Sunday, September 19, 2021

चंद्र निघाला पायी...

रस्ते दुर निघाले
गाव तुझे की मागे
अंधार विणावा काळा
घेवून चांदण धागे

हाक तमातुन उमटे
जोगी गीत गाई
चांदण्याच्या सावलीने
चंद्र निघाला पायी

शिण दाटल्या आवाजाची
उमलून येते ओवी
बहर फुलांचा फुलणारा
मातीच्या कवेत धावी

नक्षिच्या आडोशाने
नक्षत्र बघ उगवते
सरावलेल्या नयनांच
अंधारात खोल बघवते

या काळ्या अंधारात
अभंग तुझा बघ बुडतो
हा देव कोणता काळा
भक्तासाठी रडतो?

दुर दिवा निमाला
प्रकाश इकडे साचतो
मी तमात बुडल्या पानावर..
ऊजेडाची कविता रचतो

कवितेच्या अंतरंगी
काजव्याचे अक्षर ठसे
बंद कुणाच्या डोळ्याआड
थेंब अश्रुचा हसे....

दुर जाणारा रस्ता
तुझी साथसंगत
शोध तुझा हा अबोली
तमास आणतो रंगत....
(Pr@t@p)
"रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com 
(१९ सप्टेंबर २०२१)

Thursday, September 16, 2021

मोरपिसांचे ठसे....

पाऊस एकला रानी
मुक असा का पडतो?
ढगव्याकुळ मोरपिसांचा
रंग झाडावरती चढतो

साद अशी मग ओली
शिळ बनून घुमते
काळीज ढगाचे ओले
मातीत खोल रमते

या ओल्या पाऊसवेळी
मनात ढगाचे फिरणे
शित हवेच्या भुलव्याने
हरणे..अलगद झरणे...

थेंबास दे शिंपला!
होऊ दे त्यास मोती
ढग वाहून दुर नेती
झाडा खालची माती

दरीत ढग उतरता
सुर्य डोंगरी निजतो
पहाडमाथी पाऊस 
मोरपिसारी सजतो

मी धुक्याधुक्याने शोधी
तुझ्या ढगाचे ठसे
तु निघताना सांडलेले
ओली मोरपिसे

घन भारून येता पुन्हा 
मोराला हुरूप चढतो
ढग व्याकुळ होऊनी
थेंब फुलातुन झडतो.....
(Pr@t@p)
"रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com 
(१६ सप्टेंबर २०२१)

Wednesday, September 15, 2021

अनवाणी पाऊसझड...

फुल वाहिले शब्दांचे
कवितेस तुझा गंध
अनवाणी पाऊसझडीला
ये तुझा सुगंध ...

घनघोर वाहतो नभ
तुषार ढळीचा राग
बहर फुलांच्या अंतरीचा
काढून घ्यावा माग...

(Pr@t@p)
"रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com
(१५ सप्टेंबर २०२१)

Tuesday, September 14, 2021

जळणा-या मुक वाती...

साचल्या अंधारघडीत
तरंगणारे दिवे
अंधारही जळे सन्यस्त
मुक वाती सवे

धुकेरी,चंदेरी
कधी भिन्न काळा
चुकवे अंधार असा
दिव्याचा ठोकताळा

मनातला ओला अंधार
नजरेचे दिवे जळताना
मी वळत जाव्या वाती
चटके कळताना

कधी तु अंधार गर्द
कधी मी व्हावे दिवा
मागत राहू असाच
स्वर्ण प्रकाशाचा दुवा....

तुझा अंधारक्षण उजळे
माझ्या प्रकाशराती
तु अगणीत पेटवलेल्या
जळणा-या मुक वाती....
(Pr@t@p)
"रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com 
(१५ सप्टेंबर २०२१)

Saturday, September 4, 2021

पावसाची कविता....

पाऊस गेला दुरदेशी
ओल त्याची राहीली
कोण ही थेंबाची ..ओली
भावकथा वाहिली........?

अंधारबनाच्या वाटेवर
थेंबाच्या पाऊलखुणा
मातीचा हुरूपून येतो
भावबंध खोल जुना

झाडाची झडली साल
हिरवळ नेसून बसली
झरून गेल्या ढगात
आर्तता अशी का दिसली?

रित्या ढगाच्या हाका
पाऊस मौन न सोडे
थेंब घालती सृजनाचे
मातीला हिरवे कोडे

दुर अंबरी पेटती
विजेच्या लख्ख मशाली
मातीचा गंध वा-यातुन
ढगाची येते खुशाली...

कुंद हवेला मंद
मिठी एकांताची पडे
पाऊस वेचुन घेई
नभातील... चांदणखडे

हवा नाही का बोलत
ती ही तुजसम मुकी
ढगात पाऊस नसणे
पावसाची ना चुकी

तुझा असावा पाऊस
माती असता माझी
मोसम तुझा असावा
ढगास माझ्या राजी

किती लिहावा पाऊस?
घनघोर शब्दांचे ढग
डोळ्यात तुझ्या अवतरे
पावसाची कविता बघ....
(Pr@t@p)
"रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com 
(४ सप्टेंबर २०२१)

Thursday, September 2, 2021

नदी अनवाणी....

सुर्यबुडीच्या कुळातुन
संध्यादोय हो मुक्त
अंधाराच्या काळजावर
चांदण्याचे रेखत सुक्त

फुल बाधता बहर
खच फुलांचा पडणारा
शोधावा तो हात सुबक
ताटवा खुडणारा.....

तमाच्या वृक्षास
चांद फुलाचे ताटवे
दुर जात्या वाटेला
पैंजण कुणाचे आठवे?

पाण्यावर सांडे उजेड
संथ जाहल्या गाई
नदी निघाली सागरा
रानावनातुन पायी

बकुळ फुलांच्या राशी
सुगंध मनी का आठवे?
यशोधरेच्या सांत्वनाला
सिध्दार्थ अबोला पाठवे...

दिर्घ चालला तांडा
तुडवत निर्जन वाटा
नदीच्या अलिंगनाला
सागर वाहतो लाटा

चंद्ररंगाचे पाणी 
नदीस अनावर ओढ
हे नदीच्या आत्म्या...!!
तु पात्राच्या सिमा तोड....
(Pr@t@p)
"रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com 
(2 सप्टेंबर 2021)

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...