Sunday, August 26, 2018

स्पर्धा परीक्षेची बखर: 'मी' ते अधिकारी ...एक आठवणींचे मोरपीस भाग 6: शाळा बदल...आयुष्य बदल....

स्पर्धा परीक्षेची बखर: 'मी' ते अधिकारी ...एक आठवणींचे मोरपीस

भाग 6: शाळा बदल...आयुष्य बदल....

आठवीचा निकाल लागला!!! अपेक्षेप्रमाणे पुर्ण वर्षातील घडामोडी त्यात प्रतिबिंबित झाल्या. एकोणसत्तर टक्के मिळाले. आम्ही मामाच्या गावातच स्थायिक झालेले असल्याने मामा घराच्या बाजुसच राहत होते. (अत्यंत प्रेमळ स्वभावाचा हा माझा आवडता व्यक्ती. स्वतः खाजगी ड्रायव्हर, अत्यंत अल्प पगारावर काम करत असताना स्वतःचे घर सांभाळून अडीनडीला मदत करणारा! आणी आम्हा तिघा भाच्याबद्दल अपार आत्मविश्वास असणारा! पण माझे सिलेक्शन न पाहू शकलेला.........त्याचा अकाली मृत्यु म्हणजे काळाने ओढलेला एक अत्यंत क्रूर ओरखडा ..) मामा माझा निकाल पहायला सोबत आला ...अत्यंत निराश झाला. आणी घरी येवून त्यानी वडीला सोबत चर्चा केली..परिणीती ...माझी शाळा बदलली....

मला नववीला लातुरच्या नामांकित शाळेत प्रवेश मिळाला. केशवराज विद्यालय..एक अत्यंत शिस्तबद्ध व दर्जेदार शाळा.. मुलींच्या अ ब क तुकड्या, त्यांचा वेगळा मजला, जायला वेगळं गेट, मुलांच्या वेगळया ड इ फ तुकड्या..मी 'फ ' तुकडीत .. . !!! ही शाळा पण सकाळी साडेसात वाजता. मला गावाकडून सकाळी सहा वाजता निघावं लागायचं. शिवाजी चौकात उतरून जावं लागायचं..पण ते वसतिगृहापेक्षा कमी अंतर होतं.आणी या शाळेत इंटरव्हलची समस्या नव्हती. कारण सोबत टिफीन असायचा. तो खाण्यासाठी मला आसाराम नावाच्या मित्राची कंपनी मिळायची.त्याचे वडील सूतगिरणी कामगार होते. शाळेत दररोज जात होतो.दुपारी शाळा सुटली की एसटी ने गावाकडे यायचो. गावाकडून शिक्षणासाठी शहरात जाणा-या विद्यार्थ्यांचे भावविश्वच वेगळे असते. त्याला सकाळी शहर ,त्यातील व्यवहार पहायला मिळतात.तेथे त्याला त्याचे जगणे अॅडजेस्ट करावे लागते. छान छान सायकली, गाड्यावर येणारे वर्गमित्र...त्यांची जीवनशैली पहायला मिळते. आणी शाळा संपल्यास गावाकडे परत आल्यावर गावातले आयुष्य...गावातले मित्र , गावातील परिस्थिती ...या दोन्ही टोकाकडे त्याची ओढाताण होते..वैचारिकता चांगली असेल तर ठिक..नाहीतर गावातले मुलं शहरी मित्राच्या जिवनशैलीकडे आकर्षीत होवून जातात. व त्यांना मध्यवर्ती मानून आपला दिवस ठरवतात. त्यांच्या सोबत राहणे..त्यांच्या भांडणात सहभाग नोंदवणे अशा बाबी करतात..पण लातूर हे शैक्षणिक शहर या बाबतीत अत्यंत समृध्द...शहरी मुलं आणी गावाकडील मुलं या दोन्ही टोकांना अत्यंत संयत पध्दतीने सामावून व सांभाळून घेणारं हे शहर...गुणवत्तेला न्याय देणारं हे शहर...इथल्या शैक्षणिक संस्थांनी गाव आणी शहर यात अत्यंत आदर्शवत असा समतोल साधला आहे..आणी इथल्या शहरी भागातील मुलांचे वर्तुळ ग्रामीण भागातील मुलाशिवाय पुर्ण होत नाही... केशवराज शाळा ही अशीच या शाळेने माझ्या आयुष्याला सर्वात सुंदर अशी कलाटणी दिली...


दररोज शाळेत जात होतो. बसने दररोज येणेजाणे सुरू होते. शहरातले मित्र , वेगवेगळ्या गावचे मित्र ..आयुष्य व्यापक बनत चालले होते. शाळा शिस्तबद्ध , शाळेत कधीकधी भांडणे व्हायची,मुलं शाळेपासुन थोडं दुर जावून हाणामारी करायचे, मी अशा गोष्टी पासुन दुर होतो..पण येते आफत कधी कधी...शाळेत एक मुलांचा ग्रुप होता तो गावाकडून येणा-या, किंवा शांत असणा-या मुलांना टारगेट करून त्यांची टर ऊडवायचा, त्यांच्याशी भांडण करायचा..( आत्ता सगळेच ग्रुप मेमबर्स परस्परांशी जुळलेले आहोत, मेडिकल, इंजिनियरींग, बाॅलिवूड, पत्रकारिता, क्रिडा, राजकारण, प्रशासन, खाजगी व्यवसाय अशा विविध क्षेत्रात अनेकांनी नाव कमावले आहे, त्यातले कितीजण तरी विदेशात स्थायिक आहेत) एके दिवशी कसा कोण जाणे माझा नंबर लागला!! आणी मला ' तु इंटरव्हल मधे भेट तुला दाखवतो' अशी धमकी मिळाली. मी अगोदर तर घाबरलो ..तासात मन लागत नव्हते..कारण मला दररोज एक किलोमिटर त्याच रोडने बस पकडण्यासाठी जावं लागायचं..मी अस्वस्थ झालो होतो. काय होइल म्हणून धास्ती वाटत होती..विशेष म्हणजे मी काय चुक केली होती हेच मला समजत नव्हते...शेवटी ठरवले जे व्हायचे ते होवो पाहून घेता येईल..मला भांडण करायचं नव्हतं..पण झालंच तर तोंड तर द्यावच लागणार होतं....इंटरव्हल झाला!!! बेल वाजली..मी वर्गाबाहेर आलो..ग्रुप वाटच पाहत होता!! शाळेत कडक शिस्त असल्याने व सरांना समजल्यास भरपूर मार मिळून वरून पालकांना कळवले जाई त्यामुळे परिसरात भांडण करता येत नाही म्हणून मुलं दुस-या गल्लीत जावून भांडण करायचे..मला सर्वांनी घेरून ढकलायला सुरूवात केली मी पण प्रतिकार करत होतो..आणी तेवढ्यात विनय, बलभिम हे माझे दोन वर्गमित्र त्यांच्या पुर्ण मित्रासह तेथे आले ते मधे पडले..त्या ग्रुप मधिल जे मुख्य मुलं होते त्यांनी भरपूर मार खाल्ला. माझ्या मित्रांनी त्यांना चांगलीच अद्दल घडवली..मला विनय आणी बलभिम यांनी सांगितलं घाबरायचं नाही वेळ आल्यास आपण पाहून घेवू...त्यांचा आणी माझा जास्त संपर्क नव्हता पण वर्गात मी शांत राहून शिकण्यासाठी धडपड करत होतो, गावाकडून येतो म्हणून त्यांना माहीत होतं. त्यांना वाटायचं मी हुशार आहे...ते तर जिवाभावाचे मित्र झालेच पण त्या प्रसंगानंतर मला लातूर मधिल माझे शिक्षण पुर्ण होईपर्यंत जिवाभावाचे खुप मित्र भेटले..सगळे असेच अन्यायाला प्रतिकार करायला सदैव तयार असणारे, स्वतःच्या घरगुती मर्यादा असुनही मित्रासाठी काहीही करायला तयार असणारे..वेळप्रसंगी चुकत असल्यास शिवीगाळ करून जाणीव करून देणारे...स्वतः फाटके असुनही सतत मदत करण्यास तत्पर असणारे...हे आयुष्य घडायला अशा अनंत मित्रांनी मदत केली आहे...वेळप्रसंगी ते नसते तर माझी कथा काही वेगळीच असती...त्या प्रसंगाने मला बळ दिले..आपण लातूर मधे , शहरामधे आता टिकू शकतो हा आत्मविश्वास दिला.... मी अधिक आत्मविश्वासाने शाळेत जाऊ लागलो...पण घरी खर्च वाढत चालला होता..परिस्थिती बिकट होत चालली होती...पुर्वी परिस्थिती लपवत होतो वाईट वाटायचं पण आता तशा परिस्थितीत राहणारे इतर मुलं भेटत होती...दबक्या आवाजात का होईना पण मन मोकळं होत होतं..चांगलं शिकायला पाहिजे आपण! हा सामुहिक निर्धार होत चालला होता.....


शाळेत प्रत्यक विद्यार्थ्यांला प्रिय असणारे, अत्यंत तळमळीने आयुष्य व ईंग्रजी शिकवणारे आप्पाराव सर, भुगोल शिकवताना त्या भागाचा इतिहास सांगणारे होनराव सर, अत्यंत लाघवी पध्दतीने हिंदी शिकवणारे कांबळे सर, इतिहासाचे चव्हाण सर, मराठीच्या वैद्य मॅडम, अत्यंत कडक शिस्तीचे कंगळे सर अशा विविध गुरुजनांच्या मार्गदर्शनात शिकत होतो. घरी घरकामात मदत करणे, गावातील वाचनालयाचे पुस्तके वाचणे हे तर सुरूच होते..पण आर्थिक बाजू कोसळत चालली होती...तग धरणं अवघड होत चाललं होतं ..वडील , मामा एकेकाळी पुण्याला शिर्के कंपनीत कामाला होते, कंपनी कडून दुबई ला पण गेलेले होते..पण इराण इराक च्या युद्धात परत यावं लागलं..ना बचत ना काम याला कंटाळून त्यांनी माझ्या आईचं गाव रोडवर आहे, भविष्यात मुलांचे शिक्षण, रोजगार या साठी चांगलं राहील हा दृष्टीकोन ठेवून त्यांनी सर्व कुटुंब पुर्वी पासुनच येथेच ठेवलं होतं.. पण त्यांचं अर्थात आमचं मुळ गाव आलमला असल्याने ते तिकडं काही करता येईल का, तालुक्याला जावून काही करता येईल का या प्रयत्नात राहत असल्याने फिरस्तीवर असायचे...मी , आई, लहान भाऊ कुढत रहायचो आणी लढत रहायचो..दरम्यानच्या काळात वडिलांनी कसं तरी जमवून छपराचं घर मातीचं केलं होतं..तेही एक खोलीचं!!

शाळेत निबंध स्पर्धा व्हायच्या, स्नेह संमेलन, संस्कार शिबिरे व्हायची, मी एकदाच निबंध स्पर्धेत भाग घेतला,मला खुप वाटायचं माझ्या निबंधाचा क्रमांक येईल म्हणून...पण तो काही आला नाही. मी नाद सोडला. शाळेत जरी खुप काही होत असलं तरी मी सायंकाळी पाच नंतर थांबू शकत नव्हतो कारण मला गावाकडे जावं लागायचं..अपवाद शाळेने भुकंपग्रस्तांच्या मदतीसाठी आयोजीत केलेले"जाणता राजा" हे नाटक. त्यामुळे मी एक सामान्य विद्यार्थी या संवर्गात येत होतो. इतर मुलं वादविवाद, वक्तृत्व, नाटक, विविध खेळ यात सहभागी व्हायचे..मला इच्छा असून ते करता यायचं नाही...वह्या, पुस्तके,एसटी चा मासिक पास या मुळे खर्च वाढत चालल्याने वैताग येत होता...फक्त एकच गोष्ट घरी पक्की होती काहीही होवो शिक्षण सोडायचे नाही!!!


शाळेतल्या या वर्षाने मला खुप चांगले मित्र दिले, धाडस दिले, दुःखाची वैश्विकता समजवून दिली, समदुःखी मित्रांसोबत चर्चा होत असल्याने परिस्थितीला तोंड देण्यासाठी बळ मिळाले. आईच्या नोकरी मुळे औरंगाबाद वरून रहायला लातुरला आलेला वैभव नावाचा मित्र मिळाला. ज्याने कधीच मला परिस्थिती जाचणार नाही अशा पध्दतीने त्याचा कौटुंबिक सदस्य म्हणून मला वागवले.सचिन ,अभय, प्रताप, विनोद, गज्या,महेंद्र, रविकिरण अशा अनेक मित्रांनी मला वेळोवेळी मदत केली, भावनीक, मानसिक आधार दिला.

द्वितीय सत्राची परिक्षा जवळ आली होती, सगळे ड ई फ चे मुलं प्रचंड अभ्यास करत होते..मीही प्रयत्न करत होतो..ना गाईड ना ट्युशन! जे वर्गात शिकले ते घरी वाचायचे, लाईट चे वांदे , परिक्षा दिली...पुन्हा उन्हाळा, पुन्हा माळरान, वाचन, घरकामात आईला मदत.....दहावीचं वर्ष येणार होतं....शैक्षणिक आयुष्याला वळण देणारं...
आणी आयुष्याला पण.........!!! जसं आठवीचं वर्ष घडामोडीचं गेलं त्या पेक्षा जास्त घडामोडी घेवून येणारं वर्ष माझी वाट पाहत होतं आणी मी अनभिज्ञ राहून त्याला सादर होत होतो....अजून माझा झुंजण्याकडे प्रवास सुरू झाला नव्हता...पण नियतीनं रस्ता आखायला सुरूवात केला होता... (क्रमशः)
(प्रताप )

No comments:

Post a Comment

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...