स्पर्धा परीक्षेची बखर: 'मी' ते अधिकारी ...एक आठवणींचे मोरपीस
भाग 20: मुख्य परिक्षा आणी बढता हुआ कारवां...!!!!!
मुख्य परीक्षा झाली. लातुरला परत आलो. गावी भेट देवून सर्व काही सांगीतलं, निकाल येईल म्हणून आईवडीलांना खात्री दिली. तुलनेनं एक रितेपण आलं होतं. पण थोडसं भरीव ही वाटायचं कारण आज नाहीतरी मुख्य परीक्षा दिल्याने एक आत्मविश्वास आला होता. सर्व मित्र, जेथे शिकवायचो तेथील क्लासमधले मुले, लातुरमधे एमपीएससी करणारे, करण्यास इच्छुक असलेले सर्वजण भेटायला बरिश्ता हाॅटेलकडे यायचे. चर्चा व्हायची,मनात सुरसुरी दाटून यायची पण करण्यासाठी काहीच नव्हतं..सध्या शिकवणे एके शिकवणे! त्याचे दोन फायदे होते, केलेला अभ्यास पुन्हा पुन्हा रिव्हाईज होत असे आणी लातूर मधे राहण्यासाठी व पुस्तके विकत घेण्यासाठी थोडेफार पैसे मिळत असत. मी टिकून होतो.मी इतरा सारखे हंगामीपक्षी वर्तन टाळले..परिक्षा आली एकत्र या..परिक्षा झाली उडून जा...
तरीही सतत एक अनिश्चीतता पाठ सोडत नव्हती. गावाबाहेरच्या मंदिराच्या ओसरीवर एखादा मुसाफीर आपली पथारी टाकतो, त्याला गावगाड्याशी काही स्वारस्य राहत नाही तसे काहीसे झाले होते..अभ्यासाच्या ठिकाणी पडून रहा. वाचा, लिहा, पुन्हा पुन्हा तपासत रहा काय काय करता आले असते? मी पुन्हा पुन्हा मुख्य परिक्षेचे पेपर काढायचो..एक पेन्सील घ्यायचो...प्रत्येक प्रश्नाला किती मार्क्स मिळतील याचा अंदाज लिहायचा...बेरीज करायची...टोटल लिहून पहात रहायचे........दिर्घ निःश्वास ...पेन्सीलचे टोक हलक्याने आपटत...स्वगत म्हणायचे..जाणार..आपण मुलाखतीला जाणार...अंगावर काटा यायचा..मनात काहीतरी सरसरून यायचे..आनंद व्हायचा..कधि हसु फुटायचे..कधी गहीवरून यायचे...त्या काळात मन जणु रणभुमीच झाले होते..किती सराव,किती चढाया..किती बचाव..आठवले की मन या जगात राहत नाही....ते जगच वेगळे..सर्वात असुनही तेथे कोणीच येवू न शकणारी अवस्था....एक दिर्घ प्रतिक्षा होती..मन दाटून यायचे..मग निघायचे चालत दुरवर..स्वतःला बोलत...आणी भविष्याला तोलत....ज्यांनी त्या काळात मला पाहिले त्यांची प्रतिक्रिया संमिश्र असायची...ज्यांना माहित होतं की मी मुख्य परीक्षा दिली आहे ते आदराने बोलायचे...पण ती विटकी जिन्स,तो क्वचितच बदलला जाणारा टिशर्ट...त्यांना कदाचित भीतीही वाटायची की जर याचे सिलेक्शन नाही झाले तर....पण मला माहिती होतं माझा बाण अचुक लागणार....
ग्रुपचे मेंबर यायचे..भेटायचे..बोलण्याचा एकच विषय मुख्य परीक्षेचा निकाल...पण तो काही लागतच नव्हता..जगणं अधांतरी असणं...काय असतं ते समजण्याचा तो काळ..तुम्ही लढण्यासाठी सज्ज, दक्ष असता पण रणभुमीच नसते...मग काय करायचे..तर..नविन डावपेच..नव्याने शक्ती संचय..!!! मी जे हाताला लागेल ते तर झपाट्याने वाचत होतोच..पण अधाशासारखं लायब्रेरी ही शोधत होतो..सुदैवाने आमच्या शाळेचे एक सर एका वस्तीत वाचनालय चालवायचे,सरांना भेटलो, विनंती केली..सर म्हणाले एकावेळी दोन पुस्तके देता येतील आठवडाभरानंतर परत करत जा..पण दोन पुस्तकाने काय होणार? मी प्रदिप इके ला सोबत घेवून त्याची दोन माझे दोन असे आठवड्यांची बेगमी करून घेतली..मग काय ...निव्वळ फडशा..पुस्तकाचे रसग्रहण, विश्लेषण, समीक्षा, चर्चा, परिक्षेत हे वापरता येईल ते वापरता येईल(वाचनाची सवय माणसाला तारते हे मुलाखती वेळी मला नव्याने पटणार होतेच) मी किती पुस्तकाचा फडशा पाडला देव जाणे..पण त्यामुळे विचारांना दिशा मिळाली गांधी,आंबेडकर,सुभाषबाबू,भारतीय इतिहास सगळे नव्याने समजले..काही फिक्शन वाचले,काही चरित्र ..तृप्तीचा आनंद मिळायचा, किती विचार, किती बाबी नव्याने समजायच्या, या सर्व बाबीचा मी वर्गात शिकवताना वापर करायचो..वर्ग भारावलेला असायचा...वाचनाचा आनंद मिळायचा काळ...होता तो
एके दिवशी बरिश्तावर बसलो होतो..बाजुने नविन पोलीस भरती झालेले पोलीस काॅन्सटेबल,वरिष्ठ पोलीस कर्मचारी नियमीत जायचे. आजपावेतो त्यांना समजले होते हे मुलं MPSC चा अभ्यास करतात. पण नविन पोलीस मंडळींना आमची जास्त ओळख नव्हती.मुक्रमभैय्या सोबत होते..त्यांनी अचानक आवाज दिला..त्यांच्या लहान भावाचे बॅचमेट पोलीस कर्मचारी जात होते. ते तेथे आले, नेहमीप्रमाणे हाय हॅलो झाले.. रेग्युलर बोलणे झाले..आमची गाडी पुन्हा स्पर्धा परिक्षेची तयारी या वर आला आणी अचानक एक पोलीस कर्मचारी यांची चुळबुळ सुरू झाली..(ही चुळबुळ खरेतर एक संघर्षाची खदखद होती..नव्याने मार्ग निवडणे,त्यावर निघणे, चालणे... नव्हे अगदी ऊर फुटे पर्यंत धावणे आणी जिंकणे..याची ती सुरूवात होती) मुक्रमभैय्याने ओळख करून दिली 'भाई! ए इंद्रजित सोनकांबळे(वर्धन) है। MPSC करना चाहता है। अपने खुर्रम का बॅचमेट" (बस्स!! तो दिवस आणी आजचा दिवस! पोलीस शिपाई इंद्रजित ते API इंद्रजित वर्धन !!! माझ्या नंतर MPSC चे वेड पाहिलेला हा अद्वितीय मित्र!! आमचे कौटुंबिक सदस्य म्हणून ज्यांना आज अभिमानाने आम्ही मिरवतो तो जिवश्च कंठश्च व्यक्ती!!!) चुळबुळ करत त्यांनी विचारले" सर ! आपल्याला MPSC करायची आहे! मी म्हटले ठिक आहे! लगेच कागद घेतला,आणि त्यांना MPSC, तिच्या परिक्षेची पध्दत, पोस्ट, अभ्यासक्रम ईत्यादी सांगायला सुरूवात केली. लगेच संदर्भ यादी लिहून दिली साधारणतः एक तास चर्चा झाली. इंद्रजित निघून गेले.वाटले इतरांना जसे सांगतो तसे यांनाही सांगीतले आहे. आपण खुप वेळा कागद लिहून दिले आहेत हा ही त्या पैकी एक कागद अशी माझी धारणा होती.पण ती धारणाच नष्ट केली ती इंद्रजित यांनी!!! आम्ही तेथेच बसलो आहोत ! हे बहाद्दर दिलेल्या यादी प्रमाणे बाजारातुन पुस्तके घेवून लगेच हजर!!! सांगा सर अभ्यास कसा करायचा? कोठून सुरूवात करायची??( आजही तसाच आश्वासक आवाज ते कायम देत असतात" सांगा सर काय करायचे??? "SIMPLY GREAT MPSC FIGHTER!!!)
काहीही सांगा ते तयारी करून येणारच!! नविन पोलीस झालेल्या लोकांना चांगल्या पोस्टींग हव्या असायच्या, त्या मिळु शकण्याच्या काळात इंद्रजितने ट्रेझरी गार्ड ड्युटी घेतली, MPSC च्या नादात त्यांनी मी शिकवत असलेल्या ठिकाणी क्लासही लावला. दुर्दैवाने त्या काळात या MPSC च्या वेडासाठी नोकरी धोक्यात येईपर्यंत त्यांच्यावर वेळ आली पण ते अभ्यासापासून मागे हटले नाहीत ..सर गेली नोकरी तरी बेहत्तर पण MPSC करायचीच हा त्यांचा बाणा!! बरं ते स्वतः सांगत सर माझे वडील बिट जमादार असलेल्या बिट मधिल शाळेतच मी शिकलो..मग अभ्यास कशाला करावा लागतो? पेपर सुरू असताना पाठ दुखू नये इतपत काळजी घेतली जायची, माझा अभ्यास खुप कच्चा आहे पण मला अधिकारी व्हायचे आहे...निव्वळ झपाटलेपण!!! पण अभ्यासाची एवढी सचोटी,एवढे समर्पण की रात्री पेट्रोलींग करतानाही सोबत नोट्स, पुस्तके, जिथे जागा मिळेल तिथे अभ्यास, अडचण आली, डिप्रेशन आले की पेट्रोलींगची गाडी थेट रूमकडे,कितीही वाजो उठवून विचारणार सर हे कसे करायचे?? (हेच त्यांचे वेड त्यांना यशाच्या शिखरावर घेवून गेले, त्यांनी स्वतः तर अभ्यास केलाच पण सोबती पोलीस मित्रांनही अभिप्रेरीत केले..बाकीचे शहाणे( जे नंतर वेड्यात निघाले) त्यांना काय SP, IPS की PSI ? म्हणून चिडवायचे पण हे झपाटलेलेच!! खाते अंतर्गत फौजदार परिक्षेत 2 वेळा व MPSC च्या परिक्षेत एक वेळा सिलेक्शन घेवून ते थेट PSI झाले व MPSC ची पोस्ट जाॅईन केली. कधिही सहकारी मित्रांचे उट्टे काढणे नाही आजही" सर ! त्यांनी अभ्यास केला असता तर ते ही झाले असते" ही खंत व्यक्त करतात. ज्या(तत्कालीन) लातूर पोलिस अधीक्षक विश्वास नांगरे पाटील संरांच्या काळात ते काॅन्सटेबल म्हणून लातुरला भरती झाले होते, त्याच सरांच्या हस्ते( तत्कालीन विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापुर रेंज) त्यांच्या रेंज मधिल वळसंग हे सोलापूर जिल्ह्यातील पहिले ISO पोलिस स्टेशन करणारे ठाणेदार म्हणून सत्कार स्विकारताना व त्याला उत्तर देताना त्यांनाच किती अभिमान वाटला असेल!! व नांगरे पाटील सरांनाही कोण कौतुक वाटले असेल!!! एक एक दोस्त म्हणजे हिरा आहे हिरा!!!) त्या काळात इंद्रजितही भेटले, SP ऑफिस परिसरच अभ्यासमय झाला, अनेक जण अभ्यासाला लागले! कारवा बढता जा रहा था।....
निकालाची प्रतिक्षा वाढत चालली, मधेच हुल उठायची..निकाल लागणारआज,उद्या,परवा,आठवड्यात, महिन्यात.....पण तो काही लागत नव्हता..टेन्शन यायला लागले..जवळपास वर्ष होत आले होते निकाल लागत नव्हता..नविन अॅडव्हर्टाईज येणे अपेक्षित होते. पण ती ही नव्हती...आणी अचानक एके दिवशी पक्की बातमी आली
आज निकाल लागणार..! आत्मविश्वास होता आपण पास होणार !! आणी झालोच !!!! अगदी ठेवल्यासारखा माझा नंबर यादीत होता, ना पुर्वपरिक्षेसारखा चकवा ना तगमग! निकाल लागला समजले ! तडक गेलो उत्सुकता होती पण भिती??? छे! मुळीच नव्हती. नंबर पाहीला , एक वर्ष निघून गेले होते मुख्य परिक्षा होवून. दरम्यानच्या काळात अभ्यास ,वाचन, आत्ममग्नता यामुळे स्वतः बद्दल बरीच माहिती झाली होती.गुण अवगुण सारे कळले होते. फक्त आता त्याला व्यवस्थित रित्या मांडण्यासाठी तयारी करायची होती ती मुलाखतीची....!!
पण संदिप, अरूणभैय्या राज्यसेवेच्या मुलाखतीला पात्र झाले नव्हते. पण माझे मित्र विजय कबाडे (सध्या अपर पोलीस अधिक्षक बिड),दिनेश झांपले (तहसीलदार), रामेश्वर गोरे उर्फ रामभाऊ (तहसीलदार) हे मुलाखतीस पात्र झाले होते. लातूर मधुन महेश वरूडकर(अवर सचिव, मंत्रालय मुंबई) हे ही पात्र झाले होते. साधारणतः 15 जण लातूर मधुन मुलाखतीस पात्र झाले होते. लातुरच्या इतिहासात स्थानीक पातळीवर अभ्यास करून प्रथमच एवढे जण मुलाखतीला जाणार होते. सर्वत्र कौतुक दाटून आले होते. घरी निरोप दिला आई-वडील, भाऊ, मित्र आनंदाने न्हावून निघाले..माझी कथा..कर्मकथेकडून...दंतकथेकडे वाटचाल करत होती...आणी मी मुकपणे सा-यांचा आनंद पाहत मनोमन स्वतःला ठामपणे बजावत होतो...हा सर्वांना झालेला आनंद अल्पजिवी ठरू देवू नकोस...!! मी आपल्या कोषातच स्वतःला धार लावत होतो..माझ्या व सिलेक्शन च्या मधे मुलाखतीचा टप्पा उभा होता...आणी मी त्याला लांघणार होतो......
लगबग नुसती, काय करायचे माहीत होते पण ते बैजवार करण्यासाठी पुन्हा आम्ही एकत्र आलो...अभ्यास होताच पण त्याला सुव्यवस्थीकरणासाठी प्रयत्न सुरू झाले, सुदैव होते सुज्ञ आणी सारे पेटलेले दोस्त आसपास होते. द्रोण नसेल तर एकलव्य व्हायचे एवढे माहिती असल्याने एकमेकांना सावरणे, घोटणे,आकार देणे,वेळ प्रसंगी चुकत असल्यास हक्काने झापने सगळे सुरू होते.."लिंकींग मेथड" माझा नविनच शोध!!! मुलाखतीची तयारी करताना मी लिंकींग मेथड वापरायचे ठरवले.. बायोडाटा पाहून आपल्याला कुठला प्रश्न विचारला जाऊ शकतो? याची कल्पना करायची व त्यातुन कुठला ऊपप्रश्न निर्माण होऊ शकतो? त्यातुन कुठला...त्यातुन पुढे कुठला....?? असे मुळ प्रश्नाच्या सर्व बाजुने विविध लिंक तयार व्हायच्या.मग त्यावर उत्तर कसे देता येईल त्याचे अमुर्तीकरण, कल्पना करायची...म्हणून पहायचे..स्वतःवर ठासून ठासून बिंबवून घ्यायचे सर्व लिंक संपेपर्यंत उत्तरे शोधत रहायचे.सर्व लिंक पुर्ण करायच्या..यांच्यासाठी मोठमोठ्या ड्रॉईंग शिट वापरल्या...अनेक प्रश्न,ऊपप्रश्न समजुन घेता येवू लागले , कोठे कमी पडत आहोत हे ही समजायचे..लगेच तो टाॅपिक काढून त्यातला कोअर घ्यायचा.उत्तर बंदूक ठासल्यागत लोडेड करायचे..संध्याकाळी सर्वजण भेटायचो..विजय,रामभाऊ, दिनेश हे यायचे मी मार्गदर्शनासाठी तांदळे सर यांना बोलवायचो,ते ही आपला अनुभव सांगायचे. हा कालपरवाचा पोरगा इंटरव्ह्युला आहे.प्रतापराव सोडू नका, पुन्हा पुन्हा चान्स येत नाही म्हणुन आठवण करून द्यायचे.प्रश्न विचारण्यासाठी, डोकं लावण्यासाठी इतर तयारी करणारेही यायचे नवनवीन इनपुट द्यायचे...आपण वेडात निघावं आणी नियतीने अनेक शुभशकून पाठवावेत तसे होत होते..अनंत हात मदतीला धावत होते... एका एकटे पणाच्या रात्री मी विचार करत होतो..बि ए सेकंड ईअरला असताना आपण शेवटचा बुट पायात घातला होता एका अपमानाच्या क्षणी आपण मनोमन ठरवूनही टाकले होते या पायात घालण्यासाठी तेंव्हाच बुट घ्यायचे जेंव्हा आपण मुलाखतीला जाऊ....वेड माणसाला शहाणं बनवतं.....!!! वंचना माणसाला संयमी बनवते आणी त्या शांत संयमात दडलेली असते एक विक्राळ झेप....मी वरून शांत होतो पण ठरवलेलं वेड माझा हट्ट पुरवण्यासाठी अधिर झालं होतं....
कबुल केल्याप्रमाणे व माझ्यावरील अतिव विश्वासामुळे सगळ्यांशी बेट लावून " याचा इंटरव्ह्युचा शुज तर पुण्यातुन घेवू" असा त्या काळात आधार देणारा, मनोबल वाढवणारा मित्र आठवला...सकाळीच त्याचा निरोप आला होता लवकर पुण्याला ये तुझ्या इंटरव्ह्युची खरेदी करायची आहे. खुप वाट पहायला लावलास बे!!.....कट्टर दोस्त... दुसरे काय....फाटके झाकुन घेणारे सारे...भले स्वतः फाटके राहतील तरीही.....(प्रताप)
(क्रमश:)
No comments:
Post a Comment