Saturday, March 21, 2026

कूंजणीचा विलाप



ढग काळे काळे पाहुन चुकला
कुंज पाखरी थवा
कुठल्या युद्ध भुमिची ही
मरण भयाची हवा
 
आला वसंत म्हणुनी येथे 
परतुन निघाले घरा 
शांत मनाने कुणी चेतवली 
ही सुख शांतिची धरा?
 
चुकतात आस्मानी रस्ते अन्
फुटतात थवेच्या थवे 
हं! शांतिसाठी युद्ध म्हणे !
पोकळ हे गवगवे
 
 
नुसतीच धरेवर नसते
आकांत भारली हाक
कुंजनीच्या टाहोलाही
ये वैधव्याची झाक!
 
शोधत राहते कुंजा
फिरते दिशा दाही
जिव तिचाही होतो
अलबत लाही- लाही
 
धरणीचा असा हा टाहो
आभाळाला  भिडतो
युद्धाच्या मग रणकुशीला 
हसरा बुद्ध रडतो!
 
ती शोधत कलेवर असते
तिच्या प्रिय सख्याचे
आभाळ दाटुन येते 
काळया गर्द धुक्याचे
 
ती  शोधते  धरेवर सारे
विध्वंस तिला हा दिसतो
दुर ढिगारी मलब्याच्या 
पंखाचा तुकडा दिसतो
 
 ती परतुन निघत नाही
ती अग्नीबाणा भिडते
सख्यास तिच्या भेटाया ती 
स्फोटा मधुनी उडते!
 
कोणास हवी ही शांती
जी मरणा आडुन येते
आणी जिवंत ऋतुच्या 
चैतन्या खुडुन नेते----

₱Ɽ₳₮₳₱)
रचनापर्व 
www.prataprachana.blogspot.com

इराण इस्त्रायल युध्दात वाट चूकणा-या आणी आपल्या जोडीदार गमावणा-या पाखरथव्यास अर्पण....कूंज पक्षी राजस्थानी लोकगीतातील प्रेमाचे प्रतीक असणारा आणी आयुष्यभर आपल्या जोडीदाराबरोबर एकनिष्ठ राहणारा आणी भारतात प्रतिवर्ष येणारा मध्य आशियातील पक्षी



No comments:

Post a Comment

अत्त दिप भव!

शाक्यमूनी तथागता! वैशाख पोर्णिमेस तू पद्मफूलावर पाय देत अवतरलास ! मात्र ! बूध्दत्व साधण्यासाठी तू धुंडाळलेस कितीतरी काटेरी मार्ग! निकराने नि...