Wednesday, October 20, 2021

दिगंत बिलगून घ्यावा....

घडवावे ऐसे शब्द
जणू जिव वेचावा
निःशब्द कवितेमधूनी
भाव तिथे पोहचावा

होवून जावे चंद्र 
भारून द्यावा दिगंत
नजरेच्या पोर्णिमेला
अवसेची कसली खंत?

एक गीत पेरावे
हाका-याचे घेवून सुर
झाड जणू बहरावे
माळरानी खुप दुर 

नदीस यावी भरती
सागरास यावे भरते
व्हावे ओथंब अश्रू 
तु ढाळण्या पुरते

दिन असा उगवावा
जणू सांडला बहर
व्याकुळ व्हावे सारे
तुझे अवघे शहर..

हाक घुमावी रानी
थवे परतूनी यावे
मुठीतल्या अंधाराला
चांदण्याने उचलून घ्यावे

रात निघे अनवाणी 
चंद्र नभी दिसताना
तु दिगंत बिलगून घ्यावा
मी समीप नसताना...
(Pr@t@p)
"रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com 
(२० ऑक्टोबर २०२१)

Tuesday, October 19, 2021

सांजपक्षी....



चंद्र सांडतो आभाळी
पुर येतो रानी
चांदण्याच्या काळजाला
काहूराची गाणी

लागे सागराला ओढ
लाटा वर येती लाटा
दुर विरून जाती
संधेच्या शामल वाटा

मी ढग सोडले मागे
पुसत निघालो खुणा
एकल्या पाऊलवाटेला 
तेच वळण पुन्हा...

अभंगी आर्ततेचे क्षण
तुझा आभास ओझर
व्याकुळ फुलासाठी
फांदीस फुटावा पाझर

मी रेखत असता मुक
आभाळावर चांदणनक्षी
मनात विहरत असतो
आठवांचा सांजपक्षी...
(Pr@t@p)
"रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com 
(१८ ऑक्टोबर २०२१)

Sunday, October 17, 2021

फुलसुगंध...

मनी दाटते सय
मज वाटे विरह भय
माळावरच्या धुळीत
माळाचा हो विलय!

दिस मंदावे मुक
रातीत सांज बुडे
चांदण्याच्या छायेतुन
चंद्र निघाला पुढे

हात तुझे उजळले
माळाची स्पर्शून माती
किरणातुन झरणारा जेंव्हा 
चंद्र दिला मी हाती

हवा गोठली वृक्षातुन
वा-यावर गंध पसरे
फुल कोणते फुलले?
फांदीवर सोनेरी हसरे

मनात कल्लोळ गाथा
ये सय लोचनी
नयनांनी अलगद करावी
बहराची आसूस वेचणी

चंद्र तुझ्या स्मरणाचा
पुनव बनून जातो
जिव असा रातीचा
मुक शिणून जातो

तुझा इशारा होता
फुल अलगद गळते
गुज असे का उगाच
परक्याला आपसुक कळते?

माळाची उडती धुळ
माळावर किरण पडलेले
मी उचलून घेई फुल
धुळीवर मन जडलेले...

फुलास लगडलेला
मातीचा किरण गंध
चंद्र पेरतो अवकाशी
तुझा फुलसुगंध.....!!
(Pr@t@p)
"रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com 
(१७ ऑक्टोबर २०२१)

Saturday, October 16, 2021

न लागे ठाव..

स्वप्नावर सांडे चंद्र
चांदण्यास आला पुर
घर कुणाचे दुर?
झोंबे काकुळतीचा सुर

रातीवर येऊन सावली
अंधार दसदिशा वाही
मोडून पडता ग्वाही 
वाट कुणाची पाही?

नजरेवर दाटे आस
चंद्र उदासे झरतो
वारा उधाण फिरतो
बहर असा का झुरतो?

माळरानावर माती
वा-यावर अलगद उडते
दाराला हाक अडते
रातीला स्वप्न पडते

चंद्र निघाला सजने
चांदण्या पडती मागे
रात अशी का वागे?
उसवत निद्रा धागे

घर धुक्यात हरवे
गुंतुन जाती वाटा
पायरव हा खोटा
स्वप्नांच्या अनंत लाटा

चांदण्याचा घेवून रंग
ढग निघाले गावा
गोकुळ करते धावा
मुक जाहला पावा

आस मनास लागे
रात अशी ही वैरी...
कालिया डोहात जहरी
यमुनेत कृष्ण लहरी

भास असा सुरीला
राधा घेई धाव
मनात कृष्णभाव
लागे त्याचा न ठाव.....
(Pr@t@p)
"रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com 
(१६ ऑक्टोबर २०२१)


Sunday, October 10, 2021

व्याकुळ एक अभंग....

झाडांनी चंद्र नेसला
चांदण गंधफुले
बंद जाहल्या नयनी
सांजघडी ही खुले

ढग गोठल्यावेळी
धुक्यास दाट पिसे
ओंजळीत कुणाच्या
चंद्र, सांजबावरा दिसे?

गाव अंधारी बुडला
फुलवातीचे दिवे
गाई पेरत गेल्या
आर्त कापरी दुवे..

दुर निमाल्या हाका
अंधार कंच निथळे
नंदादिपाची सावली
गाभारा मुक वितळे

हिरवटीचा मोसम
धुक्यात हरवून जाई
कोण निघाला गावा?
वाट विराणी गाई

दिवे पेटले सजनी
पानातुन थंडी झरते
वातीच्या काळजातुन
ओंजळही ...थरथरते....

मंद वाहतो चंद्र
रातीत दडले रंग
कवितेला फुटतो मग
व्याकुळ एक अभंग...
(Pr@t@p)
"रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com
(१० ऑक्टोबर २०२१)


राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...