Sunday, August 19, 2018

स्पर्धा परीक्षेची बखर: 'मी' ते अधिकारी ...एक आठवणींचे मोरपीस -भाग 2


स्पर्धा परीक्षेची बखर: 'मी' ते अधिकारी ...एक आठवणींचे मोरपीस

भाग 2: यशाची चव कडू गोड.....चकवा आणी वास्तव!!

        " काहीही होवो, शिक्षण सोडायचे नाही " हे बाळकडूच मिळालेले घरून. वडिलांनी जेवढे सांगीतले त्या पेक्षा माझी आई जास्त जिगरबाज. घरी एवढी वंचना असुनही तिची विचाराची श्रिमंती अफाट. एवढी की नवकोट नारायण गरीब भासावा. वडील फिरस्तीवर ! तर घरी आम्ही तिन भाऊ आणि आई! त्यावेळी तिला अक्षर ओळख नसूनही तिने आम्हाला अभ्यासापासुन कधीच दुर जाऊ दिले नाही. नेहमी पुस्तक घेवून बसावं लागायचं..
         गुलाब मास्तरची शाळा जणू गुरूकुलच आमच्यासाठी. शाळेचे स्वतंत्र नियम! सुट्टी राहणार तीही अमावस्या पौर्णिमेला! किंवा गुरूजी बाजारासाठी तालुक्याला गेल्यावर. लहान मुलांना सुट्टी म्हणजे कोण आनंद ! पण सुट्टीच्या दिवशीही शाळेत जाणारे आम्ही काही थोडकेच पोरं होतो!! मी आणी माझा मोठा भाऊ लहानपणापासून एकाच वर्गात शिकत होतो. कारण त्याच्या बरोबर मलाही शाळेत घातले होते एकाचवेळी .शाळेत असताना वेळप्रसंगी मार खाल्ला, पण त्यामुळे शाळेत जायचे नाही असे कधीच वाटले नाही. कारण घरी शाळेबाबत कधीच तडजोड व्हायची नाही. खायला नाही मिळाले एकवेळ तरी चालेल पण शाळा बाबतीत कधिच लाड झाला नाही.
मित्रासोबत हसत खेळत, धडपडत चौथी पर्यंत शिक्षण पुर्ण केले. गावात चौथी बोर्डाची परिक्षा होत नव्हती. ती बाजुच्या सेलू या साधारणतः चार किलोमिटर असणा-या गावात व्हायची. त्या परीक्षेला आम्ही चालत जावून हजर राहिलो. केलेल्या अभ्यासाचे व गुलाब मास्तरांच्या शिकवण्याचे फलित म्हणजे मोठा भाऊ राहुल चौथीच्या बोर्डपरिक्षेत गुणवंत विद्यार्थी ठरला. आणी झोपडीत रॉकेलच्या चिमणीने अभ्यास केला तरी परिक्षेत चांगले यश मिळते हे मनावर ठसले. आईला कोठून कळले होते माहित नाही, की शिक्षणाने प्रगती होते. घरात गुणवंत विद्यार्थी ठरलेला तिचा मुलगा यामुळे तर तीचा विश्वास वाढून गेला की शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही.अंधुक अक्षर ओळख असणारी आई आम्ही सातवीत असताना सतरा नंबरचा की कुठला फार्म भरून जर स्वतः चौथी पास होत असेल आणी आज चांगल्या पद्धतीने वाचु शकत असेल ती तर कसा हुरूप नाही येणार शिकायला!!!
             चौथी संपली आणि जिल्हा परिषद शाळेत जायला लागलो. आत्तापर्यंत वेगळ्या वळणात शिकलो होतो आत्ता एकदम औपचारिक शिक्षण! खाजगी शाळेत कमी मुलं असल्याने कंपू बनला होता पण जिल्हा परिषद शाळेत जास्त मुलं जास्त वर्ग, कडक शिस्त ! कल्याणी सरांचा तर फारच दरारा. एकदम गळाच पकडायचे त्यांना घाबरावंच लागे. अशोक गुरूजी, प्रमिला मॅडम यांच्या सोबत एक सज्जन व देव माणुस बनसोडे सर हे ही त्या शाळेत भेटले. ज्यांनी आमच्या पिढीला वळण दिले ते हे बनसोडे सर.शाळा सुटल्यानंतरही शाळेत थांबून नवोदय च्या परीक्षेची तयारी करून घ्यायचे. वडिलांना गावात येणा-या सर्व शासकीय कर्मचा-या बद्दल अपार आदर त्यातुन बनसोडे सरांनी नवोदय विद्यालयाच्या परिक्षेची तयारी करण्याबाबत सल्ला दिला .आणी मग सुरू झाला दुसरा टप्पा आयुष्याचा!!
          आम्हा दोघां भावासाठी दोन पुस्तकं आणली, घरी घड्याळ, लाइट काही नाही ..अंधारातून उजेडाकडे जाण्याची जिद्द मात्र घरच्या सगळ्यातच संचारलेली!! मग काय आई अंदाजाने दररोज पहाटे अभ्यासाला उठवायची आणी माझ्या मोठ्या मामाचा मुलगा त्यांना आम्ही आबा म्हणतो त्यांच्या निगराणीत अभ्यास सुरू व्हायचा! मोठा भाऊ तग धरून अभ्यास करायचा पण मी लहान असल्याने की काय मला झोप सहन व्हायची नाही त्यामुळे मी जरा जास्त फटके खायचो. वर्षभर अत्यंत नियमीत आम्ही दोघा भावांनी खुप अभ्यास केला . मला मोठ्या भावाने खुप काही शिकवले.(आजही तो मार्गदर्शक आहेच). माझा स्पर्धा परिक्षा क्षेत्रातील तो पहिला साथी!!! तो लहानपणी खुप घाबरट होता म्हणून मला त्याच्या सोबत शाळेत जावे लागले. आम्ही एकमेकांच्या आधाराने तगत होतो. अक्षरशः आम्ही दोघांनी मिळून पुर्ण पुस्तक पाठ करून टाकले.
                            परीक्षेची तयारी जवळपास संपत आली. तालुक्याच्या ठिकाणी जावून नवोदयची परिक्षा द्यावी लागायची गावातले जवळपास नऊ ते दहा मुलं मुली परीक्षेला बसली होती. परिक्षा एकदम जवळ आली आणी मी टायफाईडने खुप आजारी पडलो. पण तरी आम्हाला परीक्षेला जावं लागलं. पेपर खुप चांगल्या रितीने आम्ही सोडवले. परिक्षा झाली , सुट्ट्या संपत आल्या , आणी निकाल लागला !!!! गावातून सगळ्या पोरांत एकच पास !!!! तो म्हणजे माझा मोठा भाऊ!!!!!! यशाची दुसरी घटना!!! यशाची गोड चव घरच्यांना चाखायला मिळाली!! या गोड चवी सोबत मी नापास झाल्याची कडू चवही त्यांना चाखावी लागली!! एका बाजुला यशाचा चकवा तर दुस-या बाजुला गुणवत्तेचं वास्तव!!!
          एका खेड्यातल्या मुलाने सलग दोन वर्ष आपली गुणवत्ता सिद्ध केल्याने शाळेने त्याचा आणी आईवडिलांचा तत्कालीन लातुर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हाधिका-याच्या हस्ते सत्कार ठेवला . सगळा गाव त्या सत्कारावेळी हजर होता. त्या कार्यक्रमासाठी आम्हाला आईवडिलांनी नविन कपडे घेतले होते. तेही सारखेच!!!!! जणु वाटावं की दोन सत्कारमुर्ती आहेत...पण यशाने मला चकवा दिला होता आणी मोठ्या भावाच्या सत्काराचे वास्तव मला जाणीव करून देत होतं की काहीच न करता त्याच्या सारखेच कपडे घालून मी तेथे हजर आहे. लहान होतो भावाच्या सत्काराचा आनंद होता पण मी नकळत अंगावरचे नवीन कपडे लपवत होतो!!! नेमकी काय भावना दाटून येत होती माहीत नाही. पण आत्ता भाऊ नवोदयला निघुन जाणार म्हणून एकटं एकटं वाटंत होतं. शाळेची पहिली पायरीच आम्ही मिळून चढलो होतो. आणी पाचवी पर्यंत एकमेकासोबत सावली सारखे एकमेकांच्या आधाराने राहिलो होतो. तो सत्काराचा दिवस खुप काही सांगुन आणी शिकवून गेला. आणी मला एकटं पडावं लागलं मोठा भाऊ सुटला आणी मला अचानक मोठं होवून लहान भाऊ निशांत ची तिच मोठ्या भावाची जबाबदारी घ्यावी लागली.
                मोठा भाऊ नवोदय साठी निघुन गेला तेंव्हा आनंदही झाला, चला किमान त्याला तर चांगली शाळा मिळाली. त्याला तेथे बुट, चप्पल, कपडे,चांगले पुस्तके मिळतील . आमच्या पैकी एक जण चिखलातुन मुक्त व्हायच्या मार्गावर मार्गक्रमण करायला निघाला होता...पण माझी वेळ अजुन यायची होती...! अजुन जास्त टाकाचे घाव सोसायचे होते...एक वादळ माझी वाट पहात दबा धरून बसलं होतं झडप घालण्यासाठी आणी मीही माझ्या नव्याने फुटू पाहणा-या पंखांना धार लावायला घेतलं होतं...आता एकट्याने लढावं लागणार होतं....संघर्ष माझ्या ' पाचविला पुजला ' होता जणु............ परिस्थितीचा हातोडा टाकावर घाव घालायला सज्ज होत होता आणी मी स्वतःच टाक धरून त्याला आव्हान देत होतो. कधी झुरत....कधी स्फुरत...(क्रमशः )
(प्रताप )

1 comment:

  1. मी तर खूप भाऊक होऊन गेले प्रताप,पुढचे भाग लवकर सेंड कर

    ReplyDelete

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...