पाऊस एकला रानी
मुक असा का पडतो?
ढगव्याकुळ मोरपिसांचा
रंग झाडावरती चढतो
साद अशी मग ओली
शिळ बनून घुमते
काळीज ढगाचे ओले
मातीत खोल रमते
या ओल्या पाऊसवेळी
मनात ढगाचे फिरणे
शित हवेच्या भुलव्याने
हरणे..अलगद झरणे...
थेंबास दे शिंपला!
होऊ दे त्यास मोती
ढग वाहून दुर नेती
झाडा खालची माती
दरीत ढग उतरता
सुर्य डोंगरी निजतो
पहाडमाथी पाऊस
मोरपिसारी सजतो
मी धुक्याधुक्याने शोधी
तुझ्या ढगाचे ठसे
तु निघताना सांडलेले
ओली मोरपिसे
घन भारून येता पुन्हा
मोराला हुरूप चढतो
ढग व्याकुळ होऊनी
थेंब फुलातुन झडतो.....
(Pr@t@p)
"रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com
(१६ सप्टेंबर २०२१)

No comments:
Post a Comment