Thursday, April 1, 2021

तपशील नसणारी भिंत...

तुझ्या माझ्या दरम्यान
उभी एक भिंत
कातळकडी दिवळीला
तपशिलाची खंत?

पत्थराच्या देवा तुला
किती वाहू फुले?
काळजाला भिडलेले
उंच तुझे झुले

ही कापुरी संध्या
झाडात अग्नी का जळे?
जात्याच्या पाळीला
दुःख पसाभर मिळे

वेलींची फुलतोडणी
बहरत नाही काया
फुलपाखरांचे वसंत
पंखाखाली वाया

दुःख मनाचे हलके
दगडाच्या देवा पाशी
दाटून आल्या सयीच्या
वेलीखाली राशी

तळ्यावर येती गायी
दुःखाचा घेवून घडा
पाण्यात बुडल्या सावलीला
हंबरण्याचा तडा

गाईस फुटतो पान्हा
तळ्यात कालव चाले
उभ्या एकल्या झाडाचे
झडती रंगीत फुले

वाटेस कसले देणे?
धुळ उंच उंच उडे
व्याकूळ होवून पान्ह्यात
रान अलगद बुडे

वळीवाच्या आगंतुक सरी
रान अलगद झेली
भिंतीस बिलगते तळयाची
गर्त ओली खोली

भिंत अलवार झरावी
दरम्यान असावा वारा
तुझ्या माथ्यावर रेखावा मी
एक तेजस्वी तारा....
(Pr@t@p)
"रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com
2/4/2021




























No comments:

Post a Comment

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...