संथ पाण्यावर जळे
बुडत्या सुर्याचे अंग
थबकत्या सांजवेळी
पाण्यावर रंग
पहाडाची रात
अंधाराची बात
चैत्राची पुनव टाकी
चांदण्याची कात
चांद उगवतो नभी
सोनल किरणांची आभा
चकोर शिवतो अवकाशी
चांद देतो मुभा
माझ्या तळव्यात साचे
तुझ्या चेह-याचा आस
चांदण्याला येई मग
रातराणीचा सुवास
माझ्या डोळ्यांना येते
तुझ्या डोळ्यांची झाक
पहाडाच्या आत घुमे
शिखराची ओली हाक
सोसवत नाहीत मग
चांदण्याच्या झळा
चांद झरतो मंद त्याला
आसक्तीच्या कळा
झाडाखाली चंद्र
झुकवितो मान
चांदणे करते
चकाकीचे दान
रात चढते नभाला
भुईवर किरणांची दाटी
चांद उतरून येतो
भुईच्या ललाटी
चांद भेटतो रातीला
रात चंद्रात बुडते
चकोराचे गाणे
मनाला भिडते
रात होते जणू
चांदण्याचा भाग
चंद्र काढतो किरणातुन
रातीचा पाऊलमाग
(Pr@t@p)
"रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com
27/4/2021

No comments:
Post a Comment