Sunday, August 26, 2018

स्पर्धा परीक्षेची बखर: 'मी' ते अधिकारी ...एक आठवणींचे मोरपीस भाग 6: शाळा बदल...आयुष्य बदल....

स्पर्धा परीक्षेची बखर: 'मी' ते अधिकारी ...एक आठवणींचे मोरपीस

भाग 6: शाळा बदल...आयुष्य बदल....

आठवीचा निकाल लागला!!! अपेक्षेप्रमाणे पुर्ण वर्षातील घडामोडी त्यात प्रतिबिंबित झाल्या. एकोणसत्तर टक्के मिळाले. आम्ही मामाच्या गावातच स्थायिक झालेले असल्याने मामा घराच्या बाजुसच राहत होते. (अत्यंत प्रेमळ स्वभावाचा हा माझा आवडता व्यक्ती. स्वतः खाजगी ड्रायव्हर, अत्यंत अल्प पगारावर काम करत असताना स्वतःचे घर सांभाळून अडीनडीला मदत करणारा! आणी आम्हा तिघा भाच्याबद्दल अपार आत्मविश्वास असणारा! पण माझे सिलेक्शन न पाहू शकलेला.........त्याचा अकाली मृत्यु म्हणजे काळाने ओढलेला एक अत्यंत क्रूर ओरखडा ..) मामा माझा निकाल पहायला सोबत आला ...अत्यंत निराश झाला. आणी घरी येवून त्यानी वडीला सोबत चर्चा केली..परिणीती ...माझी शाळा बदलली....

मला नववीला लातुरच्या नामांकित शाळेत प्रवेश मिळाला. केशवराज विद्यालय..एक अत्यंत शिस्तबद्ध व दर्जेदार शाळा.. मुलींच्या अ ब क तुकड्या, त्यांचा वेगळा मजला, जायला वेगळं गेट, मुलांच्या वेगळया ड इ फ तुकड्या..मी 'फ ' तुकडीत .. . !!! ही शाळा पण सकाळी साडेसात वाजता. मला गावाकडून सकाळी सहा वाजता निघावं लागायचं. शिवाजी चौकात उतरून जावं लागायचं..पण ते वसतिगृहापेक्षा कमी अंतर होतं.आणी या शाळेत इंटरव्हलची समस्या नव्हती. कारण सोबत टिफीन असायचा. तो खाण्यासाठी मला आसाराम नावाच्या मित्राची कंपनी मिळायची.त्याचे वडील सूतगिरणी कामगार होते. शाळेत दररोज जात होतो.दुपारी शाळा सुटली की एसटी ने गावाकडे यायचो. गावाकडून शिक्षणासाठी शहरात जाणा-या विद्यार्थ्यांचे भावविश्वच वेगळे असते. त्याला सकाळी शहर ,त्यातील व्यवहार पहायला मिळतात.तेथे त्याला त्याचे जगणे अॅडजेस्ट करावे लागते. छान छान सायकली, गाड्यावर येणारे वर्गमित्र...त्यांची जीवनशैली पहायला मिळते. आणी शाळा संपल्यास गावाकडे परत आल्यावर गावातले आयुष्य...गावातले मित्र , गावातील परिस्थिती ...या दोन्ही टोकाकडे त्याची ओढाताण होते..वैचारिकता चांगली असेल तर ठिक..नाहीतर गावातले मुलं शहरी मित्राच्या जिवनशैलीकडे आकर्षीत होवून जातात. व त्यांना मध्यवर्ती मानून आपला दिवस ठरवतात. त्यांच्या सोबत राहणे..त्यांच्या भांडणात सहभाग नोंदवणे अशा बाबी करतात..पण लातूर हे शैक्षणिक शहर या बाबतीत अत्यंत समृध्द...शहरी मुलं आणी गावाकडील मुलं या दोन्ही टोकांना अत्यंत संयत पध्दतीने सामावून व सांभाळून घेणारं हे शहर...गुणवत्तेला न्याय देणारं हे शहर...इथल्या शैक्षणिक संस्थांनी गाव आणी शहर यात अत्यंत आदर्शवत असा समतोल साधला आहे..आणी इथल्या शहरी भागातील मुलांचे वर्तुळ ग्रामीण भागातील मुलाशिवाय पुर्ण होत नाही... केशवराज शाळा ही अशीच या शाळेने माझ्या आयुष्याला सर्वात सुंदर अशी कलाटणी दिली...


दररोज शाळेत जात होतो. बसने दररोज येणेजाणे सुरू होते. शहरातले मित्र , वेगवेगळ्या गावचे मित्र ..आयुष्य व्यापक बनत चालले होते. शाळा शिस्तबद्ध , शाळेत कधीकधी भांडणे व्हायची,मुलं शाळेपासुन थोडं दुर जावून हाणामारी करायचे, मी अशा गोष्टी पासुन दुर होतो..पण येते आफत कधी कधी...शाळेत एक मुलांचा ग्रुप होता तो गावाकडून येणा-या, किंवा शांत असणा-या मुलांना टारगेट करून त्यांची टर ऊडवायचा, त्यांच्याशी भांडण करायचा..( आत्ता सगळेच ग्रुप मेमबर्स परस्परांशी जुळलेले आहोत, मेडिकल, इंजिनियरींग, बाॅलिवूड, पत्रकारिता, क्रिडा, राजकारण, प्रशासन, खाजगी व्यवसाय अशा विविध क्षेत्रात अनेकांनी नाव कमावले आहे, त्यातले कितीजण तरी विदेशात स्थायिक आहेत) एके दिवशी कसा कोण जाणे माझा नंबर लागला!! आणी मला ' तु इंटरव्हल मधे भेट तुला दाखवतो' अशी धमकी मिळाली. मी अगोदर तर घाबरलो ..तासात मन लागत नव्हते..कारण मला दररोज एक किलोमिटर त्याच रोडने बस पकडण्यासाठी जावं लागायचं..मी अस्वस्थ झालो होतो. काय होइल म्हणून धास्ती वाटत होती..विशेष म्हणजे मी काय चुक केली होती हेच मला समजत नव्हते...शेवटी ठरवले जे व्हायचे ते होवो पाहून घेता येईल..मला भांडण करायचं नव्हतं..पण झालंच तर तोंड तर द्यावच लागणार होतं....इंटरव्हल झाला!!! बेल वाजली..मी वर्गाबाहेर आलो..ग्रुप वाटच पाहत होता!! शाळेत कडक शिस्त असल्याने व सरांना समजल्यास भरपूर मार मिळून वरून पालकांना कळवले जाई त्यामुळे परिसरात भांडण करता येत नाही म्हणून मुलं दुस-या गल्लीत जावून भांडण करायचे..मला सर्वांनी घेरून ढकलायला सुरूवात केली मी पण प्रतिकार करत होतो..आणी तेवढ्यात विनय, बलभिम हे माझे दोन वर्गमित्र त्यांच्या पुर्ण मित्रासह तेथे आले ते मधे पडले..त्या ग्रुप मधिल जे मुख्य मुलं होते त्यांनी भरपूर मार खाल्ला. माझ्या मित्रांनी त्यांना चांगलीच अद्दल घडवली..मला विनय आणी बलभिम यांनी सांगितलं घाबरायचं नाही वेळ आल्यास आपण पाहून घेवू...त्यांचा आणी माझा जास्त संपर्क नव्हता पण वर्गात मी शांत राहून शिकण्यासाठी धडपड करत होतो, गावाकडून येतो म्हणून त्यांना माहीत होतं. त्यांना वाटायचं मी हुशार आहे...ते तर जिवाभावाचे मित्र झालेच पण त्या प्रसंगानंतर मला लातूर मधिल माझे शिक्षण पुर्ण होईपर्यंत जिवाभावाचे खुप मित्र भेटले..सगळे असेच अन्यायाला प्रतिकार करायला सदैव तयार असणारे, स्वतःच्या घरगुती मर्यादा असुनही मित्रासाठी काहीही करायला तयार असणारे..वेळप्रसंगी चुकत असल्यास शिवीगाळ करून जाणीव करून देणारे...स्वतः फाटके असुनही सतत मदत करण्यास तत्पर असणारे...हे आयुष्य घडायला अशा अनंत मित्रांनी मदत केली आहे...वेळप्रसंगी ते नसते तर माझी कथा काही वेगळीच असती...त्या प्रसंगाने मला बळ दिले..आपण लातूर मधे , शहरामधे आता टिकू शकतो हा आत्मविश्वास दिला.... मी अधिक आत्मविश्वासाने शाळेत जाऊ लागलो...पण घरी खर्च वाढत चालला होता..परिस्थिती बिकट होत चालली होती...पुर्वी परिस्थिती लपवत होतो वाईट वाटायचं पण आता तशा परिस्थितीत राहणारे इतर मुलं भेटत होती...दबक्या आवाजात का होईना पण मन मोकळं होत होतं..चांगलं शिकायला पाहिजे आपण! हा सामुहिक निर्धार होत चालला होता.....


शाळेत प्रत्यक विद्यार्थ्यांला प्रिय असणारे, अत्यंत तळमळीने आयुष्य व ईंग्रजी शिकवणारे आप्पाराव सर, भुगोल शिकवताना त्या भागाचा इतिहास सांगणारे होनराव सर, अत्यंत लाघवी पध्दतीने हिंदी शिकवणारे कांबळे सर, इतिहासाचे चव्हाण सर, मराठीच्या वैद्य मॅडम, अत्यंत कडक शिस्तीचे कंगळे सर अशा विविध गुरुजनांच्या मार्गदर्शनात शिकत होतो. घरी घरकामात मदत करणे, गावातील वाचनालयाचे पुस्तके वाचणे हे तर सुरूच होते..पण आर्थिक बाजू कोसळत चालली होती...तग धरणं अवघड होत चाललं होतं ..वडील , मामा एकेकाळी पुण्याला शिर्के कंपनीत कामाला होते, कंपनी कडून दुबई ला पण गेलेले होते..पण इराण इराक च्या युद्धात परत यावं लागलं..ना बचत ना काम याला कंटाळून त्यांनी माझ्या आईचं गाव रोडवर आहे, भविष्यात मुलांचे शिक्षण, रोजगार या साठी चांगलं राहील हा दृष्टीकोन ठेवून त्यांनी सर्व कुटुंब पुर्वी पासुनच येथेच ठेवलं होतं.. पण त्यांचं अर्थात आमचं मुळ गाव आलमला असल्याने ते तिकडं काही करता येईल का, तालुक्याला जावून काही करता येईल का या प्रयत्नात राहत असल्याने फिरस्तीवर असायचे...मी , आई, लहान भाऊ कुढत रहायचो आणी लढत रहायचो..दरम्यानच्या काळात वडिलांनी कसं तरी जमवून छपराचं घर मातीचं केलं होतं..तेही एक खोलीचं!!

शाळेत निबंध स्पर्धा व्हायच्या, स्नेह संमेलन, संस्कार शिबिरे व्हायची, मी एकदाच निबंध स्पर्धेत भाग घेतला,मला खुप वाटायचं माझ्या निबंधाचा क्रमांक येईल म्हणून...पण तो काही आला नाही. मी नाद सोडला. शाळेत जरी खुप काही होत असलं तरी मी सायंकाळी पाच नंतर थांबू शकत नव्हतो कारण मला गावाकडे जावं लागायचं..अपवाद शाळेने भुकंपग्रस्तांच्या मदतीसाठी आयोजीत केलेले"जाणता राजा" हे नाटक. त्यामुळे मी एक सामान्य विद्यार्थी या संवर्गात येत होतो. इतर मुलं वादविवाद, वक्तृत्व, नाटक, विविध खेळ यात सहभागी व्हायचे..मला इच्छा असून ते करता यायचं नाही...वह्या, पुस्तके,एसटी चा मासिक पास या मुळे खर्च वाढत चालल्याने वैताग येत होता...फक्त एकच गोष्ट घरी पक्की होती काहीही होवो शिक्षण सोडायचे नाही!!!


शाळेतल्या या वर्षाने मला खुप चांगले मित्र दिले, धाडस दिले, दुःखाची वैश्विकता समजवून दिली, समदुःखी मित्रांसोबत चर्चा होत असल्याने परिस्थितीला तोंड देण्यासाठी बळ मिळाले. आईच्या नोकरी मुळे औरंगाबाद वरून रहायला लातुरला आलेला वैभव नावाचा मित्र मिळाला. ज्याने कधीच मला परिस्थिती जाचणार नाही अशा पध्दतीने त्याचा कौटुंबिक सदस्य म्हणून मला वागवले.सचिन ,अभय, प्रताप, विनोद, गज्या,महेंद्र, रविकिरण अशा अनेक मित्रांनी मला वेळोवेळी मदत केली, भावनीक, मानसिक आधार दिला.

द्वितीय सत्राची परिक्षा जवळ आली होती, सगळे ड ई फ चे मुलं प्रचंड अभ्यास करत होते..मीही प्रयत्न करत होतो..ना गाईड ना ट्युशन! जे वर्गात शिकले ते घरी वाचायचे, लाईट चे वांदे , परिक्षा दिली...पुन्हा उन्हाळा, पुन्हा माळरान, वाचन, घरकामात आईला मदत.....दहावीचं वर्ष येणार होतं....शैक्षणिक आयुष्याला वळण देणारं...
आणी आयुष्याला पण.........!!! जसं आठवीचं वर्ष घडामोडीचं गेलं त्या पेक्षा जास्त घडामोडी घेवून येणारं वर्ष माझी वाट पाहत होतं आणी मी अनभिज्ञ राहून त्याला सादर होत होतो....अजून माझा झुंजण्याकडे प्रवास सुरू झाला नव्हता...पण नियतीनं रस्ता आखायला सुरूवात केला होता... (क्रमशः)
(प्रताप )

Saturday, August 25, 2018

स्पर्धा परीक्षेची बखर: 'मी' ते अधिकारी ...एक आठवणींचे मोरपीस भाग 5: .....भूकंपाच्या लहरी....

स्पर्धा परीक्षेची बखर: 'मी' ते अधिकारी ...एक आठवणींचे मोरपीस

भाग 5: .....भूकंपाच्या लहरी....



      भुकंपाने जमिन आणी माणसे दोघेही हादरली होती... सर्वसाधारण माणसाला सर्वाधिक सुरक्षित वाटणारे घरच अंगावर कोसळून झोपेतली माणसे माती दगडा आड गेली होती....सारा परिसरच दहशतीखाली होता....हाहाकार माजला होता...माणसं आणी घरं दोन्ही कोसळले होते........!!
गाड्या, शाळा,बंद होत्या...कसेतरी धावत पळत वडील दुस-या दिवशी वसतीगृहावर आले.....हळहळ व भिती व्यक्त करत त्यांनी वाॅर्डनची परवानगी घेतली आणि मला गावाकडे घेवून जायला निघाले...सगळे शहर किल्लारीकडे धाव घेत होते....गावाकडे जायला गाडी नाही..कोणी थांबायला तयार नाही...आम्ही गाडी भेटेल म्हणत चालत गावाकडे निघालो...ते पुढे मी मागे......दोन गाव आम्ही चालत ओलांडले...कसेबसे गावात पोहोचलो...सगळा गाव दहशतीत होता..अधुन मधुन हादरे बसतच होते..दुरवर मोठ्ठा आवाज व्हायचा आणी ...मग कुठल्या तरी एका दिशेने जमीन हादरत यायची आणी आम्हाला हादरऊन लहर पुढे निघून जायची...अशा क्षणभर आलेल्या त्या लहरींची कंपने मात्र आमच्या कित्यक पिढ्यात जाणवतात आजही.........!!

     मी घरी रहायला लागलो......पर्याय नव्हता....भूकंपाचा हादरा बसला की सगळे लोक घराबाहेर धावत यायचे...आम्हीही...पण लहर निघून गेल्यास भान यायचे..अरे आपण तर ऊगीचच धावत होतो...जीर्ण झालेलं झोपडं कोसळण्यानं आपण थोडंच मरू.. !! मोठ्या स्वरूपात मदत कार्य सुरू होतं..लोक जमेल तसं मदत करत होते..गावात विशीष्ठ वेळी एखादी गाडी यायची..सारा गाव भाकरी,भाजी आणी जे जे जमेल तो द्यायचा..गाडी जायची ..कोसळलेल्या लोकांना यथाशक्ती मदत करण्यासाठी तळमळणा-या या फाटक्या लोकाकडून मला त्या काळात परोपकार,संवेदना, माणुसकी शिकायला मिळाली...

       शाळा बंद होती पण ही माणुसकीची शाळा मला शिकवत होती...मन दुःखी व्हायचं..किल्लारीला जावून मदत करून आलेले लोक तेथील हाल सांगायचे...सगळ्या क्षेत्रातुन मदतीचा ओघ सुरू होता...हळुहळु लोक सावरायला लागले..जिवन आपला मार्ग शोधतेच...लोक आपले दैनंदिन व्यवहार करायला लागले...पण त्यात एक कंपन आले होते.....मला ही शाळेत परत यावं लागलं...वसतिगृहात आल्यावर आम्ही सगळे मित्र भेटलो..कोणाचे काही नुकसान झाले का? कोणाच्या घरी काही जिवीतहानी झाली का? विचारून घेतलं..सुदैवाने तसे काही झाले नव्हते...पण भूकंपाची एवढी दहशत होती की आम्ही रोज रात्री वसतिगृहाच्या इमारती बाहेर झोपायचो... रोडवर..

         अशा परिस्थितीत दोन मुलं मात्र इमारतीतच थांबायचे..अभ्यास करत..पांडुरंग राऊत आणी बालाजी हंबीरे..अभ्यासाने पेटून उठलेले हे दोघे..वाटायचे सगळ्या जगाचा अभ्यास हे दोघंच करताहेत...जणू अभ्यासासाठी यांना कशाचीच पर्वा नाही..मला वाटायचं यांना भिती कशी वाटत नसेल??? पण आता जाणवतं..आलेला भुकंप निघून जातो..पण यांच्या आयुष्यात जे हादरे बसले असतील ते बहुधा भुकंपापेक्षा जास्त तीव्रतेचे असतील....अशाच स्वरूपात अभ्यास करणारा अविनाश कुंभार, शिवाजी ही दोघं...त्यांनी पुढे काय केलं याची माहिती मात्र मिळाली नाही....
मी हाॅस्टेलवर येताना घरीच ठरलं होतं... एवढं वर्ष कसंतरी काढून ये त्यानंतर गावाकडे राहूनच शाळेत जायचं...भूकंपाने सगळं गणीतच बिघडवलं होतं...मी कसेबसे दिवस काढत होतो..अर्धपोटी राहूनही अभ्यास करायचा असतो ही जाणीव व्हायचं वय अजून झालेलं नव्हतं...ती जाणीव पण ठायी निर्माण झालेली नव्हती...माझी वेळ यायची होती....पण त्या येणा-या वेळेला बहुधा जाणवत होतं....की तीला तोंड देण्यासाठी मी तयार होत होतो...

       मधेच एकदा बांधकाम भवन वरून चालत येताना एका गॅरेजवर मला माझ्या गावातील घरा शेजारीच राहणारा संजय काम करताना दिसला...त्याला भेटलो ..त्याने सांगितले की त्याने शाळा सोडली आता तो गॅरेजवर काम करून मेकॅनिक बनणार आहे....माझ्याकडे या विषयावर बोलायला काही नव्हते..मी त्याला इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या आणी वसतिगृहात परत आलो..येताना एकच विषय डोक्यात घोळत होता...मला ही माझ्या घरचे असेच कोठे कामासाठी पाठवू शकत होते..पण एवढ्या हालअपेष्टा सहन करून ते शिकायला संधी देत आहेत...नाहीतर खेड्यात एक साधा नियम आहे..खाणारी तोंडं वाढली की त्या प्रमाणात काम करणारे हात वाढायला पाहीजेत ...जबाबदारीची जाणीव व्हायला लागली...अधुन मधुन गावाकडून आई संजय जवळ डबा पाठवायची ..कधिकधी तो डबा मी वसतिगृहात घेवून यायचो.. कधी जास्त भुक लागली असेल तर तिथेच त्याच्या सोबत गॅरेजवर बसून गप्पा करत जेवण करायचो..

       खुप प्रयत्न करून पाहिले...वसतिगृहाच्या दैनंदिनीत काही फरक पडतो का..पण नाही...उलट दिवसेंदिवस अवघड होत चाललं होतं....शाळेचा अभ्यासक्रम संपत आला होता...कसा तरी अभ्यास करून मी आठवीची परीक्षा दिली....माहिती होतं पुन्हा वसतिगृहात पुन्हा परत यायचे नाही...सगळ्या मित्रांना भेटलो..काही सिनियर म्हणाले येवून जा पुढच्या वर्षी पण...पण या भूकंपामुळे जवळपास माझ्या सोबत आलेले सगळेच मुलं पुन्हा परत येणार नव्हते..मी त्या वसतिगृहाच्या इमारतीत सगळ्यांना भेटून घेतलं आणि शाळेतल्या वर्गमित्रांना भेटून घेतलं.. सुट्ट्या लागल्याने निकालाची भिती घेवून गावाकडे परत आलो....

         साधारणतः पाचवी पासुनच..घरी कामात मदत करायची सवय होती( अपरीहार्यता पण)...आईने घराला मदत व्हावी म्हणून कपडे शिवण्यासाठी टेलरींगचे काम सुरू केलेले होते. आम्ही तिन्ही भाऊ तिला मदत करायचो. सणासुदीला थोडे जास्त कपडे यायचे. त्यावेळी आम्ही दिवस दिवसभर बसून तीच्या कामात हातभार लावायचो.. या आठविच्या सुट्टयात पण भरपूर वाचन आणि घरी कामात मदत करत होतो..डोक्यात सतत एक विषय घोळत रहायचा कधी आपल्याला या सगळ्या वंचने पासून मुक्तता मिळेल...कठोर वास्तवावर हातातली पुस्तकं रामबाण उपाय ठरायची... त्यातील विषय..त्यातील प्रसंग भुरळ घालायचे...

       भुकंपग्रस्तांसाठी आलेल्या मदतीतून आलेल्या कपडयातुन मावशीने काही कपडे आमच्यासाठी पाठवले होते.. खुप दिवसानंतर घरी काही नविन , कोरे करकरीत आले होते...सुट्ट्यात मोठा भाऊ आला होता...त्याच्या चित्रकलेने वेग घेतला होता तर..मी कविता आणी काहीबाही स्फुट लिहीत होतो...वास्तवाच्या ओंजळीतून ओघळलेले काही थेंब कवितेच्या व लिखाणाच्या रूपात ओलावा देत होते......

        आम्ही सगळेच जणू आपापल्या परीने आल्या परिस्थितीला तोंड देत होतो...फरक एवढाच की ते देत असताना इतरांना कळू नये याचा अयशस्वी प्रयत्न करत होतो..दररोज सायंकाळी माळरान माझ्याशी बोलत होतं....दिवस कसेतरी सरत होते...बुडता सुर्य नव्या दिवसाची प्रकाशवात मनात पेरून धरणीआड होत होता...आणी मी अशा अगणित प्रकाशवाती सांभाळून ठेवत होतो...येणा-या अंधाराला संपवण्यासाठी... किती तरी संध्याकाळी मी मला घेवून भरकटत असायचो माळरानावर...स्वतःशी बोलत..शब्द फुटत नसत पण मनात कसला तरी पक्का निर्धार होत असायचा....टक्कर देण्यासाठी (क्रमशः)

(प्रताप)

Wednesday, August 22, 2018

My youtube channel- महाराष्ट्रातील कविता क्षेत्रातील पहिला प्रयोग...


महाराष्ट्रातील कविता क्षेत्रातील पहिला प्रयोग...
माझ्या मराठी कवितेचा संग्रह संगीतबध्द स्वरूपात व  डिजिटल स्वरूपात मराठी चित्रपटसृष्टीतुन प्रकाशीत...
खालील URL copy करून गुगल केल्यास आपण माझ्या चॅनल वरील कविता ऐकू शकाल... किंवा
Rachanaparv हे चॅनल आपण यु ट्यूब वर सर्च करू शकाल




https://www.youtube.com/channel/UCc7Jh3YKBb1LKRb8_xtaHYw

विरहाची नक्षी.....

(फक्त चोविस शब्दांची कविता.......)

चंद्रगर्भी आकाश
दिशाहीन  पक्षी
क्षितीजावर ऊमटे
विरहाची   नक्षी

बावरी सांजवेळ
आठवणींचा बहर
समईत  जळे
अंधारा प्रहर

रात एकली
ऊदास श्वास
एकल्या पक्षाचा
दिशाहीन प्रवास...

(प्रताप)

स्पर्धा परीक्षेची बखर: 'मी' ते अधिकारी ...एक आठवणींचे मोरपीस भाग 4: गाव ते वसतिगृह..वंचनेची गाथा.....

स्पर्धा परीक्षेची बखर: 'मी' ते अधिकारी ...एक आठवणींचे मोरपीस


भाग 4: गाव ते वसतिगृह..वंचनेची गाथा.....

       सातवीच्या सुट्ट्या महत्वाच्या होत्या. कारण गावात जिल्हा परिषदेची शाळा फक्त सातवी पर्यंत होती. पुढे शिकायचे तर गावातल्या सगळ्यांना सेलू, आलमला, औसा किंवा लातुरला शिकायला जावे लागायचे. जवळपास ची शाळा असली तर दररोज जाणे येणे करणे ठिक होते. एकतर गावातून जास्त पोरं सातवीच्या पुढे शिकत नसत. सातवी पर्यंत येता येता काहीजण शाळा सोडत. ज्यांच्याकडे शेतीवाडी आहे ते शेतीच्या कामाकडे वळत. माझ्या घरी तर सतत शिक्षणाचीच चर्चा! रोज पुढे काय करायचे याची चर्चा चालायची...कधी सातारा सैनिक स्कूल तर कधी लातूर...
       मी सुट्टयात सडकून पुस्तके वाचून काढली ,जनशिक्षण निलामय केंद्र संपून गावातील एकमेव पण अत्यंत चांगले वाचनालय वाचून संपत आले होते. डोक्यात विचार गर्दी करत होते. पुस्तके बोलत होती, नविन गोष्टी कळत होत्या. वेळ मिळेल तेंव्हा गावातले मित्र पिरपाशा , दिलीप, प्रल्हाद, विनोद , दिपक, विजय यांना भेटून त्यांचा पुढल्या शिक्षणाचा काय प्लॅन आहे तेही अंदाज घेत होतो...दिवस सरत होते......आणी एकदाच्या सुट्ट्या संपल्या. त्या दरम्यान मला लातुरच्या समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहात राहून शिवाजी शाळेत आठवीला प्रवेश घ्यायचे ठरले.

        सातवीचा निकाल लागला मी पास झालो होतो. आणी मिडल स्कुल स्काॅलरशिप परिक्षा पण...! पण याची दखल घेण्यासाठी ना माझी शाळा राहीली होती ना बनसोडे गुरूजी.....कारण त्यांचे अपघातात निधन झाले होते....

          शेवटी लातुरच्या वसतिगृहात जाण्याची तयारी सुरू झाली..माझ्यासाठी वडीलांनी एक नवीन लोखंडी पेटी, दोन ड्रेस, काही आवश्यक किरकोळ सामान तालुक्याहून विकत घेतले आणि वडीला सोबत एसटी बसने मी लातूरला निघालो....... गावाकडून लातुरला येताना मन दाटून येत होते,मोठा भाऊ जसा नवोदयला गेला होता तसाच मीही घरा बाहेर पडत होतो ..गावातील सगळे दोस्त, शाळा, वाचनालय आणी माझ्या एकटेपणाला ज्याने सतत साथ दिली ते माळरान आता सगळे दुरावत होते......पण आता पाऊल टाकले होते.... माहीत नव्हतं वसतिगृह ,शाळा कोठे आहे ,कसे आहे ...मनात भितीपण वाटत होती..आपला निभाव लागेल का? आपण तिथे टिकू का? शाळा कशी असेल? आपल्याला काही जमेल का नाही..तेथील मुले कशी असतील...प्रश्नच प्रश्न!!!
विचाराच्या तंद्रीत असतानाच... एस टी लातुरला पोहचली. मी आणी वडील बांधकाम भवन जवळ उतरलो. बांधकाम भवन म्हणजे शहराच्या बाहेरचा पहिला थांबा. गाडीतुन उतरलो ..वडील खांद्यावर पेटी घेवून पुढे चालत होते आणि एक पिशवी घेवून मी त्यांच्या मागोमाग चालत होतो... वाटलं होतं मेन रोड पासुन वसतिगृह जवळ असेल पण ते निघाले एकदम शेवटी..त्याला लागुन शेतीच होती.वसतिगृह एकुण नऊ छोट्या छोट्या ब्लॉक मधे होतं..वडीलांनी कार्यालयात जाउन प्रवेशाचं नक्की केलं.. मला रहायला इथेही सगळ्यात शेवटचा पण उगवती कडला ब्लॉक मिळाला. तिथल्या नियमानुसार ज्युनिअर मुलांनी ब्लाॅकच्या काॅमन रूम मधे रहायचे तर सिनीअर्सनी रुम मध्ये. मला मिळालेल्या ब्लाॅक मधे असणा-या काॅमन रूम मधे माझे सामान वडीलांनी एका कोप-यात निट लाऊन ठेवले..निट रहायचे, शाळा बुडवायची नाही, अभ्यास करायचा , जे मिळेल ते वेळेवर जेवायचे, मी येत राहीन भेटायला हे सगळं सांगीतलं आणी सिनियर मुलांना काळजी घेण्याबद्दल सांगुन त्यांनी निरोप घेतला..ते जाताना मी शांत होतो पण ते निघून गेल्यावर मात्र रडायला आलं...
            कोणीच ओळखीचं नाही...शाळा तेथुन साधारणतः साडेतिन किलोमिटर अंतरावर..तीही सकाळी साडेसात वाजता ... ना सायकल, ना जायची व्यवस्था..ऐपत नसताना सिटी बसचा पास काढायचा तर..ती पकडायला दिड किलोमिटर जा ..आणी ती जिथे थांबते तेथुन शाळा आतमध्ये एक किलोमिटर...!!! अपवाद वगळता हाॅस्टेलचे सगळे मुलं जवळच्या लालबहाद्दूर शाळेत प्रवेश घेतलेले आणी आम्ही तिघंच शिवाजी शाळेत. सगळंच अवघड..........होऊन बसलं होतं.......
            हळु हळु ओळखी व्हायला लागल्या, वसतिगृह म्हणजे शिस्त असेलच असे नाही. हेही वसतिगृह एक साधारण वसतिगृहा प्रमाणेच! जेवणाचे हाल, साधनाची कमतरता,शाळा बुडवून ती सुटायच्या वेळेपर्यंत रूम मधे लपून राहणारे मुलं! किंवा शाळेच्या वेळेला निघून शाळेत न जाता जेवणाच्या ओढीने लवकर वसतिगृहात परत येणारी मुलं! वसतिगृह अधिक्षकाच्या विरूध्द मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालया पर्यंत आम्हा सगळ्यांना घेवून जावून निवेदन देणारी मुलं! गणेश ऊत्सवाच्या काळात भारी ऑर्केस्ट्रा येतात म्हणून रात्री उशिरा पर्यंत लातुरभर चालत फिरणारी व मिळेल तो कार्यक्रम पाहत बसणारी मुलं! व तु एकटा कशाला बसून राहतो म्हणुन प्रत्येक ज्युनिअर ला सोबत यायला भाग पाडणारी मुलं!तर दुस-या बाजुला छान छान कविता लिहिणारे, झपाटून अभ्यास करणारे, गणिताच्या व भुमितीच्या सरावाला कागद पुरत नाहीत म्हणुन काचेच्या तुकड्यावर शाई पेनने सराव करून कसलाही गोंधळ न करता अर्धपोटी राहून निष्ठेने अभ्यास करून दहावीची परिक्षा मेरिट मधे येवून उत्तिर्ण करणारी मुलं( या पैकी मला ज्या ब्लॉक मधे रहायला मिळाले त्याच ब्लाॅक मधिल एक सिनियर पांडुरंग राऊत हा मित्र हालाखीच्या परिस्थितीतुन डाॅक्टर तर झालाच पण तशीच वंचनेची परिस्थिती असुनही UPSC मधुन IRS झाला व आज सीनियर पदावर कार्यरत आहे. तर दुसरा त्याचा साथी बालाजी हंबिरे मेरिट येवून, ईंजिनीयर बनून आज UAE मधे वरिष्ठ हुद्दयावर कार्यरत आहे.) सगळ्याच प्रकारचे मुलं तिथे होती. आता मला ठरवायचे होते काय करायचे...

         मी खुप प्रयत्न करत होतो वाईट संगत लागु नये, शाळा बुडवू नये. पण सकाळी सकाळी थंड पाण्याने अंघोळ करून ,काहीच न खाता( तशी सोयच नव्हती) दप्तर सांभाळत , शेतीच्या बाजु बाजुने धावत पळत शाळेत वेळेवर पोहोचण्याची धडपड करायचो. कधी पोहचायचो कधी नाही!! ज्या दिवशी नाही पोहचलो त्या दिवशी एक तर छडीने मार खावा लागायचा, नाहीतर एक तास वर्गाबाहेर ऊभं रहावं लागे. दुस-या तासाला येणा-या शिक्षकांना वाटे की याने काहीतरी केले असेल म्हणुन याला थांबवले असेल वर्गाबाहेर...आणी मग त्या तासात बोलणी खावी लागायची. वर्गात काही नविन मित्र झाले. पडवळ, तांडुरे , चित्रकलेत पारंगत असणारा राऊत ..ते राहिलेला अभ्यास सांगायचे..मदत करण्यासाठी प्रयत्न करायचे..साडेदहा वाजता इंटरव्हल व्हायचा. सगळे मुलं आपापले टिफीन खायला घ्यायचे. काहीजण शाळेच्या समोरील गाड्यावर चाॅकलेट्स , भेळ घेण्यासाठी झुंबड करायचे. मी मात्र जवळ नसलेला टिफीन, खिशात नसलेले पैसे, आणी लागलेली भुक विसरून शाळेतल्या नळाला पाणी पिऊन घ्यायचो. तो काळ खुप अवघड असायचा वर्गात थांबावं तर मुलं टिफीन खात असंत, बाहेर जावं तर पोरांची गाड्यावर चाललेली खरेदी....भुकेनं कासावीस व्हायचं....मग तेथुन सगळं लक्ष वसतिगृहाच्या रस्त्यावर लागायचं!!! भुक आणी शिक्षण नुसतं द्वंद्व!!!! हे पिढीजात वैर आहे..पण भुक या शत्रुवर प्रेम करणा-या विद्यार्थ्यांना या भुकेनंच माणसांत आणलं आहे..

             शाळा सुटली की तडक वसतिगृहाकडे चालायला लागायचं...चालणं कसलं ..धावणंच ते....तेथे स्वयंपाकी भंडारी मामा ने अत्यंत काटेकोर व काटकसरीने आणी वय लक्षात घेवुन सकाळी दहा वाजता भरलेला टिफीन उचलायचा. पटपट जेवण करायचं ...आणी वाट पहायची रात्रीच्या जेवणाची.....तसं... पाणी .. मधुन मधुन मदत करायचं...

         कसातरी शिकत होतो, शहरातले काही मित्र झाले. ते घरी बोलवायचे. गेलो तर बाहेर रस्त्यावरच बोलायचो...घरात कधी गेलोच त्यांच्या तर अदबीने बसायचो...आणी त्यांची नीटनेटकी घरे पाहून स्वप्न पडल्या सारखं वाटायला लागायचं म्हणुन लवकर निघायचो... फक्त राऊतचं घर बरं वाटायचं...तिथं दडपण यायचं नाही कारण त्याचं घर दिड रूमचं होतं...आमच्या झोपडी सारखंच....

       या वसतिगृहाने भुकेची किंमत कळवली...सगळं चुकत चाललं होतं ..हाल होत होते...घरापासुन लांब असताना परिस्थिती लचके तोडण्याचा प्रयत्न करत होती. मी तिला जमेल तसं तोंड देण्याचा प्रयत्न करत होतो...जमेल तसं शिकत होतो.. शाळा बुडण्याचं प्रमाण वाढायला लागलं..अधुन मधुन वडील यायचे, काही खायला घेवून यायचे, थोडेफार पैसे द्यायचे...जपून जपून वापरायचो...डिपार्टमेंटल स्टोअर्स आणी जनरल स्टोअर्स अशा दुकानाच्या पाट्या बघितल्या की नेमकं तिथं काय मिळतं हे माहित नसल्यानंही पैसे जास्त दिवस पुरायचे......घरची आठवण यायची..वाटायचं उगीच आलो आपण...पण दुस-या बाजुला शहर..त्याचे रीतिरिवाज कळायला लागले होते...थोडा धाडसीपणा पण आला होता...

        सुट्ट्या होत्या म्हणून एकदा घरची जास्त आठववण आल्याने व घरी जावून खुप दिवस झाल्याने गावाकडे जाण्यासाठी निघालो..हाफ तिकीट निघून ऊरतील एवढे पैसे होते. एसटी आली गाडीत बसलो..गावचेच कंडक्टर होते...तिकीट काढण्यासाठी पैसे दिले..गावाचे नाव सांगितले..त्यांनी कोणाकडे चालला म्हणून विचारले ...मी त्यांना मी तुमच्या गावचाच आहे म्हणून सांगीतले...तर त्यांनी मला नाव विचारले..वाटलं सहज विचारत आहेत...पण नाव सांगीतल्यावर माहित नाही त्यांनी एकदम मला सांगीतले फुल तिकीट लागेल म्हणून..मी त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला पण ते ऐकले नाहीत...त्यांनी फुल तिकीटाचे पैसे नाहीत दोन रूपये कमी आहेत म्हणून मला वासनगाव या गावच्या पाटीवर उतरून दिले...गाडी निघून गेली ..त्यानंतर चार बस निघून गेल्या पण मला बसायचे धाडस झाले नाही...पाचव्या बस मधून मात्र गावातल्या ओळखीच्या माणसाने आवाज दिला म्हणून मी गाडीत बसलो..सुदैवाने या कंडक्टरने मात्र हाफ तिकीटावरच मला गावात सोडले....मला आज पर्यंत समजले नाही की त्या गावच्या कंडक्टरला नेमके काय रुचले नव्हते...

(पण वडील सांगतात की माझे सिलेक्शन झाल्यावर त्याच कंडक्टर साहेबांनी माझ्या वडीलांना बाहेर चौकात विचारले होते की, 'वाघमारे तुमचा कुठला मुलगा साहेब झाला?' त्यावेळी माझ्या वडीलांनी त्यांना गावातील इतर प्रतिष्ठा सोबत सन्मानाने चहा पाजून सांगितले की, " साहेब ज्या मुलाला तुम्ही फुल तिकीटाचे पैसे नाहीत म्हणून अर्ध्या रस्त्यात उतरवले होते ना तो मुलगा तुमच्या सारख्या ज्येष्ठ व्यक्तीच्या आशीर्वादाने साहेब झाला आहे!!!!' आजही ते निवृत्त कंडक्टर साहेब कधी गावाकडे गेल्यास भेटतात ..मी त्यांना ओळख न देता आदरपुर्वक नमस्कार करतो...मी माझे संस्कार सोडत नाही!)


       आठवीचे वर्ष जेमतेम एक सत्र झालं होतं....आणी अचानक गावापासून फक्त तिस किलोमिटर अंतरावर असणा-या किल्लारीचा भुकंप झाला ..तो हादरवून गेला....मी जमीन हादरताना...पाहीली आहे.... (क्रमशः)

(प्रताप)

Monday, August 20, 2018

स्पर्धा परीक्षेची बखर: 'मी' ते अधिकारी ...एक आठवणींचे मोरपीस भाग 3

स्पर्धा परीक्षेची बखर: 'मी' ते अधिकारी ...एक आठवणींचे मोरपीस


भाग 3:      विज्ञान प्रदर्शन..... आणी अंधारी दिवाळी...!!!!
        
               गावातल्या जिल्हा परिषद शाळेत त्यावेळी प्रौढशिक्षणाचं काम आलं. गावातल्या थोडंफार शिकलेल्या महिला पुरूष यांना स्वयंसेवक म्हणून सोबत घेऊन गुरूजी लोकांनी काम सुरू केलं. त्यावेळी गावात एक जनशिक्षण निलामय केंद्रही सुरू झालं आणी पहिल्यांदाच तेथील पुस्तकाचा खजिना हाताला लागला. मग काय  रोज नविन पुस्तक !!!! अधाशासारखं वाचन सुरू झालं. (ते आजतागायत सुरूच आहे!!!) 
            बघता बघता दिवस सरत होते.बालपणीचा काळ वाचन ,खेळ , किरायाने घेऊन सायकल शिकणं, ग्रामपंचायतीच्या टिव्ही वर पिक्चर, रामायण आणि चित्रहार व छायागीत पाहंणं  हे सगळं सुरू होतं.घर बेतानच चालत होतं. पण आता  वंचनेची सवय झाली होती. संवेदना बोथट झाली होती जणू!  मानसिकता रद्दाड झाली होती.. पण सोडेल ती नियती कसली!!! अचानक पुन्हा काही जाणिवेचे क्षण आले आणी त्यांनी टोचणारी आठवण करून दिली......आणी माझ्यावर साचलेल्या राखेला उडवून लावलं !!!!
             गावाच्या बाजुला आठ एक किलोमिटर वर आमचे मुळ गाव आलमला आहे. तेथे एक मोठं काॅलेज आणी शाळा होती. तिथे विज्ञान प्रदर्शनांचं आयोजन  करण्यात आलं होतं. आमच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना ते प्रदर्शन पाहण्यासाठी नेण्यात आलं. सगळे जण खुशीत होते. उल्हासाने प्रदर्शन पाहत होते.  उन चढत होतं आणी दुपारी जेवणाची वेळ झाली. सगळे जण अंगतपंगत करून जेवायला बसले.  पण......मी आणी माझा एक मित्र मात्र तिथे बसू शकलो नाही कारण फक्त  आम्हा दोघांचेच जेवणाचे डबे सहलीचे डबे नव्हते!! उगाच भिती दाटून आली! आणी आम्ही दोघे मुकाट्याने तेथुन निघुन  इकडच्या तिकडच्या गप्पा मारत एकमेकांसोबत तिकडे दुस-या झाडाखाली बसून जेवलो. आमच्या त्या गप्पांना मात्र काहीच 'चव' नव्हती!!!.
            प्रदर्शन संपलं ! सायंकाळी  आम्ही रांगेने चालत गावाकडे परत निघालो. गावाजवळ येता येता पौर्णिमेचा चंद्र गडद झाला होता.  सगळे जण त्या चंद्रप्रकाशाचा आनंद घेत एकमेकांशी  विज्ञानाच्या प्रयोगावर बोलत होते आणी मी मात्र अंधारावर मात करण्याचं रसायन  शोधत त्यांच्या मागे  फरफटत  मुकपणेचालत होतो. घरी उशिरा पोहचलो. सोबत नेलेला रिकामा जेवणाचा डब्बा जरा जोरातच  ठेवून  जुजबी बोलून मी न जेवताच झोपलो. घरच्यांना वाटले की चालून थकल्याने झाले असेल बहुधा. पण त्या विज्ञानाच्या प्रदर्शनाने मात्र माझ्या मनात वंचनेचं मांडलेलं प्रदर्शन  घोळत होतं....
           खेड्यात लहानपणी दिवाळीचा सण म्हटले की नुसती हुरहुर,आनंद, फटाके, फराळ !!एखाद महिना अगोदर पासूनच हुरहुर वाटायचे ते वय...दिवाळीला लोक अंधारावर मात होण्याचे प्रतिक म्हणुन दिवे लावतात.पण अशा कित्ती दिवाळी त्याच राॅकेलच्या दिव्याने साज-या झाल्या याची नोंद मी  आजही ठेवली आहे... आणी गोडधोडाचा हा  सण ,आहे ते अन्न गोड माणुन मुकपणे साजरा करणारे आमचे घर मी पाहीले आहे .  पण इतरांच्या दिवाळी बाबत मात्र त्याही वयात  कधी असूया अथवा कुठला मोह झाला नाही. रूखरूख मात्र वाटायची.
          तरीही, अंतरीचा दिप प्रज्जवलीत होण्यासाठी त्या अंधा-या दिवाळीने मला खुप काही दिले. तीने दिलेला अंधार मला शिलगवून गेला...तो आजही शिलगवतो!!  वंचनेची  दिवाळी "वंचिताची दिवाळी" म्हणुन परावर्तित   करण्याचा हुरूप तेथुनच मला मिळाला.
           आता दिवाळी नटूनथटून येते, पण मी तीला साजरे करत नाही!! कारण लहानपणी तीने माझ्या ओंजळीत टाकलेला तो अंधारच गुंतवून मी प्रवास सुरू केला होता प्रकाशाकडे...तीने अंधार पुरवला नसता तर 'अत्त दिप भवो' याचा अर्थच लागला नसता.... आणी 'दुरितांचे तिमीर जावो  ' हे  आर्जव ही भिनले नसते डोक्यात!!तेजाळून येण्यासाठी दिवाळीने पुरवलेला  तो घनघोर अंधार मला तीच्या पेक्षा जास्त मोलाचा वाटतो.
                  गावातले जिल्हा परिषद शाळेतील शिक्षण संपत आले होते, त्याच वेळी मिडलस्कूल स्काॅलरशीप ची परिक्षा दिली होती.  सुट्टयात मोठा भाऊ यायचा , नवोदयच्या गमतीजमती सांगायचा, मनात पुढील शिक्षणासाठी लातुरच्या वस्तीगृहात रहावं आणी तिथल्याच शाळेत जावं असा विचार येत होता.....पण माहीत नव्हतं पुढे काय वाढून ठेवले होतं...! (क्रमशः)
(प्रताप )

Sunday, August 19, 2018

स्पर्धा परीक्षेची बखर: 'मी' ते अधिकारी ...एक आठवणींचे मोरपीस -भाग 2


स्पर्धा परीक्षेची बखर: 'मी' ते अधिकारी ...एक आठवणींचे मोरपीस

भाग 2: यशाची चव कडू गोड.....चकवा आणी वास्तव!!

        " काहीही होवो, शिक्षण सोडायचे नाही " हे बाळकडूच मिळालेले घरून. वडिलांनी जेवढे सांगीतले त्या पेक्षा माझी आई जास्त जिगरबाज. घरी एवढी वंचना असुनही तिची विचाराची श्रिमंती अफाट. एवढी की नवकोट नारायण गरीब भासावा. वडील फिरस्तीवर ! तर घरी आम्ही तिन भाऊ आणि आई! त्यावेळी तिला अक्षर ओळख नसूनही तिने आम्हाला अभ्यासापासुन कधीच दुर जाऊ दिले नाही. नेहमी पुस्तक घेवून बसावं लागायचं..
         गुलाब मास्तरची शाळा जणू गुरूकुलच आमच्यासाठी. शाळेचे स्वतंत्र नियम! सुट्टी राहणार तीही अमावस्या पौर्णिमेला! किंवा गुरूजी बाजारासाठी तालुक्याला गेल्यावर. लहान मुलांना सुट्टी म्हणजे कोण आनंद ! पण सुट्टीच्या दिवशीही शाळेत जाणारे आम्ही काही थोडकेच पोरं होतो!! मी आणी माझा मोठा भाऊ लहानपणापासून एकाच वर्गात शिकत होतो. कारण त्याच्या बरोबर मलाही शाळेत घातले होते एकाचवेळी .शाळेत असताना वेळप्रसंगी मार खाल्ला, पण त्यामुळे शाळेत जायचे नाही असे कधीच वाटले नाही. कारण घरी शाळेबाबत कधीच तडजोड व्हायची नाही. खायला नाही मिळाले एकवेळ तरी चालेल पण शाळा बाबतीत कधिच लाड झाला नाही.
मित्रासोबत हसत खेळत, धडपडत चौथी पर्यंत शिक्षण पुर्ण केले. गावात चौथी बोर्डाची परिक्षा होत नव्हती. ती बाजुच्या सेलू या साधारणतः चार किलोमिटर असणा-या गावात व्हायची. त्या परीक्षेला आम्ही चालत जावून हजर राहिलो. केलेल्या अभ्यासाचे व गुलाब मास्तरांच्या शिकवण्याचे फलित म्हणजे मोठा भाऊ राहुल चौथीच्या बोर्डपरिक्षेत गुणवंत विद्यार्थी ठरला. आणी झोपडीत रॉकेलच्या चिमणीने अभ्यास केला तरी परिक्षेत चांगले यश मिळते हे मनावर ठसले. आईला कोठून कळले होते माहित नाही, की शिक्षणाने प्रगती होते. घरात गुणवंत विद्यार्थी ठरलेला तिचा मुलगा यामुळे तर तीचा विश्वास वाढून गेला की शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही.अंधुक अक्षर ओळख असणारी आई आम्ही सातवीत असताना सतरा नंबरचा की कुठला फार्म भरून जर स्वतः चौथी पास होत असेल आणी आज चांगल्या पद्धतीने वाचु शकत असेल ती तर कसा हुरूप नाही येणार शिकायला!!!
             चौथी संपली आणि जिल्हा परिषद शाळेत जायला लागलो. आत्तापर्यंत वेगळ्या वळणात शिकलो होतो आत्ता एकदम औपचारिक शिक्षण! खाजगी शाळेत कमी मुलं असल्याने कंपू बनला होता पण जिल्हा परिषद शाळेत जास्त मुलं जास्त वर्ग, कडक शिस्त ! कल्याणी सरांचा तर फारच दरारा. एकदम गळाच पकडायचे त्यांना घाबरावंच लागे. अशोक गुरूजी, प्रमिला मॅडम यांच्या सोबत एक सज्जन व देव माणुस बनसोडे सर हे ही त्या शाळेत भेटले. ज्यांनी आमच्या पिढीला वळण दिले ते हे बनसोडे सर.शाळा सुटल्यानंतरही शाळेत थांबून नवोदय च्या परीक्षेची तयारी करून घ्यायचे. वडिलांना गावात येणा-या सर्व शासकीय कर्मचा-या बद्दल अपार आदर त्यातुन बनसोडे सरांनी नवोदय विद्यालयाच्या परिक्षेची तयारी करण्याबाबत सल्ला दिला .आणी मग सुरू झाला दुसरा टप्पा आयुष्याचा!!
          आम्हा दोघां भावासाठी दोन पुस्तकं आणली, घरी घड्याळ, लाइट काही नाही ..अंधारातून उजेडाकडे जाण्याची जिद्द मात्र घरच्या सगळ्यातच संचारलेली!! मग काय आई अंदाजाने दररोज पहाटे अभ्यासाला उठवायची आणी माझ्या मोठ्या मामाचा मुलगा त्यांना आम्ही आबा म्हणतो त्यांच्या निगराणीत अभ्यास सुरू व्हायचा! मोठा भाऊ तग धरून अभ्यास करायचा पण मी लहान असल्याने की काय मला झोप सहन व्हायची नाही त्यामुळे मी जरा जास्त फटके खायचो. वर्षभर अत्यंत नियमीत आम्ही दोघा भावांनी खुप अभ्यास केला . मला मोठ्या भावाने खुप काही शिकवले.(आजही तो मार्गदर्शक आहेच). माझा स्पर्धा परिक्षा क्षेत्रातील तो पहिला साथी!!! तो लहानपणी खुप घाबरट होता म्हणून मला त्याच्या सोबत शाळेत जावे लागले. आम्ही एकमेकांच्या आधाराने तगत होतो. अक्षरशः आम्ही दोघांनी मिळून पुर्ण पुस्तक पाठ करून टाकले.
                            परीक्षेची तयारी जवळपास संपत आली. तालुक्याच्या ठिकाणी जावून नवोदयची परिक्षा द्यावी लागायची गावातले जवळपास नऊ ते दहा मुलं मुली परीक्षेला बसली होती. परिक्षा एकदम जवळ आली आणी मी टायफाईडने खुप आजारी पडलो. पण तरी आम्हाला परीक्षेला जावं लागलं. पेपर खुप चांगल्या रितीने आम्ही सोडवले. परिक्षा झाली , सुट्ट्या संपत आल्या , आणी निकाल लागला !!!! गावातून सगळ्या पोरांत एकच पास !!!! तो म्हणजे माझा मोठा भाऊ!!!!!! यशाची दुसरी घटना!!! यशाची गोड चव घरच्यांना चाखायला मिळाली!! या गोड चवी सोबत मी नापास झाल्याची कडू चवही त्यांना चाखावी लागली!! एका बाजुला यशाचा चकवा तर दुस-या बाजुला गुणवत्तेचं वास्तव!!!
          एका खेड्यातल्या मुलाने सलग दोन वर्ष आपली गुणवत्ता सिद्ध केल्याने शाळेने त्याचा आणी आईवडिलांचा तत्कालीन लातुर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हाधिका-याच्या हस्ते सत्कार ठेवला . सगळा गाव त्या सत्कारावेळी हजर होता. त्या कार्यक्रमासाठी आम्हाला आईवडिलांनी नविन कपडे घेतले होते. तेही सारखेच!!!!! जणु वाटावं की दोन सत्कारमुर्ती आहेत...पण यशाने मला चकवा दिला होता आणी मोठ्या भावाच्या सत्काराचे वास्तव मला जाणीव करून देत होतं की काहीच न करता त्याच्या सारखेच कपडे घालून मी तेथे हजर आहे. लहान होतो भावाच्या सत्काराचा आनंद होता पण मी नकळत अंगावरचे नवीन कपडे लपवत होतो!!! नेमकी काय भावना दाटून येत होती माहीत नाही. पण आत्ता भाऊ नवोदयला निघुन जाणार म्हणून एकटं एकटं वाटंत होतं. शाळेची पहिली पायरीच आम्ही मिळून चढलो होतो. आणी पाचवी पर्यंत एकमेकासोबत सावली सारखे एकमेकांच्या आधाराने राहिलो होतो. तो सत्काराचा दिवस खुप काही सांगुन आणी शिकवून गेला. आणी मला एकटं पडावं लागलं मोठा भाऊ सुटला आणी मला अचानक मोठं होवून लहान भाऊ निशांत ची तिच मोठ्या भावाची जबाबदारी घ्यावी लागली.
                मोठा भाऊ नवोदय साठी निघुन गेला तेंव्हा आनंदही झाला, चला किमान त्याला तर चांगली शाळा मिळाली. त्याला तेथे बुट, चप्पल, कपडे,चांगले पुस्तके मिळतील . आमच्या पैकी एक जण चिखलातुन मुक्त व्हायच्या मार्गावर मार्गक्रमण करायला निघाला होता...पण माझी वेळ अजुन यायची होती...! अजुन जास्त टाकाचे घाव सोसायचे होते...एक वादळ माझी वाट पहात दबा धरून बसलं होतं झडप घालण्यासाठी आणी मीही माझ्या नव्याने फुटू पाहणा-या पंखांना धार लावायला घेतलं होतं...आता एकट्याने लढावं लागणार होतं....संघर्ष माझ्या ' पाचविला पुजला ' होता जणु............ परिस्थितीचा हातोडा टाकावर घाव घालायला सज्ज होत होता आणी मी स्वतःच टाक धरून त्याला आव्हान देत होतो. कधी झुरत....कधी स्फुरत...(क्रमशः )
(प्रताप )

Saturday, August 18, 2018

स्पर्धा परीक्षेची बखर: 'मी' ते अधिकारी..एक आठवणींचे मोरपीस भाग 1




भाग-1: पाऊस..चिखल आणि गळके छप्पर......

          लातूर औसा रस्त्यावरील एक छोटंसं अठरापगड लोकांचं माझं एक खेडेगाव. गावाच्या मधोमध जाणारा डांबरीरस्ता..एक पश्चिमेकडला भाग 'वरला-कड' (वरचा) आणी पूर्वेकडील दुसरा 'खालला- कड'.आमचं झोपडं अर्थातच खालल्या कडील भागात!!फक्त एक चांगली गोष्ट..ते जवळपास गावाच्या शेवटी होतं. त्यामुळे ऊगवता सुर्य पहिल्यांदा आमच्या झोपडी कडुन ऊगवायचा..
         गावात जिल्हा परिषदेची शाळा सातवी पर्यंत. तेथेच शिकायला भेटले. पण गावात एक खाजगी शाळा होती गुलाब मास्तर यांची. गावच्या चार पिढ्याला शिकवणारे असे एक मुस्लिम शिक्षक जे पांडवप्रताप, भगवतगीता, रामायण,महाभारत नेमाने वाचायचे आणी त्यातील दाखले देत देत पोरांना बाराखडी, लेखन वाचन, अंकगणीत शिकवायचे. त्यांची शाळा चौथी पर्यंत. सा-या गावाचा विश्वास त्या शाळेवर...तेथे शिकायला मिळाले तर पाया पक्का होतो हा सगळ्या गावाला विश्वास! शिक्षणाचा पाया तर पक्का व्हायचाच पण शहाणपणाचा पाया त्याहून जास्त !!! अशा धर्मनिरपेक्षतेच्या शाळेत चौथी पर्यंत शिकायला मिळाले व नंतर जिल्हा परिषदेच्या शाळेत सातवी पर्यंत.
        1980 च्या दशकात मराठवाड्यात जसे टिपीकल खेडे होते तसंच आमचं खेडेगाव.पण गावात एक विशेष होतं. गावात त्यावेळी दोन पुतळे होते. एक शिवाजी महाराजांचा आणी दुसरा डाॅ.आंबेडकर यांचा. त्यांच्या समोरूनच आम्हाला शाळेत जावं लागायचं!
         घरची परिस्थिती बेताचीच पण ती हलाखीची बनून गेली .दुसरी तिसरीत असतानाच गरीबीचे दाहक चटके जाणवायला लागले. उन्हाळा, हिवाळा ठिक पण पावसाच्या काळात पाऊस जगायला शिकवायचा . "पाऊस जीवन देतो " हे खरंच आहे. त्या पावसानेच तर जीवन गहनतेने समजवून दिले...
"छप्पर गळण्यासाठी किमान ते असावं लागतं..."ते ही धड नसणारे आमचं झोपडं. त्याच्या बाजुला एक बाभळीचे झुडुप. छोटीशी पाऊलवाट , धो धो कोसळणारा पाऊस आणी बदबद गळणारे झोपडे, कोप-यात गाडग्यांची उतरंड, दोन सलद, दोन लोखंडाच्या घागरी,एक चेपलेला हंडा , एक कळशी, एक पत्र्याची पेटी, दोन तीन पत्र्याचे डबे, थोडेसे भांडे आणी पाण्याने विझलेली चुल! पाऊस वाढला की छपराच्या लाकडाला उलटी टांगलेली एक छत्री आणी त्या खाली कोठूनतरी आणलेल्या दोन विटांवर टाकलेले एक फळकुंड...आणी त्यावर पेंगुळलेल्या नजरेने डोळ्यात झोप सावरत पावसाला झेलत( जागणारे की )झोपणारे आम्ही !! राॅकेलची चिमणी विझल्यामुळे झालेल्या अंधारात दिवस आणी पाऊस कधी उजडेल याची वाट पाहणारे डोळे ,! त्या पावसानेच तर शिकवले " पावसात जगण्यासाठी घरावर किमान मजबूत छप्पर असायला हवे!"
          सकाळी रात्र आणी पाऊस सरल्याचा आनंद ही तोकडाच!! कारण घराबाहेर आणी आत चिखल झालेला....उतरंड आणी सारे घर भिजुन चिंब व्हायचे. तरीही पोत्याचे घोंगते पांघरून आम्ही शाळेत निघायचो.घरातल्या चिखलापासुन मुक्ती मिळण्यासाठी त्यावेळी शाळा बरी वाटायची. पण माहिती नव्हतं ती शाळेत जायची सवय आणी अपरिहार्यता भविष्यात आयुष्यातील चिखल दुर करायला एवढी मददगार ठरेल!!!!

         हा "घरातला चिखल" माझ्या घरी मला सर्वात शेवटी माझेे Mpscसिलेक्शन झाले त्या दिवशी पण भेटायला व निरोप घ्यायला थांबला होता !!
     
      म्हणून सांगतो "सृष्टीसाठी" जसा पाऊस गरजेचा आहे तस्साच तो" दृष्टी साठी "पण!
       तो पाऊस.....ते गळकं छप्पर..आणी तो चिखल ....यांनी त्यावेळी जगण्यासाठी व झुंजण्यासाठी हुरूप दिला व ते वंचनेच्या दिवसा सोबत निघून गेले पण आज प्रशासनात काम करताना त्यांचा विसर पडू नये म्हणून मी तिन्ही ऋतुत त्यांची आठवण काढत राहतो कारण माझा निसर्गावर विश्वास आहे " चिखला शिवाय शेत फुलत नाही ..आणी आयुष्य पण............(क्रमशः)

(प्रताप)





Thursday, August 16, 2018

'अटल'कवी

'अटल' कवी


वडील कृष्ण बिहारी वाजपेयी यांच्या कवितेचा वारसा असणारा मात्र स्वतःची स्वतंत्र शैली,प्रतिमासृष्टी व शब्दसौंदर्याची पेरण करत आशयघन कविता लिहून भारतीय समाजकारण , राजकारण प्रगल्भ करणा-या कवि मनाच्या अटलजी यांच्या निधनाने कविता काही क्षण नक्कीच स्तब्ध झाली आहे....

मौत की उमर क्या है? दो पल भी नही,
जिंदगी सिलसिला , आज कल की नही।

असे म्हणत आयुष्य तोलामोलाने जगणारा हा एक श्रेष्ठतम कवी. आयुष्याच्या प्रत्येक चढऊतारास कवितेच्या माध्यमातून जनमानसात अत्यंत मार्दवाने, प्रखरतेने व जाज्वल्याने पेरणारा हा खरा 'स्टेट्समन' !

आयुष्याच्या प्रवासात व दुनियादारीत निराशेचे क्षण आल्यास अत्यंत प्रामाणिक पणे त्यांची कविता म्हणते...

बेनकाब चेहरे है, दाग बडे गहरे है।
टूटता तिलिस्म,आज सच से भय खाता हूँ ।
.. ..........................गित नही गाता हूँ ।

पण झुंजारू वृत्तीचा त्यांचा 'अटल' स्वभाव पुन्हा त्याच जिगरने लढण्यास सज्ज होतो आणि ते लिहितात...

हार नही मानूंगा। रार नही ठानूंगा।
काल के कपाल पर, लिखता मिटाता हूँ । गीत नया गाता हूँ ।

स्वतःचा 'मै हिन्दू हूँ ।' असा 'अटल' परिचय देणारे धर्मनिरपेक्ष अटलजी 'अग्नीपंख' असणा-या अब्दुल कलाम सोबत पोखरणात 'बुध्दास पुन्हा हसवतात' व आपल्या कविता आयुष्य गित आहेत हेच अधोरेखीत करत म्हणतात .....

कदम मिलाकर चलना है।

आणी त्या मुळे ते पुन्हा पुन्हा 'अटल' होतात. 'माझी कविता योध्याची ललकार आहे ' असे नमुद करणारा हा योध्दा कवी आज आपल्यात नाही. त्याची मृत्युशी चाललेली झुंज काल संपली पण ते मनात झुंज पेरून जातात......

मौत से ठन गई,
झुजने का मेरा ईरादा ना था।
मोड पर मिलेंगे इसका वादा न था।
रास्ता रोककर वह खडी हो गई,
यो लगा जिंदगी से बडी हो गई।

देशाच्या या महान सुपुत्राने काळाच्या भाळावर आपली अमिट युगमुद्रा उमटवली आहे.
या श्रेष्ठास नमन....आपल्या कविता व कर्तृत्व आम्हाला प्रेरणा देत राहील.

' पहरा कोई काम ना आया, रसघट रित चला... जिवन बित चला ।
(प्रताप )

प्रतिक्षारत....

                   सांज बावरी घडी..रात येण्याचा प्रहर.. गोठ्याकडे वासराच्या ओढीने निघालेल्या गायीच्या खुराने ऊधळलेल्या  मातीने आसमंत बावरताना...मी त्या पाऊल वाटेच्या शेवटी.....ऊभा तुझ्या पावलांचा कानोसा घेत...वासराच्या प्रतिक्षारत नयनाने..   अन् त्याचवेळी घरट्याकडे परतणारा एक पक्षी दिशा चुकतो मला पाहून...आणी भरकटतो दिशाहीन....
                    चांदवा उगवण्याआधी चांदण्याचे दिप पेटवतो...  आणी हळुवार डोकावतो नभाआडून...रात दाटते...रान पेटते...काजवेही तुला शोधायला निघतात...अन् माळरानांचे दिर्घ निःश्वास ..मनास हुरहुरीचा बहर येतो..
फुलत्या चांदण्याखाली रातराणीही बहरते..हळुवार मी तुझ्या नसलेपणाशी मुक्याने बोलू लागतो...अन् माझ्या शब्दांस बासरीची गोकुळधुन स्पर्श करते...भाव मोहरतात... विरहिणी दवात भिजते ...तुझ्या तनुकांतीच्या आभासाने चांदवा अजुनच प्रकाशमान होतो...रात बहरते...तगमगते..अन् थकुन जाते तुझ्या नसलेपणाने  ....
                  मी गंधाळल्या रातव्यात तुला शोधत राहतो....प्रतिक्षेची घडी युगात रूपांतरीत होते...रातराणीच्या फांदीवरून फुले पेंगुन ओघळायला लागतात....काजवे पहाटेच्या नजरेस पडु नये या धडपडीत विझले जात असतानाच ....चांदणेही फिके होत असते....त्यावेळी मी चंद्र विझवून परतायला लागतो घराकडे....अन् चालायला लागतो तु न आलेल्या वाटेवरुन !!!!...पुन्हा ऊद्या याच वळणावर येण्यासाठी....!!!
    तु न आया तो क्या..ए मेहबूब..
    रात तो आएगी ।
    फुलो की शहादत का मातम क्यों?
    ॠत तो आएगी ।
  माझ्या ललित लेखातुन...
                                     (प्रताप)    

चंद्राचे प्रकाश पेरणे.....

निज दाटल्या डोळ्यांनी
पाहत जावे स्वप्न जागे
शिशिर गळत्या पानांना मी
चैत्र पालवीचे बहर मागे.....

मेघ दाटला काळीजवारा
घुमुन येतो सारी सृष्टी
बंद जाहल्या डोळ्यांना मग
अवचित लाभे हळवी दृष्टी

रात दाटल्या आभाळाने
चंद्राला मग कवेत घ्यावे
अंधार सारत्या चांदण्याला
पणतीने मग कशास भ्यावे? 

पहाटेच्या हृदयामधूनी
रातकाजवा  गातो गाणे
फटफटणा-या दिशादिशातुन
अंधाराचे सांडून जाणे.

वाहत जावे लाट बनुनी
पापण्यांचे फोडून धरणे.
ओढून घ्यावे तनामनावर
चंद्राचे हे प्रकाश पेरणे........!!
(प्रताप)

"रचनापर्व"

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...