाहिलेलं स्वप्न एकाकी मरून न जाता त्याला जिंकेपर्यंत लढण्याचं बळ मिळावं, त्याने/तिने वंचनेच्या अवस्थेला शरण न जाता त्या वंचनेलाच आपली ताकद बनवावं, असेलच घरात चिखल तर त्यानेही फुलून यावं..माझ्या इश्वरतुल्य मित्रासारखे काही हात पुढे यावेत, झपाटलेल्या मनाला यशाचं दान मिळावं, नाहीच कोणाला जमले जग बदलने तर किमान त्यानं आपलं जग स्वतःच्या हिंमतीने उभारावं...कोणी लाजून कोमेजून न जाता उमलून फुलून यावं, मोठमोठ्या शहरात स्पर्धा परिक्षा अथवा शिक्षणाचं वातावरण आहे पण आपली ऐपत नाही म्हणुन कोणी लढणं न सोडता..स्वतःच्या आसपासच एक आश्वासक शहर उभारावं..व त्यातुन अंधारात दबलेल्या अनेक झोपड्यांना प्रकाशाचं दान द्यावं...माफक घ्यावं...भरभरून द्यावं... आईवडीलांच्या डोळ्यांतील स्व्प्नांना वास्तवात आणावं...नसतीलच स्वप्न तिथे तर त्यांच्या डोळ्यांना स्वप्न द्यावं...हर एका झुंजाराने निकराने झुंजावं...आणी वाटलंच कधी एकटं तर त्याला माझ्या कथेनं सावरावं......अशा अनंत कथांना...माझ्या कथेनं आलिंगन द्यावं.....एकमेकांना भारावं....आव्हानांना भिडत....काळाच्या काळजावर नाव आपलं कोरावं.......
(" मी कोठे आहे यावरून माझे मुल्यांकन करू नका, मी कोठून आलो ते पहा माझ्या स्थानाचं मुल्य समजेल" - इति कार्व्हर....
धन्यवाद कार्व्हर !! तु मला कायम जिवंत ठेवतोस.....सा-यांना ठेव!!!)
(पुर्ण)
●~प्रताप गोरख वाघमारे~●
"रचनापर्व"
prataprachana.blogspot.com
वाळूचे कण रगळता तेल ही गळे....
ReplyDeleteखरं आहे
Delete