Sunday, February 27, 2022

चैत्र निरोप....

हा कस्तुरी गंध
हा फुलांचा ताटवा
गेल्या शिशिरास कुणी
या बहरास भेटवा...!

हा अबोल रंग
ही गडद गुलाबी रेषा
शिशीर घेवून गेला
फेरली नजर भाषा

हा व्याकुळ वळणी रस्ता
वाट भेटते पावली
या शब्दफुलांच्या सड्यात ..
उमटते तुझी सावली..

मी पाहतो झाड
फुले मुळाशी पडले
निरोप कुठला टिपण्या
पक्षी दिगंती उडले

पुढल्या चैत्रापुर्वी
पाखरांनी निरोप आणावा
मग चैत्र बहर फुलांचा 
अवकाशात भिनावा.....
▪ (Pr@t@p)▪
"रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com 
(२७ फेब्रुवारी २०२२)

अमृतलिपी-मराठी

"अमृतलिपी-मराठी"

"भाषा ही आमच्या पिढीजात जिवनाचा साररूपी अखंड प्रवाह असते" ती निव्वळ ध्वनी व वर्णाची गुंफण नसून ती अनेकाभिव्यक्त साधनापैकी सर्वोत्तम सर्वमान्य साधन आहे. जगातील कुठलीही भाषा टिकणे हे त्या -त्या काळातील समाजासाठी वरदान असते. कारण भाषा एका दिवसात तयार होत नाही ती पिढ्यानपिढ्याचे शहाणपण, सुज्ञपण,व्यवहार, भावभावना याचा एक जिवंत प्रवाह असतो..आपल्या पुर्वजाचे व वर्तमान ज्ञान आपणास मिळण्यासाठी भाषा हे एकमेव माध्यम असते...मराठी ही अशीच एक अमृतवाहिनी भाषा.....
प्राकृताच्या मुळारंभापासून,म्हाईमभट,स्वामी चक्रधर,शिवकालीन बखरी,आज्ञापत्र, संत-पंत-तंत ते प्रमाणभाषा,बोलीभाषा ते आजची बहूभाषेचा प्रभाव झालेली व समाजमाध्यमावर वापरली जाणारी मिश्रित भाषा हा तीचा प्रवास... कविता, ललित,कादंबरी, लावणी,अखंड,अभंग,निबंध,कवने,लावणी ते लोकसाहित्यातील भुपाळी,भुलाबाई,दशावतार असे नानाविध तीची रूपे...पशू असलेल्या माणसाला समकालीन जगाशी जोडण्याचे मुलगामी साधन म्हणजे भाषाच असते..ती व्यवहारात व चिंतनात आपणास जगवणारी व तगवणारी आई असते...ती असते म्हणून आपणही तगतो...तीच्या शिवाय जगणे नाही...ती कुठल्याना कुठल्या स्वरूपात आपल्याला तगवतेच उदाहरणार्थ दृष्टीविहीनास कळणारी स्पर्श व श्रवणाची भाषा,मुकबधिरास समजणारी संकेताची भाषा...भाषा..जिवनरेषा....
त्यात अमृतलेणी असणारी आपली समृद्ध मराठी भाषा...ती कधी ज्ञानीयाचे पसायदान तर कधी तुकोबाचा अभंग बनते,ती कधी ज्योतीबाचे अखंड तर कधी साऊची बावनकशी सुबोध रत्नाकर असते,ती कधी बालकवींची हिरवे हिरवे गार गालीचे तर कधी दलितांच्या विद्रोह व वेदनेची भाषा असते..ती कधी बालसुलभ तर ती कधी आईने माहेरच्या आठवणीत गाईलेली जात्यावरची ओवी असते....ती सुर्वेंची कामगार वाणी तर कधी फकिराचा विद्रोह आणनारी परिवर्तनरेषा असते...ती आंबेडकरांचा वैगुण्याविरूध्दचा लढा तर कधी साने गुरूजींची कोमल हळवी भावकथा होते...ही भाषा समृद्धीचा झरा आहे तो जिवंत ठेवणे आपल्या सर्वांची जबाबदारी ठरते ...कारण एक भाषा संपणे म्हणजे अनंत पिढ्याच्या संचित शहाणपणाशी आपली ताटातुट ठरलेलीच.....!! तीच्या वैविध्याचा सर्वांगीन आढावा हा एवढया संक्षिप्तस्वरूपात अशक्यच.....!
कुसुमाग्रजांच्या पृथ्वीचे प्रेम ते ग्रेसांच्या नादमयी सांध्यपर्वातील वैष्णवी  ते अलीकडील समाजमाध्यमावर तीचे नवसंकल्पनीय रूप असणारा प्रवास....ती तगली पाहीजे...ही पिढीजात संचिताची ठेव जगली पाहिजे....ही आमची राजभाषा,मातृभाषा, भावभाषा,ज्ञानभाषा, व्यवहारभाषा,बोलीभाषा,प्रमाणभाषा,अभिव्यक्तीभाषा,संवादभाषा म्हणून उत्तरोत्तर वृद्धींगत झाली पाहिजे....
मराठी संवर्धनाच्या संकल्पनेसह मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
▪ (प्रताप)▪
"रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com 
(२७ फेब्रुवारी २०२२)

Thursday, February 24, 2022

एकली सावली मागे....

हे व्याकुळ झाड उभे
पाखरांच्या गाठीभेटी
सावलीचे पाय पाण्यात
एकट तळ्याच्या काठी

पाण्यावर उमटे चांदणे
झिरमीर तरंग वाहे
मी पुनवेच्या ओंजळीतुन
टिपून घेतो दोहे

या शब्दांना कवच
हे अजून उमलून येती
कवितेच्या दिपमालेत
सजता आठवण वाती

हे काठ तळ्याचे खचता
पाणी होते खुले
चंद्र मातीत झरूनी
बनतो निशीगंधाची फुले

हा गंध,हा चंद्र...
ही तळ्यात पुनव बुडते
वाट चुकले वासरू
गायीच्या कंठी रडते

तो सुर व्याकुळतेचा
शब्दातुन करतो धावा
चंद्र मातीत भिजलेला
उचलून ढगांनी घ्यावा

गाव निजेस बिलगे
रस्त्यावर डोळे माझे
सड्यातुन निशीगंधाच्या
मुरली कैसी वाजे?

अदमास तुझा घेता
फांदीवर पक्षी जागे
एक एकला चंद्र वरती
अन् एकली सावली मागे....
▪ (Pr@t@p)▪
        "रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com 
(२४ फेब्रुवारी २०२२)

Saturday, February 19, 2022

बहर तुझ्या मग गावी...

ही प्रकाशधुळ उडती
ही सुर्बूडीची दिशा
अंधारात बुडल्या वाती
पेटवाव्या कशा?

काळीज अंथरून यावेळी 
सांज बहरते कशी?
झाड वाहते फुल
येत्या झुळकीनिशी

मी दिर्घ निःश्वासाचे कोडे
एकांती घेवून बसतो
चंद्र करूण होऊन
चांदणीला पाहून हसतो

दुर धुक्याचे आर्त
कसले गीत सजते
कोसळले फुल शिशिरी
वसंत होवून रूजते

मी काढतो शब्दवही
शब्दांचे रान पेटते
अनंत व्याकुळ हाकातुन
एक कविता भेटते

नखशिखांत देखण्या वेळी 
मग चंद्रही उभा पेटतो
शब्दांच्या चांदण्याखाली
नव्याने मला मी भेटतो

कधी यावे तुही लगबग
या चंद्र पेटल्या वेळी 
मी भरून द्यावी शब्दाने
तुझी रिकामी झोळी 

गीत नभात रूजावे ऊंच
चांदण्याला फुले यावी
मी इथे वाहील्या फुलांचा
बहर तुझ्या मग गावी......
▪ (Pr@t@p)▪
"रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com 
(१९ फेब्रुवारी २०२२)

...सन्मती दे भगवान!

.....सन्मती दे भगवान !

काल सांयप्रार्थने पश्चात
गांधीना हळुवार विचारले
बापू ! राम कसे आहेत?
उजव्या हातात
कृश छातीत लागलेल्या तिन गोळ्यांची
रिकामी काडतुसं घोळवत..
नौखालीतल्या दंगाशमनाच्या प्रार्थनेची
पवित्रता मनात चाळवत...
बापू नि:शब्द राहिले.....!

सत्याग्रही बाण्याने
धिर धरून पुन्हा विचारले..
सविनय मनाने
बापूंना हक्काने पुकारले...

'राम ! यथास्वरूपी थोर आहे
पण नव्याने प्रकटलेल्या भक्तांचा
खरा येथे घोर आहे'
बापूचा मृद स्वर...!
पंचा सावरत गांधी बोलले
काडतुसांचे वजन पुन्हा तोलले...
'हिजाब,खानपान,..खतरे मे।
आणी लव्ह जिहादचे थेर
कोणास नसे रे चिंता
उघड्यावर शबरी बोर...
..रामाचा बाणा विसरून
निव्वळ बाण रोखते हात
नवभक्ताची वाढलेली ही
आंधळी एक जमात...!'
हळुवार उठत,पंचा सावरत
गांधी म्हणाले 'निघायला हवे!'
माझ्या हत्येच्या सरावासाठी
पोस्टर पोहचवायचेत नवे!

मी म्हणालो 'बापू!'
कशाने येईल हो?
या आंधळ्याना भान?
पाठमोरे गांधी गात निघाले....
'रघूपती राघव राजाराम
सबको सन्मती दे भगवान...!!!'
(प्रताप)
१०/२/२०२२
#गांधी वचन


आमीन राजे आमीन!!

राजे ! मुजरा!!
"आओ मौलवी साहब।
सब ख़ैरियत?"
मौलवी साहेबाची खिन्न नजर...
"राजे ! आपण होतात
खुशहाली थी।
आपकी तारीख़ मे
ना किसी भगवान का घर गीरता,
ना कोई बहू बेटिया शरमिंदा ।"
सभी को गले लगाने वाला
आपका दरिया दिल सिना।
समशेरीसही नाज वाटावा ऐसे
आणी 'कुराण-ए-पाक' को भी 
अदब से उठाने वाले आपके हात
माशाल्लाह!......राजे....!!
अब माहोल वैसा नही लगता ।"

"हल्ली ऐकतो आहोत आम्हीही!
मौलवी साहब! 
रयतेच्या भरवशावर 
स्वराज्य सोडून येताना,
धावपळीच्या जिंदगीत
एक आज्ञापत्र काढायचं राहिलं....
वाटते याच का अट्टहासाने
आम्ही स्वराज्यासाठी रक्त वाहिलं...?
रयतेस कळायला हवं 
"बेदीलीस आम्ही 
कधीच राजी नसतो...
....असो! मा ! जगदंब !!
रयतेस सद्बुद्धी देवो...!!"


"आमीन!!" राजे!आमीन!!

(प्रताप)
१९ फेब्रूवारी २०२२
#रयतप्रेमी, प्रजाहितदक्ष राजेंचा जन्मोत्सव#

Monday, February 14, 2022

चाहुलीचे ऋतू...

चंद्र निळाई राती
झाडास पालवी फुटे
दुर माळावरती दुव्याचा
निळा तारा तुटे

तुटला तारा गातो
निळे गीत उद्याचे
काळीज वाहत निघते
भिजल्या दुर नद्याचे

विव्हल तिराची भाषा
सागर तळात बुडते
पुनवेच्या चंद्राखाली 
चकोर जोडी उडते

ही ओंजळ भरून जाते
चांदण्याचे शुभ्र फुल
रातीवर जडत असते
चंद्राची निळी भुल...

निळ्या चंद्र उजेडी
सारे असता विझले
हळू उचल पावले
चांदणे नुकते निजले

चाहूलीचे ऋतू पेरून
रातीचा बदले रंग?
निळ्या आभाळी चंद्र 
होतो निळा दंग....
▪ (Pr@t@p)▪
"रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com 
(१४ फेब्रुवारी २०२२)

Saturday, February 12, 2022

त्या शुष्क झाडाखाली....

त्या शुष्क झाडाखाली
पानांचा आत्मा झुरतो
जिव तयांचा हिरवा
फांद्या मधूनी फिरतो

हे सुकले फुल पिवळे
जणू सोनेरी सडा
खोडाच्या सालीला 
शिशिराचा काळीजतडा

ही हवा कुण्या दिशेला
वसंत फुलवण्या गेली?
वाळल्या पानातुन वाहे
जखम गंधीत ओली

शिल्प वितळती थंडी
फांद्यास तुझा वारा
झाडांच्या मनात चमके
एक निढळ ध्रूवतारा

मंद सुरांचा साज
वसंत दाटून येतो
मी फुले वसंतरंगी
झाडांना वाटून येतो

वसंत माझा सृजनक
झाडांस तुझ्या दान
मी उचलून पुढे निघतो
एक वाळके ..पान....
▪ (Pr@t@p)▪
"रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com 
(१२ फेब्रुवारी २०२२)

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...