Sunday, October 17, 2021

फुलसुगंध...

मनी दाटते सय
मज वाटे विरह भय
माळावरच्या धुळीत
माळाचा हो विलय!

दिस मंदावे मुक
रातीत सांज बुडे
चांदण्याच्या छायेतुन
चंद्र निघाला पुढे

हात तुझे उजळले
माळाची स्पर्शून माती
किरणातुन झरणारा जेंव्हा 
चंद्र दिला मी हाती

हवा गोठली वृक्षातुन
वा-यावर गंध पसरे
फुल कोणते फुलले?
फांदीवर सोनेरी हसरे

मनात कल्लोळ गाथा
ये सय लोचनी
नयनांनी अलगद करावी
बहराची आसूस वेचणी

चंद्र तुझ्या स्मरणाचा
पुनव बनून जातो
जिव असा रातीचा
मुक शिणून जातो

तुझा इशारा होता
फुल अलगद गळते
गुज असे का उगाच
परक्याला आपसुक कळते?

माळाची उडती धुळ
माळावर किरण पडलेले
मी उचलून घेई फुल
धुळीवर मन जडलेले...

फुलास लगडलेला
मातीचा किरण गंध
चंद्र पेरतो अवकाशी
तुझा फुलसुगंध.....!!
(Pr@t@p)
"रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com 
(१७ ऑक्टोबर २०२१)

No comments:

Post a Comment

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...