Friday, April 28, 2023

सांजार्त-पुरस्कार




                         *पसायदान राज्यस्तरीय काव्यपुरस्कार जाहीर*
*********************** 
यंदा *दशकपुर्ती साजरी करणार्या मु .पो. गुहागर .जि. रत्नागिरीच्या *पसायदान* राज्यस्तरीय पुरस्कार २०२३ची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे.*२०१४वर्षापासून *पसायदान प्रतिष्ठान गुहागर* यांच्या वतीने महाराष्ट्रातील गुणवत्तापूर्ण आणि सकस लेखन करणाऱ्या कवींना हा *पसायदान* *राज्यस्तरीय काव्य पुरस्कार दिला जातो .आतापर्यंत महाराष्ट्रातील अनेक मान्यवर कवींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.(श्री  संतोष कांबळे, गीतेश शिंदे, सचिन गांगुर्डे, डी के शेख, संजय चौधरी,मांगीलाल राठोड,साईनाथ पाचारणे,अनिल पाटील,प्रमोदकुमार अणेराव ,रमजान मु्ल्ला,हबीब भंडारे आदि ते माधुरी मरकड, प्रतिभा सराफ) मागविलेल्या  प्रवेशिकांतून उत्कृष्ठ कवितासंग्रहासाठी हा सदर पुरस्कार प्रदान करण्यात येतो.नुकतेच *वर्ष २०२२च्या काव्यसंग्रहांसाठीचे" पसायदान राज्यस्तरीय काव्यपुरस्कार "मान्यवर परीक्षकांकडून जाहीर करण्यात आले आहेत. यात *सुप्रसिद्ध कवी आबासाहेब  पाटील( मुनशी, बेळगाव )यांच्या "घामाची ओल धरून" , तसेच प्रसिद्ध लेखक, समीक्षक, बालसाहित्यिक, राष्ट्रपती पुरस्कार विजेते, डाँ श्रीकांत पाटील (कोल्हापुर, घुमकी ,)यांच्या "झाडोरा" आणि प्रशासकीय सेवेत असून साहित्यक्षेत्रात आपलं स्थान मिळविणारे, सावनेर तालुक्याचे तहसीलदार  व कवी प्रताप वाघमारे (नागपूर) यांच्या "सांजार्त" या कवितासंग्रहाला या कवितासंग्रहांना हा *पसायदान*राज्यस्तरिय  काव्यपुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.  *रोख रक्कम तीन हजार ,शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह,सन्मानपत्र  असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.लवकरच  या पुरस्कारप्राप्त कवींना मान्यवरांच्या हस्ते ज्येष्ठ साहित्यिकांच्या हस्ते चिपळूण येथे *जागर साहित्य संमेलनात या पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल असे *पसायदान प्रतिष्ठान* यांच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे. पुरस्कार प्राप्त सर्वांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

======================

Thursday, April 20, 2023

अत्तरगंध



गवगवा अत्तराचा
मुठ अशी का झाकतो?
लाज कुण्या फुलाची
तो रानावनात राखतो? 

होतो कधी कुठले
तो मुक निळे मन्वंतर 
कधी धावत वक्षी बिलगे
तोडत सारे अंतर

मागू कशास काही
गंध कधी का साठतो?
अनाहुत झुळूकीवरती
तो भास नव्याने वाटतो

तरीही कुपी होवुन 
जिव असा का बसतो?
तुझ्या निश्वासामधुनी
माझा अत्तरगंध हसतो.....

やraτa प"
www.prataprachana.blogspot.com
२०.४.२०२३
 


 












Sunday, April 16, 2023

मौनहाक


मौनावर हाक अंथरे
आठवांचा मखमली शालू
एक एकल्या माझ्याशी
दिर्घ किती मी बोलू? 

आणु कुठले शब्द 
वर्तुळ कसे संपावे?
अजान हाक नभाला
का मन कंपावे?

तुझ्या दिशेची सावली
लांबेल का जराशी?
उन्हे उभे बघ व्याकुळ 
बंद तुझ्या दाराशी

मी लिहतो आहे इकडे
संथावली बावर गाणी
सुर तुझ्या हुंदक्याचे
होताना आबादानी

स्वप्नात अशी का वाट
उगाच वेडी सुटते?
न पडणारे स्वप्न मग
तुझ्या मनात तुटते

やraτa प"
www.prataprachana.blogspot.com
१७.४.२०२३
 




 
 

 

 

अद्वैती


साजन दुर गेला
ठेवुन मागे हाक
हाकेस त्या हंबराच्या
घुमारे लाखलाख

वनवास असा कसा हा
सितेस वन लागे
झाडांचे आत्मे गेले
मारिच पावला मागे

बेंबीच्या देठामधुनी
हाक अशी का फुटते?
कोण चांदणी वेडी
आभाळातून हमसून तुटते?

नागीण वळणी वाटा
वारुळ वेढत राहते
मनात या अनाम
कोण निरंतर वाहते?

हा कसला खंड पडला?
अखंड कसे व्हावे?
तुला भेटण्या व्याकुळ 
मनी दाटले धावे..

शोधु कसे कुठे
की वृक्षास अलिंगन देऊ?
की तुला खुण पटण्या
मी चुडामण होऊ?

कोणाशी युद्ध पुकारु?
की हसरा बुद्ध होऊ?
की तुझ्या अंतरी येवुन
अद्वैती सिद्ध होऊ?

やraτa प"
www.prataprachana.blogspot.com
१६.४.२०२३
 


  




 


  



मिलनप्रकाशी ...


मी थिजलो आहे तेथे
जेथे वाटा फुटती
झाडांच्या काळजातल्या
जणु हिरव्या फांद्या तुटती

मी सजलो आहे तेथे
जेथे आसवे ढळती
आणी गर्द धुक्यातून 
पाने शुष्क गळती

मी निजलो आहे तेथे
जेथे बदक एकला राहतो
सजनीच्या पायरवाचा 
जिव अदमास घेतो

मी विझलो आहे तेथे
जेथे चंद्रमावळी दिशा
उगत्या दिशेस दिलीय ना?
तु मिलनप्रकाशी आशा....

やraτa प"
www.prataprachana.blogspot.com
१४.४.२०२३
 



देशांतर


होताहे देशांतर माझे
जणु मी खुद्द हरवतो
रित्या उदास फांद्यांवर 
मी भास जुने मिरवतो 

हे अनाम दुःख अनुत्सुक 
जेरबंद होऊन अडते
रित्या एकल्या खोप्यासाठी
मुळ तळात रडते

हसते झाड उशाला
डोक्यावर शिशिर येतो
अनाम बहर धारण्या
कसला उशीर होतो?

शहरातील घड्याळाचे
कसे थांबवू काटे?
मी मुक्या गतीने निघतो
टाळतो बोभाटे...
 
घेऊ तळे कुशीला?
की होऊ वाहते पाणी?
बदले कुस दुरावा
हो एकांत आबादानी

दुःख तुझे गोजिरे 
काळजात बघ हसले
मी बुडवून माझी गाथा
गाऊ अभंग कसले?

राहशील का तु असाच
भगवंत पावणारा?
शब्दांच्या गालखळीवर
तिट लावणारा 

"やraτa प"
www.prataprachana.blogspot.com
१३.४.२०२३












 


महासुर्य


नभात रंग ऊधळण 
अंधार हटवण्यासाठी
महासुर्या तुला वंदन 
माझे कोटी कोटी....

"やraτa प"
www.prataprachana.blogspot.com
१४.४.२०२३




परिघ

सहस्रके ओलांडून 
तु आलास
अभंगी शब्दांची 
मानवता पेरत...
निःशब्द जाणीवांना
तु दिलेस
अथांग आभाळ....
त्या आभाळाचा
प्रज्ञापाऊस..
वाहतो आहे 
रानाशिवारातुन...
मानवतेचे पिक
आता फोफावते आहे
मनामनात...
आणी आम्ही
तयारी करताहोत
सहस्रके ओलांडण्याची....
तुझे आभाळ 
ओलांडते आहे
आकाशगंगेचा परिघ.... 
"やraτa प"
www.prataprachana.blogspot.com
१३.४.२०२३












Tuesday, April 11, 2023

वज्रधैर्य.....


चंदनाचे हात हे
गंध घरोघरी
अंधार सारणा-या
या तेजो प्रकाशसरी

'फुले' सुगंधलेणे
तेजोमय क्रांतीसुर्य
हुंदक्याना चेतवणारे
हे अपार वज्रधैर्य....

"やraτa प"
www.prataprachana.blogspot.com
११.४.२०२३
क्रांतिरत्न बा ज्योती यांना नमन!



 









Friday, April 7, 2023

चैत्रावकाळी सर



मातीस ओला गंध
चैत्राच्या संध्याकाळी
कणास बिलगुन गेली
सर एक अवकाळी

शाम ढगाचा धावला
जणू राधा ही अवनी
एक एकली साळुंकी 
झाली फांदिची पाहुणी

रिमझिम सर मारे
अंधुक रेघोट्या
मातीतून उगवती
हेमकांती गारगोट्या

चेतलेल्या हवेमधे
आला शितल थंडावा
वारा उधाणुन करे
झाडपानांशी पुंडावा

ढगाच्या मनाला
कोण जाणे काय वाटे?
तो गरजतो मौन
माझ्या काळजाच्या वाटे

माझ्या मनातला ढग
निघे थेट तुझ्या गावा
तुझ्या मातीने धाडला
त्याला राधेचा सांगावा..... 

"やraτa प"
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
७.४.२०२३



 



 








Thursday, April 6, 2023

चैत्र चांदवा


चैत्र चांदवा सखे!
तुजसम उगवून आला
तुझ्या दिशेला उडते
निद्रेची पक्षीमाला

सांग कुठे मी उजवू
पंखात साचली आभा?
खिडकीस तुझ्या उजळण्या 
देशील का तु मुभा?

किती दुर हा थवा
कापत निघतो अंतर
चकोर तुझ्या आसेचा
त्यास उडे समांतर 

दोहोनाही वाटे
चंद्र कवेस यावा
आस कुशीचा व्याकुळ 
हळवा चैत्र व्हावा!

"やraτa प"
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
६.४.२०२३










Tuesday, April 4, 2023

पेशींचा दिशाभ्रम....



माझ्या पेशींना होताहे
दिशाभ्रम कधीचा
मी काढत असता माग
विराट लुप्त नदीचा

सरुप रंध्र माझे
निराकार आवेग वाहे
उदात्त दुःख माझे
का मागे मागे राहे?

आत्म्यास जाग येता
स्वप्नांची सावली पडते
दुर तळ्याच्या काठावर
का सखी अवघडते? 

ती हसते,ती रडते
ती बनते कंठ झरणारा
दवबिंदुच्या डोळ्यांमधला
ती थेंब ओल भरणारा

ऊर तिचा का दाटे
उजाड एकट राती?
हिरवळीस पाडते भुल
तिच्या पायतळाची माती

तिच्या हाकांचे वैभव
अवकाश लाल रंगीत
दुर टेकडावरती वाजे
रित्या सुरांचे संगीत.......

मी अर्थ लावत सुटतो
तिच्या शब्द खुणांचा
मी शून्यातून काढतो माग
तिच्या फुलबनाचा...
"やraτa प"
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
५.४.२०२३


 






 


 


Monday, April 3, 2023

शेवट टिंब


श्वास रोखून धरते
ओठातली आसुस हाक
देवदुताच्या पंखाला
बाधते वैराग्याची झाक

काय असे मी मागु ?
पदरी न जे पडे
कशास फेकु पटलावर
इप्सिताचे शकुनखडे?

धुळीत शोधतो मी
तुझ्या गावच्या वाटा
श्राप दुराव्याचा सजवे
या अधोमुख ललाटा

पंख पसरून शोधतो
पक्षी निर्भयाचे आत्मबळ
तो तळ्याच्या अंतरातली
प्राषुण घेतो कळ

मी त्या तळ्यातील धुसर
तुझ्या सावलीचे बिंब
तु आक्रोशुन लिहिलेल्या
कवितेतले मी शेवट टिंब........

"やraτa प"
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
४.४.२०२३

 











Sunday, April 2, 2023

एकांतास सद्गती


तळे तुझ्या मनाचे
एकला बदक राहतो
झाडांचा आत्मा तुटका
सुन्न मनाने पाहतो

तु बसली होती तेथे
शब्दांचे हिरवे वारे
हृदयतळाचे निनाद 
एकांती थरथरणारे

आजही गंध मनाला
तु वेचल्या कळ्यांचे
नयनी स्तब्ध आवेग
दाटल्या गळ्यांचे

तु शब्दबनाच्या वाटा
सोडुन निघता मागे
मी गंधफुलांचे माग
ठेवतो कळण्याजोगे

भयकंपीत असते नसणे
कसे तुला मी सांगू?
मनातल्या हाकांना
रामप्रहरी कसा लांघु?

गाठेन कधी मी तळे
ओळखण्या तुझी खुण
मनात गुंजत असता 
तुझ्या कुळाची धुन 

ठेव हाक एक मागे
मिठी न राहो रिती
एकांत व्याकुळ माझा
दे त्यास तु सद्गती.......

"やraτa प"
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२.४.२०२३












 





राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...