Saturday, May 30, 2020

मुकुटातुन गळले मोरपीस.....


अंधार तळातुन येती
शब्द चांदणअस्तरी
कवितेच्या आत्म्याला ये
सुवास तुझा कस्तुरी

हे गडद अंधारी रस्ते
होई फिक्कट सावली
तुटत्या ता-याच्या गतीने
झुळुक का धावली?

ही कसली आवर्तने
हे कसले सुर?
वैशाखाच्या चांदण्याला
येई शब्दऊधाणी पुर

दिशाहीन भावनांना
निशीगंधी आत्मा मिळे
राधेच्या पावलात साचते
सुगंधी कृष्णनिळे तळे

ही कोरड कसली साचे?
तळे पावलाशी असताना
सुर दाटून येतो कुठला
बासरी नसताना

हे असले कसले संगीत
सारेच भारून जाते!
वावटळीचे साध्वीपण
वा-याला सारून येते

जगरहाटीची पुनव चकाकी
रानोमाळ सांडत असते
माझ्या ओल्या शब्दांशी
कविता भांडत असते

मी शब्द सांधून घेतो
भाव हरवत जातो
मुकुटातुन गळले मोरपीस
आत्म्यावर गिरवत राहतो.....
(♡pr@t@p♡)
30/05/2020
" रचनापर्व"
BLOG# prataprachana.blogspot.com

Friday, May 29, 2020

कवितेच्या राखेआड......


ही झुळुकीची ओंजळ
उफान थव्याला आले
सांजसावळ्या घटीकेचे
मन गुलाबी झाले

ही वैशाखी रिक्तता
सांज भरून येते
सांजसयीचा पदर
रात धरून येते

ओकाबोका डोंगर
अंधार धुक्यात बुडतो
झडल्या पंखाचा आत्मा
मुक मनात रडतो

चोचीत साठले दाणे
खोप्यात निपचीप निजती
डोळ्याच्या पापणीआड
स्वप्न चंदेरी सजती

झाड स्तब्ध होते
स्पर्शित नाही वारा
सुकल्या माळावर झिरपती
आठवणीच्या धारा

पैंजणांचा नाद उतरतो
माती मोहरून हसते
वैशाखाच्या चांदणबनात
सावली चमकत असते

वैशाख वणव्याने पेटे
मनी शब्दांची मशाल
कवितेच्या राखेआड निजती
आर्त भाव खुशाल......
♡Pr@t@p♡
29/5/20
"रचनापर्व"
prataprachana.blogspot.com 

Thursday, May 28, 2020

वैशाखीसांज.....

या सांजेच्या काळजाला
का वाचा फुटत नाही
वा-याच्या कवेतून अलवार
का झुळूक सुटत नाही

हे वैशाखाचे बन विखुरले
गुलमोहर अलगद झडले
एकल साळुंक्याला अनाहूत
स्वप्न सहवासी पडले

हा काळीजवारा स्तब्ध
अवकाश रंगात भिजलेला
बागडणा-या थव्यांचा
मनात देह रूजलेला

हे सावल्यांचे फसवे स्पर्श
पावलात तापली माती
वैशाखाच्या घटिका मुक
आषाढी अभंग गाती

आकाश धवल निळे आणी
पिवळ्या साजात सजलेले
ओठांच्या शुष्कतेस भेदत
ये गीत दवात भिजलेले

गायी गेल्या गोठ्यात
रान मोकळे सारे
माळरानावर उरती दोघे...
माळ आणी...प्रतिक्षारत वारे

या वैशाखीसांजेस
शब्द फुटत नाही
गुलमोहराला फुलण्याचा
मोह सुटत नाही
(प्रताप)
28/5/2020
"रचनापर्व"
फोटो#नेटवरून साभार#


राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...