Friday, April 30, 2021

कवी ग्रेसांच्या कविता- दुःख भराला आले...

#माझ्या कोरेन्टाईन काळातील संध्यामग्नता.....
••कवी ग्रेस.....भाग -2••
त्यांची "सांजभयाच्या साजणी" या काव्यसंग्रहातील
#"दुःख भराला आले"...ही अजोड कविता......
#सादरीकरण#

दुःख भराला आले म्हणजे
चंद्र नदीवर येतो;
पाण्याचेही अस्तर सोलुन
बिंब तळाला नेतो.

त्या काठावर स्वप्न उतरते
या काठावर डोळे झाक;
शब्द दुभंगून जातील तेंव्हा
पैलतिराहुन येईल हाक....

#Great Grace sir....
You tube channel- rachanaparv 




‍‌ 


कवी ग्रेसांच्या कविता...


#माझ्या कोरेन्टाईन काळातील संध्यामग्नता.....
कवी ग्रेस.....
त्यांची "संध्याकाळच्या कविता" या काव्यसंग्रहाची अप्रतिम व अजोड अर्पण कविता......
#सादरीकरण#

आकाश जसे दिसते
तशी म्हणावी गाणी
देहावरची त्वचा आंधळी
छिलून घ्यावी कोणी

गाय जशी हंबरते
तसेच व्याकुळ व्हावे
बुडता बुडता सांजप्रवाही
अलगद भरूनी यावे .....
‍‌❤ LOVE YOU GRACE SIR !!!!
रचनापर्व
You tube channel- rachanaparv

Wednesday, April 28, 2021

सागर एकला....

भिरभिरे मन कशाने
कसला गहिवर आला?
चांदण्याच्या वेचणीला
आडे किरणांचा शेला

वाळुच्या मनाला
पाणियाचा संग
परतत्या लाटांना
किना-याचा चंग

नावाड्याला फुटे कंठ
वल्हवतो गाणी
पाण्याच्या तळात झुरे
फेकलेली नाणी

सारस एकला
बसे डोलकाठी
सागर झुरतो
नदीच्या पाण्यासाठी

निळाईचा रंग
अवकाशी भिडे
थवा पाणपक्षाचा
दिगंतात उडे

युगाची कथा 
सागराची मोठी
ऐकण्या अधिर
देवमाशांची दाटी

तळामुळात दडली
नदीची अपार माया
दिले स्वतःचे गर्तपण
नदीस पांघराया

खोलखोल दुःख
सागर वाहतो
तळाच्या आतुन
चंद्र सुर्याला पाहतो

चांदव्याच्या खाली
उधाणतो वेडा
निघण्या अवकाशी
नदी घाले खोडा

मुक उभा युगे
सागर एकला
लाटा वाहूनी किनारी
जिव नदीचा थकला....
(Pr@t@p)
"रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com 
28/4/2021

Tuesday, April 27, 2021

रातीचा पाऊलमाग....

संथ पाण्यावर जळे 
बुडत्या सुर्याचे अंग
थबकत्या सांजवेळी 
पाण्यावर रंग

पहाडाची रात
अंधाराची बात
चैत्राची पुनव टाकी
चांदण्याची कात

चांद उगवतो नभी
सोनल किरणांची आभा
चकोर शिवतो अवकाशी
चांद देतो मुभा

माझ्या तळव्यात साचे
तुझ्या चेह-याचा आस
चांदण्याला येई मग
रातराणीचा सुवास

माझ्या डोळ्यांना येते 
तुझ्या डोळ्यांची झाक
पहाडाच्या आत घुमे
शिखराची ओली हाक

सोसवत नाहीत मग
चांदण्याच्या झळा
चांद झरतो मंद त्याला 
आसक्तीच्या कळा

झाडाखाली चंद्र 
झुकवितो मान
चांदणे करते 
चकाकीचे दान

रात चढते नभाला
भुईवर किरणांची दाटी
चांद उतरून येतो
भुईच्या ललाटी

चांद भेटतो रातीला
रात चंद्रात बुडते
चकोराचे गाणे
मनाला भिडते 

रात होते जणू
चांदण्याचा भाग
चंद्र काढतो किरणातुन
रातीचा पाऊलमाग
(Pr@t@p)
"रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com 
27/4/2021

Monday, April 26, 2021

दिव्याच्या खोलवर....


तुझ्या आभासाचा सागर
लाटा दिगंता भिडल्या
आभाळाच्या सावलीत
दोन साळुंक्या दडल्या

देते हवा उदासीची
बगळ्याला हुल
पाखरांना सतावते
मुकी घालमेल

मेणातुन झरे
ज्योतीची शलाका
मनी दाटे पुका-याचा
अभंग शेलका

दुःख बाणाचे अपार
धनूष्याला ठावे
घायाळ सारसाचे
मन शिका-यास भावे

रक्तवर्णी सायंकाळी
अंधार का दाटे?
एकल्या वाटेचा
उर उसासून फाटे

येते हवा हळू
मुक ढगातून थोडी
चांदण्यात ऊडे दुर
साळुंक्याची जोडी

खिडकीला बाधे
नजरेची आण
पावलांना द्यावे
तुझ्या वाटेचे ते भान

मी हृदयी जपले
फुलपाखरांचे भाव
फुलावर माझ्या
बहराचे खोल घाव

गंध झरतो चांदवा
चांदण्याला गंध
मी सोडवून घ्यावा
तुझ्या आठवांचा बंध

दे पेरून शलाका
दिव्याच्या खोलवर
दुर सार हा अंधार
अलगद अलवार.....
(Pr@t@p)
"रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com
26/4/2021





Sunday, April 25, 2021

मुके वाळवंट...

शब्दांचा दुष्काळ दिर्घ
दुराव्याचा वैशाख पेटे
ते रस्तेही निघाले ओढीने
न जाणो कोण भेटे?

सावल्यांचे आत्मे टांगून
हा वारा दिशाहीन चाले
पारव्यांच्या उदास पंखाना
लगडत नाहीत फुले

फुलांचे शोषूण गंध
देठ सोडले मागे
फुलपाखरांच्या पंखाचे
तरीही उगाच त्रागे

रेगीस्तानाच्या आत्म्यात
मृगजळाचा साठा
तहानलेल्या जिवा...
शोधत ये तु वाटा

हे मुसाफिरांचे तांडे
ते फकिरंचे पाक दुवे
रेतीच्या ढिगावर उतरती
कवितेचे मुक थवे

चांदबुडीची रात
अंधार दाटलेला
गझलेच्या वहीचा हा
कोनाही फाटलेला

वा-यातुन गझल वाहे
तुझ्या विराण दिशेला
मी शब्द सजवून देतो
चुंबण्या मृगजळी आशेला

शब्दांच्या जोडीला
पाखरे देती पंख
मी उचलून घेतो वैराण
विंचवाचे जहरी डंख

उमटत नाहीत पावले
रेती बेईमान वाहते
तरीही वाळवंट मुक्याने
वाट कुणाची पाहते?
(Pr@t@p)
"रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com 
25/4/2021

Saturday, April 10, 2021

कवितेचे सुगंधगाणे...

आता सुगंध फितवत नाही 
फुलांचे कोडे सुटले
बहर असे विश्वासाचे
काट्यांनी अलगद लुटले...

दिनवाण्या पाकळ्याचे 
अस्तर कसले भुलवे!
सोसावे गंध महकती
की काट्यांचे जलवे??

लावून बागा नेटक्या
रान फितूर झाले
भुंग्याचे काळीज हळवे
उगाच आतुर ओले

मी घेवून आपली वही
त्यात ठेवून देतो फुल
माफ ही करून देतो
फुलाची.. चुक..भुल...

हवे तुला जर अत्तर
घे वहीचे पाने!
हृदयात भरून येईल
कवितेचे सुगंधगाणे....
(Pr@t@p)
"रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com 
10/4/2021

Saturday, April 3, 2021

कु-हाडीची लाज...

झाड निजले दुपारी
उन्हाचीच छाया
द्यावी त्याला पांघराया
स्वतःचीच काया

झाड फुलले मुक्याने
चिमण्यांची हाक
बहराला वाटे
कु-हाडीचा धाक

झाड तुटले दुपारी
चिमण्यांना शोक
रानाचं काळीजही
होतं ओकंबोकं

रान उचलून घेई
त्याचे एक बिज
नवरोपटे राखते
कु-हाडीची लाज
(Pr@t@p)
"रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com
3/4/2021





Friday, April 2, 2021

खुशाली....

झाडालाही असते गणगोत
ते नसते अनाथ, अनौरस...
दुर जंगलात त्याचे कुळ
फुलत असते
ऊन,वारा,पाऊस झेलत..
••••
अतिव इच्छा असुनही
त्याला भेटता येत नाही त्यांना
कडकडून...
उडत येणारी पाखरे,हवा
जमिनीवरून वाहत येणा-या
पाण्यातुन होते खुशालीची
ओसाड देवाणघेवाण
हर हंगामात..
••••
अवचीत एके दिवशी
कु-हाड उगारली जाते
लाकुडतोड्याच्या हातातील
कु-हाडीस भाऊबंदाच्या
फांदीचा दांडा पाहून
झाड कडकडून भेटते
कु-हाडीस...
•••••
पुढच्या हंगामात खुशाली
येते...
पण झाड असत नाही...
●●●
(Pr@t@p)
"रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com
2/4/2021




Thursday, April 1, 2021

तपशील नसणारी भिंत...

तुझ्या माझ्या दरम्यान
उभी एक भिंत
कातळकडी दिवळीला
तपशिलाची खंत?

पत्थराच्या देवा तुला
किती वाहू फुले?
काळजाला भिडलेले
उंच तुझे झुले

ही कापुरी संध्या
झाडात अग्नी का जळे?
जात्याच्या पाळीला
दुःख पसाभर मिळे

वेलींची फुलतोडणी
बहरत नाही काया
फुलपाखरांचे वसंत
पंखाखाली वाया

दुःख मनाचे हलके
दगडाच्या देवा पाशी
दाटून आल्या सयीच्या
वेलीखाली राशी

तळ्यावर येती गायी
दुःखाचा घेवून घडा
पाण्यात बुडल्या सावलीला
हंबरण्याचा तडा

गाईस फुटतो पान्हा
तळ्यात कालव चाले
उभ्या एकल्या झाडाचे
झडती रंगीत फुले

वाटेस कसले देणे?
धुळ उंच उंच उडे
व्याकूळ होवून पान्ह्यात
रान अलगद बुडे

वळीवाच्या आगंतुक सरी
रान अलगद झेली
भिंतीस बिलगते तळयाची
गर्त ओली खोली

भिंत अलवार झरावी
दरम्यान असावा वारा
तुझ्या माथ्यावर रेखावा मी
एक तेजस्वी तारा....
(Pr@t@p)
"रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com
2/4/2021




























राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...