Saturday, September 4, 2021

पावसाची कविता....

पाऊस गेला दुरदेशी
ओल त्याची राहीली
कोण ही थेंबाची ..ओली
भावकथा वाहिली........?

अंधारबनाच्या वाटेवर
थेंबाच्या पाऊलखुणा
मातीचा हुरूपून येतो
भावबंध खोल जुना

झाडाची झडली साल
हिरवळ नेसून बसली
झरून गेल्या ढगात
आर्तता अशी का दिसली?

रित्या ढगाच्या हाका
पाऊस मौन न सोडे
थेंब घालती सृजनाचे
मातीला हिरवे कोडे

दुर अंबरी पेटती
विजेच्या लख्ख मशाली
मातीचा गंध वा-यातुन
ढगाची येते खुशाली...

कुंद हवेला मंद
मिठी एकांताची पडे
पाऊस वेचुन घेई
नभातील... चांदणखडे

हवा नाही का बोलत
ती ही तुजसम मुकी
ढगात पाऊस नसणे
पावसाची ना चुकी

तुझा असावा पाऊस
माती असता माझी
मोसम तुझा असावा
ढगास माझ्या राजी

किती लिहावा पाऊस?
घनघोर शब्दांचे ढग
डोळ्यात तुझ्या अवतरे
पावसाची कविता बघ....
(Pr@t@p)
"रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com 
(४ सप्टेंबर २०२१)

No comments:

Post a Comment

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...