हे व्याकुळ झाड उभे
पाखरांच्या गाठीभेटी
सावलीचे पाय पाण्यात
एकट तळ्याच्या काठी
पाण्यावर उमटे चांदणे
झिरमीर तरंग वाहे
मी पुनवेच्या ओंजळीतुन
टिपून घेतो दोहे
या शब्दांना कवच
हे अजून उमलून येती
कवितेच्या दिपमालेत
सजता आठवण वाती
हे काठ तळ्याचे खचता
पाणी होते खुले
चंद्र मातीत झरूनी
बनतो निशीगंधाची फुले
हा गंध,हा चंद्र...
ही तळ्यात पुनव बुडते
वाट चुकले वासरू
गायीच्या कंठी रडते
तो सुर व्याकुळतेचा
शब्दातुन करतो धावा
चंद्र मातीत भिजलेला
उचलून ढगांनी घ्यावा
गाव निजेस बिलगे
रस्त्यावर डोळे माझे
सड्यातुन निशीगंधाच्या
मुरली कैसी वाजे?
अदमास तुझा घेता
फांदीवर पक्षी जागे
एक एकला चंद्र वरती
अन् एकली सावली मागे....
▪ (Pr@t@p)▪
"रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com
(२४ फेब्रुवारी २०२२)
No comments:
Post a Comment