Thursday, February 27, 2020

स्पर्धा परीक्षेची बखर: 'मी' ते अधिकारी ...एक आठवणींचे मोरपीस भाग 23: झाले मोकळे आकाश.......!!!


स्पर्धा परीक्षेची बखर: 'मी' ते अधिकारी ...एक आठवणींचे मोरपीस

भाग 23: झाले मोकळे आकाश.......!!!

                मुलाखत होवून गेली होती,नविन पुर्व परिक्षा आली होती तिची तयारी सुरू होती, अभ्यास वेगात सुरू होता,पण मन सतत लागलेलं असायचं ते मुलाखतीचा निकाल कधि लागेल. अभ्यासाची जुनीच पध्दत होती,सर्वांनी मिळून अभ्यास करायचा, तांदळे सर, अतुल पाटील,संदिप जाधव,अरूण पोतदार,अशोक मोहाळे,संजय औताडे सगळे जण एकत्र अभ्यासाला बसायचो,चर्चेसाठी मग दिनेश झांपले सर, विजय कबाडे हे येत असायचे..मी विजय आणी तांदळे सर शिकवायला जायचो. क्लास मधे शिकवताना अनेकजण मन लावून शिकायचे,विविध पार्श्वभूमीचे, परिस्थितीचे मुलं अभ्यास करायचे...सर्वांचा विश्वास होता आम्ही सिलेक्ट होणार! कारण तसे होणे हे त्यांना झुंजण्याचे बळ देणार होते..त्यांनी आमच्यावर लावलेल्या अपेक्षा पुर्त होणे ही त्यांचे मनोबल टिकवणार होते. खुप दबाव यायचा कसा लागेल निकाल,काय होईल, कोणती पोस्ट मिळेल की पुन्हा सारे मुळातुन करावे लागेल? दररोजचा दिवस जड जायचा,मन लागायचे नाही, सारे होते सोबत म्हणून दिवस रेटायचे बळ होते...राजेंद्र यायचा बोलून जायचा...लागेल बे! वाट बघ! सांगायचा...क्लास मधील मुले, आम्हाला फाॅलो करणारे विद्यार्थी, घरचे लोक सगळे सगळे अपेक्षा ठेवून होते....

              दरम्यानच्या काळात मोठा भाऊ काही तरी धडपड करत होता, तो कलाक्षेत्रातील असल्याने त्याला स्पर्धा परिक्षा वगैरेत मन लागायचे नाही तरीही त्याला बळजबरीने क्लासला बसायला सांगायचो..तो बसायचा पण रूम वर आल्यावर तेच पेंटींग, स्कल्पचर,आर्टिस्टीक क्रिएशन यातच तो रमायचा..सतत त्याच्या डोक्यात असायचे की याच क्षेत्रात त्याला करिअर करायचे आहे. माझ्या घरच्यांना वाटायचं की त्यांनेही माझ्या सारखा अभ्यास करावा.कारण चौथी बोर्डातली त्याची कामगिरी व नवोदयच्या परिक्षेत त्याने जिल्ह्यात सिध्द केलेली त्याची गुणवत्ता, त्यामुळे त्यावेळी त्याचा गावात जिल्हा स्तरीय अधिका-या मार्फत झालेला सत्कार, 12 पर्यंत नवोदय विद्यालयात झालेले शिक्षण यामुळे घरच्यांना(अर्थात मलाही)वाटायचे हा हुशार आहे यांना पण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायला हवा. खरंतर ही कुटुंबाची गरज होती जी त्याच्या इच्छेवर थोपवली जात होती.तो मला म्हणायचा' मला आर्ट क्षेत्रात करिअर करायचे आहे,मलाही वाटायचं पण पर्याय नव्हता...तो निमूट क्लास मधे येवून बसायचा.त्याचे त्याच क्षेत्रातील मित्र त्याला भेटायचे..या छंदासाठी त्यांना बिए नंतर एटिडी या कोर्सला अॅडमीशन घेतले होते. व ती पदविका मिळवली होती.कंपनीत काम करणे,पेजर ऑफिसमधे काम करणे, कला क्षेत्रातील दुकानावर सहाय्यक म्हणून काम करणे,गणेशोत्सव व इतर प्रसंगी डिझाईनचे मखर बनवून विकणे,त्यातुन त्याने आपला संघर्ष आणी आवड जतन करून ठेवली होती. असेच एके दिवशी त्याचा मित्र शरद पुणे आला त्याने सांगितले "राहूल,केंद्रीय विद्यालयाच्या आर्ट टिचर च्या जागा निघाल्या आहेत, खुप कमी जागा आहेत आमच्या कॅटेगरीला जागा नाहीत, मी फार्म घेतला आहे तु भर" त्याने तो फार्म दिला,भैय्याने घेतला, पाहिले , दोनच जागा आहेत, तरी किमान आर्ट टिचर च्या जागा आहेत हीच त्याच्यासाठी अभिप्रेरणा होती...त्याने तो फार्म भरला..कसा अभ्यास करायचा याचे डिस्कशन व्हायचे,कशाचा अभ्यास करायचा हे त्याला माहीत होते,MPSC च्या क्लास मधे बसून त्याला ब-यापैकी जनरल स्टडीज माहिती होते. सिरीयस होवून त्याने अभ्यास केला...त्याची परिक्षा मुंबईला होती.मित्रांकडून उसने घेवून,काही त्याचे काही माझे असे पैसे जमा करून तो परीक्षेला गेला...परिक्षा झाली...

             आमची दुसरी पुर्व परिक्षा झाली...आता फक्त प्रतिक्षा..मुलाखत दिलेल्या निकालाची,झालेल्या पुर्व परीक्षेच्या निकालाची, सोबतच राहुल भैय्याने दिलेल्या दिलेल्या परीक्षेची ..हा काळ कसा होता वर्णनच करू शकत नाही..दरम्यानच्या काळात PSI परीक्षेचा निकाल आला लातुर मधून खुप चांगले निकाल आले,जेथे शिकवत होतो तिथल्या क्लासचे निकाल तर आलेच पण आमच्या ग्रूप मधून रोहिणी पोतदार(अरूण पोतदार यांची बहीण) ही प्रथम प्रयत्नातच PSI झाली. लातुरभर आनंद पसरला. स्पर्धा परीक्षेची तयारी करणा-यासाठी मनोबल वाढेल अशी पहिली भरिव घटना!! खुप चांगले लक्षण असलेली ही घटना होती. दरम्यानच्या काळात राहूल माकणीकर सर(मुळचे लातुरकर, सध्या DCP नागपूर तत्कालीन STI परीक्षेतील महाराष्ट्राची दंतकथा, पुणे ज्ञान प्रबोधिनीत व सबंध महाराष्ट्रात ज्यांनी कित्यकांना शिकवले होते,शिकवत होते), यजुवेंद्र महाजन सर(दिपस्तंभ क्लासेस), रंजन कोळंबे सर असे किती तरी दिग्गज लातुर मधे शिकवायला यायचे. मुलांना शिकवायचे.तेथील मुलांची तयारी पाहून खुश व्हायचे. कोण शिकवतात तुम्हाला म्हणून लातुरात शिकवणा-या आम्हा सर्वांचे कौतुक करायचे. प्रचंड आत्मविश्वास वाढला, कधी कधी अशा दिग्गजांचे व आमचे हाफ हाफ डे सेशन व्हायचे, मी,राजेंद्र ढाकणे,तांदळे सर, विजय कबाडे, अरूण पोतदार असे सारे शिकवायला जायचो, त्याच काळात प्रकाश कुलकर्णी सर( सध्या सहाय्यक आयुक्त विक्रीकर ज्यांनी 2002 च्या अॅटेम्प्ट ला डेप्युटी कलेक्टर रॅकचे मार्क्स घेवूनही त्या जाहिरातीत निव्वळ 78 च पोस्ट असल्याने DY SLR हे सिलेक्शन मिळवले होते), धन्वंतकुमार माळी सर(DY CEO सध्या बिड जिल्हा परिषद- वारंवार अपयश येवूनही,सात्याने प्रयत्न करून ज्यांनी महाराष्ट्रात तिसरे येण्याचा बहुमान मिळवला,व ज्यांची शाळा पहायला जिल्हा स्तरीय अधिकारीही उत्सुक असायचे असे आदर्श शिक्षक), त्यांचे मित्र भांबरे सर(जि.प. शिक्षक), महेश वरूडकर सर ( सध्या अवर सचिव), जुना सहकारी अतुल कुलकर्णी (सध्या कक्ष अधिकारी), सुधीर पोतदार सर( ज्ञान प्रबोधिनी लातुर चे संचालक), दयानंद सोमवंशी सर( सोहम क्लासेस चे संचालक), विद्याधर कांदे सर ( फिनिक्स अॅकेडेमीचे संचालक) व ईतर असे सारे जण शिकवत होतो. अख्खं लातुर जिव तोडून शिकत होतं आम्हीही जिव तोडून शिकवत होतो( आमच्या मुळे असा माझा तरी बिल्कुल दावा नाही मुलामुलींच्या स्वतःच्या प्रयत्नानेच पण त्याकाळात व नंतर लातुर मधून खुप सारे सिलेक्शन झाले त्यात थोडेफार योगदान मीही देवू शकलो हे अत्यंत समाधान.)

                त्या दरम्यान राहूल भैय्याचा निकाल आला, तो मुलाखतीला पात्र झाला होता. खुप आनंद झाला एवढ्या कमी जागा असतानाही तो पास झाला होता.त्याचा इंटरव्ह्यु दिल्लीला होता.त्याच्या इंटरव्ह्युची खुप चांगली तयारी करून घेतली.त्यानेही ती खुप मन लावून केली. सा-या त्याच्या मित्रांनाही आनंद झाला होता. त्याची खुप चांगली तयारी झाल्याने तो दिल्लीला जाऊन मुलाखत देवून आला. त्याची मुलाखत चांगली झाली. त्याने केलेली तयारी, त्याच्या सोबत झालेली चर्चा या सर्वांच्या आधारेच मुलाखत झाली. काही प्रश्न चर्चेतलेच आले, अचानक आम्ही दोघेही मुलाखत स्तरापर्यंत पोहचलो होतो. घरात तर खुपच आनंदाचे वातावरण होते. पण ते व्यक्त करण्याची एक मर्यादा होती, कारण तो काय, मी काय आम्हा दोघांचेही फायनल निकाल लागलेले नव्हते,घरच्यांना आशा होत्या पण अव्यक्त! कारण निकाल नकारात्मक लागला तर?? खुप मोठा अपेक्षाभंग झाला असता. आमच्या निकालाच्या कल्पनेने आई वडील ही थोडेसे चिंतायुक्त होते पण तसे ते दाखवायचे नाहीत. काय करणार त्यांना आमचा अभ्यास, तयारी याची चर्चा करण्यासाठी कोणी नसायचे, आणी जे करू शकतील अशा लोकांकडून त्यांना तशी संधी मिळायची नाही. गरीबांची स्वप्नेही दबकी असतात....निमूट पहायची..वास्तवात आली तर डंकाच!!! पण नाही आली तर दबके दुःख....आणी उपहास...इज्जतीला जपणारे माझे आईवडील कोणी उपहास करू शकणार नाहीत एवढ्याच मर्यादेत व्यक्त व्हायचे..त्यांना खात्री होती काही तरी नक्कीच चांगले होईल पण ते व्यक्त करू शकत नव्हते...तसेच आमचेही!! पण तरीही हे माझे माझ्या मर्यादे विरूध्द पुकारलेले बंड होते..जे मला जिंकायचेच होते..मी करणार नव्हतो...जिथे कल्पनाही होवू शकत नव्हती अशा ठिकाणी मी स्वप्न पाहीले होते...आणी निव्वळ ते पाहून मी थांबलो नव्हतो तर जिवाच्या आकांताने, जवळपास काहीच सामुग्री नसण्याची अवस्था असतानाही मी या टप्प्यावर आलो होतो...मी हरणार नव्हतो. मी सुरूवातच जिंकण्यासाठी व मर्यादा लांघण्यासाठी केली होती...मुळात राज्यसेवा परीक्षेची तयारी करायची हे ठरवणेच मुळात एक मर्यादा तोडणे होते....आणी मी तर आता एवढ्या दुर आलो होतो...आता थांबणे नव्हतेच!!!
                दरम्यानच्या काळात निलराज बनसोडे(जलसंपदा विभाग),आलोक चिंचोलकर( तलाठी), किशोर गवळी, हे पण कालेजचे क्लासमेट व अत्यंत जिवाभावाचे मित्र अभ्यासाला बसू लागले, काही मित्रांचे लहान भाऊ, काॅलेजचे सिनीयर, ज्युनिअर, गावातले मित्र हे ही क्लासला येवू लागले, त्यांना शिकवत होतो, योगदान देण्याचा प्रयत्न सुरू होता. एक काळ होता की सा-या लातुरला वाटायचे हा मूर्खपणा आहे की लातुर मधे राहून MPSC करणे..पण आता तेथेच खुपजण अभ्यास करू लागले, दरम्यानच्या काळात लातुर SP ऑफिसची लायब्रेरी व स्टडीरूम बंद झाल्याने आम्ही लातुरच्या नगरपरिषदेच्या वाचनालयात ही (टाउन हाॅल) अभ्यास करून दुसरी पुर्व परिक्षा दिली होती.

            लातुरात चिकनगुनियाची साथ आली होती, ग्रामीण भागात त्याने थैमान घातले होते. त्यात आईला त्या आजाराने ग्रासले. ती खुप आजारी पडली, त्या आजारात व्यक्तीला सांध्याचा त्रास होतो,धड उठता बसताही येत नाही ती झोपून रहायची,वडील घरकाम करायचे, तीला दवाखान्यात नेवून आणले पण तरीही ती आजारीच होती. पहायला गेलो..घर पडके असेल तरी चालते पण माणसे पडलेली नसावीत..पण आई आजारी होती.घरी थांबायला लागु नये आम्हालाही ती लगेच जायला सांगायची, वडील ही थांबू देत नव्हते. खुप निराशा येवू लागली.निकाल नाही, कसं होणार याची कायम टांगती तलवार..मी आणि मोठा भाऊ दोघेही खुप परेशान होतो...कसा तरी स्वयंपाक करायचा, खायचा, अभ्यास..पुर्व परिक्षा होवून गेल्याने क्लासेस ही नाहीत...काहीतरी खटाटोप करावी म्हटले तर अभ्यास सुटेल वाटायचे..खिशात गेल्या 7 दिवसापासुन फक्त तिन रूपये शिल्लक होते..वावड्या उठत होत्या निकाल लागणार आहे, लवकरच लागेल...रूम बदलली..फक्त ठिकाण..पण तशीच पत्र्याची.. अगोदरच्या पेक्षा स्वस्त...जेथे पोटासाठी आलेले परराज्यातील मजूर मुलेही आमच्यापेक्षा चांगल्या रूममधे राहत त्या गल्लीत...आणी तिचेही चार महिन्याचे भाडे थकलेले...

         एके दिवशी असाच बरिश्तावर गेलो, त्या दिवशीही निकाल लागेल अशी चर्चा होती..रहिमभाई हाॅटेलवर होते..काही असो पण कोणाला उधार मिळो की न मिळो हिमायतभाई व रहिमभाई मला हमखास उधार द्यायचे..कदाचित माझ्याकडे भेटायला येणारे एक तर खुप जण होते. त्यामुळे त्यांचे हाॅटेल खुप चालायचे..आणी आम्ही सारे चर्चेसाठी व व्हिजीटर्सला भेटायलाही तेथेच बोलवायचो त्यामुळे पुर्ण लातुरात बरिश्ता खुप फेमस झाले होते. आणी या दोन्ही भावांना माझी परिस्थिती व स्थिती दोन्ही माहिती होती.त्यामुळे ते मला खुप प्रेमाने, आदराने व अभिमानाने वागवायचे..मीही झालेली उधारी मी अत्यंत नियमीत द्यायचो.मुलं भेटायला यायचे, मित्र भेटायला यायचे त्यामुळे MPSC करायचीय का? बरिश्तावर जा! असा सल्ला नविन लोकांना मिळायचा.माझा अभ्यास आणी बरिश्ता जवळपास एकदाच सुरूवात झाली... होती.. .गेलो..बसलो..एकटाच होतो..खुपवेळ एकटाच बसलो.सगळेजण येणार होते... वाट पाहत होतो..तेवढ्यात काॅलेजचा एक जुना क्लासमेट खुप दिवसानंतर भेटला, एका संस्थेवर शिक्षक होता, सोबत गावातले प्रतिष्ठित लोक होते. SP office मधे काम असल्याने तो तेथे आला होता, त्याने विचारपूस केली, सोबतच्या लोकांशी ओळख करून दिली..आणि सोबतच त्यांना सांगीतले " हा खुप हुशार पण मुर्ख ठरलेला माझा जिगरी दोस्त ! त्याचवेळी 12 वी झाल्यास याला म्हटले होते डी एड कर पण केले नाही. MPSC करत बसला, आज बघ मी, शेतात बोअर केला, चांगले उत्पन्न होते, नोकरी आहे. तु ही सेटल झाला असतास आत्तापर्यंत, ते MPSC करायला ईथुन होत नाही बाबा,ते आपलं काम असत नाही, आपण खेड्यातले लोक आहोत, हातानं खराबा करून घेतलास" तो खुप तळमळीने बोलत होता त्याला फक्त आपला मित्र गरीब कुटुंबातला आहे, डी एड ला नंबर लागत असुनही गेला नाही, आणी आता बेकार बसला आहे याचे वाईट वाटत होते. तो खुप वेळ बोलला..आणी आत निघून गेला.सोबतचे 2/3 जण तिथेच बाजुला बसुन राहिले.त्यांनाही माझी किव येत होती. ते अधुन मधुन माझ्याकडे पाहत होते...त्याची तळमळ पाहून मी त्याला काही बोललो नव्हतो..

                        थोड्या वेळाने सारे मित्र जमा झाले...विजय, दिनेश,राजेंद्र, संदिप तर तांदळे सर, अतुल पाटील,अशोक मोहाळे हे सगळे जण आपल्या काॅलेजला गेले होते. आज नक्कीच निकाल लागणार आहे यावर चर्चा सुरू होती, राजेंद्र फोन करून तिकडे पुण्यात कोणाला तरी बोलला...आणी म्हणाला..निकाल आहे बे आज तुमचा!! अचानक वातावरणात टेन्शन वाढले..विजय ने पण कन्फर्म केले..खात्री पटली आज निकाल आहे...वातावरण खुप तणावपूर्ण झाले होते..मी सगळ्यात असून नसल्या सारखा झालो होतो..प्रत्यकाची अवस्था तणावाची होती. संजय औताडे पण आले..याच चर्चा दर 10 मिनिटाला बघा रे, कन्फर्म करा! लागेल यार आज निकाल, काय होतंय माहिती नाही ! लागला पाहिजे रे, सिलेक्शन व्हायला पाहिजे नाही तर काही खरं नाही!!! वातावरण एकदम गरम, सुन्न, अस्थिर....तगमग तगमग नुसती...वेड्यासारखी चुळबुळ...परेशान...दबाव वाढलेला..निकाल मुंबईत लागणार, सुट्टीचा दिवस, कलेक्टर ऑफिसला फॅक्स येईल पण वर्किंग डे उजडे पर्यंत काही खरे नाही...कसा समजेल तो लागला तर..?? चिंता निव्वळ चिंता..कोणीतरी तो सांगेल म्हणून सतत इकडे तिकडे संपर्क सुरू..आणी अचानक ...
सुधिर पोतदार सरांचा फोन आला..निकाल लागला!!!! धस्स!!
अरे विचारा कोणाकोणाचे सिलेक्शन झाले?
सध्या लागला एवढीच माहीती मिळाली आहे, प्रबोधिनीत विचारत आहे..
जिव कासाविस होत होता
थोड्यावेळाने समजले
........राहुल माकणीकर -Dysp
..........महेश वरूडकर- DO
आमचा निकाल काही समजेना...राजेंद्रने त्याच्या मुंबईच्या कुठल्या तरी मित्रांला फोन लावला.....".जा..कुठलीही लोकल पकड..तु जवळच राहतोस.. MPSC ऑफिसमधे जाऊन ही नावे यादीत पहा...निघ लवकर...."
त्याचा मित्र निघाला....इकडे आम्ही राजाला दरम्यानच्या काळात अक्षरशः भंडावून सोडले..बघ रे पोहचला का? इतका वेळ लागतो का?....पोहचला असेल ना...काय माणुस आहे यार...राजा परेशान...तो मग आमचा भडिमार पाहून..इकडे तिकडे..जात होता..बोलत होता...आम्ही भांबावून दमून गेलो..इतक्यांदा विचारले होते त्याला की....आता काही का येईना रिझल्ट शांत रहा म्हणून संदिप ओरडला...येईल रे सगळंयाचा निकाल अभ्यास काही कमी होता का आपला....(अरे भाऊ तु सोड ते! मित्र पोहचला का बघ राजाचा...) शेवटी थकून बसलो...राजू बाजुला गेला होता...तो खाली मान घालून आला...(संदिप उगीच त्याला ग्यानी म्हणत नाही) चेहरा गंभीर...माझ्या काळजात धस्स!! विजय परेशान ...
यार ! तुम्ही पाहिजे त्या ठिकाणी नाहीत! क्षणात आभाळ फाटले...सुन्न.....काळीजच हलले....
आणी थोडं थांबून ओरडत म्हणाला," पण सगळे यादीत आहात बे तुम्ही........."
अर्थ लागायला क्षणभर उशिर लागला...
आणी अचानक उलगडा झाला..आपले सिलेक्शन झाले!!!!!! आपण यादीत आहोत
कल्लोळ, जल्लोष, गळाभेटी...अश्रु..हसू...सिलेक्शन झालेले परिक्षा न दिलेले...सारेच एकरूप..सारेच चिंब........
आनंद गगनात मावत नव्हता...दुःख होतेच हवे ते मिळाले नाही पण आवडीचे डिपार्टमेंटची पोस्ट मिळाली हेच समाधान....
धावत PCO कडे गेलो..गावात बाजुच्या मामाच्या घरात फोन होता..त्यावर काॅल केला..
मामाच्या मुलाने फोन उचलला
हॅलो, नितीन
अरे पिताजीला बोलंव...
थांबा बोलवतो...फोन प्रतिक्षेत, काॅइन संपला, दुसरा टाकला....मागे गोंधळ, जल्लोष सुरू होता...दुसरा काॅइन डयुरेशन संपला...टेन्शन शेवटचा काॅइन टाकला...आणी लगेच आवाज आला.."हॅलो! बोला बाबा काय म्हणता?"
आवाज कापतोय, गळा भरून आलाय," पिताजी! निकाल लागला"
तिकडून," काय मिळाले?"(किती आत्मविश्वास! कित्ती आस! काय म्हणायचं या जिगर ला?)
"नायब तहसीलदार!"
शाब्बास! बेटा,घरी या! आईला सांगतो!..गळा दाटलेला आवाज, आणी इकडे गालावर कोसळणारे अश्रु!!
(त्याच धुंदीत STD वाल्या कडून मी चौथा काॅइन घेतला आणि अजुन एक काॅल केला...तो काॅल एवढाच महत्वाचा होता...! ना त्यांनी पैसे मागितले ना मला द्यायचे भान..मागे थांबलेल्या मित्राने ते दिले)
तो पर्यंत रहिमभाईने शिवाजी चौकातुन बुके आणले होते! आयुष्यातला पहिला सन्मान!
पाॅलिटेक्नीक काॅलेज मधून मिठाईसह मित्र आले..दोन्ही भाऊ आले...नि:शब्द गळाभेट ..अंतरीचा उमाळा संयमी शांत..
                              सर्वांनी एकमेकांच्या गळ्यात गळे घालून ओल्या डोळ्यांनी शुभेच्छा दिल्या...तेवढ्या गडबडीतही..माझ्या आत गेलेल्या शिक्षक मित्रांसोबत आलेल्या लोकांना मी मिठाई दिली...त्यांना धक्का बसला होता..मी त्यांना माझ्या मित्राला निरोप द्यायची विनंती केली...आणी निघालो....ज्या चिखलाने मला दान दिले होते फुलण्याचे.. ज्या पडक्या घरात मी पडझड न होणारे स्वप्न उभारले होते..ज्या गावात माझ्या स्वप्नासाठी माझ्या आईवडीलांची परवड झाली होती, अनंत स्वप्ने जिथे त्यांनी जपली होती...पावसाळ्यात जे घर सतत पाणी चिखलात असायचं त्या घरातल्या या मोसमाच्या चिखलाला आलिंगन द्यायला मी निघालो...सोबत मित्रांचा लोंढा...त्यांना कोण आनंद मला जेवढा..त्याही पेक्षा जास्त त्यांना.सगळे दोस्तवेडे......!!
ते माझ्या आईवडीलांचा आनंद पहायला माझ्या अगोदर तयार!!
गावात पोहचलो....आई ताडकन उठून चुल पेटवत होती...ती खरंतर नि:शब्द झाली होती..वडील 10 वेळा रस्ता तपासत होते
गल्लीत वळलो...घरासमोर गर्दीच गर्दी...पावसाच्या पाण्याने वेढणारे घर गावच्या लोकांनी वेढले होते...दारात ओल्या जागेवर.. एक चटई टाकलेली होती...मी अभ्यास करतो म्हणून कधी तरी घेतलेली..एक जुनी लोखंडी खुर्ची ठेवली होती..
घर डोळ्यातल्या पाण्याने ओले दिसत होते...मी आईवडीलांच्या चिखल लागल्या पायावर डोकं टेकवत होतो...कोरडा..ठाम हात ओले डोळे पुसत पाठीवर पडत होता...आजारातुन नुकतीच बरी झालेली आई माझ्या चेह-यावरून हात फिरवत होती, कानशिलावर बोटे मोडून दृष्ट काढत होती...मी ओल्या डोळ्यांने हसता चिखल पाहत होतो....कित्येक पदर डोळ्याला लागत होते...किती तरी ओल्या नजरा हा नजारा पाहत होत्या...माझं फुललं माळरान माझी वाट पाहत होतं...... (प्रताप)
(क्रमशः)




Tuesday, February 25, 2020

स्पर्धा परीक्षेची बखर: 'मी' ते अधिकारी ...एक आठवणींचे मोरपीस

भाग 22: मुलाखत......(2)

              मुलाखत कक्ष डाव्या हाताला होता. बाहेर एक खुर्ची होती, दारावर एक शिपाई होते.आत मधे एका मुलाची मुलाखत सुरू होती. पोर्च मधे सन्नाटा होता. खाली किमान इतर उमेदवार तरी होते.समूहात असलेली मानसिक सुरक्षितता तरी होती तिथे...पण ..इथे मात्र निखळ एकटेपणा,तुटलेपणा...ही फार नाजूक अवस्था होती सर्व तयारीच्या काळातील...जर इथे भिती हावी झालीतर आजपर्यंत केलेल्या अभ्यासाचा काहीच फायदा होत नाही.राजेंद्र ढाकणे(शालेय पोषण आहार अधिक्षक) हा या बाबत जाण असलेला मित्र! सुदैवाने त्याने मुलाखतीच्या काळात स्थिर कसे रहायचे या बाबत चर्चा केली होती..मी ते आठवू लागलो...सर्व मित्रांनी दिलेले सल्ले डोक्यात आणू लागलो..तसे पाहिले तर भिती वाटत नव्हती पण दडपण होते...सहज दुरवर पाहीले ...दिनेश झांपले,विजय कबाडे थांबले होते..पाहत होते..शांत राहण्याचे व 'तोड डालो' वाले इशारे सुरू होते. मी काही क्षण डोळे बंद केले..मागील दोन वर्षाची साधना, मेहनत डोळ्यासमोर आली..आतील स्पर्धक फुरफुरू लागला..अचानक खुमखुमी दाटून आली..मी येणारे दडपण झटकले..आणी त्या दबावाच्या अवस्था जाऊन उत्सुकता निर्माण झाली....आणी आतला मुलगा कधी बाहेर येतो आणि माझा इंटरव्ह्यु कधि सुरू होतो..वाटायला लागले...मी दबावावर मात करून स्थिर झालो होतो...स्पर्धक संचारला होता आतला....आता फक्त टक्कर!! ...दुसरीच दुनिया होती ती...कदाचित माझे शब्द तेवढे समर्थ नाहीत ते मांडायला....अचानक दरवाजा उघडला ..आतला मुलगा बाहेर आला..मी त्याच्याकडे पाहून इशारा केला "कसं काय?" त्याने इशा-यानेच सांगीतले इतके काही ठिक नाही..लक्षात आले आपल्याला टफ अवस्थेला तोंड द्यावे लागू शकते..मी सज्ज झालो...मला आत येण्यासाठी निरोप मिळाला...मी लक्ष विचलित होवू नये म्हणून कुठेही न पाहता कक्षाकडे निघालो.
"मे आय कम इन सर?" "या, बसा!" "धन्यवाद सर" गुड माॅर्निंग सर, गुड माॅर्निंग मॅडम" आपोआप घडले..डोळ्यासमोर कोणीच दिसत नव्हते.मी खुर्चीत बसलेलो होतो,हातातली फाईल सन्माननीय पॅनेल सदस्यांकडे तोंड करून टेबल वर ठेवली गेली...मी परत स्थिरतेकडे धावू लागलो...MPSC चे अध्यक्षांचेच पॅनेल,करकेट्टा मॅडम(IAS),बनसोडे सर(मेंबर),देशमुख सर(मेंबर) यांचे चेहरे हळुहळु क्लिअर व्हायला लागले..."नाव काय आहे?" उत्तर.."शिक्षण?"....उत्तर...नाॅर्मल होवू लागलो...आतुन सावध झालो...आता प्रश्न येणार. आलाच!!! पण माझ्या लिंकचा...लिंकींग मेथड की जय! " तुम्ही छंद वाचन लिहीला आहे, ते ययाती,मृत्युंजय वगैरे सोडून अलिकडचे काय वाचले ते सांगा, तुम्ही सगळे जण ही दोनच पुस्तके वाचता का?" मी" सर, अत्यंत आदरपुर्वक सांगतो ही दोन पुस्तके मी अकरावीला असतानाच वाचली आहेत, सध्या मी " द अल्केमीस्ट" हे पुस्तक वाचले आहे "(मराठीची अनुवादित प्रत बाजारात येवून एक महिन्यापेक्षा कमी कालावधी झाला होता आणी हे खरंच अलिकडचे पुस्तक होते, अरूणभैय्याचे आभार एवढे सुंदर पुस्तक त्यांनी वाचायला आणले होते .) अध्यक्षांनी लगेच प्रश्न केला" त्यातुन आपल्याला काय संदेश मिळतो?" ( लक्षात आले सरांनी पण हे पुस्तक वाचले आहे, जे पुस्तक एवढे आवडले होते आणी भारलेही होते त्या अगदी हृदयात बसलेल्या पुस्तकाबद्दलचा प्रश्न...मग काय मी जणु सॅतिएगो आणी तो प्रश्न म्हणजे शकुन!! मी तेथुन जे उत्तरे द्यायला सुरूवात केली आणी जो आत्मविश्वास आला तो शेवटपर्यंत अगदी सुभेदार गेस्टहाऊसचा परिसर सोडला तरी फाॅर्म कायमच होता...) मी काय संदेश मिळतो ते अगदी सुस्पष्ट सांगीतले, अध्यक्ष उत्तरले"गुड!"मी "धन्यवाद सर" दुसरा प्रश्न "अजुन काय वाचले?" मी " दि गाॅड ऑफ स्माॅल थिंग्ज" त्याच्या लेखिका,त्यांचा पुरस्कार , बिए चे इंग्रजी साहित्य, शेक्सपिअर,त्याची लेखनशैली, त्याची साहित्यकृती,भारतीय इंग्रजी लेखक, त्यांचे वैशिष्ट्य....मुलाखत बहारदार पध्दतीने सुरू होती, सफाईदारपणे उत्तरे देत होतो,कुठलाही किंतु परंतु राहिला नव्हता.. आणी अचानक दुस-या सदस्यांकडे धुरा गेली...मग विषय लोकप्रशासन, व्यवस्थापन त्यातील फरक, व्याख्या, विचारवंत,त्यांचे योगदान अशा विविध बाबींचे प्रश्न विचारले जाऊ लागले. लोकप्रशासन माझा एम ए चा विषय,राज्यसेवेचा ऐच्छिक विषय. एक तर त्यात आवड वरून तो दयानंद काॅलेजच्या प्रा.सुभाष भिंगे सरांच्या तालमीत शिकला असेल तर..मग काय किंतु काय परंतु! सगळं लख्ख, स्वच्छ घडाघडा उत्तरे देत होतो.. मुलाखत समाधानकारकरित्या चालू होती अचानक मॅडमचा प्रश्न "द गाॅड ऑफ स्माल थिंग्ज"ची थीम सांगा,त्यात काय आहे? शेक्सपिअर व अरुंधती रॉय यांची तुलना करा, दोघात कोण श्रेष्ठ आहे? दृष्टीकोन असणारे विश्लेषणात्मक प्रश्न यायला सुरू झाले..अलर्ट!! मानवाधिकार व मुलभुत अधिकार काय फरक आहे? कोणते अधिकार श्रेष्ठ आहेत? तुम्ही कुठल्या अधिकारांना प्राधान्य द्याल?वगैरे इंडियन ऑथर मधे कोण आवडतं? का? फिक्शन लिटरेचर म्हणजे नक्की काय? इत्यादी त्यानंतर शेवटचे सदस्य "लातुर?" मी"हो सर" कधी निर्माण झाला?..या प्रश्ना पासून जे वस्तुनिष्ठ प्रश्न सुरू झाले ते थांबायचे नाव नाही..प्रश्न उत्तर, प्रश्न उत्तर...ते विचारत आहेत मी उत्तर देत आहे..प्रश्न खाली पडतच नव्हता..भुगोल,राज्य घटना, कृषी फक्त विषय बदलत होते..आणी अचानक..."मोगलांची वंशावळ सांगा" एकदम स्पीडब्रेकर....काही केल्या आठवेणा...मी"सारी सर" "मग शिवाजी महाराजांची वंशावळ सांगा " सांगीतली..पुन्हा अध्यक्षांचे प्रश्न सुरू झाले पद, पसंतीक्रम, पदाची कर्तव्य...पसंतीक्रम असाच का दिला..महसुलच्याच पदांना पसंती का? उत्तर देत होतो...सरतेशेवटी अध्यक्ष म्हणाले "ठिक आहे,तुम्ही जाऊ शकता" मी उठून सर्वांना शुभेच्छा दिल्या,आभार व्यक्त करून बाहेर पडलो...थोडासा संभ्रम झाला , आपला इंटरव्ह्यु किती वेळ चालला? माझ्याकडे घड्याळ नव्हते...तर त्याची सोय मित्रांनी केलेली..मी किती वाजता आत गेलो..किती वाजता बाहेर पडलो या वरून त्यांनी समाधानकारक वेळ चालला असा निष्कर्ष काढला.काय काय विचारले , काय उत्तरे दिली याची चर्चा झाली. झांपले सर सिनियर होते म्हणाले "भारी झाला की इंटरव्ह्यु!" पण मला शंका आली म्हटले "सर! किमान अर्धा तास तर चालायला हवा होता फक्त 19 मिनीट म्हणजे कमी झाला ना?:" त्यावर ते म्हणाले " प्रत्येक प्रश्नाला उत्तर मिळाले तर ते कशाला ताणत बसतील? मळभ दुर झाले......विजयच्या घरी परतलो..झांपले सरांची मुलाखत पण खुप चांगली झाली..एकतर ते ऑलरेडी सिलेक्टेड,त्यात पुर्णतः मॅच्युअर, अनुभवी... त्यामुळे त्यांचा इंटरव्ह्यु चांगला जाणारच यात शंका नव्हती...कारण त्या सोबत त्यांना आम्ही आमचे प्रश्न, अॅगल सांगू सांगू परेशान केलेलेच होते( दिनेशरावचे मोठेपणच!! आम्ही तुलनेने खुप ज्युनियर असूनही त्यांनी आमच्या इनपूटला अत्यंत आदर दिला अर्थात त्यांनी केलेली सुचना तर आम्ही खुप गांभीर्याने घ्यायचो) पण दिनुभाऊ आपल्या अनुभवी आणी व्यवहारी आवाजात म्हणायचे "बघु ! दिला तर एकदाचा इंटरव्ह्यु, पाहू काय होतंय"

          आम्ही औरंगाबादहून लातुरला परत आलो. घरी भेटून सगळंयाना सांगीतले मुलाखत चांगली झाली. आई वडिल म्हणाले आता आराम कर थोडा, रहा चार पाच दिवस पण मी म्हटले "विजयचा इंटरव्ह्यु राहिला आहे, मिळुन तयारी करायची आहे" वडील म्हणाले "जा ! स्वतःचा इंटरव्ह्यु आहे तशीच तयारी करा,हयगय करायची नाही " किती सहज बोलले पण त्यांची मनोवृत्ती समजली इमानदारीने मित्रासाठी पण योगदान द्या!! मी लातुरला आलो विजय सोबत बसून रोज तयारी करू लागलो,चर्चा, ऊणिवा, दुरुस्त्या,...एक जाणवले...पुणे सोडून विजय लातूर मधे तयारी करत आहे म्हणजे आपली जबाबदारी जास्त आहे..आम्ही जिव लावून तयारी करू लागलो.विजयचा इंटरव्ह्यु जणू माझाच आहे असे समजून......विजयची तयारी पण मुळातच खुप चांगली होती त्यात काही भर पडेल का? याचाच प्रामाणिक प्रयत्न असायचा आमच्या ग्रुपमध्ये एक वैशिष्ट्य आहे जर एखाद्या गोष्टी बद्दल स्वतः सोडून इतराला खात्री आहे आणी तो त्या बद्दल सांगत आहे तर निर्धास्तपणे त्याच्यावर विश्वास ठेवायचा...विजयच्या इंटरव्ह्युचा दिवस जवळ येत होता. औरंगाबादला विजयला सोबत म्हणून मीही निघालो...त्या काळात कुठल्याच सोबत्यावर कसलेच दडपण येणार नाही याची सामूहिक काळजीच आम्ही घेत होतो...विजयाचा इंटरव्ह्यु जवळपास शेवटच्या दिवसात होता...औरंगाबादचे MPSC चे इंटरव्ह्यु शेड्युल जवळपास संपत आले होते....मनात एक विचार सतत येत होता, सर्व पॅनल मेंबर खुप दिवसांपासून मुलाखती घेत आहेत ते आपल्या प्रश्नात नाविन्य आणतील...सतत जाणवत होते, मी विजयला म्हणालो," मास्तर! काही तरी वेगळ्या सरप्राइजिंग प्रश्नाची पण तयारी ठेवावी लागेल"(मी आणी विजय त्या काळात (आणी आत्ताही कधी कधी )एकमेकांना मास्तर म्हणायचो) विजय पण मुलाखतीच्या या चक्रात जसा उमेदवार ओव्हरलोडेड होतो तसेच झाले होते. पण तरीही विजुने विश्वास दाखवला..मग प्रचलित प्रश्न, नविन प्रश्न, संभाव्य प्रश्न, लिंकींग प्रश्न सर्वत्र आमचा धुंडाळा सुरू होता...जी अवस्था माझी तीच विजयची...काय फरक असणार.....मनात झटपट...

             विजयच्या मुलाखतीचा दिवस उगवला ,विजयची तयारी झाली ..आम्ही सुभेदार गेस्टहाऊस कडे निघालो... जातानाही आमची चर्चा सुरू होती. जाण्यापूर्वी काही तरी खायला हवे असे ठरले..माझी बडबड सुरू होती, त्यातुन मी खरंतर मुलाखतीचा दबाव विजयवर येणार नाही याची माझ्यापरीने काळजी घेत होतो.आम्ही नाश्ता करायला थांबलो. का कोण जाणे मी विजयला अचानक म्हटले "आजचा पेपर वाचायला हवा" विजयला शांती हवी होती डोक्यात आता नविन काही नको होतं...त्याचा आदर करत मी म्हटलं ठिक आहे मी वाचतो ! सहज डिस्कस करू! आणी मी पेपर हातात घेवून वाचु लागलो , काही महत्वाच्या बातम्या निवडून आम्ही चर्चा केली. आठवत नाही पण त्यात साखर कारख्यान्या बाबत एक बातमी होती. आम्ही मुलाखत स्थळी गेलो..मग ठरल्या प्रमाणे विजयला आत सोडले.मी बाहेर थांबलो...प्रतिक्षा सुरू होती.विजयची मुलाखत झाली. विजय बाहेर आल्याबरोबर सांगीतले, बरं झालं ! तुम्ही सकाळी पेपर वाचून सांगीतले , मला पॅनलने विचारलेला पहिला प्रश्न होता" आजच्या पेपर मधल्या महत्वाच्या पाच बातम्या सांगा"!!!! आम्ही दोघेही स्तब्ध झालो.आणी अचानक खुश ही ...सगळे हात एकमेकांना सावरायला असतील तर पडण्याची भिती कसली!!! विजयचा इंटरव्ह्यु खुप छान गेला होता. ..सगळ्या मित्रांचा शेवटचा टप्पा सुखद गेला होता..आम्ही लातुरला परतलो.....

         सगळे जिवश्च कंठश्च मित्र, आमचे सुख दुःख हेच, हेच आमचे जगणे झाले होते, हीच आमची दैनंदिन. सगळे वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे,परिस्थितीचे..पण अखंड एकजीव..आमच्या ध्येयाने आमच्यातील भेद गाळुन टाकले होते...आता प्रतिक्षा होती फक्त निकालाची...!! पण तो काही लवकर लागत नव्हता, दरम्यान पुढची अॅडव्हर्टाईज आली होती..आम्ही सगळे जुने नवे मित्र पुन्हा अभ्यासाला लागलो..तेच झपाटलेपण..तेच समर्पण...तोच भाव...पण मनात कायम एक आस निकाल कधी लागणार??? काहीच उत्तर नाही दिर्घ प्रतिक्षा.....

            मी जरी सगळ्यात होतो तरी आतुन एकटा होतो...जर निकाल नकारात्मक आलाच तर मी कदाचित किती मागे फेकला गेलो असतो..कल्पना ही करवत नव्हती..मनात कायम ते अर्धपडके घर.... आईवडील... आठवत रहायचे....एकदा गावाकडे गेलो...आत साचल्या पण कोणाशीही बोलू न शकणा-या भावना घेवून माळरान गाठले...सांजवेळ..माळरान..गावात लागणारे दिवे...गावाकडे परतण्याची घाई झालेले गुरे...मी मात्र तसाच गावाकडे पाठ करून मुक माळरान तुडवत निघालो.. किती बोललो..किती मुक राहिलो...माळरान ऐकत होतं.......मी त्यावर पेरल्या स्वप्नांच्या बिया फुलतील का? हा प्रश्न मी त्याला विचारला....माळरान हसल्याचा भास झाला......मी पावश्याची पाऊस तगमग मनात घेवून निकाल कसा लागेल याची कल्पना करत होतो........मुक मनात नुसता कल्लोळ सुरू होता....(प्रताप)
(क्रमशः )

Monday, February 24, 2020

स्पर्धा परीक्षेची बखर: 'मी' ते अधिकारी ...एक आठवणींचे मोरपीस भाग 21: मुलाखत....(1)


स्पर्धा परीक्षेची बखर: 'मी' ते अधिकारी ...एक आठवणींचे मोरपीस

भाग 21: मुलाखत....(1)

मुलाखतीची तयारी!! एक खेड्यातून आलेला, जिल्हा परिषद शाळेत शिकलेला अत्यंत विवंचना असुनही अधिकारी बनण्याचं माझं स्वप्न! अक्षरशः मलाच माझी किव यायची काय करणार होतो मी जर या टप्प्यावर आलो नसतो, मुख्यपरिक्षा नापास झालो असतो तर....खाडकन डोळे उघडले! ट्रॅव्हल्स पुण्याकडे धावत होती.मी एकटक अंधाराकडे पाहत माझी कथा आठवत होतो..गावाकडे आई वडील अर्ध पडक्या घरात आहेत, दोन्ही भाऊ लातुरच्या मध्यभागी पण जुन्या वाॅशिंग सेंटरचा भाग असलेल्या माती पत्र्याच्या खोलीत झोपले आहेत.सकाळी आलेला डब्बाच त्यांनी रात्री खाल्ला असेल..एका लहान परिघात जगणारे माझे कुटुंब आणी त्यात माझ्या मनाला हे विशाल होण्यासाठीचे लागलेले डोहाळे...कुठलाच शिधा नसताना अनंत अवकाशाकडे चालत निघावे..आणी मी परतेलच खजिन्यासह हा विश्वास घेवून माझ्या घरच्यांनी निर्धास्त रहावे...कशी जिद्द पेटणार नाही, कसे बाहू फुरफुरणार नाहीत, का मस्तक टक्कर द्यायला सज्ज होणार नाही? पुण्याला निघायच्या अगोदर स्वतःकडील साठवून ठेवलेला पैसा सोबत होता त्यासह अगोदर गावी जाऊन आई वडिलांना भेटलो होतो.खुप दिवसानंतर घरी बसुन आम्ही सगळे बोललो होतो..अंतःकरणात खुप काही पण एकमेकाला आधार मिळेल अशा शब्दांची पेरण करत वडील बोलत होते..त्यांना कोठून विश्वास होता माहित नाही? अक्षरशः अन्नान्न दशा पण ते बोलायचे मात्र जिगरीचे!! बाबा! या वेळी सलेक्शन होईल असाच इंटरव्ह्यु द्यायचा, आपलं सलेक्शन तर होणारं!! पण नाहीच झालं तर घाबरायचं नाही, नाराज व्हायचं नाही, हिमतीनं करत रहायचा अभ्यास! बंडाळ काय आपल्या जन्माची आहे , काढू कसे तर दिवस!! माझ्या मनात विश्वास आहे तुम्ही होणारच!!! अर्थात स्वतःच्या मुलांना अहोजाहो करत बोलण्याची त्यांची संस्कार शैली!! ते जेंव्हा आत्मविश्वास द्यायचे , टक्कर द्यायचे बोलायचे तेंव्हा भाकरी थापत थापत आई बोलायची, बस करा आता ! जेउ द्या लेकराला अगोदर!! तीला हे एवढं मोठ्ठं स्वप्न खरं तर वाटायचं पण तीला विश्वासयुक्त भिती असायची, आणी तिला अजब वाटायचं एवढासा हा पोरगा काय करायला निघाला आहे, तिला कळायचं मी खुप डोक्यात घेवून हे सगळं करत आहे,पण तिला भितीही वाटत रहायची ह्याला नाही झेपलं तर....ती या भितीनं विषय बदलण्याचा प्रयत्न करायची,तब्येत खुप खराब झाली म्हणून डोळ्यात आलेलं पाणी पुसायची..मी वडीलांचा आग्रही आत्मविश्वास आणी आईचा दबका आशावाद यातुन मार्ग काढायचो...
रात्रीच्या अंधारात लख्ख भुतकाळ आठवत होता..तो पाऊस,तो चिखल,एकवेळचं जेवण, पुस्तक वह्या भेटत नाहीत म्हणून कुढणं, आपल्या सारख्याच फाटक्या मित्रांत आशावादी बोलणं, त्यांनाही सोबत अभ्यास करा म्हणनं...किती बदल,किती धाडंस...पण एक विश्वास होता काही होवो हे सिध्द करून दाखवायचंच!!! मन पेट घेत होतं..खिशातली छोटी डायरी काढून मुलाखतीचे मुद्दे आठवत बसलो..पहाटे पुणे आलं ...मित्र घ्यायला आला गळ्यात पडला,गहिवरून बोलला आलास भावा!चल आज माॅल मधे जायचंय आपल्याला. सगळ्यात वेगळा ड्रेस आपल्या डोक्यात आहे..तु बघत रहा..तो बडबड करत होता मी हसत होतो...कित्ती लोकांना माझ्या ध्यासानं वेडावलं होतं......

आयुष्यात पहिल्यांदा माॅल मधे गेलो..चांगले दोन ड्रेस, आणी आठवणीनं न भेटलेला शुज आणी इतर साहित्य घेतलं..दिवसभर इंटरव्ह्युची तयारी यावर बडबडत तिथल्या मित्रासोबत फिरलो...आणी लगेच रात्री परत निघालो...हे सगळं लातुरात ही करता आलं असतं पण पुण्यात मित्र आठवण करत असल्याने व त्यांचा उत्साह टाळता न येण्याजोगा असल्याने जावं लागलं...शेवटी ते हिंमत देत होते म्हणून तर मी इथपर्यंत पोहचलो होतो...आणी ते ही माझ्या वेडातुन हिंमत बांधून घेत होते स्वतःची......

परत आलो, जोमाने तयारीला लागलो, आम्ही सगळे मिळून तयारी करत होतो.एकमेकांना एकमेकांच्या उणीवा दाखवून देत होतो,त्या कशा दुरूस्त करता येतील त्याही सांगत होतो.ना कुठला क्लास ना कुठले मार्गदर्शन तरीही एका सुरात,लयीत तयारी सुरू होती,आत्मविश्वास म्हणायचा तर काळजात किंचीतही थरकाप नाही सरळ आभाळाला भिडण्याची तयारीच जणु...स्वतःच्या,घरच्यांच्या,मित्रांच्या आणी आम्हाला पाहून MPSC करायला सुरूवात केलेल्या नविन मुलामुलींच्या किती अपेक्षा होत्या...आमच्यावर..मनात कायम एक दिवा पेटलेला असायचा..ध्यासाचा नंदादीप जणु! मुलाखतीचा दिवस जवळ येत होता. ठरले की चार दिवस अगोदरच औरंगाबादला जायचे,तेथे रूळायला मदत होईल.. शेड्युल मिळाले...माझा इंटरव्ह्यु अगदी सुरूवातीच्या काळात होता,नंतर दिनेश झांपले, आणी शेवटी शेवटी विजय कबाडे.
माझा इंटरव्ह्यु होता तरी सगळेजण निघायचे ठरले..(आधार देणे काय असते ते येथून समजत होते) पण निव्वळ एक रात्री राहता येईल एवढीच माझी तयारी होती..माफक पैसे होते.मी बोलणार कसा? (पण न सांगता ओळखणार नाहीत ते मित्र कसले? आणी तेही कळलंय त्यांना हे न दाखवता!!! ) विजयराव यांनी डिक्लेअर केले"आपले औरंगाबादला घर आहे तेथे कोणीच राहत नाही आपण सगळे तेथेच थांबू" नियती की नियत? कदाचित त्याही पलीकडचे विशाल -हदय माझ्या मित्राकडे होते..तरीही संदिप अगदी शिव्या घालत गुपचूप विचारणार'पैसे लागणार आहेत का बे?" , तांदळेसर बाजुला घेवून बोलणार"प्रतापराव अडचण असेल तर सांगा बरं!" इंद्रजित न सांगता मदतीला हजर, गज्या तर काहीच संबंध नसताना MPSC चा माझ्या सोबत केस एवढे काप, असा थांब तसे बस.....हे सांगणार...मदतीच्या किती हाताची मोजदाद करावी?
जे मुलंमली परिस्थिती गरीब आहे हे कारण देतात त्यांना एकच सांगणे...तुम्ही फक्त निघा...थांबू नका..नियती अनेक रूपे घेवून सज्ज असते मदतीला...घाबरू नका परिस्थिती वाईट असल्यावरच ती चांगली करण्याची संधी आपल्याला मिळते...!!

घरी जाऊन आई वडिलांना भेटलो, भावांचा निरोप घेवून औरंगाबादला निघालो..मुख्य परिक्षेलाच ईथे आलो त्या नंतर आत्ताच..विजुच्या घरी पोहचलो..मुलाखतीची तयारी शेवटच्या टप्प्यात आली होती..फक्त एकदाच सुभेदार गेस्टहाऊसला जाऊन मुलाखतीचे ठिकाण पाहून घेतले..मुलाखती देवून परत येणा-या मुलामुलींना पाहीले..काय काय विचारत आहेत म्हणून बाहेरच्या मुलामुलींचा घोळका त्यांना घेरत होता,ज्यांची मुलाखत चांगली झाली ते सांगायचे त्रोटक,ज्यांची मुलाखत चांगली झाली नाही ते गुपचुप निघून जायचे.त्यांच्या चेह-यावरील भाव स्पर्धेची क्रूरता अधोरेखित करत होते..मी सावध झालो..तडक परत येवून अभ्यासाला लागलो..कारण आतुन आवाज येत होता..हा अॅटेम्प्ट गमावणे आपल्याला परवडणारच नाही, दुस-याचा इंटरव्ह्यु कसा का जात असेल पण आपला चांगलाच झाला पाहिजे...थोडे दडपण जाणवायला लागले..प्रश्नाच्या लिंक पुन्हा पुन्हा तपासून घेवू लागलो...मनात सतत कोणते प्रश्न विचारतील?काय उत्तर द्यायचे याची उजळणी सुरू असायची दोन दिवस झाले...उद्या मुलाखत होती...मित्रांनी लवकर झोपायला सांगीतले ...खाली अंथरुण टाकून सारेच झोपलो होतो..लाईट बंद झाला आणी मला झोप काही केल्या येईना...सगळे झोपले होते..मी या कुशीवरून त्या कुशीवर वळत होतो..झोप पार उडाली होती..डोळ्यासमोर उद्याची मुलाखत..घर, गाव,आईवडील, भाऊ, मित्र, त्यांचे अपेक्षायुक्त चेहरे...विचारले जावू शकणारे प्रश्न सगळा गोंधळ सुरू झाला...मला काय चालले आहे समजत नव्हते...फक्त एक माहिती होतं..माझ्या आयुष्यातला उद्याचा खुप महत्त्वाचा दिवस होता..मला तो जिंकायचा होता..मला खरंच हे सारं गमावणं परवडणार नव्हतं...जर मुलाखत चांगली नाही झाली तर मी काय करेन....??? उत्तरच सापडेना...मी स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करत होतो..सारे विचार सारून उद्या हे विचारले तर असे उत्तर द्यायचे..ते विचारले तर तसे....मी अक्षरशः आयुष्यभराचा झगडा झगडत होतो जणू....कधी तरी रात्री तिन वाजता वगैरे झोप लागली ..सकाळी लवकर उठलो..थोडा थकवा जाणवला..पण भावनांचा बहर रात्रीच विरून गेला होता...त्यामुळे मी माझ्या मुळ भुमीकेत परत आलो...मी खुणगाठ बांधूनच उठलो...आणी डिक्लेअर करून टाकले..ग्रुप मधला माझाच इंटरव्ह्यु पहिला आहे...तो भारी देणार...सर्वांनी साथ दिली चिअरअप केले...मी तयार होवून निघालो...ठरवले ढासळायचे नाही...

सुभेदार गेस्टहाऊसला पोहचलो..वारंवार सर्व बाबी तपासून घेतल्या असल्याने आत्मविश्वास होताच,सोबत सारेच मित्र होते...पाहीले सेंटरवर मीच वेगळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे...स्वतःचे वेगळेपण एक नवा आत्मविश्वास देवून गेले..आत जाण्याची वेळ आली, सर्व मित्रांनी शुभेच्छा दिल्या...मी एक दीर्घ श्वास घेतला आणि निघालो..आजपर्यंत केलेल्या अभ्यासाचे चिज करण्याचा हा दिवस होता. गेट मधे शिपाई काकांनी अडवले..विचारले.. सांगीतले..इंटरव्ह्यु आहे..कौतुक भरल्या नजरेने त्यांनी आत सोडले...(माझ्या बॅच मधला सर्वात लहान वयाचा मीच आहे..बहुधा ते लहानपण त्यांना नवलाचे वाटले) आत गेलो, कागदपत्रे तपासून घेत होते. बिए झाल्यावर पदवीदान समारंभ व्हायच्या अगोदरच मेन्सचा फाॅर्म भरला होता त्यावेळी डिग्री भेटली नव्हती पण मुलाखती अगोदर ती सादर करण्यास सांगितले ती दिल्यास परवानगी मिळाली मी हाॅल मधे बसलो..हाल मधे सिनियर मुले दिसत होते....मी निरखु लागलो..सगळे नविनच होते मला...पहिल्यांदाच सगळे पाहत होतो...एक सिनियरने विचारले" कितवा अॅटेम्प्ट?" मी, "पहिलाच" सांगीतले. त्यावर ते म्हणाले "मित्रा ! माझी ही चौथी मुलाखत, ट्रायल म्हणून दे या वेळची मुलाखत!" मी शांतपणे सांगीतले " हज्जार वेळा ट्रायल झालीय, ही फायनलच असणार"
ते हसले म्हणाले "भारी काॅन्फिडन्स आहे राव तुझा!, असाच ठेव मुलाखत होईपर्यंत " शुभशकून...हुरूप...आणी तरीही सावधान अवस्था! मी धन्यवाद म्हटले...माझ्या नावाचा पुकारा झाला....मला वरच्या मजल्यावर मुलाखत कक्षाबाहेर वेटिंगला बसायचे होते...आतल्या उमेदवाराची मुलाखत संपेपर्यंत....!! मी पाय-या चढताना स्वतःलाच सांगु लागलो...चांगलीच होणार आपली मुलाखत, फक्त शांत राहून द्यायची....पण आत खळबळ सुरू झाली होती...(प्रताप)
(क्रमशः)
..

Sunday, February 23, 2020

स्पर्धा परीक्षेची बखर: 'मी' ते अधिकारी ...एक आठवणींचे मोरपीस भाग 20: मुख्य परिक्षा आणी बढता हुआ कारवां...!!!!!



स्पर्धा परीक्षेची बखर: 'मी' ते अधिकारी ...एक आठवणींचे मोरपीस

भाग 20: मुख्य परिक्षा आणी बढता हुआ कारवां...!!!!!


मुख्य परीक्षा झाली. लातुरला परत आलो. गावी भेट देवून सर्व काही सांगीतलं, निकाल येईल म्हणून आईवडीलांना खात्री दिली. तुलनेनं एक रितेपण आलं होतं. पण थोडसं भरीव ही वाटायचं कारण आज नाहीतरी मुख्य परीक्षा दिल्याने एक आत्मविश्वास आला होता. सर्व मित्र, जेथे शिकवायचो तेथील क्लासमधले मुले, लातुरमधे एमपीएससी करणारे, करण्यास इच्छुक असलेले सर्वजण भेटायला बरिश्ता हाॅटेलकडे यायचे. चर्चा व्हायची,मनात सुरसुरी दाटून यायची पण करण्यासाठी काहीच नव्हतं..सध्या शिकवणे एके शिकवणे! त्याचे दोन फायदे होते, केलेला अभ्यास पुन्हा पुन्हा रिव्हाईज होत असे आणी लातूर मधे राहण्यासाठी व पुस्तके विकत घेण्यासाठी थोडेफार पैसे मिळत असत. मी टिकून होतो.मी इतरा सारखे हंगामीपक्षी वर्तन टाळले..परिक्षा आली एकत्र या..परिक्षा झाली उडून जा...

तरीही सतत एक अनिश्चीतता पाठ सोडत नव्हती. गावाबाहेरच्या मंदिराच्या ओसरीवर एखादा मुसाफीर आपली पथारी टाकतो, त्याला गावगाड्याशी काही स्वारस्य राहत नाही तसे काहीसे झाले होते..अभ्यासाच्या ठिकाणी पडून रहा. वाचा, लिहा, पुन्हा पुन्हा तपासत रहा काय काय करता आले असते? मी पुन्हा पुन्हा मुख्य परिक्षेचे पेपर काढायचो..एक पेन्सील घ्यायचो...प्रत्येक प्रश्नाला किती मार्क्स मिळतील याचा अंदाज लिहायचा...बेरीज करायची...टोटल लिहून पहात रहायचे........दिर्घ निःश्वास ...पेन्सीलचे टोक हलक्याने आपटत...स्वगत म्हणायचे..जाणार..आपण मुलाखतीला जाणार...अंगावर काटा यायचा..मनात काहीतरी सरसरून यायचे..आनंद व्हायचा..कधि हसु फुटायचे..कधी गहीवरून यायचे...त्या काळात मन जणु रणभुमीच झाले होते..किती सराव,किती चढाया..किती बचाव..आठवले की मन या जगात राहत नाही....ते जगच वेगळे..सर्वात असुनही तेथे कोणीच येवू न शकणारी अवस्था....एक दिर्घ प्रतिक्षा होती..मन दाटून यायचे..मग निघायचे चालत दुरवर..स्वतःला बोलत...आणी भविष्याला तोलत....ज्यांनी त्या काळात मला पाहिले त्यांची प्रतिक्रिया संमिश्र असायची...ज्यांना माहित होतं की मी मुख्य परीक्षा दिली आहे ते आदराने बोलायचे...पण ती विटकी जिन्स,तो क्वचितच बदलला जाणारा टिशर्ट...त्यांना कदाचित भीतीही वाटायची की जर याचे सिलेक्शन नाही झाले तर....पण मला माहिती होतं माझा बाण अचुक लागणार....

ग्रुपचे मेंबर यायचे..भेटायचे..बोलण्याचा एकच विषय मुख्य परीक्षेचा निकाल...पण तो काही लागतच नव्हता..जगणं अधांतरी असणं...काय असतं ते समजण्याचा तो काळ..तुम्ही लढण्यासाठी सज्ज, दक्ष असता पण रणभुमीच नसते...मग काय करायचे..तर..नविन डावपेच..नव्याने शक्ती संचय..!!! मी जे हाताला लागेल ते तर झपाट्याने वाचत होतोच..पण अधाशासारखं लायब्रेरी ही शोधत होतो..सुदैवाने आमच्या शाळेचे एक सर एका वस्तीत वाचनालय चालवायचे,सरांना भेटलो, विनंती केली..सर म्हणाले एकावेळी दोन पुस्तके देता येतील आठवडाभरानंतर परत करत जा..पण दोन पुस्तकाने काय होणार? मी प्रदिप इके ला सोबत घेवून त्याची दोन माझे दोन असे आठवड्यांची बेगमी करून घेतली..मग काय ...निव्वळ फडशा..पुस्तकाचे रसग्रहण, विश्लेषण, समीक्षा, चर्चा, परिक्षेत हे वापरता येईल ते वापरता येईल(वाचनाची सवय माणसाला तारते हे मुलाखती वेळी मला नव्याने पटणार होतेच) मी किती पुस्तकाचा फडशा पाडला देव जाणे..पण त्यामुळे विचारांना दिशा मिळाली गांधी,आंबेडकर,सुभाषबाबू,भारतीय इतिहास सगळे नव्याने समजले..काही फिक्शन वाचले,काही चरित्र ..तृप्तीचा आनंद मिळायचा, किती विचार, किती बाबी नव्याने समजायच्या, या सर्व बाबीचा मी वर्गात शिकवताना वापर करायचो..वर्ग भारावलेला असायचा...वाचनाचा आनंद मिळायचा काळ...होता तो

एके दिवशी बरिश्तावर बसलो होतो..बाजुने नविन पोलीस भरती झालेले पोलीस काॅन्सटेबल,वरिष्ठ पोलीस कर्मचारी नियमीत जायचे. आजपावेतो त्यांना समजले होते हे मुलं MPSC चा अभ्यास करतात. पण नविन पोलीस मंडळींना आमची जास्त ओळख नव्हती.मुक्रमभैय्या सोबत होते..त्यांनी अचानक आवाज दिला..त्यांच्या लहान भावाचे बॅचमेट पोलीस कर्मचारी जात होते. ते तेथे आले, नेहमीप्रमाणे हाय हॅलो झाले.. रेग्युलर बोलणे झाले..आमची गाडी पुन्हा स्पर्धा परिक्षेची तयारी या वर आला आणी अचानक एक पोलीस कर्मचारी यांची चुळबुळ सुरू झाली..(ही चुळबुळ खरेतर एक संघर्षाची खदखद होती..नव्याने मार्ग निवडणे,त्यावर निघणे, चालणे... नव्हे अगदी ऊर फुटे पर्यंत धावणे आणी जिंकणे..याची ती सुरूवात होती) मुक्रमभैय्याने ओळख करून दिली 'भाई! ए इंद्रजित सोनकांबळे(वर्धन) है। MPSC करना चाहता है। अपने खुर्रम का बॅचमेट" (बस्स!! तो दिवस आणी आजचा दिवस! पोलीस शिपाई इंद्रजित ते API इंद्रजित वर्धन !!! माझ्या नंतर MPSC चे वेड पाहिलेला हा अद्वितीय मित्र!! आमचे कौटुंबिक सदस्य म्हणून ज्यांना आज अभिमानाने आम्ही मिरवतो तो जिवश्च कंठश्च व्यक्ती!!!) चुळबुळ करत त्यांनी विचारले" सर ! आपल्याला MPSC करायची आहे! मी म्हटले ठिक आहे! लगेच कागद घेतला,आणि त्यांना MPSC, तिच्या परिक्षेची पध्दत, पोस्ट, अभ्यासक्रम ईत्यादी सांगायला सुरूवात केली. लगेच संदर्भ यादी लिहून दिली साधारणतः एक तास चर्चा झाली. इंद्रजित निघून गेले.वाटले इतरांना जसे सांगतो तसे यांनाही सांगीतले आहे. आपण खुप वेळा कागद लिहून दिले आहेत हा ही त्या पैकी एक कागद अशी माझी धारणा होती.पण ती धारणाच नष्ट केली ती इंद्रजित यांनी!!! आम्ही तेथेच बसलो आहोत ! हे बहाद्दर दिलेल्या यादी प्रमाणे बाजारातुन पुस्तके घेवून लगेच हजर!!! सांगा सर अभ्यास कसा करायचा? कोठून सुरूवात करायची??( आजही तसाच आश्वासक आवाज ते कायम देत असतात" सांगा सर काय करायचे??? "SIMPLY GREAT MPSC FIGHTER!!!)
काहीही सांगा ते तयारी करून येणारच!! नविन पोलीस झालेल्या लोकांना चांगल्या पोस्टींग हव्या असायच्या, त्या मिळु शकण्याच्या काळात इंद्रजितने ट्रेझरी गार्ड ड्युटी घेतली, MPSC च्या नादात त्यांनी मी शिकवत असलेल्या ठिकाणी क्लासही लावला. दुर्दैवाने त्या काळात या MPSC च्या वेडासाठी नोकरी धोक्यात येईपर्यंत त्यांच्यावर वेळ आली पण ते अभ्यासापासून मागे हटले नाहीत ..सर गेली नोकरी तरी बेहत्तर पण MPSC करायचीच हा त्यांचा बाणा!! बरं ते स्वतः सांगत सर माझे वडील बिट जमादार असलेल्या बिट मधिल शाळेतच मी शिकलो..मग अभ्यास कशाला करावा लागतो? पेपर सुरू असताना पाठ दुखू नये इतपत काळजी घेतली जायची, माझा अभ्यास खुप कच्चा आहे पण मला अधिकारी व्हायचे आहे...निव्वळ झपाटलेपण!!! पण अभ्यासाची एवढी सचोटी,एवढे समर्पण की रात्री पेट्रोलींग करतानाही सोबत नोट्स, पुस्तके, जिथे जागा मिळेल तिथे अभ्यास, अडचण आली, डिप्रेशन आले की पेट्रोलींगची गाडी थेट रूमकडे,कितीही वाजो उठवून विचारणार सर हे कसे करायचे?? (हेच त्यांचे वेड त्यांना यशाच्या शिखरावर घेवून गेले, त्यांनी स्वतः तर अभ्यास केलाच पण सोबती पोलीस मित्रांनही अभिप्रेरीत केले..बाकीचे शहाणे( जे नंतर वेड्यात निघाले) त्यांना काय SP, IPS की PSI ? म्हणून चिडवायचे पण हे झपाटलेलेच!! खाते अंतर्गत फौजदार परिक्षेत 2 वेळा व MPSC च्या परिक्षेत एक वेळा सिलेक्शन घेवून ते थेट PSI झाले व MPSC ची पोस्ट जाॅईन केली. कधिही सहकारी मित्रांचे उट्टे काढणे नाही आजही" सर ! त्यांनी अभ्यास केला असता तर ते ही झाले असते" ही खंत व्यक्त करतात. ज्या(तत्कालीन) लातूर पोलिस अधीक्षक विश्वास नांगरे पाटील संरांच्या काळात ते काॅन्सटेबल म्हणून लातुरला भरती झाले होते, त्याच सरांच्या हस्ते( तत्कालीन विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापुर रेंज)  त्यांच्या रेंज मधिल वळसंग हे सोलापूर जिल्ह्यातील पहिले ISO पोलिस स्टेशन करणारे ठाणेदार म्हणून सत्कार स्विकारताना व त्याला उत्तर देताना त्यांनाच किती अभिमान वाटला असेल!! व नांगरे पाटील सरांनाही कोण कौतुक वाटले असेल!!! एक एक दोस्त म्हणजे हिरा आहे हिरा!!!) त्या काळात इंद्रजितही भेटले, SP ऑफिस परिसरच अभ्यासमय झाला, अनेक जण अभ्यासाला लागले! कारवा बढता जा रहा था।....

निकालाची प्रतिक्षा वाढत चालली, मधेच हुल उठायची..निकाल लागणारआज,उद्या,परवा,आठवड्यात, महिन्यात.....पण तो काही लागत नव्हता..टेन्शन यायला लागले..जवळपास वर्ष होत आले होते निकाल लागत नव्हता..नविन अॅडव्हर्टाईज येणे अपेक्षित होते. पण ती ही नव्हती...आणी अचानक एके दिवशी पक्की बातमी आली
आज निकाल लागणार..! आत्मविश्वास होता आपण पास होणार !! आणी झालोच !!!! अगदी ठेवल्यासारखा माझा नंबर यादीत होता, ना पुर्वपरिक्षेसारखा चकवा ना तगमग! निकाल लागला समजले ! तडक गेलो उत्सुकता होती पण भिती??? छे! मुळीच नव्हती. नंबर पाहीला , एक वर्ष निघून गेले होते मुख्य परिक्षा होवून. दरम्यानच्या काळात अभ्यास ,वाचन, आत्ममग्नता यामुळे स्वतः बद्दल बरीच माहिती झाली होती.गुण अवगुण सारे कळले होते. फक्त आता त्याला व्यवस्थित रित्या मांडण्यासाठी तयारी करायची होती ती मुलाखतीची....!!

पण संदिप, अरूणभैय्या राज्यसेवेच्या मुलाखतीला पात्र झाले नव्हते. पण माझे मित्र विजय कबाडे (सध्या अपर पोलीस अधिक्षक बिड),दिनेश झांपले (तहसीलदार), रामेश्वर गोरे उर्फ रामभाऊ (तहसीलदार) हे मुलाखतीस पात्र झाले होते. लातूर मधुन महेश वरूडकर(अवर सचिव, मंत्रालय मुंबई) हे ही पात्र झाले होते. साधारणतः 15 जण लातूर मधुन मुलाखतीस पात्र झाले होते. लातुरच्या इतिहासात स्थानीक पातळीवर अभ्यास करून प्रथमच एवढे जण मुलाखतीला जाणार होते. सर्वत्र कौतुक दाटून आले होते. घरी निरोप दिला आई-वडील, भाऊ, मित्र आनंदाने न्हावून निघाले..माझी कथा..कर्मकथेकडून...दंतकथेकडे वाटचाल करत होती...आणी मी मुकपणे सा-यांचा आनंद पाहत मनोमन स्वतःला ठामपणे बजावत होतो...हा सर्वांना झालेला आनंद अल्पजिवी ठरू देवू नकोस...!! मी आपल्या कोषातच स्वतःला धार लावत होतो..माझ्या व सिलेक्शन च्या मधे मुलाखतीचा टप्पा उभा होता...आणी मी त्याला लांघणार होतो......

लगबग नुसती, काय करायचे माहीत होते पण ते बैजवार करण्यासाठी पुन्हा आम्ही एकत्र आलो...अभ्यास होताच पण त्याला सुव्यवस्थीकरणासाठी प्रयत्न सुरू झाले, सुदैव होते सुज्ञ आणी सारे पेटलेले दोस्त आसपास होते. द्रोण नसेल तर एकलव्य व्हायचे एवढे माहिती असल्याने एकमेकांना सावरणे, घोटणे,आकार देणे,वेळ प्रसंगी चुकत असल्यास हक्काने झापने सगळे सुरू होते.."लिंकींग मेथड" माझा नविनच शोध!!! मुलाखतीची तयारी करताना मी लिंकींग मेथड वापरायचे ठरवले.. बायोडाटा पाहून आपल्याला कुठला प्रश्न विचारला जाऊ शकतो? याची कल्पना करायची व त्यातुन कुठला ऊपप्रश्न निर्माण होऊ शकतो? त्यातुन कुठला...त्यातुन पुढे कुठला....?? असे मुळ प्रश्नाच्या सर्व बाजुने विविध लिंक तयार व्हायच्या.मग त्यावर उत्तर कसे देता येईल त्याचे अमुर्तीकरण, कल्पना करायची...म्हणून पहायचे..स्वतःवर ठासून ठासून बिंबवून घ्यायचे सर्व लिंक संपेपर्यंत उत्तरे शोधत रहायचे.सर्व लिंक पुर्ण करायच्या..यांच्यासाठी मोठमोठ्या ड्रॉईंग शिट वापरल्या...अनेक प्रश्न,ऊपप्रश्न समजुन घेता येवू लागले , कोठे कमी पडत आहोत हे ही समजायचे..लगेच तो टाॅपिक काढून त्यातला कोअर घ्यायचा.उत्तर बंदूक ठासल्यागत लोडेड करायचे..संध्याकाळी सर्वजण भेटायचो..विजय,रामभाऊ, दिनेश हे यायचे मी मार्गदर्शनासाठी तांदळे सर यांना बोलवायचो,ते ही आपला अनुभव सांगायचे. हा कालपरवाचा पोरगा इंटरव्ह्युला आहे.प्रतापराव सोडू नका, पुन्हा पुन्हा चान्स येत नाही म्हणुन आठवण करून द्यायचे.प्रश्न विचारण्यासाठी, डोकं लावण्यासाठी इतर तयारी करणारेही यायचे नवनवीन इनपुट द्यायचे...आपण वेडात निघावं आणी नियतीने अनेक शुभशकून पाठवावेत तसे होत होते..अनंत हात मदतीला धावत होते... एका एकटे पणाच्या रात्री मी विचार करत होतो..बि ए सेकंड ईअरला असताना आपण शेवटचा बुट पायात घातला होता एका अपमानाच्या क्षणी आपण मनोमन ठरवूनही टाकले होते या पायात घालण्यासाठी तेंव्हाच बुट घ्यायचे जेंव्हा आपण मुलाखतीला जाऊ....वेड माणसाला शहाणं बनवतं.....!!! वंचना माणसाला संयमी बनवते आणी त्या शांत संयमात दडलेली असते एक विक्राळ झेप....मी वरून शांत होतो पण ठरवलेलं वेड माझा हट्ट पुरवण्यासाठी अधिर झालं होतं....
कबुल केल्याप्रमाणे व माझ्यावरील अतिव विश्वासामुळे सगळ्यांशी बेट लावून " याचा इंटरव्ह्युचा शुज तर पुण्यातुन घेवू" असा त्या काळात आधार देणारा, मनोबल वाढवणारा मित्र आठवला...सकाळीच त्याचा निरोप आला होता लवकर पुण्याला ये तुझ्या इंटरव्ह्युची खरेदी करायची आहे. खुप वाट पहायला लावलास बे!!.....कट्टर दोस्त... दुसरे काय....फाटके झाकुन घेणारे सारे...भले स्वतः फाटके राहतील तरीही.....(प्रताप)
(क्रमश:)

Tuesday, February 18, 2020

तु जिजाऊची रयतमाया.....

तुझा वेग, तुझी तेग
दिल्लीच्या तख्तास हादरे
सह्याद्रिच्या नरविरा तुला
अगणित अगणित मुजरे..

तुझ्या इराद्यात ताना
लगीन कोंढाण्याचं लावी
विशाळगडाच्या रस्त्यावर
बाजी   'पावन' होई

तांडवी शिवाचा त्रिनेत्र तु
तु जिजाऊची रयत माया
शेती, पिकाची, माय,मातीची
तु राखतो  बुज शिवराया!

महाराष्ट्र देशाच्या रचियेत्या
तु बहु सुंदर त्यास घडविले
सकल बहुच्या उध्दाराचे
तोरण त्यास चढविले

स्वराज्याची 'श्री' इच्छा
रयतेच्या मनात ठसते
श्रीमान योगी रूप तुझे
सत्तेच्या उदरी वसते

माय,मातृभुमी साठी राजा
दे तुझा गमिनीकावा
नरपती जागव आमची मने
पेर धमन्यात तुझा 'छावा'

तु आमचा राजा
तु आमची माय
अखंड प्रणाम तुला
बा ! शिवराय!
(प्रताप)
"रचनापर्व"
prataprachana.blogspot.com

क्षत्रियकुलावंतास मुजरा!!!
आठवावे तुझे रूप ।आठवावा तुझा 'प्रताप' ।।

Sunday, February 16, 2020

होवून...शांत...मुके....

ही फुलांच्या हृदयात
ऊमलती आग कसली?
सांजवेळी नित्य फुलणारी
आठवणींची बाग कसली

हे चांदणबन का झुकते
आभाळाच्या छातीवर
नसतात येत्या पाउलखुणा
अंगणातल्या मातीवर

दुर जात्या वा-या सवे
किती हाका सरल्या
बंद मनाच्या दरवाज्यातुन
तशाच मुक फिरल्या

पाखरशिळेतील ही ओल
अवकाशी जाई झिरपून
बागेतील आठव फुलांचे
बहर जाती करपून

मनावर फिरे मोरपीस
हे कसले आल्हाद दाटले?
पाकळ्यांचे अस्तर लुबाडून
बाजार फुलांचे थाटले

सुन्या पावलांचे मुक इशारे
आता रस्तेही रुळले
नित्य उमलत्या फांदीहून
बहर निपचित गळले

सांज गोठल्यावेळी
ढगांचे रंग निस्तेज फिके
शब्द गातात आठवगीते
होवून ..शांत...मुके....
(प्रताप)
16/2/2020
"रचनापर्व"
prataprachana.blogspot.com















Monday, February 10, 2020

हर वसंतावेळी.....

आता बहर येईल हिरवा
तुडवत झडली पाने
ओक्याबोक्या झाडावर
पक्षीही गाईल गाणे

फांद्या पाहतील खिन्न
निष्पाप पानांचे सडे
दुर जात्या रस्त्यांना
पडतील रूक्ष तडे

झुळुक घेते कुशीला
शुष्कपर्णात हुंदका दाटे
माझ्या हिरव्या फांदीवर
बहराचे ओझे वाटे

फुलले होते हे ही
गेल्या बहरा वेळी
कसली ही शोकगीते
कोकीळ गाते काळी

मातीत रुतली पाने
बहर उद्याचा देती
आसुस वसंतासाठी
झडणे यांच्या माथी

अनंत जन्माचे हे
मरून फिरून येणे
कोणाच्या वसंतासाठी
कोण जिवन देणे

रस्त्यात पडल्या पानांची
का आपुलकी वाटे?
गतवेळचा तुझा बहर
मनात खोलवर दाटे

तुझ्या बहरासाठी सजले
माझ्या पानांचे सडे
हर वसंतावेळी मी
शिकतो समर्पणाचे धडे
(प्रताप)
10/2/2020
"रचनापर्व "
prataprachana.blogspot.com













Sunday, February 9, 2020

असे धुकेरी चांदणे....

हा धुक्याचा पट
सांजवेळी खुलावा
तुझ्या ओंजळीत
अवघा वसंत फुलावा

सांजेला चांदण्याची
लगडून यावीत फुले
पालवीचे -हृदय
कंच हिरवे खुले

आभाळाला गंध
हवेला तुझा भास
सृष्टीवर ओसंडो
सारा पुनव मास

दिप जळावे मनाचे
अंधार जळुन जावा
माझा वातीचा भाव
तुला कळुन यावा

अवघे मुकेपण सरून
मौनाला शब्द फुटावे
बेभान मनाचे भान!
भान अलगद सुटावे

दिशा धुसर व्हाव्यात
रस्ता हरवून जावा
चांदण्यांने ढग पांघरूण
साधावा स्पर्श कावा

उधळून द्यावा प्रकाश
मन व्हावे लख्ख
हरवल्या पावलांना
सापडावा रस्ता चक्क!

सारे भारून जावे
मन भरून यावे
असे धुकेरी चांदणे
नित्य फिरून यावे
(प्रताप)
9/2/2020
"रचनापर्व"
prataprachana.blogspot.com

Thursday, February 6, 2020

मर्मभेदी हातोडा...

माझ्या शब्दांकडे
नकोस पाहू विस्मयाने!
माहित आहे
तुझा भ्रमनिरास होतोय.

नाजुक साजुक,
शब्दांना पायदळी चिरडण्याचा तुझा
नित्य प्रघात मी मोडला आहे
मान्य!
शब्दांचे कातीवपण तुला बोचतेय!

पण
एव्हाना तुझ्या लक्षात यायला हवे होते
मी लेखणी ऐवजी टाक वापरतोय!
निगरगट्ट दगडी मनावर जर
शब्दांना मुळ धरता येत नसेल तर...
मला शब्द कोरावेच लागतील निग्रहाने!!

थांंब !!!
अजुन मर्मभेदी हातोडा
विकत घ्यायचाच आहे मी !
(प्रताप)
7/2/2020
"रचनापर्व"
prataprachana.blogspot.com



राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...