Wednesday, November 29, 2023

आस दरवळ


झाडाच्या सावलीला
फुल कधी का लागे?
ती चालत निघून जाते
मंद प्रकाशा मागे

झाड दुःखी विरते
अंधारदिव्याच्या तळी
तेवत नयनी स्वप्न 
बहराचे मृगजळी

तु का उजवते फांदी
अशा दाटल्या राती?
फुल उसासून चुंबते
दवात भिजली माती

दुःख तयाचे नित्य
मातीवर व्याकुळ पडते
अशा फुलसड्यावर 
प्रित तुझी मग जडते

अशा फुलझडीची 
तुझ्या देव्हारी रास
नित्य रामप्रहरी तेथे
दरवळते माझी आस.....
                                  ("やraτa ₱)                           
www.prataprachana.blogspot.com
           २९. ११.२०२३ 

 






Tuesday, November 28, 2023

धुकेरी एकांत...


धुक्यात चंद्र वाहे
नयनात ढग थिजतो
ओल्या पाऊस वेळी
एकांत अवघा भिजतो

चंद्र उभा व्याकुळी
जणू मिरेची विणा
शामलकांती नभी
शोधत गिरधर खुणा

दुर दरीतळाला
वाट तमात बुडते
स्वप्नांची काळीजमाया
तुझ्या आभासी जडते

कसे कुशीस घेवू
हे भुरभुरणारे धुके ?
आक्रोशती हाक माझी
मौनात स्तब्धे मुके

एकांताचे भोग तू
दिले शब्दांच्या भाळी
कशा विराण्या गाऊ
अशा धुकेरी वेळी?

मुक धुक्याच्या संगे
चांद नभी एकला
असला कसला आकांत
तु झोळीत त्याच्या टाकला.....?

                ("やraτa )                          
www.prataprachana.blogspot.com
                    २८. ११.२०२३



 












Sunday, November 26, 2023

हुरहूर थवा


अज्ञात गाठण्या निघती 
हे कावर बावर थवे
नयनात तयांच्या चांदणे
हृदयात काहूरी दिवे

तु तुझ्या दिशेची सावर
झाडांची निजली छाया
पानावर उजळून येईल 
चंद्रव्याकूळी माया 

मी कुशी तुझी का शोधू
थव्यास उसंत देण्या
की बहरून उगवून येवू
सडा फुलांचा होण्या?

अवरुध्द घटिका स्तब्ध 
कंठ तुझा का दाटे?
अव्यक्त प्रारब्ध आपले
व्याकुळते स्वप्नावाटे

चांद नभाला शिवतो
निशीगंध तयात भिनतो
अवकाशाच्या मलमलीची
मी नित्य कविता विणतो

या तलम गोजी-या हाका
दुर दिशात विरती
ही किती युगाची भिरभिर 
थवे व्याकुळी फिरती......

मिळू दे उसंत थव्याला
घे ना हाक उराशी!
शांत मंद होईल 
हुरहूर मग जराशी!

                         ("やraτa ₱)                           
www.prataprachana.blogspot.com
 २६. ११.२०२३ 

























Friday, November 17, 2023

धिर व्हावा



घनश्यामा ये तु तत्पर !
राधा झुरते आहे
कळ तुझ्या बासरीची
अंतरात स्फुरते आहे

भेट अशी ती व्हावी
अनंत कवेस यावा
उगवल्या चंद्रास नभी 
फुटो चांदणधावा

एकात्म सारे व्हावे
विलग उरो ना काही
विरुन एक व्हाव्या
बहूमुखी दिशा दाही 

स्वत्व तुझे व्हावे
एक सुर व्हावा
तो पावेतो तगण्याचा
मला धिर व्हावा!

                            ("やraτa প")                           
www.prataprachana.blogspot.com
१८. ११.२०२३ 

 

 







साजन खुणा




ढग चालले चालले
न्ह्याळत साजन खुणा
आणी स्पर्शिती डोंगर
आठवणींचा जुना 

दिसतो एक पारवा
शोधत अजाण खोपा
युगायुगाच्या अंतराने
त्याच्या काळीजखेपा

दुर सजनी एकली
क्लांत आठववेळी
बट एक स्थिरावे
तिच्या उन्नत भाळी

हात उगाच काहूरे
चेह-याचा अधिर भास
या सांजेस गुलाबी छटा
भवती तुझा सुवास....

                          ("やraτa প")                           
www.prataprachana.blogspot.com
 १५. ११.२०२३ 













Thursday, November 9, 2023

दरवेशी





या साजनवाटा भिनती
जणू धुक्याला रंग
मी सांजनयनी पाहे
तमाचे काजळी अंग

तु सांडुन जाते सारे 
माझ्या ओंजळी तारे
मी रातगतीचे चांदणे
रेखतो तगमगणारे

तू देत नाहीस हात
माझ्या रित्या हाती
मलूल एकट विझती
हृदयाच्या हळव्या वाती

दे ना चेत मनाला
अंधार जाचला असता
मी व्यापून असे काय घेवू?
तुच तु साचला असता

दे अखंड असे चैत
या हेमंती क्षणांना
तु दे अंतराळ अनंत
एकेका प्रेम कणांना

व्यापू दे अंतर्बाह्य 
ये असे एकदा कवेशी !
शब्दांचे नगर वसवेल
हा विरहांकित दरवेशी...
                           ("やraτa প")                           
www.prataprachana.blogspot.com
   ९. ११.२०२३ 






 






 


Wednesday, November 8, 2023

प्रेमझरे



दुवे कुणाचे वसले
आत्म्याच्या भावतळी
हुरहुरते भिरभिरते
माळावरती एक कळी

झुरझुर वाहते एकले
हेमंताचे व्याकुळ वारे
सोनफुलाचे काळीज
अव्यक्त हुरहुरणारे

फकीर कुठली गीते
झोळीत सावडून घेतो
एकांत जुलमी सखा
स्मिताने आवडून घेतो

गातो तीव्र निःशब्द 
तो शब्द आरास रचतो
कुण्या दुरदेसीच्या सजनीला
तो अनाहूत सुचतो

तो असतो आभास धुसर
तो नसतो वास्तव खरे
तरीही त्याच्या चाहुलीने 
तुझ्या अनंतास प्रेमझरे.... 

                           ("やraτa প")                           
www.prataprachana.blogspot.com
  ८. ११.२०२३ 







राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...