Sunday, October 10, 2021

व्याकुळ एक अभंग....

झाडांनी चंद्र नेसला
चांदण गंधफुले
बंद जाहल्या नयनी
सांजघडी ही खुले

ढग गोठल्यावेळी
धुक्यास दाट पिसे
ओंजळीत कुणाच्या
चंद्र, सांजबावरा दिसे?

गाव अंधारी बुडला
फुलवातीचे दिवे
गाई पेरत गेल्या
आर्त कापरी दुवे..

दुर निमाल्या हाका
अंधार कंच निथळे
नंदादिपाची सावली
गाभारा मुक वितळे

हिरवटीचा मोसम
धुक्यात हरवून जाई
कोण निघाला गावा?
वाट विराणी गाई

दिवे पेटले सजनी
पानातुन थंडी झरते
वातीच्या काळजातुन
ओंजळही ...थरथरते....

मंद वाहतो चंद्र
रातीत दडले रंग
कवितेला फुटतो मग
व्याकुळ एक अभंग...
(Pr@t@p)
"रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com
(१० ऑक्टोबर २०२१)


No comments:

Post a Comment

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...