Monday, April 26, 2021

दिव्याच्या खोलवर....


तुझ्या आभासाचा सागर
लाटा दिगंता भिडल्या
आभाळाच्या सावलीत
दोन साळुंक्या दडल्या

देते हवा उदासीची
बगळ्याला हुल
पाखरांना सतावते
मुकी घालमेल

मेणातुन झरे
ज्योतीची शलाका
मनी दाटे पुका-याचा
अभंग शेलका

दुःख बाणाचे अपार
धनूष्याला ठावे
घायाळ सारसाचे
मन शिका-यास भावे

रक्तवर्णी सायंकाळी
अंधार का दाटे?
एकल्या वाटेचा
उर उसासून फाटे

येते हवा हळू
मुक ढगातून थोडी
चांदण्यात ऊडे दुर
साळुंक्याची जोडी

खिडकीला बाधे
नजरेची आण
पावलांना द्यावे
तुझ्या वाटेचे ते भान

मी हृदयी जपले
फुलपाखरांचे भाव
फुलावर माझ्या
बहराचे खोल घाव

गंध झरतो चांदवा
चांदण्याला गंध
मी सोडवून घ्यावा
तुझ्या आठवांचा बंध

दे पेरून शलाका
दिव्याच्या खोलवर
दुर सार हा अंधार
अलगद अलवार.....
(Pr@t@p)
"रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com
26/4/2021





No comments:

Post a Comment

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...