घडवावे ऐसे शब्द
जणू जिव वेचावा
निःशब्द कवितेमधूनी
भाव तिथे पोहचावा
होवून जावे चंद्र
भारून द्यावा दिगंत
नजरेच्या पोर्णिमेला
अवसेची कसली खंत?
एक गीत पेरावे
हाका-याचे घेवून सुर
झाड जणू बहरावे
माळरानी खुप दुर
नदीस यावी भरती
सागरास यावे भरते
व्हावे ओथंब अश्रू
तु ढाळण्या पुरते
दिन असा उगवावा
जणू सांडला बहर
व्याकुळ व्हावे सारे
तुझे अवघे शहर..
हाक घुमावी रानी
थवे परतूनी यावे
मुठीतल्या अंधाराला
चांदण्याने उचलून घ्यावे
रात निघे अनवाणी
चंद्र नभी दिसताना
तु दिगंत बिलगून घ्यावा
मी समीप नसताना...
(Pr@t@p)
"रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com
(२० ऑक्टोबर २०२१)
No comments:
Post a Comment